इतिहास अभ्यासकांचे सामान्यतः दोन प्रकारात वर्गीकरण करता येऊ शकते..
पहिला वर्ग म्हणजे प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर जाऊन, भौगोलिक परिस्थिति अनुभवून अभ्यास करणे. यामध्ये दुर्गस्थापत्यशास्त्र, किंवा प्रत्यक्ष त्या वास्तुशी निगडीत गोष्टींचा अभ्यास करणे. या पहिल्या वर्गात मोडणारी लोकं जन्मतःच भटके असतात. हल्ली गेल्या शतकापासून यांना “ट्रेकर” हा नवा शब्द सुद्धा मिळाला आहे. उन-वारा-पाऊस-थंडी, अगदी कशातही ही लोकं अगदी आनंदाने, जे मिळेल ते खात, कसलाही बडेजाव न मागता डोंगरदर्यात फिरत असतात. फिरता फिरता यांचे निरिक्षण आणि अभ्यासही सुरु असतो. घरी आल्यावर मग हे सारे ते शब्दबद्ध करतात.
दुसरा वर्ग म्हणजे एखाद्या बंद, अंधार्या खोलीत बसून जुनी पुराणी, मळलेली, धुळीने माखलेली, जळमटांचा स्वेटर ल्यालेली, वाळवीच्या जगण्याचा आधार बनलेली कागदपत्रे वाचणारा वर्ग. ही अंधारी खोली म्हणजे एखादे पुराभिलेखागार असू शकते किंवा त्यांचे स्वतःचे घर सुद्धा ! ही लोकं सुद्धा तहानभूक विसरून त्या कुठल्याशा कधितरी अर्धवट फाटलेल्या तर कधी शाई उडालेल्या कागदात डोकं खुपसून काहीतरी वाचत असतात. वाचता वाचता, त्याचा अन्वयार्थ लावतात, आणि मग जे वाचलंय ते शुद्ध, स्पष्ट, इतिहास क्षेत्रात फारसं खोलात न जाता वाचन करणार्यांसाठी अगदी सोप्या शब्दांत लिहून लोकांपुढे मांडतात.
आता कोणाला असा प्रश्न पडेल, ‘की मग यातील योग्य प्रकार कोणता’, तर यावर उत्तर एकच आहे.. दोन्हीही प्रकारांतील माणसे अतिशय महत्वाची आहेत ! कसं ? एक गोष्ट सांगतो.. वरील दोन्हीही प्रकार आपण प्रत्यक्ष रणांगणात असणारे आणि फडावर काम करणारे अशा दृष्टीने पाहूया. एकदा गंमत झाली, शिवाजी महाराजांनी सोनोपंत डबीरांचा मुलगा निळो सोनदेव यांना “माहुली किल्ल्यापासून वरघाटी चाकण-इंदापूरपर्यंतचा पूर्ण कारभार तुम्ही पहावा” असं म्हटलं ! निळोपंत चपापलेच. हे काय ? ते महाराजांना म्हणाले, “महाराज, हे कामाचे दिवस आहेत. हे वतनाचे, बसून करायचे काम दुसर्या कोणाला तरी सांगावे. मी आपल्याबरोबर येऊन दहा लोक कामं करतील तेवढं करून किल्ला जिंकावा लागला तरी ते करीन”.. यावर महाराज निळोपंतांना म्हणाले- “पंत, वतनाचा, फडावर बसून कारभार बघणे हे काम सुद्धा तितकेच थोर आहे. एकाने ते काम करावे, एकाने हे काम करावे, दोन्हीही कामे साहेब बरोबरीची आहेत असंच मानतात”.. !!
अर्थात, या गोष्टीतच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. पण तसं पहायला गेलं तर हेही आहे, की कोणी एक माणूस ही दोन्हीही कामे एकाच वेळी तितक्याच ताकदीने नाही करू शकत, आणि जे करु शकतात ते पुरंदरे - बेडेकर होतात !

पण कधिकधी मनात विचार येतो, मी या दोन पैकी कोणत्या प्रकारात बसतो ? माझ्या अल्पबुद्धीनुसार, दुसरा प्रकार मला जास्त जवळचा वाटतो. म्हणजे, मी अगदीच घरकोंबडा आहे असंही नाही, पण अगदी “ट्रेकर” म्हणावं इतकंही माझं त्या प्रकारात योगदान नाही. फारफार तर काय, आजपर्यंत केवळ १८-२० किल्ले पाहिले असतील. पण जर महाराष्ट्रातील किल्ल्यांची संख्या पाहिली तर केवळ ७-८ टक्के किल्ले मी पाहिले आहेत, एवढंच !! मला कागदपत्रांत रमायला आवडतं.. ते वाचून त्यातील नवनव्या गोष्टी शोधणं आवडतं. पण पहिल्या प्रकाराबद्दलसुद्धा मला तितकाच आदर आहे. माझे अनेक जिवाभावाचे मित्र सुट्टी मिळाली की डोंगरात पळतात, मलाही वाटतं.. पण पुन्हा सतत ‘कागद’ खुणावतात, आणि नकळत पावलं वळतात ती कागदपत्रांकडेच.. अनेकदा या गोष्टीमूळे कोणी थट्टेनं किंवा कोणी खोचकपणे “बोरुबहाद्दर” म्हणून सुधा पदवी लावलीय, पण ती comment न समजता मी complement समजतो.. काय करणार ! आहे हे असं आहे..
© कौस्तुभ कस्तुरे । kaustubhkasture.in