Labels

माझा परिचय माझी कविता मोडी दफ्तर शिवछत्रपती महाराज श्रीमंत पेशवाई संकीर्ण लेखसंग्रह

भोसले कुळाचा पुर्ववृत्तांत


          शिवाजी महाराजांबद्दल आज ज्या अनेक गैरसमजुती पसरलेल्या आहेत त्यांपैकीच एक म्हणजे महाराज नक्की कोण होते याविषयी आहे ! काही लोकांचं म्हणणं आहे की महाराज राजपूत होते, काहींचं म्हणणं आहे की महाराज धनगर होते, काहींचं म्हणणं आहे की महाराज कानडी होते तर काही म्हणतात ते मूळचे महाराष्ट्रातीलच, मराठा होते. परंतू अस्सल ऐतिहासिक साधनांचा उहापोह केला असता, त्यात दिलेली माहितीच ग्राह्य धरून चालले पाहिजे. आणि म्हणूनच, सर्वप्रथम, पूर्विच्या बखरी अथवा इतर साधनांतून शिवाजी महाराजांचं, अथवा, पूर्ण भोसले घराण्याचंच कुळ नेमकं कुठलं आहे हे तपासायला हवं !
          शिवचरित्राचा अभ्यास करताना जे काही पुरावे तपासले जातात त्यात बखर हे वाङ्‍मय दुय्यम दर्जाचं असलं तरीही त्याचं महत्व हे कमी होत नाही. शिवाय, महाराजांच्या कुलवृत्तांताविषयी अस्सल पत्रांमध्ये अतिशय नगण्य माहिती मिळते, जो काही भरवसा ठेवावा लागतो तो बहुतांशी बखरींवरच ! उपलब्ध असलेल्या बखरींपैकी, जो अतिशय विश्वसनिय असा पुरावा मानला जातो, ती कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासद याने लिहीलेली ‘सभासद बखर’ आहे, परंतू सभासदाने शिवाजी महाराजांच्या पूर्वजांबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. त्याने थेट मालोजीराजे आणि विठोजीराजांवर केवळ एक परिच्छेद लिहीला आहे. श्री विनायक लक्ष्मण भावे यांनी ‘मराठी दफ्तर रुमाल पहिला’ मध्ये छापून प्रसिद्ध केलेली ‘शेडगावची बखर’ हीचा या प्रकरणासाठी संदर्भ म्हणून विचार केला आहे. ही बखर नेमकी कोणी लिहीली हे समजत नसलं तरीही, त्यातील, तीन वेगवेगळ्या वळणाच्या लिखाणाच्या पद्धतीवरून आणि बोरूच्या फरकावरून हे लिखाण तीन वेगवेगळ्या कालखंडात केलं गेलं आहे यात संदेह नाही. या बखरीची अस्सल प्रत भावे यांना सातार्‍यात मिळाली. आणि त्यातही लक्षात घेण्याचा मुद्दा हा की, बखरीतील कालखंड आणि घटना या इतर मिळालेल्या पुराव्यांशी अत्यंत मिळत्या जुळत्या आहेत. आणि ही बखर शकावलीच्या स्वरूपात अनेक तारखंसह लिहीली असल्याने, खुद्द भोसले घराण्याशी संबंधीत जवळच्याच व्यक्तिने ही बखर लिहील्याचे यावरून स्पष्ट होते. माझा असा तर्क आहे की, कदाचित या बखरीतील शिवरायांच्या कालखंडाचा वृत्तांत सभासदाने लिहीला असावा, कारण त्याच्या बखरीतील मजकुर हा बहुतांशी या बखरीतील मजकुराशी तंतोतंत जुळतो. परंतू असे विधान ठामपणे करण्यासाठी कोणतीही नोंद उपलब्ध नाही. असो, तर या ‘शेडगावच्या बखरीत’ शिवाजी महाराजांच्या कुलवृत्तांता संबंधी काय माहिती आहे ते आता पाहू-
