Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

पेशवे दफ्तर भाग ३ : पुणे पुराभिलेखागार

गेल्या दोन भागात आपण खुद्द पेशवेकाळात पेशव्यांचं हे प्रचंड दफ्तर कसं होतं, त्याची स्थित्यंतरं कशी झाली आणि नंतर इंग्रजी अमदानीत  कमिशन वगैरे बद्दल माहिती पाहिली. आता या शेवटच्या आणि तिसऱ्या भागात आपण सध्याचं पेशवे दफ्तर अथवा ज्याला आता पुणे पुराभिलेखागार म्हणतात ते कसं आहे ते पाहूया.
इ.स. १८६३ मध्ये इनाम कमिशन बरखास्त झाल्यानंतर २८ ऑगस्ट १८६३ पासून हे दफ्तर कोथरूडच्या एलिनेशन ऑफिसमध्ये ठेवण्यात आलं होतं हे आपण पाहिलेलं आहेच. साधारणतः सत्तावीस वर्षे उलटल्यानंतर, इ.स. १८९० मध्ये हि सगळी कागदपत्र बंडगार्डन रस्त्यावर असलेल्या त्या महाप्रचंड इमारतीत आणण्यात आली. आज आपण पाहतो ती हीच इमारत ! साधारणतः लहानमोठ्या अशा बारा निरनिराळ्या खोल्यांची हि इमारत बनलेली असून निरनिराळी कागदपत्रे येथे जातं करून ठेवण्यात आलेली आहेत. दि. १५ सप्टेंबर १८१९ रोजी मॉंक्लीयाड नावाच्या अधिकाऱ्याने पेशवे दफ्तराचा एक विस्तृत अहवाल कंपनीला सादर केला. या अहवालानुसार इ.स. १७२९ पासून ते इ.स.१८१७ पर्यंतचे, मधल्या काही काळातले वगळता संपूर्ण दफ्तर उपलब्ध होते. काही कागद शनिवारवाड्याच्या आगीमध्ये आणि निजामाच्या स्वारीत नष्ट झाले असले तरीही ते सोडल्यास इतर संपूर्ण पेशवेकाळाचे कागद सुरक्षित होते. या खुद्द पेशव्यांच्या दफ्तरात कोणत्या प्रकारचे कागद होते आणि त्याचे कामकाज कसे चालत होते याबद्दल आधीच्या दोन भागात विस्तृत चर्चा केली असल्याने ते पुनश्च सांगण्यात काही अर्थ नाही. एकंदर विचार करायचा झाल्यास पेशवे दफ्तरात ३४,९७२ रुमाल असून त्यापैकी २७,३३२ मराठीचे, ७,४८२ रुमाल इंग्रजीचे तर १२९ रुमाल गुजराथीत तर २९ रुमाल फारसी कागदपत्रांचे आहेत. 

एलिनेशन ऑफिस आणि नंतर स्वतंत्र भारतात पुत्रातत्वविभागाकडे कारभार आल्यानंतर कामकाजाच्या सोयीसाठी पुणे पुराभिलेखागार अथवा पेशवे दफ्तराचे पुढीलप्रमाणे विभाग करण्यात आले होते, जे आजही आपल्याला पाहायला मिळतात.

१) शाहू दफ्तर : सातारकर थोरल्या शाहू महाराजांच्या दफ्तराचे एकूण ५६ रुमाल असून त्यात बहुतांशी त्यांच्या रोजकीर्दी अथवा रोजनीशांच्या नोंदी आहेत. यामध्ये राजकारणी कागद, वतने-सनदा-इनामे, प्रशासकीय, लष्करी, खाजगी, नेमणुका, कारखाने वगैरे निरनिराळ्या तपशिलाची माहिती मिळते.

२) चिटणीसी दफ्तर : या दफ्तरात एकूण २६७ रुमाल असून यात बहुतांशी राज्यकारभार, किल्ले आणि प्रांताचा बंदोबस्त वगैरेसंबंधी कागद आहेत. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी संपादन केलेल्या 'पेशवे दफ्तरातून निवडली कागदपत्रे' च्या ४५ खंडांमध्ये त्यांनी चिटणिशी दफ्तराचा प्रामुख्याने उपयोग केलेला आहे.

३) पेशवे रोजकीर्दी : यामध्ये पेशव्यांच्या रोजनिशा असून इ.स. १७१९ ते इ.स. १८१७ या काळातल्या सर्व पेशव्यांच्या रोजनीशांचे तब्बल ७८८ रुमाल असून लष्करी, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे अनेक बाबींवर या रोजनीशांमधून माहिती मिळते. निरनिराळे सावकारी हिशेब, ताळेबंद वगैरे सुद्धा या दफ्तरात असून बहुतांशी नोंदी या खुद्द पेशव्यांनी केलेल्या असल्याने याला खूप महत्व आहे.मुख्यत्वेकरून यात पोता, रवासुदगी आणि दफाते असे तीन भाग आढळतात. या रोजकिर्दींमध्ये मुख्यत्वेकरून अमुक एका तारखेला पेशव्यांचा मुक्काम कुठे होता याबद्दल माहिती मिळते.

