काय हो, पुस्तक लिहीणं म्हणजे काय असतं ? आपल्याला हव्या तेवढ्या कागदांवर लिहायचं आणि मग ते छापायचं म्हणजे झालं पुस्तक तयार !... हो, याच घोर गैरसमजात मी सुधा होतो एकेकाळी. पण मागच्या वर्षी ऑगस्टपासून पुढच्या काळात माझा हा विचार कुठच्या कुठे उडून गेला. आता आठवलं की मात्र हसायला येतं त्याचं.
माझं पहिलं पुस्तक ‘पेशवाई’ प्रकाशनाच्या दिवशीच संध्याकाळी हातात पडलं, आणि क्षणभरात मागचे तब्बल चार महिने, किंबहुना चार वर्ष सर्र्कन डोळ्यांसमोरून गेली. हे पुस्तक कसं घडलं त्याची ती एक स्पष्ट झलक होती. काय आहे ही ‘पेशवाई’ची जन्मकथा ?
इ.स. २०११ च्या १४ जानेवारीला विलेपारल्याच्या जनसेवा समिती तर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. निनादराव बेडेकर, इतिहास संशोधक पांडुरंगराव बलकवडे आणि मेजर शशिकांत पित्रे यांची ‘पानिपत’ या विषयावर एकदिवसीय व्याख्यानमाला झाली होती. अर्थातच, पूर्ण दिवस मंतरलेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर घाईगडबडीत निनादरावांची भेट घेतली. बोलता बोलता सहज त्यांच्या तोंडून निघून गेलं की, “आत्ताच्या काळात पेशव्यांविषयी इतके गैरसमज पसरले आहेत, की सर्वसामान्य माणसाला प्रथम ऐकताच ते खरे वाटतात, आणि एकदा खरे वाटले की माणूस पुन्हा ते पडताळून पाहण्याचा विचारच करत नाही”. पुढे पुस्तकांचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले, “या गोष्टीला एका दृष्टीने इतिहास लेखकही कारणीभूत आहेत. कारण आमच्याकडे पेशव्यांवर एकतर रियासतीसारखं पांडित्याचं चार हजार पानांचं लिखाण झालं नाहीतर एकदम कादंबर्या ! पण सर्वसामान्य माणसाला समजेल पण कंटाळाही नाही येणार असं आटोपशीर लिखाण मात्र कोणी केलं नाही”. नंतर थोड्या बाकीच्या गोष्टी झाल्या, आणि घरी निघायला पावलं वळली..
पण मनात मात्र निनादरावांचे ते शब्द भोवर्यासारखे रुंजी घालत होते. योगायोग म्हणू वा काहीही, पण नुकतंच, त्याच्या तीन महिने आधी, २०१० च्या दिवाळीत मी माझ्या माहितीकरीता पेशव्यांवर एक डॉक्युमेंटेशन करायला घेतले होते. पारल्याहून दादरला येईपर्यंत त्या भोवर्याचं वादळ झालं, आणि मनाशी काहीतरी ठरवलं.. काय ते मलाही सांगता नाही येत, कारण अर्थात त्यावेळीसुद्धा पुस्तक लिहीण्याचा हेतू मनात नव्हताच ! असेच दिवसांमागून दिवस उलटत गेले, सुरुवातीला केवळ संदर्भाला उपयोगी म्हणून लिहीलेली वाक्यरचना मी बदलत गेलो आणि पाहता पाहता हे लिखाण जवळपास तीनशे फुलस्केप्स इतकं झालं ! बापरे ! आपण खरंच इतकं लिहू शकतो ? ते हस्तलिखित पाहताना विचार आला, आणि साधारण २०११ चा ऑगस्ट महिना असेल, हे माझं लिखाण पूर्ण झालं. आता मात्र हळूहळू वाटायला लागलं, हे पुस्तक म्हणून कसं वाटेल ? अर्थात, तरिही अनेक गोष्टी होत्याच ! सुरुवात होत होती ती थेट बाळाजी विश्वनाथांपासून ! पण पार्श्वभूमी काय ? म्हणून मग ‘मराठी राज्य’ ही संकल्पना जेव्हा उदयाला आली तेव्हापासून म्हणजेच, श्री शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून सुरुवात करावी असं मनात आलं, आणि पंधरवड्यात तेसुधा लिहून पूर्ण झालं. आता अख्खं साडेतीनशे फुलस्केप्सचं लिखाण माझ्यासमोर होतं. पुढे काय करायचं ?
