Labels

माझा परिचय माझी कविता मोडी दफ्तर शिवछत्रपती महाराज श्रीमंत पेशवाई संकीर्ण लेखसंग्रह

बाजीरावसाहेब आणि मस्तानी ! समज-गैरसमज भाग १




पत्र क्र १ :

पु॥ तीर्थरुप राजश्री नाना व तथा राजश्री भाऊसाहेबांचे सेवेशी विनंती.
शेटी मलिक स्वामींकडून (पेशव्यांकडून) येथे आला. त्याजबरोबर पत्र पाठविले ते पावले. सेटीने राजश्रींस वर्तमान सविस्तर स्वामींकडील सांगितले. महाराजांनी ऐकून घेऊन मागती. येकीकडे सेटीस नेऊन पुसिले.  त्याणे सांगितले की, "पेशवे सुखरुप आहेत. कामकारभार पूर्ववतप्रमाणेच होत आहे. आपले बंदोबस्ताने आहेत". 'ब्राह्मणाचे हात तोडले', 'कलावंतिणी राखिल्या', 'दारु पितात', 'धुंद जाहाले' म्हणून महाराजांनी ऐकीले होते; परंतू सर्व शोध बारकाईने घेतला व दिसोनही सर्व आला. अगदी बाष्कळ. नाना बहुत खबरदार आहेत. तेव्हा महाराज बोलले की, "लवंडीचे लोक भलतेच सांगतात. सर्व लटके. नाना खुशाल आहे की ?" तेव्हा हा म्हणाला "खुशाल आहेत". महाराज बोलले, "इतके असले म्हणजे जाहले. नाना जिवाने खुशाल असला म्हणजे सर्व बरे आहे. लोकांचे मजकूर आम्ही कोठे मानतो ? तु सांगतोस हे खरे. बारांना वाईट नाना. तेवढा माझा चाकर माझे पदरी मातबर आहे. सुखरुप असला म्हणजे जाहले". मग शेटी म्हणाला की "सुखरुप आहेत". हे वर्तमान शेटीने आम्हांजवळ येऊन सांगितले. खरेच आहे. परभारी शेटीने जेव्हा राजश्रींजवळ स्वामींचे पत्र दिल्हे, महाराजांनी वाचले, (त्यावेळेस तिथे) दरबारी लोक फार होते. यास्तव शेटीला म्हणाले, "इकडे ये. तुला वर्तमान पुसावयाचे आहे". असे सदरेस बोलून पलिकडे शेटीला घेऊन गेले. वर्तमान पुशिले. याने ही सांगितले. हे ही वर्तमान राजश्री गोविंदराव यांणी सांगितले की, "नानास वर्तमान पुसायासी सेटीस याप्रमाणे पुशिले व जाबसालही उतम जाहला. आता माहाराजांचे निदर्शनास आले". इतक्या उपरी राजश्री दरबारी काय चर्चा करितात व बाईजवळ काय चर्चा करितात हे ही येक दो दिवशी कळेल. तदोत्तर सेवेशी लिहीन. शेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.

मस्तानीच्या नादी लागून बाजीराव दुराचारी बनले, अशी चर्चा जनमानसात ठिकठिकाणी ऐकू येऊ लागली. तेव्हा शाहू महाराजांनी स्वतः चौकशी केली, आणि या चर्चा निव्वळ बाजारगप्पा असल्याचे लक्षात आले. हे पत्र सातार्‍याहून महादजीपंत पुरंदरे यांनी पुण्याला नानासाहेब पेशव्यांना लिहीलेले आहे. पुरंदरे हे पेशव्यांचे दिवाण होते. सातारा दरबारातील बित्तंबातम्यांवर त्यांची बारिक नजर असे. हे काम बाजीराव पेशव्यांच्या अनेक हितचिंतकांपैकी कोणाचे तरी असावे, कारण निजाम हा स्वतः बाजीरावांविषयी अनेक गैरसमज पसरवत होता आणि त्याला सातारा दरबारातील काही सुमंत, मंत्री, प्रतिनिधी अशा राजमंडळातील व्यक्तिंची फूस होती. खुद्द शाहू महाराज म्हणतात, "लवंडीचे (म्हणजे मस्तानीचे, इथे अर्थ मस्तानीच्या बाबतीतले) लोक भलतेच सांगतात, सर्व लटके".