          शेडगावकरांच्या बखरीत सुरुवातीलाच, “ सिसोदे महाराणा याची वौशावळ मारवाड देशाचे ठाई उदेपुरानजिक चितोडे शहर आहे तेथे एकलिंग माहाराज शंभू माहादेव व श्री जगदंबा देवी आहे तेच कुळस्वामी तेथील संवस्थानी सिसोदे माहाराणे आहेत. त्यांतिल एक पुरुष सजणसिव्हजी माहाराणे याजपासून संततीचा विस्तार: ” असे म्हणून त्यातील एकेक करून चौदा पुरुषांचे फक्त नाव नमुद केलेले आहे. त्यावरून कोण नेमका कोणाचा पुत्र अथवा कोणाचा भाऊ हे समजून येत नाही. ती सर्व नावे पुढीलप्रमाणे-

१. सजणसिव्हजी माहाराणा   २. दिलिपसिव्हजी माहाराणा   ३. सिव्हाजी माहाराणा
४. भोसाजी माहाराणा             ५. देवराजजी माहाराज           ६. इंद्रसेनजी माहाराज
७. शुभकृष्णजी माहाराज        ८. स्वरूपसिव्हजी माहाराज    ९. भुमिंद्रजी माहाराज
१०. यादजी माहाराज             ११. धापजी माहाराज               १२. बर्‍हाटजी माहाराज
१३. खेलकर्णजी माहाराज       १४. मालकर्णजी माहाराज.

इथे बखरीत असं नमुद केलं आहे की, चितोडगडाच्या जवळच भोशी किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या जवळच असणार्‍या भोसावत या गावी रहायला आल्यापासून या राजवंशाचे शिसोदे हे आडनाव मागे राहून ‘भोसले’ असं झालं. तर्क असा आहे, की अल्लाउद्दीन खलजीने चितोडगडावर आक्रमण केल्यानंतर चितोडचा महाराणा लक्ष्मणसिंह शिसोदिया हा आपल्या सात मुलांसह लढता लढता मारला गेला, आणि त्याच्या आठव्या पुत्राला, अजयसिंहाला राजपुतांनी खलजीपासून वाचवून सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवले. कदाचित अजयसिंहांचेच हे पुढचे वंशज खलजीपासून बचाव करण्यासाठी, आपला शिसोदिया म्हणून निर्वंश होवू नये म्हणून ‘भोसावत’ या नावाने राहू लागले असावेत. पण या गोष्टीला हवा तसा पुरावा आजुन सापडलेला नाही.
          या शिसोदिया कुळातल्या राजांच्या दक्षिणेतल्या प्रवेशाबद्दल शेडगावकरांचा बखरकार म्हणतो, “ येकंदर पुरुष चौदा त्यांपैकी खेलकर्णजी माहाराज व मालकर्णजी माहाराज असे दोघे बंधू हे दक्षणदेशी आलें ते आमेदशा पातशहा दौलताबादकर ( दौलताबादचा अहमदशहा निजामशहा) यास येऊन भेटले. त्यानी त्यांचा मोठा सन्मान करून नंतर दर असामीस प्रथक प्रथक (?) पंधरा पंधराशे स्वारांच्या सरदार्‍या मणसब देऊन हे (भोसले बंधू) पातशाही उमराव म्हणवीत होते. त्या उभयता बंधूंच्या नावे सरंजाम चाकरीबद्दल चाकण चौर्‍यासी (चाकण आणि भवतालची चौर्‍यांशी खेडी) परगणा व पुरंधेरचे खाली परगणा व सुपे माहाल असे तीन माहाल तैनातीबद्दल त्याजकडे लाऊन दिल्हे त्याप्रमाणे ते उभयेता बंधू चाकरी करीत होते ”.