मला चांगलंच आठवतंय, हे साडेतीनशे फुलस्केप्सचं ओझं घेऊन पुढचे दोन महिने मी किमान तीन बर्यापैकी ज्ञात असलेल्या प्रकाशन संस्थांकडे गेलो असेन.. पण प्रत्येक वेळी प्रकाशकांच्या टेबलवर पुस्तक ठेवल्याक्षणापासून पुढच्या पाच मिनीटात प्रकाशक ते चाळत, आणि “विषय छान आहे, पण... आम्हाला करता नाही येणार”, “बघुया”, अशी उत्तरं येत ! शेवटी काय, नाद सोडला. तिथपासून हे काम काय असतं याची चुणूक जाणवायला लागली होती.
पाहता पाहता चार वर्ष उलटली, मध्यंतरी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुरु केलं होतं ! मागच्या वर्षी निनादराव बेडेकरांना आदरांजली म्हणून जेव्हा आम्ही सात जण एकत्र येऊन ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ची तयारी करत होतो तेव्हा सहज मनात आलं, आपण मागे लिहीलेलं काहीतरी.. कपाट शोधलं आणि ते लिहीलेले, कोपरे दुमडलेले आणि चार वर्षात धूळ खाऊन मस्त तब्येत झालेले, काळवंडलेले फुलस्केप्स अखेर सापडले. पेशाने गायक, हौसेनी इतिहास अभ्यासक आणि मुख्य म्हणजे निनादरावांचे पट्टशिष्य असलेले उमेश जोशी स्वतः एक प्रकाशक असल्याने त्यांना फोनवर बोलता बोलता सहज म्हटलं, असं असं आहे. राव म्हणाले, घेऊन ये ! मग काय, लगेचच २३ ऑगस्ट २०१५ ला डोंबिवलीला स्वर्गीय बाबा आमटे यांच्या कवितांचा “करुणाष्टके” हा कार्यक्रम होता, त्याकरता उमेश आणि मी भेटल्यावर त्या हस्तलिखिताची एक प्रत मी त्यांना दिली. अर्थात, एक प्रकाशक या नात्याने त्यांनी महिनाभर घेऊन निवांत ते पूर्ण हस्तलिखित चाळले, तपासले. लेखनशैलीच्या अनेक चूकाही वर वर पाहतानाच सांगितल्या, पण महिनाभराने का होईना, “आपण हे पुस्तक करतोय” असं जोशी म्हणाले आणि क्षणभर माझा विश्वासच बसेना..
“पेशवाई” हे नाव कसं वाटतं असं अनेकांना विचारलं, त्यावर बर्याच जणांनी नाकं मुरडली. “शिवाजी महाराजांनी पेशवा चा पंतप्रधान केला तर पुन्हा पेशवाई का म्हणताय ?” असा खोचक सवालही अनेकांनी केला. पण खरं सांगायचं तर खुद्द थोरल्या महाराजांनी सुद्धा राज्याभिषेकानंतरही ‘पेशवे’ हा शब्द वापरला असल्याने, तसेच नंतरच्या काळात अनेकांनी हा शब्द वापरला असल्याने त्यात काही खुप मोठी चूक आहे असं नाही. पेशव्यांच्या वाढत्या पराक्रमामूळे, चढत्या यशामूळे आणि कीर्तिमूळे बखरकारांच्या लेखणीतून, शाहीरांच्या कवनांतून, पोवाड्यांतून त्यांची कीर्त दवण्यासारखी घमघमू लागली, आणि मराठी बखरकारांनी, शकावलीकारांनी, शाहीरांनी मराठेशाहीच्या या कालखंडाला एक विशेषण बहाल केले ते म्हणजे "पेशवाई" ! अन् म्हणूनच नाव ठरवायचं एवढं काही खलबत झालं नाहीच, लेखक आणि प्रकाशक “पेशवाई” या नावावरच खुष होते, पण खरी मजा सुरु झाली ती पुस्तकावर काम करताना ! वाक्यरचना, शब्दरचना, आणि अर्थ हे अर्थातच लिखाण करताना ‘मज बालकाचे मनीं कैसे’ असणार. मग ओळ अन् ओळ तपासून ‘भाषाशुद्धीची चळवळ’ सुरु झाली. या सोबतच, आलं ते मुखपृष्ठ ! कोणत्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ ठरवण्याची एक प्रकारची गंमत असते. म्हणजे लेखकाच्या मनात काहीतरी वेगळं असतं, प्रकाशकाच्या मनात काहीतरी वेगळं असतं