Pages

  • शिवकाळ
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • माझ्याबद्दल

थोरल्या राजाराम महाराजांचे थोरल्या शाहूंबद्दलचे मत

शाहू कधीतरी दक्षिणेत नक्की येईल असे राजाराम महाराजांना वाटत होते, आणि आपण शाहूतर्फे राज्य करत आहोत ही राजाराम महाराजांची भावना होती हे दर्शवणारे राजारामांचे शंकराजी नारायण सचिव यांना लिहीलेले पत्र..  दिनांक : २५ ऑगस्ट १६९७ (भाद्रपद वद्य ४ शके १६१९, ईश्वरनाम संवत्सर).. परंतू पुढे राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईंनी मात्र शाहू महाराष्ट्रात आल्यावर अखेरपर्यंत त्यांना विरोधच केला .. राजारामछत्रपतींच्या मनातलं शाहूंचं स्थान त्या अखेरपर्यंत ओळखू शकल्या नाहीत.. 


  श्री

     राजमान्य राजेश्री शंकराजी नारायण पंडीत यांसि आज्ञा ऐसी जे राजश्री दादाजी नरसप्रभू देशकुलकर्णी व गावकुलकर्णी देहाये (गाव) तर्फ (तालुका) रोहीडखोरे व वेलवंडखोरे याचे वतन तुम्ही जप्त केले. हे वतन परत देणे. मावळमजकूरी स्वारी येण्याचे पूर्वी वतन दिल्याचा मजकूर लिहीणे. याउपरी वतन न दिल्या हा बोभाटा आल्यास तुमचे अबरूस व पदास धका येईल असे स्वामीस भासत आहे व पुढे नाना प्रकारच्या अडचणी तुम्हांस अशा करणीच्या येतील कारण चिरंजीव (शाहू) कालेकरून (काही काळानंतर) श्री देसी (महाराष्ट्रात) आणील तेव्हा संकटी जी माणसे उपयोगी पडली त्याचा तसनसी (नाश) आम्ही करविल्या हे इकडे यावे त्याचे चित्ती द्वेश यावा (अर्थात शाहू इकडे यावे आणि त्याला माझ्याबद्दल म्हणजेच राजारामांविषयी द्वेष वाटावा) व राज्यकर्त्यास इनसाफ पाहाणे जरूर, त्यात हे तरी अविचाराचे कलम (म्हणजे ही अविचाराची गोष्ट). भलाई जाली ती सारी आमची. एकीकडे जाऊन असी करणी तुम्ही केली यास स्वामीद्रोहाचेच करणे, ते (शाहू) मुख्य, सर्व राज्यास अधिकारी, आम्ही करीतो तरी त्याच्यासाठीच आहे, प्रसंगास सर्व लोकांस तिकडेच पाहणे येईल, व वागतील हे कारण ईश्वरीच नेमले आहे. उगीच भलते भरी न भरणे (उगाच भलत्या  नादाला लागू नका). पुढे उर्जित होय ते करणे. हे न केलिया कामची फळे ज्याचे ते भरतील असी श्रीची इच्छाच असली तरी तुम्ही तरी का समजाल. तरी  नीट चालीने वागणे म्हणजे पुढे सर्वोपरी उर्जिताचेच करण जाणजे   जाणिजे निदेश (निर्देश=आज्ञा) समक्ष मो। (मोर्तब) असे. 

   तेरीख १७ सफर सु॥ समान                                 रुजू सुरनीस बार
   तिसैन अलफ                                                      बार सूद

असल पत्र सचिवपंतास दिल्हे त्याची नकल ठेविली त्याची नकलसंदर्भ :  लेखांक २८६, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड १५

: कौस्तुभ कस्तुरे   ।   [email protected] 

Newer Post Older Post Home