Pages

  • शिवकाळ
  • रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी
  • माझ्याबद्दल

माझा मोडीचा प्रवास

मोडीचा आणि माझा प्रथम परिचय केव्हा आला ? मला अगदी स्पष्ट आठवतंय.. माझ्या बाबांना ट्रेकींगची आणि पर्यायाने इतिहासाची प्रचंड आवड. याच आवडीतून त्यांनी ‘श्रीमानयोगी’, ‘छावा’, ‘स्वामी’, ‘राऊ’ सारख्या ऐतिहासिक कादंबर्‍या आणून ठेवल्या होत्या. मी लहानपणी दिवाळीत किल्ले करण्याच्या निमित्ताने त्यात काही सापडतंय का बघण्यासाठी एके दिवशी त्यातली “श्रीमानयोगी’ घेतली, आणि पुढच्या तीन महिन्यात ती वाचून काढली. अन्‌ मग दिवसेंदिवस “शिवाजी” या तीन अक्षरांनी त्या बालवयात मला अक्षरशः झपाटून काढलं. 


आणि अशातच, इ.स. १९९९ च्या मे महिन्यात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतल्यावर हाती आलं ते मराठ्यांच्या इतिहासाचं पुस्तक, पण त्याहून जास्त मोठा प्रश्न उभा राहिला तो पुस्तकाचं मलपृष्ठ पाहून ! काहीतरी अगम्य चित्राकृतींमध्ये एका वळकटीच्या कागदावर लिहीलेलं ते कसलंसं पत्र होतं. बालमनाने थोडा शोध घेतल्यावर कळलं की ते शिवाजी महाराजांचं पत्र आहे !! झालं.. आणखी शंका !! श्रीमानयोगीत तर शिवाजी मराठी आहे, मग ही कोणती भाषा ? म्हणजे शिवाजी महाराज “आपले” नाहीत ? ते कोणत्या न समजणार्‍या भाषेत बोलायचे ? अखेरीस हे प्रश्न झेपेनासे झाले आणि तो विषय तिथेच संपला.





यानंतर साधारण सहा वर्षे उलटली, आणि आमच्या शाळेत ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांची तीन दिवसांची शिवचरित्र व्याख्यानमाला झाली. आता हळूहळू समजायलाही लागलं होतं. ऋषिसारख्या दिसणार्‍या या आजोबांनी शाळेतल्या मुलांना सहज समजेल असं शिवचरित्र आणि त्याचा पाया सांगितला. हे सांगतानाच मधेच कुठेतरी महाराजांच्या पत्रांचा वगैरे उल्लेख आला, अन्‌ त्याहूनही महत्वाचं म्हणजे ‘शिवाजी महाराज मराठीच होते’ हे समजलं !! झालं.. मग ते मराठी होते तर मराठी पत्र चौथीच्या इतिहासात असं कसं छापलं ? पुन्हा विचारांचं काहूर माजलं. शेवटी घरी आल्यावर न राहवून बाबासाहेबांचं “राजाशिवछत्रपती” विकत आणलं. आणि आत पाहतो तो काय ? चौथीच्या इतिहासात असलेलं ते पत्र जसंच्या तसं बाबासाहेबांच्या पुस्तकात सुद्धा ! 

आता काही स्वस्थ बसवेना. तेव्हा आजच्यासारखं घरी इंटरनेट नव्हतं. सायबरकॅफेत जाऊन नेट वापरायला मिळे. माझे तास अन्‌ तास कॅफेत जाऊ लागले. मोडी लिपीविषयी एकेक माहिती गोळा करण्याच्या नादात तहान भूक सुद्धा विसरलो होतो. नेटवर काही जुजबी माहिती मिळाली. मोडी तज्ञ राजेश खिलारींचा एक ब्लॉग होता मोडीवर तो उपयोगी पडला आणि मोडीची बाराखडी मिळाली. मग काय.. पुन्हा बालवाडीत असल्यासारखं मोडी अक्षरं तक्त्यावरून वहिवर लिहायची आणि घोटून घोटून पाठ करायची हा एकच उद्योग ! तरिही काही समाधान होईना. बाबासाहेबांच्या वा चौथीच्या इतिहासातील ते पत्र अजून काही स्पष्ट वाचता येत नव्हतं ! एके दिवशी चक्क भिंग घेतलं आणि छापलेल्या पत्रातले बारकावे बघितले, अन्‌ ताळमेळ साधत पत्रं वाचलं. अर्थात, त्यावेळी ते पत्र वाचलं होतं, निम्म्याहून जास्त शब्दांचा अर्थ समजला नव्हता. 

मग हळूहळू सुरुवात झाली ती सवयीप्रमाणे वहिवर मोडीत लिहायची. मला आठवतंय, माझ्या दहावीच्या प्रत्येक वहीवर चूकीच्या का होईना, पण माझं नाव मोडीत लिहीलं होतं मी. पण इतकंच करायचं ? आपण आपलं शिकतोय, पण चूका सांगणारा सापडत नाही तोवर आपलं आपल्याला सगळंच बरोबर वाटतं. आणि याच जरा अधिक आत्मविश्वासात मी पत्र लिहीलं.. 

