Labels

माझा परिचय माझी कविता मोडी दफ्तर शिवछत्रपती महाराज श्रीमंत पेशवाई संकीर्ण लेखसंग्रह

भा.नौ.पो विक्रांत - भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका




दि. १३ ऑगस्ट २०१३

          दि. १२ ऑगस्ट २०१३ हा दिवस भारतीय नौदलाच्या इतिहासातील सुवर्णाध्यायाची सुरुवातया शब्दांत वर्णन करावा लागेल. कारणही तसंच आहे. या दिवशी संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या असलेल्या नव्या विमानवाहू युद्धनौकेचे (Aircraft Carrier) जलावतरण करण्यात आले. या नव्याविमानवाहू युद्धनौकेचे नामांतरण करण्यात आले तेसुद्धा नौसेनेच्या गौरवशाली परंपरेला जपत ! जून्या आणि सेवेतून निवृत्त्त झालेल्या व्यक्तिंची जशी काळजी घेतली जाते त्याप्रमाणेच युद्धनौकेच्या बाबतीतही तिची आठवण रहावी म्हणून तिच्या निवृत्तीनंतरही तिचे नाव दुसर्‍या नौकेला दिले जाते. आणि याच परंपरेला जपत, १९७१ च्या भारत-पाक युद्धात गौरवशाली आणि अभिमानास्पद कामगिरी बजावलेल्याभा.नौ.पो. विक्रांतया विमानवाहू युद्धनौकेचेच नाव या नव्या नौकेला देण्यात आले आहे.
ही नवी “विक्रांत” नेमकी आहे तरी कशी याबाबत जनसामान्यांच्या मनात कुतुहल आहे, तर मग चला, ही नवीरणरागिणीनेमकी आहे तरी कशी ते समजावून घेऊया. पण तत्पूर्वी पूर्वीच्या विक्रांतची माहिती असणे आवश्यक आहे, तेव्हा प्रथम जून्या विक्रांत विषयी थोडेसे पाहू..
          विक्रांत ही पूर्वाश्रमीची एच.एम.एस हर्क्युलसनामक ब्रिटीश रॉयल नेव्ही चीमॅजेस्टीक वर्गातली (Majestic class) विमानवाहू युद्धनौका ! ही युद्धनौका दुसर्‍या महायुद्धातील विमानवाहू नौकांच्या रचनेनुसार (1942 Designed Light fleet Aircraft Carrier) बनवण्यात आली होती. Majestic class प्रमाणेच Colossus class च्या युद्धनौका इंग्लंडने बनवल्या होत्या, परंतू महायुद्धानंतरच्या काळात विकासाचे वारे वाहू लागले असताना इंग्लंडने या दोन्ही वर्गातील, Colossus आणि ५ Majestic वर्गातील (त्यांच्या दृष्टीने जुन्या झालेल्या) विमानवाहू नौका अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, फ्रान्‍स, भारत, कॅनडा आणि नेदरलँड्स अशा सात विकसनशील देशांना विकल्या. यातीलच मॅजेस्टीक वर्गातीलहर्क्युलसही नौका भारताकडे आली आणि भारतीय नौदलाने तीचे नाव ठेवले, विक्रांत ! भारतीय नौसेना पोत विक्रांत ! दि. १२ नोव्हेंबर१९४५ रोजी हर्क्युलस चे जलावरतण झाले आणि २२ सप्टेंबर १९४५ मध्ये तीचे अनावरण झाले. परंतू ही नौकाब्रिटीश रॉयल नेव्हीमध्ये कधीच दाखल (Commission) झाली नाही. इ.स. १९५७ मध्ये भारताने ही नौका अधिकृतरीत्या इंग्लंडकडून किकत घेतली आणि सर्व चाचण्या आणि आपल्याला आवश्यक असणारे बदल करून बेलफास्ट येथे भारताच्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांच्या उपस्थितीतविक्रांतया नावाने दि. ४ मार्च १९६१ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. आता या नौकेची काही तांत्रीक माहिती आपण पाहू-
