Labels

माझा परिचय माझी कविता मोडी दफ्तर शिवछत्रपती महाराज श्रीमंत पेशवाई संकीर्ण लेखसंग्रह

दुर्दैवाचे धनी भाग १ : दादोजीपंत कोंडदेव मलठणकर !


          दादोजी कोंडदेव यांच्यावरून महाराष्ट्रात सध्या प्रचंड गदारोळ उठला आहे. मुळात, उपरा कोणी येऊऩ दादोजी कोंडदेवांविषयी लिहीतो आणि आमचे लोक त्याला बळी पडतात हा प्रकारच अतिशय गंभीर आहे. दादोजी कोंडदेवांविषयी काही अस्सल समकालीन कागद सापडतात. खुद्द शिवाजी महाराजांच्या काही पत्रांमध्ये त्यांचे उल्लेख आहेत. शिवाय, इतर बखरींपेक्षाही सभासद बखर या अत्यंत विश्वसनिय बखरीत दादोजींविषयी जे लिहीलयं ते मात्र नक्कीच लक्षात घ्यायला हवं.
कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो,
          “ ... शाहाजीराजे यांसि दौलतेमध्ये पुणे परगणा होता. तेथे दादाजी कोंडदेऊ शाहाणा, चौकस ठेविला होता. तो बेंगळूरास (शहाजी) माहाराजांचे भेटीस गेला. त्याबरोबर शिवाजीराजे व जिजाबाई आऊ ऐशी गेली. ते समयी राजियास वर्षे बारा होती. (परत पुण्याला येतेसमयी शहाजीराजांनी) बराबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे करून दिले व बाळकृष्णपंत, नारोपंत दीक्षितांचे चुलत भाऊ मुजुमदार (म्हणून) दिले. व सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनिस ऐसे देऊन दादाजीपंतांस व राजे यांसी पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले... ”

          याशिवाय खुद्द सातारकर छत्रपती भोसल्यांच्या संग्रहात असणारी संभाजी भोसले शेडगावकर यांची बखर हीसुद्धा एक विश्वसनिय बखर आहे. कारण या बखरीतल्या घटनांना आधार असणारे अनेक इतर पुरावेही सापडले आहेत. सभासदाने ज्या गोष्टी नमुद केलेल्या आहेत त्यातील बर्‍याचशा गोष्टी याही बखरीत आहेत. बखरकार नक्की कोण ते सांगता येत नाही, पण त्याने दिलेली माहिती पहा-

          “... दादोजी कोंडदेव यांजकडे पूर्वी काम सांगितल्या दिवसापासोन तो मुलुख निज्यामशाई मुलुखालगत होता. तेव्हा दादोजी कोंडदेव यांणी मलकांबर ( निजामशाहाचा वजीर मलिक अंबर हबशी) रीति जमिनीची चालवली. कितीएक प्रतिवर्षी पाहणी करोन सेताचे उत्पन्न अन्वये वसुल घ्यावा. त्या सेत करणारापासोन कधी जिनस विकत घेतला, तर त्याचा पैका त्यास देत असत. हे निजामशाई पेक्षा रीति रयतेस फार चांगली. त्यास ते सुखकारक सेत करणारांस पडत होते. व मावळात लोक राहणार हे केवळ दरिद्री (गरीब) परंतू शरिरेकरोन बलकट होते. त्याणी अति मेहनत करोन त्यास (फक्त) उदरनिर्वाहापुरते उत्पन्न होत असे. मग दादोजी कोंडदेव यांणी त्या मुलुकाची व त्या लोकांची आवस्ता पाहिली की, हे लोक झाडीतून राहणारे आणि ज्यांस वस्त्रे पात्रे नाहीत ते लोक झाडीत राहणारे म्हणोन त्यानी शरिराचे संरक्षण जाहले पाहीजे. त्यासाठी सर्वांनी घरोघर शस्त्रे मात्र बालगली होती. ते लोक फार सावधपणे वागत होते. तेव्हां दादोजी कोंडदेव यांणी त्या लोकांचे पोषणाकरीता कीतीएक वर्षे त्या लोकांपासोन वसूल घेतला नाही. त्याखेरीज दुसरे माहालाचा वसूल जमा होण्याचे कामावर ते मावळे लोक बहुत चाकरीस ठेविले. त्या योगे करून ते मावळे लोक सहजच पोसले गेले. याप्रमाणे दादोजी कोंडदेव याणी रीति चालविली. तेव्हा सिवाजीराजे यांस बालपणी दादोजी कोंडदेव हा सिवाजी राजे यांस विद्याअभ्यास करणारा सिक्षाधारी होता. त्याणीं विद्याभ्यासात सिवाजीराजे यांस तयार केले. परंतू धनुर्विद्यांत व शिपाईगिरीत ते खुद्द राजे जातिने निपूण होते. त्याजला घोड्यावर बसता येत होते तसे दुसरे मराठे लोकांस बसता येत नव्हते... ”

