Pages

  • शिवकाळ
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • माझ्याबद्दल

मस्तानी .. उपलब्ध साधनांच्या आधारे व्यक्तीवेध !!

बाजीराव-मस्तानी हे प्रकरण इतिहासातील चर्चेचा विषय अनंत काळापासून ठरले आहेच, पण आता संजय लिला भन्‍साळीच्या "बाजीराव-मस्तानी" चित्रपटातील बहुतांशी सगळ्याच आक्षेपार्ह दृष्यांमूळे मस्तानीबद्दल इतिहासाचप्रेमी आणि सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मस्तानी होती कोण नेमकी ? बाजीरावांची ती पत्नी होती का ? तिला विरोध का झाला ? बाजीरावसाहेबांच्या घरच्यांचे खरेच काही चूकले का ? पाहुया---



मस्तानीशी अधिकृतरीत्या लग्न झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. प्रत्येक मराठी साधनांमध्ये तीचा उल्लेख "कलावंतिण" असाच आहे. बाजीराव निर्व्यसनी होते हे बरोबर पण नंतर मद्यपान करू लागले होते याला पुरावे आहेत. व्यसनाधिनतेची आवई उठवण्यात आलेली अर्थातच खोटी होती, ते पूर्ण व्यसनाधीन झालेले नव्हते परंतू मद्यपान सुरु होते. १२ जानेवारी १७४० च्या पत्रात स्वतः अप्पा नानासाहेबांना कळवतात, की बाजीराव म्हणाले, "मस्तानी आणून देणे म्हणाजे महिन्या दो चौ मध्ये आपण प्राशनाचे सोडतो".



दि. ११ जानेवारी १७३० रोजी नानासाहेबांच्या लग्नानिमित्त मस्तानीचे नाच-गाणे झाल्याचे उल्लेख पेशवे दफ्तर खंड ३० लेखांक ३६३ मध्ये सापडतो त्यात "मस्तान कलावंत" असा उल्लेख आहे ! रियासतकारांनी एक उल्लेख दिलाय पेशवे दफ्तरातील पत्राचा तो असा- "साहेबांपासी मस्तान आहे येणेकरून आम्हांस समाधान आहे. पोर हिरोन घेतली असा लौकीक न कीजे". तेरीख-ए-महंमदाशाही मध्ये ती कंचनी (कलावंतीण) असल्याचेच नमुद आहे. सर्व बखरी, शकावल्या वगैरे मस्तानीला कलावंतीण म्हणूनच उल्लेखतात. ती छत्रसालांची औरस संतती असती तर तीला "कलावंतीण" म्हणून कोणीही म्हटले नसते. शिवाय, ती औरस असती तर ती आणि तीची पुढची संतती "हिंदू" असती. पेशव्यांच्या बखरीत ती आधी "शाहाजतखानाची (सादतखान) कलावंतीण" असल्याचे सांगितले आहे तर एका जुन्या बाजीरावांच्या बखरीत ती "निजामाची मुलगी असल्याचे" सांगितले आहे. सातार्‍याचा ब्रिटीश रेसिडेंट जनरल ब्रिग्जने १८२१ मध्ये मराठी सरदारांच्या वंशावळी केल्या त्यातही तो मस्तानीला छत्रसालाची अनौरस कन्या आणि समशेरला बाजीरावांचा अनौरस पुत्र (Illegitimate Son) म्हणतो.


मस्तानीबद्दल मूळात तीची बाजीरावांशी पहिली ओळख आणि मुलाखत केव्हा झाली, ती पुण्यास केव्हा आली, अखेरची भेट कुठे झाली वगैरे कसलेही उल्लेख नाहीत. "राउंशी तिचे लग्न खांडा पद्धतीने झाले. लग्नाला पिलाजी जाधवराव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी अश्या मातब्बर मराठ्यांनी उपस्थिती लावून छत्रपती शाहूंच्या वतीने राजमान्यताच दिली". या वाक्याला काहीही आधार नाही. मस्तानी ही कलावंतीण असताना कोणही सुज्ञ कुटूंबात अशीच प्रतिक्रिया येईल जी त्यावेळेस आली. याकरीता कारणे अनेक आहेत. अप्पा-मातोश्री आणि नानासाहेबांच्या मनस्थितीतून समजून घेतल्यास त्यांचा विरोध का होता हेसुद्धा समजून येईल.