          या नौकेचे वजन कोणत्याही अतिरीक्त भाराशिवाय अंदाजे १५७०० टन तर पूर्ण भारासहीत १९५०० टन इतके भरत होते. जवळपास ७०० फूट लांबीच्या या विमानवाहू नौकेला पाण्यात स्थलांतर करण्यासाठी एकून ४ बॉयलर्स आणि २ प्रॉपेलर्स मिळून ४०००० अश्वशक्ती (Horsepower) निर्माण करू शकत होते. या नौकेचा सर्वोत्तम वेग हा २३ नॉटीकल मैल म्हणजेच ४१.४ कि.मी प्रती तास (१ नॉटीकल मैल = १.८ किमी) इतका होता. यात प्रथम ४० मी.मी व्यासाच्या १६ बोफोर्स विमानरोधक तोफा होत्या, परंतू नंतर बदल करून त्यांची संख्या ८ वर आणण्यात आली. या नौकेवर १०७५ नौसैनिक तैनात असत. याशिवाय नौकेचे मुख्य अंग म्हणजे त्यावरची विमाने आणि हेलिकॉप्टर्स ! विक्रांतवर प्रथम हॉकर सी-हॉक ही जेट विमाने, अलिझ ही दोन रोटर्स वर चालणारी विमाने, इंग्लंडकडून घेतलेली वेस्टलँड सी-किंग ही पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर्स आणि चेतक ही हाल
(Hindustan Aeronautics Limited) ची स्वदेशी बनावटीची हलकी हेलिकॉप्टर्स होती. पुढे इंग्लंडच्या रोल्स-रॉईस या प्रसिद्ध कंपनीने बनवलेल्यासी-हॅरीयरअथवासागर ससाणाया STOVL (Short TakeOff & Verticle Landing) ही अत्याधुनिक विमाने आल्यावर त्यांनी अलिझ आणि सी-हॉक्स ची जागा घेतली. विक्रांतवर एकूण १६ सागर ससाणा होती. या विमानांमूळे १९८२-८३ या काळात तिच्या संरचनेत बदल करण्यात आले. याआधी १९७८-८२ या काळात नौकेचे इंजिन आणि बॉयलर्सही बदलण्यात आले होते. यापूर्वीची सी-हॉक आणि अलिझ ही विमानेकॅटॅपुल्टपद्धतीने उडणारी असल्याने पूर्वी विक्रांतचा पृष्ठभाग सपाट होता. परंतू नवी सागरससाणा ही अतिशय कमी अंतरामध्ये (Short TakeOff १०० फूट) उड्डाण करू शकत असल्याने त्यांचे उड्डाण अधिक उत्तम आणि निर्धोक व्हावे म्हणून विक्रांतवरील वाफेच्या गोफणी (Steam Catapults) काढून नौकेच्या पुढच्या भागात चढ करण्यात आला. या नव्या प्रणालीलाआकाशझेपअथवा (Sky Jump) म्हटले जाते. 
          १९६५ च्या युद्धात ऐनवेळेस विक्रांत बॅलार्ड पीअर येथे दुरुस्तीसाठी गोदीत आणली होती, परंतू पुढे १९७१ च्या भारत पाक युद्धात विक्रांतने अतिशय मोलाची कामगिरी बजावली. इस्टर्न फ्लीट मध्ये नियुक्त केल्यानंतर भा.नौ.पो. ब्रह्मपुत्रा आणि भा.नौ.पो. बियास या युद्धनौकांसह (Frigates) बांग्लादेश मोहीमेवर पाठवण्यात आली. दि. ४ ते १० डिसेंबर १९७१ दरम्यान पूर्व पाकीस्तान उर्फ बांग्लादेशच्या किनार्‍यापासून ६० नॉटीकल मैलांवर थांबून चितगाव आणि कॉक्सबझार या महत्त्वाच्या ठाण्यावर आणि खुलना आणि मोंगला या बंदरांवर विक्रांतवरील ८ सीहॉक्स विमानांनी सतत हल्ले चढवले. या चढाईत पाकीस्तानी तोफांमूळे एकाही सी-हॉक चे नुकसान झाले नाही हे विशेष. विक्रांतला बुडवण्यासाठीच्या विशेष मोहीमेवर पाकीस्ताननेपी.एन.एस. गाझीही पाणबुडि पाठवली, परंतू भारताच्याराजपूतया युद्धनौकेने विशाखापट्टणम्‌ च्या समुद्रात डेप्थ चार्जेस च्या मदतीने गाझीला जलसमाधी दिली. १९७१ च्या भरीव कामगिरीकरीता विक्रांतवरील अधिकार्‍यांना २ महावीरचक्र आणि १२ वीरचक्र प्रदान करण्यात आली. पुढच्या काळात युद्धाचा प्रसंग नसल्याने ‘Showing the flag’ व्यतिरीक्त विक्रांतला विशेष अशी कामगिरी नव्हतीच. आणि अखेर, वयोमानापरत्वे अत्यंत विपन्नावस्थेत असलेल्या विक्रांतला दि. ३१ जानेवारी १९९७ रोजी भारतीयनौदलातून अखेरचा निरोप देण्यात आला. विक्रांत निवृत्त (Decommissioned) झाली. यानंतर पुढच्या काळात आजतागायत तिचे कायमस्वरूपी नौदल संग्रहालय करून ‘Indian Museum Ship’ म्हणून ती मुंबईत बॅलार्ड पीअर येथील गोदीत नांगरून ठेवली होती, परंतू सरकारच्या उदासीनतेमूळे आता ती आशाही मालवली आहे.
