महाराष्ट्रातील अस्मानी आणि सुलतानीच्या कचाट्यात सापडलेल्या लोकांना आशेचा एकह्ही किरण दिसत नव्हता.. शेतात गवताची एक काडी उरली नव्हती. लोक झाडाचा पाला ओरबाडून खात होते. अशा वेळेस संत एकनाथ महाराज तुळजापूरच्या महाराष्ट्राच्या भाग्यभवानीला आवाहन करीत होते,
" हे चंडमुंडभंडासूरखंडिनी जगदंबे.. उदंडदंड महिषासूरमर्दिनी दुर्गे.. महाराष्ट्रधर्मरक्षिके तुळजाभवानी, दार उघड "
महाराष्ट्राचे महाभाग्य म्हणून शिवाजी महाराजांचे स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायमच आहे, परंतू अशा अद्वितिय राजाला जन्म देणारी अन् केवळ राजांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मायेच्या पंखांखाली घेणारी ती माऊली किती थोर असेल बरं ??
कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर नावाचा समकालिन शिवचरित्रकार लिहीतो, "पृथ्वीचा भार नाहिसा करण्यासाठी भुतलावर अवतार घेऊन शहाजीराजाच्या वाड्यात बालरुपाने विहार करणारा आणि आपल्या सौंदर्याने जन्म देणारी आई व दुसरे लोक यांचे रंजन करणारा तो सर्वांतरात्मा विष्णु तेथे नानाप्रकारच्या बाललीला करू लागला" .
कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर नावाचा समकालिन शिवचरित्रकार लिहीतो, "पृथ्वीचा भार नाहिसा करण्यासाठी भुतलावर अवतार घेऊन शहाजीराजाच्या वाड्यात बालरुपाने विहार करणारा आणि आपल्या सौंदर्याने जन्म देणारी आई व दुसरे लोक यांचे रंजन करणारा तो सर्वांतरात्मा विष्णु तेथे नानाप्रकारच्या बाललीला करू लागला" .
वरील रेखाचित्रात आहेत बाल शिवबाला घेऊन उभ्या असलेल्या जिजाऊसाहेब !
गुप्तहेरांकडून बातम्या येत होत्या. हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळाच जणू ! स्वराज्याच्या सुरुवातीला या तिसर्या डोळ्याचं नाव होतं विश्वासराव दिघे देशपांडे.. अन् नंतर आले बहिर्जी नाईक जाधव ! वरील रेखाचित्रात महाराज गुप्तहेरांकडून आलेल्या बातम्यांचे खलिते लक्षपूर्वक ऐकत आहेत..
जावळीकर चंद्रराव मोरे दौलतराव वारल्यानंतर विजापूरच्या आदिलशहाने ती गादी खालसा करू नये यास्तव महाराजांनी चंद्ररावाच्या विधवा बायकोच्या पदरी शिवथरच्या मोरे घराण्यातल्या 'यशवंतराव' नावाच्या माणसाला दत्तक देऊन त्याला 'चंदरराई दिल्ही'. पण पुढच्या ५-६ वर्षातच चंद्रराव यशवंतरावाचा माज वाढला आणि हळूहळू तो स्वराज्यात घुसखोरी करू लागला. महाराजांनी त्याला समजावून पाहिले पण पठ्ठा ऐकेचना ! महाराजांनी आपले वकील म्हणून रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्यांच्या साथीला संभाजी कावजी कोंढाळकर यांना पाठवले. पण चंद्ररावाने त्यांच्यासोबत मग्रुरीने उलटजबाब दिला-
" तुम्ही कोण ? राजे आम्ही.. येता जावळी जाता गोळी होईल "
रघुनाथपंतांनी जंजिर्याला मोर्चे लावले खरे ! पण हा पाण्यातला उंदिर सहजासहजी दाद देणारा नव्हता. मराठी आरमाराने लावलेले मोर्चे मोडून काढून सिद्दी याकुतखान कडवी झुंज देत होता. दंडा-राजपुरीच्या किनार्यावरील मराठी तोफांच्या धडाक्याने जंजिर्याच्या तटाचा चिराही निखळत नव्हता !
