Pages

  • शिवकाळ
  • रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी
  • माझ्याबद्दल

१७३७ च्या दिल्ली मोहिमे दरम्यानचे पत्र

इ.स. १७३७ च्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या दिल्लीवरील मोहिमे दरम्यानचे एक पत्र. 





या पत्रातून  आपल्याला काही गोष्टी दिसून येतात त्या अशा-

पेशव्यांचे हेर निजामाच्या छावणीपासून ते बादशाही छावणीपर्यंत सगळीकडे पसरले असून त्यांना एकूण एक बातम्या मिळत असत. उदाहरणार्थ या पत्रात चक्क बादशहाचा सरदार सादतखान याने पाठवलेल्या पत्रात नेमका काय मजकूर आहे ते दिले आहे, याचाच अर्थ, मोंगली पत्रांतला मजकूरही मराठी गुप्तहेरांना कळत असे. यावरून आपल्याला मराठ्यांच्या हेरखात्याची कल्पना येते. या पत्रात पेशव्यांचा दिल्लीतील हा हस्तक (जो स्वतः हेर असावा) म्हणतो, "सादतखानाने नबाबाला (निजामाला) पत्र लिहीले की पिलाजी जाधवरावांचा मुलगा यमुना ओलांडून चार हजार फौजेनिशी गेले असता सादतखानाने पंधरा हजार फौजेनिशी येऊन त्यांचा पराभव केला आणि यमुनेच्या दक्षीणेला पिटाळले. ऐंंशी माणसे मारली, दोनशे जखमी झाले आणि पाचशे माणसे कैद केली. नदीत कित्येक माणसे आणि घोडी बुडाली. बाकी पंतप्रधानांकडे येऊन पोहोचले". 

पण पुढे हा हस्तक म्हणतो- "महाराज राजश्री स्वामींचा (शाहू महाराजांचा) प्रताप व वैकुंठवासी राजश्री नानांचे (बाळाजी विश्वनाथांचे) पुण्य मस्तकी आहे. (बाजीराव) यशवंत होऊन येतील.. (सादतखानाने मात्र) बढाई लिहीली आहे ! पहावे, हे (पेशवे)ही तयारीत आहेत. (सादतखानाच्या बातमीत) विश्वास काय ? असं झालंय".

यातून मिळणारी आणखी एक बातमी म्हणजे सादतखान निजामाला म्हणतो, "नावांचा पूल बांधला आहे, दहा नावा कमी आहेत". याचा अर्थ अब्दालीच्या आधीही उत्तर भारतात नावांचा पूल अथवा ज्याला "पाँटून ब्रिज" म्हणतात तो बांधायचे तंत्र अवगत होते. मराठ्यांकडे हे तंत्र वापरत होते का याबद्दल सांगणे मात्र अवघड जाते.


पत्राचा स्रोत  : पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद, खंड १५, लेखांक १७

- कौस्तुभ कस्तुरे