          हे झाले दादोजी कोंडदेवांच्या ‘आदिलशाही सुभेदार’ या नात्याने केलेल्या कामांचे आणि शिवाजी महाराजांच्या शिक्षणासंबंधीचे ! याव्यतिरीक्त पुढे दिलेली माहिती पहा-

          “ ... शाहाजी माहाराज यांचे दौलतीमध्ये पुरंधर परगणा होता. त्यास तेथे तो दादो बाबाजी कोंडदेऊ म्हणून कारकून शाहाणा फार चौकशीने ठेविला होता. तो माहाराजांचे भेटीस बंगळूर सरदेश चंदीचंदावरास आला. तेथे त्याचेबरोबर त्याचे वोलखीने कारकून शामजी निळकंठ व बालकृष्णपंत व नारोपंत दीक्षित व सोनोपंत व रघुनाथ बल्लाळ असे च्यार असाम्यास पुरंदर किल्ल्याचे अंमलात त्यावेलेस पुनवडी म्हणून लहान खेडे होते तेथे दाखल जाहले. येताच सिवाजीराजे पुनवडीस होते तेथे जाऊन भेट घेतली आणि शिवाजीराजे यांचे स्वारीबरोबर गेले आणि बारा मावळे काबिज केली. आणि मावळची देसमुखीबद्दल जे तेथे गुमस्ते बेबदल होते त्यास दस्त करून मारीले. शके १५६६ तारणनाम संवत्सरे फसली सन १०५४ या सालापासून सिवाजीराजे बंडावा करू लागले. त्यांनी मोठेमोठे कारकून व परभू वगैरे ज्ञातीचे पुरुष धारिष्ट्याचे व मावळे लोक पाईचे सरदार व शिपाई मोठे शूर धारकरी विसवासुक इतबारे असे मनुष्य जमा करून पादशाई किल्ले शयाद्रीचे बळकावून मुलुख काबिज कऱीत चालले. व च्यार पादशाईचे खजिने मारू लागले. त्यास शिवाजीराजे हे पादशाईस काळ जाले. तेव्हा त्यांचे वडील शाहाजीराजे माहाराज वजिर त्याचे वेळचे दादो कोंडदेऊ कारकून ब्राह्मण हा शिवाजीराजे यांजला बाळपणी शिक्षाधारी विद्याभ्यास करणारा तो फार शाहाणा व मोठा शूर होता व शामराव निळकंठ ब्राह्मण (शामराजपंत निळकंठ पंतपेशवे) व मोरो त्रिमल पिंगळे ब्राह्मण व येसाजी कंक व तानाजी मालुसराव व बाजी पासलकर हे पाईचे सरदार मोठे शूर धारकरी व मावळे लोक सिपाई अशी भरवशाची मनुष्ये जमा करून राज्य काबिज करू लागले... पुढे काही दिवसांनी दादो कोंडदेव यांस देवाज्ञा झाली... अंतकाळसमई त्याणे सिवाजी राजे यांस बोलावून आणोन विनंती केली की मी (केवळ) आपले धन्याचे (शहाजीराजे) हीताविसी आपणांस वारंवार निसिद्धीत होतो. परंतू आता माझी आपणांस एक प्रार्थना आहे, की आपण स्वतंत्रपणे वागत जावे. गाई-ब्राह्मण व प्रजा यांचे प्रतिपाळण करून मुसलमान लोकापासून हिंदू लोकांची देवस्थानें रक्षावी. आणि सिवाजीराजे यांचे हाती आपले कुटूंबाचीं मनुष्यें राजे यांचे हाती स्वाधींन करून मग दादोजी बाबाजी कोंडदेव देशस्त ब्राह्मण मौजे मलठण भीमातीर येथील जोसी कुलकर्णी याणी प्राण सोडीला. नंतर सिवाजीराजे यांणी दादोजी कोंडदेव यांणी अंतःकाळसमई सांगितल्याप्रमाणे आपले मनात वागऊन त्या रीतिने करू लागले व आपण जातीने राजे कारभार स्वतंत्रपणे करू लागले... ”