आणि मुखपृष्ठ तयार करणारा अवलिया कलाकार जे करतो ते आणखी वेगळंच असतं. ‘पेशवाई’च्या बाबतीत माझं म्हणणं होतं की शनिवारवाड्याचा दिल्लीदरवाजा, आणि त्यावर एक ढाल-तलवार किंवा मग पुण्याच्या पेशवे बागेतला माधवरावसाहेबांचा करारी पुतळा असं काहीसं असावं. पण प्रकाशक महोदयांना ते काही केल्या पटेना ! अखेर आमचा हा वाद ‘अस्मी क्रिएशन्स’च्या कोर्टात जाऊन पडला आणि ‘अस्मी’चे आशुतोष केळकर आणि त्यांच्या टीमने जे काही बनवलं ते आज आपल्या समोर आहे ! एकीकडे हे सुरु असतानाच दुसरीकडे, मिलींद आणि मंजिरी सहस्रबुद्धे यांनी अक्षरजुळणीचे काम अतिशय जलदगतीने आणि अप्रतिम केले. ते झाल्यानंतर ‘भाषा आणि लेखनशुद्धीच्या चळवळीतील महत्वाचे योगदान’ जर कोण देत असेल ती व्यक्ती म्हणजे मुद्रितशोधन करणारी व्यक्ती ! हे काम उमेश जोशींच्या मातोश्री सौ. मेघना जोशींनी पूर्ण केले. ही सारी कसरत करत करत तीन महिने निघून गेले.
नोव्हेंबरमध्ये शेवटी शेवटी माझी MBA ची परिक्षा होती, त्यामूळे अर्थात त्यावेळी एक लेखक अभ्यासाच्या नावाखाली उंडारत होता आणि तो वगळता बाकी सारी मंडळी कामात गर्क होती. डिसेंबरमध्ये परिक्षेबरोबरच अभ्यासाचे कारण संपले आणि प्रकाशक महोदयांनी पानिपतच्या चौथ्या युद्धाच्या आघाडीवर तैनात होण्याचा निरोप धाडला. मग काय करतो बापडा, पुन्हा बदलापूर ते पारले अशा फेर्या सुरु झाल्या. कधीकधी तर पारल्यातच दोन दोन मुक्काम होऊ लागला. ‘पेशवाई’ सोबतच ‘पाऊलखुणा’चेही काम युद्धपातळीवर पूर्ण होत होते. डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात दोन्हीही पुस्तके ‘मौज’च्या प्रेसकडे प्रिंटींगला गेली, पण ‘मौज’ म्हणजे खरंच नावासारखी मौज वाटली, कारण एवढ्या नामांकित संस्थेकडे इतरही पुस्तकांच्या छपाईचे काम असणारच ! तरिही मौजच्या भागवत काकांनी आम्हाला चौथे पानिपत जिंकून देत दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी, प्रकाशनदिनाच्या, किंबहुना प्रकाशनवेळेच्या केवळ दोन तास आधी पुस्तके सुपूर्द केली आणि पुस्तक हाती आल्यानंतर मला पानिपतच काय, सबंध ब्रह्मांड जिंकल्यासारखे वाटले.. मग काय, १९ तारखेला संध्याकाळी राफ्टर पब्लिकेशन्स आणि जनसेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने पारल्याच्या डहाणूकर महाविद्यालयात इतिहास संशोधक आणि शंभूराजांचे चरित्रकार डॉ. सदाशिव शिवदे आणि ज्येष्ठ खगोलतज्ञ श्री. मोहन आपटे या दोन विद्वज्जनांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रकृतीच्या कारणास्तव शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू न शकल्याने दुसर्या दिवशी पुण्याला त्यांच्या हस्ते औपचारिक प्रकाशन झाले, आणि त्याच दिवशी पुस्तक अधिकृतरित्या बाजारात आले..
गेली चार वर्षे उराशी बाळगलेलं स्वप्न मागच्या चार महिन्यापर्यंत काही ध्यानीमनी नसता अचानक पूर्ण झालं होतं. खरंच, मागच्या वर्षीचे ते मंतरलेले दिवस आठवले की काय वाटतं ते शब्दात सांगता यायचं नाही.. ते काहीही असो, ते ‘मंतरलेले दिवस’ लवकरच पुन्हा येणार आहेत याची मला खात्री आहे..
- कौस्तुभ कस्तुरे । kaustubhkasture.in