पत्र लिहीलं होतं थेट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ! पुढच्या साधारण सहा महिन्यात बाबासाहेबांना आणखी दोन पत्र पाठवली. वयोमानानुसार प्रत्यक्ष बाबासाहेबांचं उत्तर येणं अपेक्षित नव्ह्तंच. अखेर एके दिवशी पुरंदरेवाड्यावर गेलो असता आश्चर्याचा धक्काच बसला. बाबासाहेब म्हणाले, “मी तुम्ही लिहीलेली तीन्ही पत्रं वाचली”. पण याहून मोठा धक्का म्हणजे, बाबासाहेब त्यांच्या खास शैलीत मिष्कीलपणे म्हणाले, “पत्र सुरेख आहेत, पण जर्राSS लहानशा चूका आहेत काही”. बापरे ! म्हणजे, एवढ्या आभाळाएवढ्या मोठ्या माणसाला आपण पत्र पाठवलं आणि ती चूका सापडतील इतक्या नीट त्यांनी वाचली सुद्धा ! नुकतंच पोहोचलेलं पत्र बाबासाहेबांनी हातात घेऊन त्यातले बारकावे सांगितले. आणि त्या क्षणी मी त्या पत्रात किती ठिकाणी वेडेपणा केला होता हे मला जाणवलं. “ली” लिहीताना “ल” काढून नेहमीसारखी शिरोरेघेवरून वेलांटी दिली होती... “कु”, “खु” साठी वेगळ्या आकृती असतात हे काही माहित नव्हतं, त्यांना सरळसोट उकार दिले होते. पण बाबासाहेबांनी मात्र चूका सांगताना त्या दुरुस्त कशा होतील हे सुद्धा समजावलं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास दिला. आणि म्हणूनच अभिमानाने सांगावसं वाटतं की अप्रत्यक्षरीत्या मोडीतले बारकावे शिकवणारे गुरु लाभले तेच खुद्द शिवशाहीर !

यानंतर मग मोडीचा जो सराव सुरु झाला तो काही आजतागायत सुटलेला नाही. मोडी म्हणजे कायम अमुक एकाच शैलीत असेल असं अजिबात नाही हे नव्याने समजलं. मग निरनिराळी पत्रं वाचून, तत्पुर्वी शिवकालीन भाषेचा अभ्यास करून मोडी पत्रं वाचायला लागलो. काही पुस्तकांमधून छापलेली मोडी पत्रं हाताशी येत गेली आणि मग त्यांचं लिप्यंतर करण्याचा छंदच जडला. 

दरम्यान मुंबईतले मोडी तज्ञ श्री. राजेश खिलारी यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून काही आणखी कागद वगैरे मिळत गेले, काही गोष्टी नव्याने समजल्या. या मधल्या काळात मी सहज माझ्या हाताशी लागलेली काही आधीच प्रकाशित असलेली मोडी पत्रे लिप्यंतरासह फेसबुकवर पोस्ट करत गेलो आणि लोकांचाही मोडीच्या प्रती असलेला संभ्रम समजत गेला. अनेकांचे तर ती पत्रे पाहून मेसेज येत की “तुम्ही ज्या भाषेत फेसबुकवर काहीतरी टाकलंय तसंच आमच्याकडेही आहे, आम्हाला अर्थ सांगाल का ?”. मग अशातून घरबसल्या आणखी कागद वाढत गेले, वेगवेगळ्या वळणाची मोडी नजरेत येऊ लागली, आणि वाचनसराव पक्का होत गेला. 

आज या वळणावर उभं राहून पाहत असता हा प्रवास कधीकधी माझा मलाच समजत नाही. मी घरच्या घरीच मोडी कशी शिकलो ? पण या प्रश्नाचं उत्तर वरचा सगळा प्रवास पाहिल्यावर मिळतं. आज शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि अगदी आंग्लकालीन सुद्धा मोडी वाचायला फारसा विचार करावा लागत नाही. पण “आपणांसी जे ठावे । ते इतरांसी सांगावे” या उक्तीनुसार मोडीचा प्रसार करण्याच्या हेतूने काही लेख लिहीले, मोडी शिकण्यासाठी डिजीटाईझ्ड पुस्तके हावी त्यांना दिली, संगणकावर मोडी लिहीता येण्यासाठी श्री. खिलारी यांच्या आकर्षक फॉन्ट्स सोबतच अस्सल पेशवेकालीन रुपडं ल्यालेला मोडी फॉन्ट “मोडीकस्तुरे” बनवला. यापुढेही अनेक गोष्टी मनात आहेत. “इतिहासमित्र” या माझ्या अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅपमध्ये “मोडी” साठी स्वतंत्र विभाग पुढच्या काही महिन्यांत देण्याचा प्रयत्न सुरु आहे. kaustubhkasture.in या ब्लॉगवर सुद्धा काही माहिती दिली आहे. महाराष्ट्रेतिहासाच्या दृष्टीने उपयुक्त अशी मोडी कागदपत्रे लिप्यंतराचे काम सुरु आहे. अजूनही जे जे नवे सापडेल ते करण्यासाठी मी हरप्रकारे प्रयत्नशील आहे. बहुत काय लिहीणे ? 


- © कौस्तुभ कस्तुरे | kaustubhkasture.in