अनेकांचा प्रश्न असतो की  छत्रसालांची मुलगी असूनही मस्तानी मुसलमान कशी ? मुळात असे-
छत्रसाल हा बुंदेला (हिंदू) परंतू त्यांची इराणी वंशाची रक्षा (नाटकशाळा) हीजपासून त्यांना "मस्तानी" झाली. अर्थात, ही संतती अनौरस म्हणूनच मानली जाते, कारण ती छत्रसालांच्या अधिकृत धर्मपत्नीपासून झालेली नव्हती. ती जर धर्मपत्नीपासून झाली असती तर आपल्या पितृसत्ताक पद्धतीप्रमाणे जो वडिलांचा धर्म तोच मुलीचा धर्म, म्हणजे मस्तानी हिंदू असायला हवी. बरं, चला, ती मुसलमान होती, मग बाजीरावांनी तिच्याशी लग्न केले ? काय पुरावा आहे ? काहीही नाही !! बाजीराव इतके दुधखुळे नक्कीच नव्हते. या द्रष्ट्या माणसाला 'आपण मुसलमान पत्नी केल्यास पुढे काय कोलाहल माजेल' याची कल्पना नसावी ? बरं, चला, केली मुसलमान पत्नी, पण मग आयुष्यभर तीला मुसलमान म्हणून ठेवले ?

पुण्यातल्या ब्राहमणांनी समशेरची मुंज करायला नकार दिला ही शुद्ध भूलथाप आहे ! बाजीरावांच्या मनात असते तर त्यांनी मनगटाच्या बळावर ते केले असते ! पुढे नानासाहेबांच्या लग्नसमारंभात मस्तानीचा उल्लेख "मस्तान कलावंत" असा येतो. शिवाय आपली सगळीच साधने तीचा उल्लेख 'कलावंतीण' असा करतात, एकही मराठी साधन ती बाजीरावांची पत्नी म्हणून करत नाही ! ती बाजीरावांची धर्मपत्नी असती तर तीसुद्धा लग्नानंतर "हिंदू"च की.. आणि जर कोणी विरोध केला तर त्याला "धर्मांतर" करण्यास बाजीराव हुशार होतेच की. पूर्वी बजाजी निंबाळकर, नेतोजी पालकर यांची धर्मांतरे झाली होतीच, तसे शास्त्रात सांगितले असताना बाजीराव गप्प बसले ? मग दारुच्या आहारी जाण्यापेक्षा धर्मांतराचा मार्ग सोप्पा होता की !

मस्तानीला विरोध हा तीच्या धर्मावरून काही प्रमाणात असुही शकतो (त्याचे लिखित पुरावे नाहीत) पण मुख्य विरोध का झाला असावा याचे कारण शोधल्यास दिसते ते म्हणजे- राधाबाईंनी आपल्या आयुष्यात सवतीमत्सर काय असतो हे अनुभवले आहे. खुद्द छत्रपती घराण्यात सातारा-कोल्हापूर वाद ताजे होते जे त्या जवळून अनुभवत होत्या. अशातच बाजीरावांना पेशवेपद मिळूनही सातारा दरबारातीलच विरोधक जास्त होते. अशात मस्तानीच्या मुलाने पुढे राज्याचा वाटा मागितल्यास काय ? हा विचार राधाबाईंच्या मनात उद्भवणे सहज शयक्य होते, शिवाय विरोधकांना आयतेच कोलीत मिळेल की "पेशव्याच्या घराण्याने राज्य वाटून खाल्ले". मस्तानीशी लग्न अधिकृतरीत्या झाल्याचे कोणतेही पुरावे मुळातच नाहीत, त्यामूळे हा प्रश्न वास्तविक इथेच संपतो, आणि उरला प्रश्न तीला स्विकारायचा तर, बाकीच्यांना असे निकष लावण्याआधी आरोप करणार्‍यांनी स्वतःच्या घरात असे चालले असते का याचा विचार करावा ! बाजीरावांच्या जागी आणि पेशव्यांच्या घरच्यांच्या जागी स्वतःला ठेवून पहावे ! 