          स्वतः महाराजसाहेब शिवाजीराजे यांच्या पत्रात दादोजींच्या कर्तबगारीबद्दल उल्लेख आले आहेत. उदाहरणादाखल एक पत्र पहा. परिंच्याची पाटीलकी कान्होजी खराड्याची नसतानाही तो तेथे वाडा उभारतो आहे हे कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी तेथील हवालदार तान्हाजी जनार्दन याला आज्ञापत्र पाठवून ताकीद दिली. या अस्सल पत्राची छायांकीत प्रत पुढील पानावर दिली आहे. पत्राचा देवनागरी तजुर्मा असा-

          “ मशहुरूल अनाम राजश्री तान्हाजी जनार्दन हवालदार व कारकून ता। निरथडी पा। पुणा प्रति राजश्री शिवाजीराजे सुहूर सन इसने सबैन अलफ परंचाचे पाटीलकीसी कान्होजी खराडे नसता कथला करून घर तेथे बांधतात तरी कथला करू न देणे. वैकुंठवासी साहेबाचे (शहाजीराजे) व दादाजीपंताचे (दादोजी कोंडदेव) कारकिर्दीस चालीले आहे ते करार आहे, तेणेप्रमाणे चालवणे. नवा कथला करू न देणे. व परिंचा(स) कान्होजी खराडियास घर बांधो न देणे. छ २८ सफर मोर्तब सुद. मर्यादेयं विराजते ॥ ”

          यावरून, आज महाराष्ट्रात ‘दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज यांचा काहीही संबंध नव्हता’ अथवा ‘दादोजी हे शिवरायांचे गुरू तर सोडाच, पण साधे नोकरही नव्हते’ अशा आशयाचे गैरसमज पसरवले जात आहेत, ते किती निराधार आहेत हे स्पष्ट होते. काही इतिहासकार म्हणतात, बखरींमध्ये दादोजी कोंडदेवांनी शिवाजीराजांना विरोध केल्याचंही लिहीलं आहे. पण तत्कालीन परिस्थीतीत दादोजींनी तसं केलं असेल तर तो राजकारणाचाच एक भाग म्हणायला हवा नाही का? तसं तर खुद्द महाराजसाहेब शहाजीराजांनीही आदिलशहाला ‘पोरगा माझे ऐकत नाही’ असं सांगितलं होतं, म्हणून काय खरंच शिवाजीराजे शहाजीराजांच ऐकत नव्हते का? ही सारी राजकारणं होती. ‘तु मारल्यासारखं कर अन्‍ मी लागल्यासारखं करतो’ अशी ही पद्धत होती. बाहेरून आपण एकमेकांशी अजिबात सहमत नाही आहोत असं दाखवायचं आणि आतून शक्य तितकी मदत करायची हे त्या मागचं खरं सूत्र होतं !  गुरू म्हणजे शेजारी बसवून हातात लेखणी देऊन मुळाक्षरे शिकवणाराच तो काय, असं तर नसतं ना? कोणत्याही बाबतीत, कोणत्याही गोष्टीत जाणतेपणी वा अजाणतेपणी अनेक गोष्टी अनेक माणसे आपल्याला शिकवतच असतात. अन्‍ तसंही, अमुक एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांचे ‘गुरू’ असल्याचा एकही पुरावा सापडलेला नाही. शिवाय, जगाच्या इतिहासात आज नेपोलियनचे, चंद्रगुप्ताचे, अन औरंगजेबाचे कपडे तरी कुठे सापडले आहेत ? म्हणून ते काय कपडेच घालायचे नाहीत का ? ‘दादोजी हे गुरू होते’ असं कुठे प्रत्यक्षपणे लिहीलं नाही म्हणून लगेच त्यांच्यावर चिखलफेक कशासाठी करायची या गोष्टीचा विचार मात्र कोणीही करत नाही हे महाराष्ट्राचं दूर्दैव आहे ! 

१)  पुढे दादोजी कोंडदेवांविषयी काही अस्सल पुरावे सादर करत आहे..
 