मार्गशिर्ष शुद्ध सप्तमी शके १५८१, म्हणजेच गुरुवार दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी किल्ले प्रतापगडाच्या डोंगरमाचीवर महाराजांनी अफजलखान 'एकांगे करून, वाघनखाचा मारा करून, पोटात बिचोवा खुपसून मारिला'.
दि. १३ जुलै १६६० ची दुपार.. विशाळगडापासून ४ कोसांवर असणार्या गजापूरनजिकच्या खिंडित सिद्दी मसाऊदने पन्हाळ्यावरून सहाशे मावळ्यांसह निसटलेल्या शिवाजी महाराजांना गाठले. प्रसंग बाका होता. अशा वेळेस हिरडसमावळातील बांदल देशमुखांच्या मावळ्यांनी आणि देशपांडे बाजूप्रभू प्रधान यांनी राजांना बळेच निम्मे मावळ्यांसह विशाळगडाकडे पाठवून आपण स्वतः खिंड अडवून उभे राहिले. महाराज गडावर पोहोचल्याच्या इशारतीच्या तोफा होत नाहीत तोवर बाजी आपल्या देहाची चाळण होत असतानाही खिंड प्राणपणाने लढवत होते, राजे पोहोचत नाहीत तोवर हा बुलंद बुरुज गनिमाला तसुभरही पुढे सरकू देण्यास राजी नव्हता..
प्रतापगड युद्धानंतर जवळपास वर्षभराने महाराज पुन्हा राजगडला आले ! गडावर आल्यावर जखमनाम्याचा दरबार भरला. आपल्या सार्या सवंगड्यांचं कोडकवतिक केल्यानंतर महाराजांनी 'अज्ञानदास' शाहिराला बोलावलं. अज्ञानदासाने प्रतापगडच्या रणसंग्रामावर एक फक्कड असा पोवाडा राजगडच्या राजसभेत गायला ! शेवटी शाहिराने दोन ओळी झोकात उठवल्या,
" जैसे आंगद हनुमंत रघुनाथाला, तैसे जेधे बांदल शिवाजीला .. हां जी जी रं जी..........."
" महाराज राजश्री बसनूर प्रांत मोहीम करावया निमित्य आरमाराच्या जमावानिसी मौजे मजकूर (मालवण) एथे आले . त्याउपर दर्यामध्ये बेट नजिक दृष्टीस पडिले तेव्हा या बेटाचे नाव काय म्हणून पुसिले. त्यावर कृष्ण सावंत देसाई व भानजी प्रभुदेसाई प्रांतमजकूर यांनी सांगितले की या बेटाचे नाव 'कुरटे'. त्यावरी राजश्री स्वामी बेटावरी येऊन जागा पाहिला. ते स्थळ उत्तम विस्तिर्ण आटोपासारखे दिसले. त्याउपरी रा॥ स्वामिंनी आज्ञा केली या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा. म्हणून आज्ञा करून किल्ला बांधावयास हुकूम केला " ... राजाज्ञेप्रमाणे सिंधुदुर्गाचे बांधकाम झपाट्याने वर चढू लागले !
४ फेब्रुवारी १६७०, माघ वद्य नवमीच्या दिवशी, नव्हे नव्हे, भर मध्यरात्री.. औरंगजेबाविरुद्ध मराठी तलवारी उपसल्या गेल्या. सूभेदार तानाजी मालुसरे पाचशे मराठी वाघांना घेऊन दख्खनदरवाजा किल्ले सिंहगड जिंकायला निघाले. गडावर उदयभान राठोडने जागता पहारा ठेवलेला होता, पण गाफिल असलेल्या डोणगिरीच्या भयंकर कड्यावरून चढून जायचे असे तानाजीने ठरवून मराठी मावळे तेथून घोरपडीच्या चिवटपणाने (यशवंती घोरपड इत्यादी दंतकथा आहेत हे लक्षात ठेवावे, त्यामूळे घोरपडीच्या सहाय्याने नव्हे) "वान्नरन्याये करोन कपारियांत बोटे अडकवोन" म्हणजे माकडं जशी कपार्यात बोटं अडकवून चढतात तसं कडा चढून गेले..
