Pages

  • शिवकाळ
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • माझ्याबद्दल
"पुरंदरे" आणि "इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २" या दोन्ही पुस्तकांची प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी तसेच "पेशवाई" आणि "इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १" ही दोन्ही पुस्तके ऑनलाईन नोंदणी आणि घरपोच मिळवण्यासाठी उपलब्ध असून 'माझी पुस्तके' या मेन्यूवर अथवा संकेतस्थळाच्या उजवीकडे, खालच्या भागात दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करा.

दुर्दैवाचे धनी भाग २ : ब्राह्मण आणि शिवाजी महाराज !



          छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असा अपप्रचार गेली काही वर्षं महाराष्ट्रात पद्धतशीर पणे सुरू आहे. परंतू मूळात एक गोष्ट मात्र कधीही लक्षात घेतली जात नाही ती म्हणजे, शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेतील, अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती सोडता सात प्रधान हे शिवाजी महाराजांनीच नियुक्त केलेले ब्राह्मण होते. यात महाराजांच्या गैरहजेरीत राज्य सांभाळणारा राज्याचा मुख्य प्रधान (पंतप्रधान) हाही ब्राह्मण होता, या प्रधानाचे नाव, मोरेश्वर त्र्यंबकपंत पिंगळे. महाराजांच्या राजमंडळातही मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, रामचंद्रपंत निळकंठ बहुलकर, दत्ताजीपंत मंत्री, रघुनाथ बल्लाळ अत्रे, रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबक सोनदेव यांसारखे अनेक हुशार ब्राह्मण कारभारी होते. खुद्द महाराजांच्या राज्याचे न्यायाधिश निराजी रावजी नाशिककर हे ब्राह्मण होते. महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला आणि म्हणून महाराजांच्या राज्याभिषेकाला काशिहून गागा भट्टांना यावे लागले असा जो समज आज आहे तो पूर्णपणे चूकीचा आणि समाजात दुही माजवणारा आहे. मुळात गागा भट्ट हे महाराष्ट्रीयच होते !
त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर. दिवाकर भट्ट या प्रकांड पंडितांचा हा मुलगा. भट्ट हे ते ब्राह्मण होते असे म्हणून नाही तर ते त्यांचे आडनावच होते ! गोदावरी नदीच्या तीरावरील प्रख्यात प्रतिष्ठान नगरी म्हणजेच पैठणचे राहणारे, विश्वामित्र गोत्री देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांचे घराणे हे ! परंतू गागाभट्टांचे खापर पणजे रामेश्वरशास्त्री भट्ट हे महाराष्ट्रातील सुलतानी अंमलाला कंटाळून काशीला जाऊन राहीले, ते कायमचेच ! गागाभट्टांच्या पणजोबांनी सुलतानांनी उध्वस्त केलेल्या अखिल हिंदुस्थानच्या तीर्थक्षेत्राचे, श्री काशीविश्वेश्वराचे मंदिर पुन्हा नव्याने बांधले. गागा भट्ट हे राज्याभिषेकाच्या वेळेस पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले असं नाही. या आधी इ. स. १६६४ मध्येही ते महाराजांशी याच (राज्याभिषेकाच्या) संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्रात आले होते, परंतू त्यावेळेस शायिस्तेखान स्वारीमुळे महाराष्ट्राची वाताहात झालेली होती आणि महाराजांना क्षणाचीही उसंत नसल्याने तेव्हा गागा भट्टांनी त्यांचा बेत पुढे ढकलला. हे खुद्द गागा भट्टांनीच त्यांच्या ‘शिवार्कोदय’ या ग्रंथात नमुद करून ठेवलेले आहे. या वेळेस आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे समर्थ रामदास स्वामींची ! महाराज समर्थांना किती मानत असत हे खुद्द महाराजांच्या समर्थांना लिहीलेल्या पत्रावरूनच सिद्ध होते. ते संपूर्ण पत्र सदर पुस्तकाच्या ‘शिवाजी महाराज आणि अध्यात्म’ या प्रकरणात उद्धृत केलेच आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून चोविसाव्या वर्षापर्यंत म्हणजेच, सलग बारा वर्षे गोदावरी नदीच्या पात्रात उभे राहून, पहाटे पहाटे गोदावरीच्या थंड पाण्यात उभे राहून सूर्यनारायणाला तेरा कोटी गायत्री मंत्राचा जप करण्याचा संकल्प समर्थांनी केला होता. समर्थही शेवटी माणूसच होते. गोदावरीच्या थंड पाण्यात उभं राहण्याचा परीणाम अखेरीस श्वसनसंस्थेच्या विकारात झाला, आणि पुढे समर्थांना दम्याचे दुखणे जडले ते कायमचेच ! ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थांना दम्याचा त्रास जाणवू लागल्याने ते राज्याभिषेकास उपस्थित राहू शकले नाहीत.  परंतू आपल्या शिष्यांसोबत त्यांनी आशिर्वाद पाठवला ! किंबहूना, समर्थांनी शिवाजी महाराजांचे ‘निश्चयाचा महामेरू...’ असे जे सार्थ शब्दांत वर्णन केले आहे, त्यासारखं वर्णन भूषण कवी अथवा अगदीच जयरामासारखे कवी सोडले तर कोणाही कवीला आजतागायत करता आलं नाही ! अर्थात हे झाले तार्कीक स्पष्टीकरण ! शेडगावकरांचा बखरकार मात्र रामदास स्वामी राज्याभिषेकाला हजर होते असं स्पष्ट नमुद करतो, तो म्हणतो, “ ... कुल देशातूंन पादशाई मुलुखातून व थोर थोर क्षेत्रांस पत्रे पाठऊनु वैदीक व शास्त्री व वैदीक पुरुषें व थोर थोर ब्राह्मण भट भिक्षुक षड्दर्शने दशनाम मिळोन पनास हाजार याची गणना जाली. त्यास चातुर्मास ठेऊन घेऊन सीधे उलफे व मिष्टान्न भोजन देऊन सर्वांचा बंदोबस्त ठेविला. नंतर श्री रामदास स्वामी व गागाभट पंडित व प्रभाकरभट पंडित यांचे चिरंजीव बालंभट कुलगुरू व सरकारकून व उमराव व सरदार व मानकरी वगैरे मिळोन सर्व मते तख्तांस जागा पूर्वी रायेरी सोन्याची पायेरी हे नांव मोडून रायगड असे नाव ठेऊन तोच गड तख्तास व राजधानीस नेमिला. असे जाहल्यानंतर श्री रामदास स्वामी व गागाभट व थोर थोर ब्राह्मणानी सिवाजीराजे यांस अभिषेक करावा असा निश्चय केला. आणि सुदीन सुमुहुर्त शके १५९६ आनंदनाम संवतसरे फसली सन १०८४ मिती ज्येष्ठ शु॥ १३ त्रयोदसीस मंगळस्नान श्री माहादेव व भवानी कुलस्वामी व मातोश्री व श्री रामदास स्वामींस व प्रभाकरबावा याचे पुत्र बालंभट कुळगुरू व गागाभट व थोर थोर भट व सत्पुरुष या सर्वांची येथाविधी आलंकार व वस्त्रे देऊन पुजा करोन, सर्वांस नमन करोन सर्वांचे आसिरवाद घेऊन पट्टाभिषेकास बैसले... ”
          शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो, “ ... कुल आपले देशातून पन्नास सहस्र वैदिक ब्राह्मण थोर थोर क्षेत्रीहून मिळाले. तो सर्वही समुदाय (राजांनी) राहून घेतला. प्रत्यही मिष्टान्न भोजनास घालू लागले. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ मासी शुध त्रयोदसीस मुहूर्त पाहीला. ते दिवशी राजियांनी मंगलस्नाने करून श्री माहादेव व श्री भवानी कुलस्वामी, उपाध्ये प्रभाकरभटाचे पुत्र बाळंभट कुलगुरू व भट गोसावी, वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठीत यांची सर्वांची पुजा येथाविधी अलंकार वस्त्रे देऊन सर्वांस नमन करून अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके करून सुवर्ण कलशपात्री अभिषेक केला. (राज्याभिषेकास) पन्नास सहस्र ब्राह्मण वैदिक मिळाले. यावेगळे तपोनिधी व सत्पुरुष , संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी जंगम नाना जाती मिळाले.या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मर्‍हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाहला. गोष्ट सामान्य न जाहली...”  आता, सभासद हा खुद्द राज्याभिषेकासमयी तिथे उपस्थित होता यात शंका नाही, कारण ही बखर शिवकाळाशी सर्वात जवळच्या असणार्‍या कालखंडातली आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांनी कृष्णाजी अनंत हा ‘ पुरातन, राज्यातील माहितगार ’ असल्यानेच राजारामांनी त्याला आपल्या वडिलांचे चरित्र लिहावयास सांगितले. त्यामूळे याहून दुसरा मोठा पुरावा कोठेही सापडणार नाही. 
आजतागायत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केल्याचा एकही अस्सल लेखी कागदोपत्री पुरावा ( म्हणजे पत्र, समकालीन बखर अथवा परकीय वकीलांची बातमीपत्रं इ.) आजपर्यंत सापडलेला नाही, ही सत्य परिस्थिती आहे. याउलट इ.स. १६७०-७१ मध्ये त्र्यंबकेश्वर महाक्षेत्री शिवलिंगापाशी असणार्‍या भोसले कुलाच्या क्षेत्रोपाध्यांना, आबदेभट ढेरगे यांना शिवाजी महाराजांनी दिलेले हा कौलनामा पाहता खरे काय ते चटकन लक्षात येईल.
“ कौलनामा अजरख्तखाने राजश्री शिवाजीराजे साहेब दामदौलतहू ता। भटानी व समस्त भिकक्षुक भटानी त्रिंबककर को। त्रिंबक सुहूर सन इहिदे सबैन अलफ कौलनामा यैसा जे वेदमूर्ति आबदे ढेरगे यांणी मालुमात केली की साहेबाचे (महाराजांचेच) लोक येताजाता आपणास तसविस देताती तरी कौल मरहमत केलिया आसिरवाद देऊनु सुखे राहोन म्हणुन तरी तुम्ही सुखे राहणे. साहेबाचे लोक तेथे आले तरी भिक्षुक ब्राह्मणास आजार देणार नाही. तुम्ही सुखे राहणे. कोणे गोष्टीचा शक न धरणे. दरी बाब कौल असे. मोर्तब सुद. मर्यादेयं विराजते ॥ ”
या पत्राची अस्सल छायांकीत प्रत पुढे दिलेली आहे.




महाराजांच्या सैन्यातील काही माणसांचा उपद्रव होतो म्हणून महाराजांचे त्र्यंबकेश्वर येथील क्षेत्रोपाध्ये आबदेभट ढेरगे यांनी शिवाजी महाराजांकडे कौल मागितला. याबाबत क्षेत्रीच्या ब्राह्मणांना सैन्यातील कोणाही व्यक्तीकडून कसलाही त्रास होणार नाही अशा आशयाचा कौलनामा महाराजांनी पाठवून दिला.