          बखरकार म्हणतो, की या उभयतां भावांना खेलकर्ण आणि मालकर्ण ऐवजी खेलोजी आणि मालोजी अशी नावे पडली. याचे कारण बखरकार लढाईच्या निमित्ताने देत असला तरी याचे मूळ कारण असे असावे- सुलतानी अंमलात, मुसलमान लोक हे एखाद्या हिंदूला, जरी तो बडा सरदार अथवा सेनापती असला तरीही काफर म्हणून तुच्छतेनेच संबोधत असत. यासाठी पुढील व्यक्तिंची उदाहरणे पाहू. महाराजांच्या पंताजी गोपिनाथ बोकील या वकीलाला अफजलखान ‘पंतू’ म्हणायचा. औरंगजेब नेतोजी पालकराला ‘नेतू’, खुद्द शिवाजी महाराजांना ‘सिवा’ आणि संभाजी महाराजांना ‘संभा’ म्हणायचा हे अस्सल पत्रांतू दिसून येतं. त्यामूळेच इथेही साहजिकच, ‘खेलकर्णजी’ आणि ‘मालकर्णजी’ ही नावे गळून पडून खेलो आणि मालो असेच उल्लेख केले गेले असावेत. अर्थात, हे दोघेही कितीही झालं तरी निजामशाहाचे सरदार असल्याने त्यांच्या नावापुढे ‘जी’ हे आदरार्थी विशेषण लावणे भागच होते. म्हणूनच यांची नावे पुढे ‘खेलोजी’ आणि ‘मालोजी’ अशीच रुढ झाली. पुढे खेलोजी हे लढाईत ठार झाले आणि मालोजी हे एके दिवशी चाकणजवळच्या चासकमान (थोरल्या बाजीरावांच्या पत्नीचे माहेरही याच गावचे होते) गावात जलक्रिडा करावयास गेले असता बुडून मृत्यू पावले. त्यांचे पुत्र बाबाजीराजे (जन्म शके १४५५) हे लहान असल्याने निजामशाहाने मालोजींची ईनामदौलत अनामत करवून सरकारात दाखल केली. मालोजींची पत्नी आपला पुत्र बाबाजीला घेऊन दौलताबादेपासून पाच कोसांवर असणार्‍या वेरूळ जवळच्या घृष्णेश्वरासन्निध जाऊन राहिली. तिच्याजवळ असणार्‍या पिढीजात आसवाबातून आणि मालोजींच्या असणार्‍या थोड्याफार जमिनीत शेती करवून त्यांचा निर्वाह चालला होता. पुढे बाबाजीराजे मोठे झाल्यानंतर भीमा नदीच्या काठावर ‘मौजे देऊळगाव तर्फ पाटस परगणे पुरंदर’ येथे येऊन मौजे देऊळगाव, मौजे खानवटे आणि मौजे कसबे जिंती (?) या भीमातीरावरच्या तीन गावांच्या पाटीलक्या खरेदी केल्या. पुढे परिधावीनाम संवत्सरे शके १४७४ मध्ये बाबाजीराजांची पत्नी प्रसुत होऊन पुत्र झाला. या पुत्राचे नाव ठेवण्यात बाबाजीराजांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवले मालोजीराजे ! यानंतर बाबाजीराजांना आणखी एक पुत्र झाला, याचे नाव ठेवण्यात आले विठोजीराजे. पुढे मालोजी आणि विठोजी हे आपल्या तीर्थरूप आणि मातोश्रींसह देऊळगावास येऊन राहिले. येथून जवळच सातारा-फलटण या भागात