ग. ह. खरे संपादित "ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड १" मधील हे आदिलशाहाने कान्होजी जेध्यांना पाठवलेले फार्सी फर्मान. दादाजी कोंडदेव हे आदिलशहाचे सुभे कोंडाण्याचे सुभेदार होते हे आपल्याला माहित आहेच. पण त्याही आधी दादाजी हे शहाजीराजांचे विश्वासू सेवक होते आणि तात्पर्याने आदिलशहापेक्षा ते शहाजीराजांचे कारभारी या नात्याने शिवरायांच्या प्रत्येक कार्यात सामिल होते हे पुढील पत्रावरून सिद्ध होते. आदिलशहाचा दादाजींवर अजिबात विश्वास नव्हता हे सांगणारे एक पत्र खर्‍यांनी छापले असून ते अस्सल फार्सी पत्र आदिलशहाने कान्होजी जेध्यांना लिहीलेले आहे. या पत्रात आदिलशहा दादाजींचा उल्लेख "हरामखोर" असा करतो. या पत्राचा सारांश रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या "ऐतिहासिक पत्रबोध" या अमुल्य ग्रंथात लेखांक ३ मध्ये "हरामखोर दादाजी" या मथळ्याखाली दिला आहे. आता दादाजी कोंडदेवांना आदिलशाही हस्तक म्हणण्याआधी कोणीही १० वेळा विचार करावा कारण खुद्द आदिलशहाच त्यांना "हरामखोर" म्हणतो आहे.


२) तान्हाजी जनार्दन हवालदार याला २६ जून १६७१ रोजी पाठवलेल्या पत्रात महाराज "वैकुंठवासी साहेबाचे (शहाजीराजांचे) व दादाजीपंताचे (दादोजी कोंडदेव) कारकीर्दीस चालिले आहे तेणे प्रमाणे चालवणे" असं म्हणतात. हे पत्र पंतांच्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी लिहीलेले आहे, तरिही शहाजीराजांसोबतच पंतांचे निर्णय महाराजांना वंदनिय होते. ते अस्सल मोडी पत्र असे-





३) यापुढे दादाजी कोंडदेवांचे निर्णय तसेच चालू ठेवण्याबद्दल शिवाजी महाराजांच्या कोणकोणत्या पत्रात उल्लेख आहेत त्याचा सारांश दिला आहे-












४) महाराजांचे सगळ्यात प्रथम चरित्र लिहीणारा महाराजांचा समकालीन "कृष्णाजी अनंत सभासद" याने आपल्या बखरीत दादोजी कोंडदेवांविषयी, शहाजीराजांनीच "शहाणा, चौकस" ठेविला होता असं म्हटलं आहे.. म्हणजे शहाजीराजांनीच दादाजीपंतांची नेमणूक केलेली. ते आदिलशहाचे सुभेदार होते हा वेगळा भाग असून त्याव्यतिरिक्त ते शहाजीराजांचे कारभारीही होते हे सभासदाने स्पष्ट केले आहेच. शिवाय, ही बखर खुद्द महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून तयार झालेली असल्याने अविश्वासाचा प्रश्नच नाही. सभासद म्हणतो-




५) शिवचरित्र साहित्य खंड ३ मधील २९ ऑगस्ट १६७४ रोजीची "पुरंदर किल्ल्याची हकिकत". यामध्ये महाराज "दादो कोंडदेव आम्हांजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते ते मृत्यु पावले. आता आम्ही निराश्रीत जालो"..


६) पुरंदरे दफ्तर ३ मध्ये प्रसिद्ध  झालेल्या खेडेबार्‍याच्या देशपांड्यांच्या करीन्यात "याप्रांती साहेबाचे सुभेदार दादाजी कोंडदेव कसबियात होते ते वेलेस राजश्री साहेब (शिवाजीराजे) लाहाण होते. राजेश्री माहाराजसाहेबी (शहाजीराजांनी) मातुश्री आऊसाहेबांस (जिजाऊसाहेबांना) व तुम्हास खेडबारियास दादाजीपंतापासी पाठविले.."



*************************

कौस्तुभ कस्तुरे  ।   [email protected]

"पेशवाई" आणि "इतिहासाच्या पाऊलखुणा"च्या प्रकाशनानिमीत्त बनवलेले 'मराठी अभिमान गीत'..