मूळात, मस्तानीचे कुळ आणि मूळ अजूनही इतिहासाला अज्ञात आहे. बखरकार तर स्पष्टपणे तिचा उल्लेख "शाहजतखानाची कलावंतीण" असा करतो. हा शाहजतखान म्हणजे सादतखान असावा. मस्तानीचे मूळ नाव मेहेरुन्निसा बेगम  ! बुंदेलनरेश महाराणा छत्रसाल आणि त्यांची इराणी पत्नी रूहानीबेगम यांची कन्या. १७२८ मध्ये मोंगल सुभेदार महंमदखान बंगश याने छत्रसालांच्या जहागिरीवर आक्रमण करून जैतपूरच्या किल्ल्यात कोंडले असता बाजीरावांनी बंगशाचा पराभव करून बुंदेलखंडावरचे संकट दूर केले. याबद्दल कृतज्ञता म्हणून छत्रसालांनी आपल्या कन्येचे बाजीरावांसोबत लग्न लावून दिले. मस्तानी बद्दल अनेक समज-गैरसमज आहेत, अन्‌ त्यांचे ठोस कारण अजूनही समजू शकलेले नाही. परंतू तिच्या एकंदरीत मुसलमानी चलिरीतिंवरून पुण्यातल्या सनातनी समाजाने तिला स्विकारण्यास नकार दिला. खुद्द पेशव्यांच्या घरातल्या व्यक्तिंनी मस्तानीला अपमानास्पद वागणूक दिली असे ठामपणे म्हणता येणार नाही. कारण काही उल्लेख असे आहेत की समशेरबहाद्दरच्या जन्माच्या वेळेस खुद्द मातोश्री राधाबाईंनी आणि काशिबाईंनी मस्तानीची काळजी घेतली होती. परंतू उत्तरोत्तर वाढणारा विरोध लक्षात घेऊन पेशवे लोकांकरता मस्तानीला दूर ठेवावे अशी युक्ती चिमाजीअप्पांनी केली आणि त्यानुसार मस्तानीला दूर ठेवण्यात आले. पुढे बाजीरावांनी लोकविरोध न जुमानता मस्तानीला शनिवारवाड्यातच महाल बांधून दिला. मस्तानीच्या जन्माबद्दल आणि मृत्यूबद्दल निश्चित तिथी आज उपलब्ध नाही, परंतू श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर लगेचच १७४० मध्ये तिने आपले जिवन संपवले एवढे निश्चित. पुण्याजवळ पाबळ येथे तिची कबर आहे. 

 पत्र क्र २ :

पै॥ छ ११ सवाल                                                                               श्री

तीर्थरुप मातुश्रीबाई (राधाबाई) वडिलांचे सेवेसी अपत्ये चिमाजीने साष्टांग नमस्कार विनंती. येथील क्षेम त॥ छ ८ सवाल पावेतो समस्त सुखरुप असे, विशेष सिवाजी कृष्ण यांस नासिकास चिरंजीवांस (सदाशिवराव) नोवरी (नवरी) पाहावयासी पाठविले होते तो आला की नाही ? काय वर्तमान ते लेहून पाठविले पाहिजे. माघ मासी लग्न (सदाशिवरावाचे) व मुंजी (रघुनाथरावांची) नेमिली आहे. ऐसियास राजश्री स्वामी (शाहू) जेजुरीस माघ मासी येणार. त्यांचे साहित्य (व्यवस्था) केले पाहिजे. व घरचेही साहित्य कहाले पाहिजे. दोन्ही साहित्ये येकदाच होणार नाही. यास्तव वैशाख मासी लग्नाचा व मुंजीहा मुहूर्त आहे की नाही ते मनास आणावे. वैशाख मासी मुहूर्त असिला तरी वैशाखमासी करावे, म्हणजे माघमासी राजश्री स्वामींचे साहित्य होईल. तदनंतर वैशाखमासी घरचे साहित्य होईल. आपले विचारे माघमासीच उरकून घ्यावे ऐसे असिले तरी साहित्य जसे होईल तसे होऊ. बहुत काये लिहीणे ? कृपा केली पाहिजे. रायासिही (बाजीरावांस) चार गोस्टी नम्रतेने बोलणे तैशा बोललो. सांप्रत पहिल्यापेक्षा बोलून चालून भोजन करून सुखरुप आहेत. देवाची दया आहे तर दिवसेंदिवस संतोषीच होत जातील. चितात मात्र वेध (मस्तानीबद्दल) आहे तो कललाच (वाढलाच) आहे. सविस्तर नानाही सांगतील त्याजवरून कलेल हे विनंती.