शंभू-महादेवाचे पवित्र शिवालय होते. तुळजापूरची भवानीही जवळच होती. ही दोन्ही शिसोदिया म्हणजेच भोसले घराण्याची कुलदैवते ! शेडगावकरांचा बखरकार म्हणतो, मालोजीराजे घृष्णेश्वरास आल्यानंतर शंभू घृष्णेश्वर आणि श्री जगदंबा तुळजाभवानीने मालोजीराजांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, ‘तुम्हांस आश्विन शुद्ध ८ मंगळवार (शके १५१६ जयनाम संवत्सरे) रोजी रात्रीस तुम्हांस शेतात द्रव्यलाभ होईल’ आणि खरंच द्रव्यलाभ झाला. मालोजीराजांची पत्नी दीपाबाईसाहेब या फलटणच्या वणगोजी नाईक निंबाळकर यांची कन्या. दीपाबाई आणि मालोजीराजांना पुढे नगरच्या शहा-शरिफ पीराच्या प्रसादाने पुत्र झाले अशी त्यांची समजूत होऊन आपल्या पुत्रांची नावेही शहाजी (जन्म, शके १५१६ जयनाम संवत्सर) आणि शरिफजी (जन्म, शके १५१७ मन्मथ संवत्सर) अशीच ठेवली. अर्थात इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांच्या मते शहाजीराजांचे मूळ नाव सिंहजीत्‍ आणि शरिफ़जीराजांचे मूळ नाव शरभजीत्‍ असावे. सिंहजीत्‍ या शब्दाचा अपभ्रंश सिंहजी, सिंहाजी, सिहाँजी, स्याहाजी आणि शहाजी असा होत गेला तर शरभजीत्‍ या शब्दाचा अपभ्रंश शरभजी, शरफजी, शरिफजी असा झाला असावा. मालोजीराजे भोसले हे अहमदनगरच्या निजामशहाचे सरदार असल्याने निजामशहाच्या मखलाशीकरता त्यांनी सिंह आणि शरभ या पुरातन संस्कृत नावांच्या जवळ जाणारी शाह आणि शरिफ ही नावे नगरच्या शाह्शरिफ पीरावरून ठेवली असे निजामशहाला भासवले. मार्गशिर्ष शुद्ध ५ शके ५१२७ विश्ववसुनाम संवत्सरे या दिवशी शहाजीराजांचे, निजामशाहीतील बडी असामी असलेल्या, वर्‍हाडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्येशी, जिजाबाईंशी लग्न झाले. यानंतर शहाजीराजे आणि जिजाबाईंना एकूण सहा पूत्र झाले त्यात सर्वात पहीला संभाजीराजे आणि सर्वात शेवटचे शिवाजीराजे वगळता सारी मुले लहानपणीच मृत्यू पावली.
          कृष्णाजी अनंत सभासदानेही महाराज क्षत्रिय राजपूत होते असं आपल्या बखरीत नमुद केलं आहे. एके ठिकाणी तो महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यातील संभाषणाबद्दल लिहीतो, त्यात मिर्झाराजे म्हणतात, “ ... हीच गोष्ट खरी. आपण राजपूत. तुम्ही (शिवाजी महाराज) व आम्ही एकजाती आहोत. अगोदर आपले शिर जाईल मग तुम्हांस काय होणे ते होईल... ”. या कृष्णाजी अनंताची बखर तर सर्वमान्यच आहे !
