थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समर्थ रामदासस्वामींप्रती असलेली भक्ती सर्वश्रुत आहे. समर्थांना महाराज किती मानत असत हे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांमधून स्पष्ट होतं. चाफळच्या मंदिरात लष्करी लोकांचा त्रास होतो म्हणून वेळोवेळी तेथील अंमलदारांना दिलेल्या आज्ञा असोत, वा वेळोवेळी करून दिलेल्या गावांच्या आणि धान्याच्या सनदा असोत. महाराजांनी समर्थांच्या संप्रदायाकडे विशेष लक्ष पुरवले होते. दि. ८ ऑगस्ट १६७६ रोजी महाराजांनी महिपतगड आणि सज्जनगड येथील किल्लेदारांना पत्र पाठवून, "समर्थ गडावर येतील, ते जितके दिवस राहतील तितके दिवस राहू द्या, जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊ द्या, त्यांची योग्य प्रकारे काळजी घ्या, त्यांना राहायला उत्तम जागा करून द्या" अशा आज्ञा दिल्या (श्री.सं.का.ले.१५ व १६). दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी दिलेल्या विस्तृत सनदेत तर महाराज समर्थांना "श्री सकळ सद्गुरुवर्य, श्री कैवल्यधाम, श्री महाराजस्वामी" असं संबोधतात (जमाव दफ्तर, पुणे पुराभिलेखागार). परंतु अचानक, ध्यानीमनी नसताना, दि. ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचं रायगडावर निधन झालं.