४) घडणी रुमाल : 'घडणी' म्हणजे नेमकं काय ते या लेखमालिकेच्या पहिल्या भागात सांगितलं आहे. या घडणी दफ्तराचे एकूण ९३२ रुमाल असून त्यात वर्षासने, सरंजाम इत्यादी तपशील आणि हिशेब तारीखवार आणि मुद्देसूद लिहिलेला असून निरनिराळे ताळेबंदही आढळतात.

५) प्रांत अजमास : या विभागात एकूण ५,०९५ रुमाल असून प्रांतवार जो काही वसूल व जे उत्पन्न सरकारात जमा होत असे त्याचा सगळा हिशेब या रुमालांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या दफ्तरामध्ये कोकण, हिंदुस्थान (नर्मदेच्या वरचा प्रदेश), मोंगलाई (निजामाचा प्रदेश), सातारा, पुणे, नगर असे निरनिराळे विभाग असून त्यानुसार कागदपत्रे लावलेली आढळतात. यातील २०५ रुमाल हे निव्वळ उत्तर हिंदुस्थानच्या कारभारावर असून शिंदे-होळकर, नारोशंकर, हिंगणे, बुंदेले वगैरे उत्तरेतील सरदारांसंबंधी आणि त्यांच्या कारभारासंबंधी यात भरपूर माहिती मिळते. 

६) पागा आणि पथके लष्कर : या दफ्तरातीळ पागेच्या विभागात एकूण ६९४ रुमाल असून पेशव्यांच्या अमदानीत घोडदळ, पागा इत्यादींवर झालेला खर्च यात सापडतो. याशिवाय पथकाच्या विभागात २७१ रुमाल असून तोफखाना, पायदळ, घोडदळ इत्यादींच्या वेतनासंबंधी माहिती आहे.

७) सातारा महाराज दफ्तर : हे दफ्तर इ.स. १८४८ नंतर म्हणजे इंग्रजांनी सातारचे राज्य खालसा केल्यानंतर पुण्याला आणले गेले. या विभागात एकूण २,६६८ रुमाल असून मुखतः प्रतापसिंह छत्रपतींच्या आणि शहाजी उर्फ अप्पासाहेबांच्या काळातील रुमाल आहेत. यामध्ये सुमारे १५० रुमाल हे अव्वल इंग्रजी कागदांचे आहेत. १३३ रुमाल हे छत्रपतींच्या खाजगी व्यवहाराचे असून छत्रपतींचे राजोपाध्ये, समर्थ रामदासस्वामी वगैरे सत्पुरुषांबद्दलची आणि त्यांच्या संस्थानांबद्दलची माहिती मिळते.

८) आंग्रे दफ्तर : या विभागात एकूण ७६१ रुमाल असून यातील ४५७ रुमाल हे इ.स. १७९८ ते इ.स. १८४० मधील आंग्रे घराण्यातील पुरुषांच्या रोजकीर्दीचे आणि उर्वरित रुमाल हे प्रांतवार हिशेबाचे आहेत.

हे झालं खुद्द पेशवेकालीन कागदपत्रांसंबंधी. यापुढील इतर विभाग हे इंग्रजी अमदानीत जमवलेल्या कागदांचे आहेत ते असे- 

९) जमाव दफ्तर : निरनिराळ्या ठिकाणाहून जमवलेली कागदपत्रे असल्याने याला जमाव दफ्तर असं म्हटलं जातं. हे दफ्तर मूळच्या पेशवे दफ्तरापासून पूर्णपणे वेगळे आहे. इनाम कमिशनर्सनि निरनिराळ्या सरंजामदार,  कागदपत्रे या विभागात असून एकूण ८,०६९ रुमाल या विभागात आहेत. अनेक ठिकाणी, इनाम कमिशनर्सनी जमवलेले कागद पुन्हा नेण्याकरिता त्या त्या कागदांचे मालक पुन्हा न आल्याने ते कागद तसेच जपून ठेवण्यात आले, हे परत करण्याचे जवळपास ६०१ रुमाल आहेत. या दफ्तरात इ.स. १६०७ पासून ते इ.स. १८६५ मधील रुमाल आढळतात. यात इनाम कमिशनच्या चौकशीचे जवळपास दीड हजारांहून जास्त रुमाल आहेत. याशिवाय डेक्कन कमिशनर्सचं दफ्तर, परत करण्यासाठीचे कागद, एजंट दफ्तर, अमानतदारांच्या वह्या (याद्या), जमाव सोलापूर, जमाव कर्नाटक असे अनेक विभाग या दफ्तरात असून निरनिराळ्या सरदारांच्या कैफियती-याद्या वगैरे आणि वंशावळी शोधण्यासाठी या दफ्तराचा प्रामुख्याने उपयोग होतो. निरनिराळ्या सनदांच्या ज्या वेळोवेळी नकला केल्या गेल्या त्या नकलांचे एक 'सनदा नोंदणी दफ्तर' असून याचे जवळपास ११५ रुमाल आहेत. निरनिराळ्या देवस्थानच्या हक्कांसंबंधी सापडणाऱ्या अनेक सनदा अभ्यासास उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या सनदांच्या अनेक नकला या दफ्तरात आपल्याला पाहायला मिळतात.