मस्तानी आल्यावर काही वर्षे कोथरुड बागेत राहत असल्याच्या आख्यायिका आहेत पण लांब कुठे राहत होती याला आधार नाही काही. ती सुरुवातीपासून शनिवारवाड्यातच राहत होती असे दिसते, कारण बुंदेलखंड स्वारीनंतर ३ वर्षांनी शनिवारवाडा बांधून झाला. "कोथरुड बागेत" मस्तानीचा वाडा वगैरे बिनबुडाच्या कथा आहेत. कोथरुड बाग मुळात पेशव्यांकडे किमान १७९३ मध्ये नव्हती, ती हरिपंततात्यांच्या पुत्राने दुसर्‍या बाजीरावांना नंतर लग्नानिमित्त भेट दिली. त्यामूळे मस्तानी येथे होती हे खात्रीशिररीत्या सांगता येत नाही.. कदाचित आधी ही बाग पेशव्यांकडे असेल अथवा फडक्यांच्याच वाड्यात मस्तानीचे बइर्‍हाड तात्पुरते थाटले असेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. परंतू हे केवळ तर्क आहेत, याला पुरावे काही नाहीत.

राहता राहिली गोष्ट समाशेरला दूर ठेवल्याची तर तसेही अजिबात नाही ! नानासाहेबांनी मस्तानीचा राग समशेरवर कधीही काढला नाही, उलट त्याला कायम सख्ख्या भावाप्रमाणे वागवले. "समशेरला पेशवाई मिळू दिली नाही" हा आरोप हास्यास्पद आहे ! अहो, मोठा पुत्र गादीचा वारसदार असतो, नानासाहेब जिवंत असताना रघुनाथराव आणि जनार्दनपंतांचाही हक्क नव्हता तर समशेर कुठून आला मधूनच ? पुढेही नानासाहेब गेल्यावर त्यांच्या थोरला मुलगा विश्वासराव पानिपतात पडल्याने मधल्या मुलावर, माधवरावांवर पेशवाईची जबाबदारी आली. विश्वासराव जिवंत असते तर विश्वासरावच पेशवा झाले असते, माधवराव नव्हे ! समशेरबहाद्दरला नानासाहेबांनी दूर लोटणे सोडाच, पण नानासाहेबांनी मस्तानीला त्रास दिला असेल हेसुद्धा अशक्य वाटते. याचे कारण समशेरबहाद्दरची मुद्रा "श्री बल्लाळ चरणी ततपर । समशेरबहाद्दर निरंतर" अशी आहे. बल्लाळ म्हणजे बाळाजी (नानासाहेब) !! मस्तानीला नानासाहेबांनी छळले असते तर आपल्या आईला छळणार्‍या नानासाहेबांच्या चरणी तत्पर असे समशेर कदापीही म्हणाला नसता. आईचा अपमान कोण सहन करेल ? यावरूनच अंदाज येतो की नानासाहेबांनी समशेरला किती ममतेने वागवले आणि मस्तानीलाही त्रास दिला नाही. १७३९ साली महादजीपंत पुरंदर्‍यांना लिहीलेल्या पत्रात नानासाहेब उद्वेगाने म्हणतात, "मास्तानी येथून गेली, मोठा संदेह आम्हांविसी होता तो वारला" म्हणजेच मस्तानी येथून गेली आणि माझ्याबद्दल जो संशय निर्माण झाला होता तो दूर झाला !!  समशेरबहाद्दरची अस्सल मुद्रा अशी -



बाजीरावांचा २० वर्षांच्या कारकीर्दीतील ४२ लढायांचा दैदिप्यमान इतिहास दुर्लक्षुन मस्तानीचा विषय चघळणे म्हणजे त्यांच्या कार्याची आणि इतरही पेशवे घराण्याची थट्टा आहे. आणि मस्तानीबद्दल कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसताना ललित कथा आणि आख्यायिकांच्या आधारे याला "अमर प्रेमकथा" म्हणणे म्हणजे तर आणखीनच क्रूर थट्टा ! महाराष्ट्राच्या एका पराक्रमी पेशव्याच्या वाट्याला त्याच्या कर्तृत्वाच्या कौतुकापेक्षा त्याच्या प्रेमकथांचे गोडवे यावेत याहून मोठे दुर्दैव कोणतेही नाही !!!

- © कौस्तुभ कस्तुरे

Newer Post Older Post Home