          एकूणच, जून्या विक्रांतचा हा इतिहास पाहिल्यानंतर आता आपण नव्याने येऊ घातलेल्या स्वदेशी बनावटीच्या विक्रांतकडे वळू ! वास्तविक सध्या आपल्याकडेभानौपो विराटही सागर ससाणांनी सुसज्ज अशी विमानवाहू नौका आहे खरी, पण तीही मूळची इंग्लंडनिर्मित (HMS HERMES) असल्याने आणि तीही फारफारतर अजून ७ ते ८ वर्षे सेवा देईल अशा परिस्थितीत असल्याने नव्या विक्रांतचे येणे हे अत्यंत आनंददायी आहे. नव्याने येऊ घातलेली हीविक्रांतनेमकी कशी आहे ते आपण पाहू-
          कोचिन शिपयार्ड लिमीटेड या कंपनीने केरळमधल्या कोचियेथे बनवलेली ही नौका पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. ही नौका २०१८ पर्यंतसर्व चाचण्या आणि सुसज्ज होऊन भारतीय नौदलात दाखल होईल. या नौकेचे वजन साधारणतः ४०००० टन इतके महाकाय आहे. आणि सर्व साधनांनी सुसज्ज झाल्यावरते अंदाजे ४४००० टन इतके भरेल. अडीच एकर चे क्षेत्रफळ आणि  ८६० फूट लांबीच्या या नौकेला स्थलांतर करण्यासाठी ४ (इलेक्ट्रीक आणि गॅस) टर्बाईन्‍स आणि २ प्रॉपेलर्स आहेत. या विक्रांतचा उच्चतम वेग २८ नॉटीकल मैल म्हणजेच ५०.४ कि.मी प्रतीतास इतका असेल. या नौकेवर साधारणतः १४०० नौसैनिक तैनात असतील. विक्रांतवर ४ ऑटोब्रिडा (Otobreda) प्रकारच्या रीमोट कंट्रोलवर चालणार्‍या तोफा, रडार निर्देशित SAM म्हणजेच जमिनीवरून अवकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र (SAM = Sumrface to Air Missile) आणि अत्याधुनिक अशी सी-व्हिज अथवा CIWS (Close-In Weapon System) ही प्रणाली असेल, ज्यामध्ये अत्याधुनिक संगणकीकृत रडार आणि मल्टीबॅरेल रॅपीड फायर तोफा असतील. या CIWS चे अनेक प्रकार असतात, परंतू विक्रांतवर कोणत्या प्रकारची प्रणाली असेल हे मात्र नौसेनेने अजून उघड केले नाही. याशिवाय नौकेचे मुख्य अंग म्हणजेच विमाने ! विक्रांतवर रशियन बनावटीची १२ मिकोयान मिग २९ के ही अत्याधुनिक जेट विमाने, ८ भारतीय बनावटिची आणि HAL ने तयार केलेली तेजस ही LCA (Light Combat Aircraft) म्हणजेच अत्यंत हलकी लढाऊ विमाने आणि काम्होव्ह केए-३१ या जातीची अथवा सी-किंग जातीची पाणबुडीविरोधी १० हेलिकॉप्टर्स असतील.
          दि. १२ ऑगस्ट २०१३ या दिवशी विक्रांतचे जलावतरण झाले. जलावतरण म्हणजे नौकेचे अनावरण नव्हे, जलावतरण म्हणजे सुक्या गोदीतून ही विशाल नौका प्रथमच समुद्रावर तरंगू लागली. अजूनही नौकेचे फ्लाईट केबिन आणि उर्वरीत बांधकाम बाकी आहे. याच विक्रांत वर्गातील, आणि नव्या विक्रांतहूनही अजस्त्र अशी आणखी एक विमानवाहू नौका कोचिन शिपयार्ड बांधत आहे, हीचे नावही निश्चित करण्यात आले आहे, भा.नौ.पो. विशाल. शिवाय रशियन बनावटीची पूर्वाश्रमीचीअ‍ॅडमिरल गोर्श्कोव्हअथवाभा.नौ.पो. विक्रमादित्यहीसुद्धा येत्या २ ते ३ वर्षात नौदलात दाखल होईल. ज्याच्याकडे जास्त विमानवाहू नौका त्या देशाचे नौदल हे बलाढ्य असतेच ! येत्या काळात एका वेळेस तीन विमानवाहू नौका तीनही समुद्रात तैनात करण्याचे, आणि आशिया खंडातील चीनच्या नौदलाचा दबदबा झुगारून देण्याचे हिंदुस्थानचे स्वप्न पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यातीलविक्रमादित्यही रशियन बनावटीची असली तरीही स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक अशाविक्रांतआणिविशालयांची बांधणी करून महासत्ता होण्याचा आणि आमच्या बळावर समुद्रावर आम्हीही राज्य करू शकतो हे भारतीय नौदलाने जगाला दाखवून दिले आहे.

- कौस्तुभ कस्तुरे


Newer Post Older Post Home

"पेशवाई" आणि "इतिहासाच्या पाऊलखुणा"च्या प्रकाशनानिमीत्त बनवलेले 'मराठी अभिमान गीत'..