१०) या वर उल्लेखिलेल्या दफ्तरांप्रमाणेच जकात व हक्क कमिशनचे दफ्तर, १८५७ साळापूर्वीचे दफ्तर, अम्मलदारांचे दफ्तर, जंजिरा दफ्तर, औंधकर प्रतिनिधी दफ्तर, वैद्य दफ्तर, कोरेगाव दफ्तर, रास्ते दफ्तर वगैरे इतरही दफ्तरे आहेत. याशिवाय ४,४५४ इंग्रजी कागदांच्या 'फाईल्स' असून ३५६ रुमाल आहेत. 


हे प्रचंड दफ्तर, अगदी इंग्रजी आमदानीपासूनच निव्वळ साठवले जात नव्हते, तर त्यातील कागदांच्या वाचनाचे प्रयत्न इंग्रजी अंमलातच सुरु झाले होते. रावबहाद्दूर गणेश चिमणाजी वाड यांनी पेशवे दफ्तरातील रोजकीर्दीच्या अनेक रुमालांमधून सुमारे ३२ खंड तयार होतील इतके महत्वाचे कागद बाजूला काढून ठेवले, पण त्यातील शाहू आणि पेशव्यांच्या रोजनीशांचे केवळ १४ खंडच प्रसिद्ध होऊ शकले. बाकीचे निवडलेले बहुतांशी कागद रावबहाद्दूर दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी आपल्या 'इतिहाससंग्रह' या मासिकात प्रसिद्ध केले. यानंतर, सुमारे १९२१ नंतर रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी चिटणिशी दफ्तरातील सुमारे दहा हजार महत्वाचे कागद निवडून ते 'पेशवे दफ्तारातून निवडलेले कागद' या ग्रंथमालेच्या ५ खंडात मिळून प्रसिद्ध केले. सरदेसाईंनी एकूण ६८ रुमाल बाजूला काढले होते, त्यापैकी केवळ नऊ रुमालच 'पेशवे दफ्तर खंडा'तुन प्रसिद्ध होऊ शकले. उरलेले ५९ रुमाल मात्र पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ शकले नाहीत. सरदेसाईंनी बाजूला काढलेले हे रुमाल आजही पुणे पुराभिलेखागारात आहेत. 

एकूणच, आजही इतिहास संशोधकांना मराठ्यांच्या इतिहासावरील संशोधनासाठी पुण्याचं पेशवे दफ्तर अथवा पुणे पुराभिलेखागार हे अतिशय महत्वाचं केंद्र आहे. सुमारे चार कोटी कागद येथे अभ्यासक आणि संशोधकांच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या दैदिप्यमान इतिहासाला पुन्हा उजेडात आणण्यासाठी, त्यावरील धरलेली काजळी दूर करण्यासाठी पुन्हा कोण्या सरदेसाई-वाड-पारसनिसांची गरज आहे, जे इथे येऊन नवे कागद वाचतील, त्यात दडलेला इतिहास उजेडात आणतील.. अर्थात, हे इतरांना सांगण्यापूर्वी मी स्वतः याची सुरुवात केलेली आहेच, आपणही करा ! बहुत काय लिहिणे ? एकूण तीन भागात 'पेशवे दफ्तर' समजावून सांगण्याचा हा थोडक्यात प्रयत्न होता. आपण सर्वजण सुद्न्य आहातच. लेकराचे अगत्य असू द्यावे. लेखनावधी !!


- © कौस्तुभ कस्तुरे

माहिती स्रोत : 
१) वाड-मावजी-पारसनिसांनी संपादित केलेल्या पेशव्यांच्या रोजनिशा
२) वाड डायरीजच्या प्रस्तावना
३) Handbook to the records in the Alienation Office, Pune (२ खंड)
४) महाराष्ट्र पुराभिलेखागार मार्गदर्शिका