इ.स. १६७० मध्ये औरंगजेबाने स्वतःहून पुरंदरचा तह धुडकावून लावून हिंदूंवर अनंवित अत्याचार करण्यास सुरुवात केल्यावर महाराजांनीही मोंगलांविरुद्ध एकदम चढाईचे धोरण स्विकारले. चार वर्ष गंजत पडलेल्या मराठी तलवारी एकदम धार चढून म्यानातून उपसल्या गेल्या. एकेक किल्ला सर होऊ लागला. खुद्द महाराज मार्च १६७०च्या पूर्वार्धात आसनगावजवळच्या माहुलीगडावर जाऊन धडकले. पण मनोहरदास गौड नावाच्या मोंगल किल्लेदाराने महाराजांचा सुलतानढवा मोडून काढला. महाराजांनी माघार घेतली आणि तेथूनजवळच असणार्या टिटवाळ्याच्या महागणपतीच्या दर्शनाला गेले. यानंतर पुन्हा १६ जून १६७० रोजी महाराजांनी पुन्हा माहुलीवर एल्गार केला आणि माहुली फत्ते झाला !
२२ जून १६७० रोजी मराठी सैन्याने चिखलाच्या भिंती तयार करून, त्यात लाकडी फळ्या रोवून त्याआडून मारा करून किल्ले कर्नाळा सर केला !
रायगडाचे बांधकाम पूर्ण झाले होते. स्वराज्याच्या इमारतखात्याचे सूभेदार हिरोजी इंदळकर अथवा इंदुलकर हे महाराजांना मोठ्या आनंदाने इंद्राच्या अमरपुरीप्रमाणे सजवलेला रायगड दाखवत होते. समोर दिसत आहेत ते रायगडच्या पालखी दरवाजाशेजारचे दोन प्रमुख आघाडी मनोरे (जे सध्या निम्मेही शिल्लक नाहीत), त्यामागे तिनमजली लहान मनोरा आणि पायथ्याला गंगासागर तलाव !
१६७० च्या सुमारास धर्मवेडाने पछाडलेल्या औरंगजेबाचा क्रूरपणा फारच वाढला ! हिंदूंचे पवित्र तिर्थक्षेत्र असणार्या काशिविश्वेश्वराचे देऊळ घणांच्या घावांखाली उध्वस्त होऊ लागले. आणि वेदशास्त्रसंपन्न गागाभट्टांनी मनोमन प्रतिज्ञा केली. "आजचा विश्वेश्वर शिवाचा अपूर्ण राहिलेला अभिषेक मी रायगडावर जाऊन त्या 'शिव'शंकराला करीन" ! आणि गागाभट्ट दक्षिणेची वाट चालू लागले....
दोन शिव एकमेकांना भेटले. एक होता सह्याद्रीचा रुद्र आणि दुसरा होता कैलासाचा महारुद्र ! राज्याभिषेकाच्या दिवशी भल्यापहाटे महाराजांनी जगदिश्वराच्या मंदिरात शिवलिंगाची पुजा केली !
इंग्रजांचा वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन हा राज्याभिषेकाला उपस्थित राहिला. रायगडाची अतिशय बिकट वाट चढताना हेन्रीला खरंतर घाम फुटलेला आणि जेमतेम दोन माणसेच जाऊ शकतील अशा वाटेवरून वर आल्यावर नगारखान्याच्या बाहेर झुलत उभ्या असलेल्या या सालंकृत हत्तींना पाहून हेन्रीची बोटे आश्चर्याने तोंडातच अडकली ! हे हत्ती वर आले तरी कसे ? बिचारा शेवटपर्यंत विचारच करत राहिला !