तारिख-ए-महंमदशाही मध्ये नमुद केले आहे, "मस्तानी कंचनी असून ती अश्वारोहणात विशेष कुशल होती. बाजीरावांप्रमाणेच तलवार, भाला घेऊन ती त्याजबरोबर भरधाव घोडदौड करी. त्या तीव्र वेगात उभयतांच्या रिकीबी यत्किंचितही मागेपुढे होत नसत (थोडक्यात पेशव्यांच्या तोडीची होती). मोहीमांत ती बाजीरावांबरोबर हजर असे". अर्थात प्रत्येक मोहीमेत नसणार हे उघडच आहे ! मस्तानीचा उल्लेख मराठी पत्रात "यवनी" असा नसून "कलावंतिण" असाच आढळतो. खुद्द पेशव्यांच्या घरून मस्तानीला विरोध हा तिच्या धर्मावरून नसून 'एकपत्नीत्वाच्या' प्रथेला परंपरा जाण्याला होता. बाजीरावांची पहिली पत्नी हयात असताना मस्तानीपासून झालेली संतती ही आणखी वाद उत्त्पन्न करील असे कदाचित राधाबाईंना वाटले असावे, आणि ते साहजिकच होते. सावत्रपणाचा दाखला त्यांनी अनुभवला होता. खुद्द छत्रपती महाराजांच्या घराण्यात सावत्रपणाच्या भाऊबंदकीतून नको त्या कटकटी उद्भवल्या होत्या. सातारा आणि कोल्हापूर गादी होण्यासाठी भोसले घराण्यातील भाऊबंदकीच कारणीभूत होती. त्यातून मस्तानी मातुल कुळाकडून मुसलमान, त्यामूळे उद्या तिची संतती ही 'वाटेकरी' होण्याची भाषा करू लागली तर भलताच अनर्थ ओढवेल या भितीने राधाबाई आणि चिमाजीअप्पांनी तिला विरोध केला. मस्तानीला विरोध हा १७३८-३९ सालापासून विशेष वाढला होता असं उपलब्ध पत्रांवरून दिसतं. अखेरीस बाजीरावांची प्रकृती मस्तानीपायी बिघडत चालल्याचे पाहून पेशव्यांच्या घरच्यांनीही त्यांना समजून घेतले, २९ मार्च १७४० च्या पत्रात चिमाजीअप्पा नानासाहेबांना लिहीतात, "राऊस्वामी १९ जिल्हेजी गेले त्या दिवसापासून आजपावेतो त्यांचे पत्र नाही.  जेथपर्यंत येत्न चाले तो केला, परंतू ईश्वराचे चित्तास न ये त्यास आमचा उपाय काय ? त्यांचे प्राक्तनी असेल ते सुखरुप होऊ(दे). आपण निमित्त व्हावे यैसे नाही. पुण्यात गेल्यावर तिची (मस्तानीची) रवानगी त्याजकडे (बाजीरावांकडे) करावी". पुढे महिन्याभरातच दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावसाहेब मौजे कलमडे परगणे रावेर येथे मृत्यू पावले आणि काही काळातच मस्तानीनेही आपले जिवन संपवले. पण म्हणून मस्तानीच्या पुत्राला पेशवे घराण्याने वाळीत टाकले अथवा वार्‍यावर सोडले असे अजिबात नाही. कृष्णसिंह अथवा समशेरबहाद्दरला नानासाहेबांनी सख्ख्या भावाप्रमाणे जपले. त्याला राघोबादादा, जनार्दनपंत आणि सदाशिवरावभाऊंच्या बरोबरीचा दर्जा दिला. हे समशेरबहाद्दर पुढे १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या संहारात मृत्यू पावले. 

संदर्भ :
१) मस्तानी : द. ग. गोडसे
२) मराठी रियासत : सरदेसाई
३) महाराष्ट्रईतिहासमंजिरी : द. वि. आपटे
४) पेशवे बखर : कृष्णाजी विनायक सोहोनी (सं: साने)
५) पेशवे दफ्तरातील निवडक पत्रे : सरदेसाई
६) साधनपरिचय महाराष्ट्राचा : द. वि. आपटे, रा. वि. ओतुरकर

© कौस्तुभ कस्तुरे  ।   [email protected]
Newer Post Older Post Home

"पेशवाई" आणि "इतिहासाच्या पाऊलखुणा"च्या प्रकाशनानिमीत्त बनवलेले 'मराठी अभिमान गीत'..