          शहाजीराजांच्या दरबारात असणार्‍या कवी जयराम गंभीरराव पिंड्ये याने सुद्धा भोसल्यांच्या कुळाविषयी लिहून ठेवल आहे. ‘ उपनाम भोसले, वंश शिसोदे, वर्ण क्षत्रिय (राजपूत), गोत्र कुशिक (कौशिक) ’ असल्याचं जयराम सांगतो. निदान, शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या आधी जयरामाने हे लिहून ठेवलं आहे हे नक्की, त्यामूळे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस महाराजांचं गोत्र ठावूक नव्हतं म्हणून गागाभट्टांनी ‘शिसोदिया’वंशिय राजपूत असं क्षत्रियपण चिकटवलं  हा सध्या होत असणारा आरोप पूर्णतः चूकीचाच नसून तो निराधारही आहे ! शहाजीराजांच्या जिवनचरित्राविषयी जयराम लिहितो :
महिच्या महेंद्रामधे मुख्य राणा । बलिपास(दिलिपसिंह) त्याचे कुळी जन्म जाणा ।
तयाचे कुळी मालभूपाल झाला । जयानेजले शंभू संपूर्ण केला ॥८५॥
एकूणच हा सारा प्रपंच मांडला तो केवळ शिवाजी महाराजांचा कुलवृत्तांत समजण्याकरीता ! महाराष्ट्रात आज कित्येक मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांचा असा आक्षेप आहे, की भोसले हे आडनाव पूर्वीपासून ९६ कुळी मराठ्यांत आहे. परंतू इ.स. १७०० च्या पूर्वीची ९६ कुळांची यादी अजून खात्रीलायक सापडलेली नाही. भारत इतिहास संशोधक मंडळाचे माजी ज्येष्ठ संशोधक सी.व्ही. वैद्य यांच्या Shivaji, the founder of Maratha Swaraj या ग्रंथात त्यांनी उदयपूर संस्थानचे तत्कालीन राजे पंडित सुखदेव प्रसाद यांचा अभिप्राय नोंदवला आहे, ज्यात प्रसाद म्हणतात, ‘the name of Bhosaji does not occur in their genealogical tables nor it is common among Rajputs’. परंतू आपल्याकडच्या बखरींमध्ये मात्र भोसले यांच्या नावाबद्दल सर्व बखरकारांत एकवाक्यता आहे. याव्यतिरिक्त इतिहासकारांचा आक्षेप असा आहे, की भोसल्यांचं गोत्रं आहे कौशिक. आणि राजपुत शिसोदियांचं गोत्रं आहे बैजावप. परंतू आपल्याकडे ही गोष्ट कधीही लक्षात घेतली जात नाही की क्षत्रियांना पुराणकाळापासूनच स्वतःचं असं गोत्रं नसे. क्षत्रिय घराण्याचा जो गुरू (Preceptor) असे, त्या गुरूचंच गोत्र क्षत्रिय लावत असत. यामुळेच, अल्लाउद्दिनच्या आक्रमणानंतर अजयसिंहाचे वंशज जेव्हा दक्षिणेत आले, तेव्हा दक्षिणेतीलच एका कौशिक गोत्री ब्राह्मणाला गुरू मानून त्यांनी त्या गुरुचे गोत्रं मान्य केले असेल. आजही आपण पाहिलं तर सातारा गादी आणि कोल्हापूर गादी ही एकाच भोसले घराण्याची आहे. परंतू या दोन्ही ठिकाणच्या भोसल्यांचं गोत्रं निराळंच आहे. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या घराण्याचं उपाध्येपण चालवत होते प्रभाकरभट्ट आर्विकर पुढे त्यांच्या पुत्राला, बाळंभट्ट आर्विकरांना महाराजांनी उपाध्येपण बहाल केले. भीमा नदीच्या काठावर पेडगावच्या उत्तरेला असणार्‍या आर्वि गावच्या कौशिक गोत्री ब्राह्मणाला मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी गुरूस्थानी मानुन, भोसल्यांचे उपाध्येपण बहाल केल्यांचं दानपत्र आज उपलब्ध आहे. राज्याभिषेकाच्या आधी खुद्द महाराजांनी राजस्थानात, राजपुतान्यात माणसे पाठवून आपला कुलवृत्तांत गोळा करण्यास सांगितले होते. शिवाय आजही, बिआवर, बिकानेरच्या राजसंग्रहात शिवाजी महाराजांच्या कुंडल्या आहेत. या सार्‍यावरून, जोपर्यंत नवीन विश्वसनिय पहिल्या दर्जाचे पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत आज ठामपणे असे विधान करता येते की, महाराज हे मेवाडच्या महाराणा लक्ष्मणसिंहाच्या वंशातले, शिसोदिया वंशिय क्षत्रियकुलोत्पन्न होते हे निश्चित !Copyrights : Aparichit Shivshahi by कौस्तुभ सतीश कस्तुरे 

Newer Post Older Post Home

"पेशवाई" आणि "इतिहासाच्या पाऊलखुणा"च्या प्रकाशनानिमीत्त बनवलेले 'मराठी अभिमान गीत'..