रायगडावर असलेल्या कवीराज भुषणाने एक दिवस महाराजांना आपल्या चतुरंग सेनेसह मोहीमेवर निघालेले पाहिले आणि आश्चर्य आणि रोमांचित झालेल्या भुषणाच्या प्रतिभेने तांडव मांडले-
" साजि चतुरंग बीर रंग में तुरंग चढी
सरजा शिवाजी जंग जितन चलत है ।
भूषन भनत नाद बिहद नगारन के
सरजा शिवाजी जंग जितन चलत है ।
भूषन भनत नाद बिहद नगारन के
नदी नद मद गैबरन के रलत हे ॥
ऐल फैल खैलभैल खलक में गैल गैल
सुजन की ठैल पैल सैल उसलत है ।
तारा सो तरनी धुरी धारा मे लगत जिमी
थारा पर पारावार यों हलत है ॥ "
तारा सो तरनी धुरी धारा मे लगत जिमी
थारा पर पारावार यों हलत है ॥ "
महाराज शिवछत्रपती रायगडाच्या नगारखान्याच्या महाद्वारातून राजसभेत प्रवेश करताना .... जणू रुद्रच धीरगंभीरपणे पावलं टाकत प्रवेशत आहे !
महाराजांना राज्याभिषेक झाला आणि स्वराज्यात आनंदी आनंद उसळला. सुलतानीचे भय उरले नाही. श्री सद्गुरुवर्य समर्थ रामदासस्वामींनी तर या स्वराज्याला "आनंदवनभुवन" म्हटले ! हिंदूंचे देव-धर्म पुन्हा निःशंक धर्माचरणात सुखाने नांदू लागला...
महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि औरंगजेबाने विमनस्कपणे डोक्याला हात लावल्यावर जणू भवताली 'शोकसभा' भरली.. औरंगजेबाची मनस्थिती काय होती बरं ??
सरित्पतेचे जल मोजवेना
माध्यान्हिचा भास्कर पाहवेना
मूठित वैश्वानर साहवेना
तैसा नृप शिवाजी जिंकवेना
म्हणजे, जसे समुद्राचे पाणी मोजता येत नाही, जसा दुपारचा सूर्य पाहता येत नाही, जसा मुठित आत्म्याला बंद करून ठेवता येत नाही तसा (कितीही प्रयत्न केले तरिही) या शिवाजीला जिंकता(च) येत नाही !
स्वराज्य.. सुराज्य ! महाराजांच्या पंखांखाली गरिब शेतकरी प्रजाही सुखाने नांदत होती. पुन्हा आनंदाची चाहूल लागत होती. शेतकर्याला सुखाने चार घास जेवता येत होते आणि स्वराज्यातील म्हातारे, स्त्रिया, गोमाता आणि लहान मुलं निर्धोकपणे जगू शकत होती !
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त्त गडावरच्या राजवाड्यात दुध द्यायला आलेली आणि गड फिरण्याच्या नादात सूर्यास्ताच्या समयी दरवाजे बंद झाल्यावर आपल्या लहानग्या बाळाच्या ओढीने रायगडाच्या मावळत्यामाचीवरील श्रीगोंदे टोकाजवळचा कडा उतरणारी एक गवळण. हिरा गवळण ! वास्तविक हिरा गवळणीची ही कथा आहे, अस्सल इतिहास नाही ! पण काही कागदांत अथवा बखरीत हिरकणी बुरुजाची नावे आढळतात त्यावरून ती कथा काही अंशी अत्य असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या 'कथाकथना'त हिरकणीची कथा ज्या पद्धतीने सांगितली आहे ना ती ऐकताना अंगावर काटा आल्यावाचून आणि डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही !
© वरील सर्व रेखाचित्रांचे हक्क राखिव आहेत. त्यांचा वैयक्तिक म्हणून कोणीही गैरवापर केल्याचे आढळल्यास अथवा ती स्वतःची म्हणून प्रसिद्ध केल्यास कारवाई करण्यात येईल.
कौस्तुभ कस्तुरे । [email protected]