Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

गोब्राह्मणप्रतिपालक महाराज शिवछत्रपती !!

शिवाजी महाराजांच्या 'गोब्राह्मणप्रतिपालक' या बिरुदावरून कायमच वाद उत्पन्न झालेले दिसतात. अर्थात, हे वाद एकतर जातीयवादी नाहीतर राजकारणी केवळ त्यांच्या फायद्यासाठी उकरून काढत असतात हे उघड आहे. पण यामुळे, सर्वसामान्य माणसाला, ज्याला इतिहासात नेमकं काय दडलंय हे माहित नसतं तो अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणखी संभ्रमित होतो. याकरताच, शिवाजी महाराजांच्या 'गोब्राह्मणप्रतिपालना'चे समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे काय आहेत ते आपण पाहूया -


१) सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांचे इ.स. १६४७-४८ मधील मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना लिहिलेले एक पत्र. यात शिवाजी महाराज स्वतः म्हणतात, "महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती, गाईचा प्रतिपाळ केलिया बहुत पुण्य आहे"
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३४

२) मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना इ.स. १७४८-४९ मधील लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "ब्राह्मणांकडून गुरांची पालं घेऊ नका, ती सरकारातून माफ केली आहेत"
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३७

३) शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेल्या 'शिवभारता'त महाराजांना स्पष्टपणे गाई आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा असं ठिकठिकाणी लिहिलेलं आढळेल. शिवभारताच्या पुढील श्लोकांमधून आपल्याला हे समजून येईल :

शिवभारत अध्याय पहिला

श्लोक : 
देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तकः । प्रपन्नानां परित्राता प्रजानां प्रियकारकाः ।।१५।।
तस्यास्य चरितं ब्रह्मन्नेनकाध्यायगर्भितम् । भगवत्याः प्रसादेन भवता यत् प्रकाशितम् ।।१६।।

अर्थ : देव-ब्राह्मण आणि गाई यांचा त्राता, दुर्दम्य यवनांचा काळ, शरणागतांचा रक्षक, (जो) प्रजेचे प्रिय करणारा आहे अशा त्या शिवाजीराजांचे जे अनेकाध्यात्मक चरित्र आपण एकवीरा देवाच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे. 


शिवभारत अध्याय पहिला


श्लोक : 
द्विजातीरीती तं श्रुत्वा जानानः शिवभूमीपः । अभ्येतमपि नो हन्तुमिच्छन्निजनयस्थितः ।।४८।।

अर्थ : तो (कृष्णाजी भास्कर) ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही. 


शिवभारत अध्याय २१वा


४) शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष अष्टप्रधान मंडळात असलेले रामचंद्रपंत अमात्य आपल्या "आज्ञापत्र" या अमूल्य ग्रंथात महाराजांविषयी लिहितात - "शहाण्णवकुळीचे मराठ्यांचा उध्दार केला. सिंहासनारूढ होऊन, छत्र धरून छत्रपती म्हणविलें. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थांनी स्थापून यजनयाजनादी षट्कर्मे वर्णविभागे चालविली". 


आज्ञापत्र



५) दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या सनदेत समर्थांनी महाराजांना दिलेल्या उपदेशात "देव-ब्राह्मणांची सेवा करूनु, प्रज्येची पीडा दूर करुनु पाळण रक्षण करावे" असं सांगितल्याचं आणि आपण त्यानुसारच वागत असल्याचं खुद्द महाराज उद्धृत करतात. 
स्रोत : चाफळची सनद (मूळ अप्रकाशित)

चाफळ सनद 


६) समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं "निश्चयाचा महामेरू" हे जे सार्थ वर्णन केलं आहे त्यात ते महाराजांसंबंधी म्हणतात, "देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।". 


समर्थांचे शिवछत्रपतींना पत्र 


७) शिवाजी महाराजांचा समकालीन असलेला आणि खुद्द महाराजांच्या भेटीने प्रभावित झालेला, तत्कालीन महाराष्ट्र पाहिलेला उत्तरेतला महाकवी भूषण महाराजांबद्दल म्हणतो :

"शिवाजी महाराज ब्राह्मणभोजन घालत होते" (शिवभूषण छंद ६४), "धर्माच्या वेळी ब्राह्मण पाहिले की कुबेराची पहाडासारखी सुवर्णसंपत्ती लुटून दान करण्याची उर्मी शिवाजीराजांच्या मनात उत्पन्न होते" (शिवभूषण छंद ३८९)

८) शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे बुधभुषणम् मध्ये क्षत्रियांची कर्तव्य सांगताना "गो-ब्राह्मण प्रतिपालन" हे एक कर्तव्य सांगतात. संभाजीराजे म्हणतात, "वेदांचे अध्ययन करून, यज्ञ करून, प्रजेचे पालन, गो-ब्राह्मणपालन करून जो मारला गेला किंवा संग्रामात धारातीर्थी पडला तो क्षत्रिय स्वर्गास जातो". आता हे वर्णन संभाजीराजांनी कोणाला डोळ्यासमोर ठेऊन केलं असावं बरं ?
(संदर्भ : बुधभुषणम् - संपादक : कदम, अध्याय २रा, श्लोक ५५४)

९) सभासद मालोजीराजांना झालेल्या शंभुमहादेवाच्या दृष्टांताबद्दल चर्चा करताना म्हणतो, "तुझ्या वंशात आपण अवतार घेऊ ! देव ब्राह्मणांचे संरक्षण करून म्लेंच्छांचा क्षय करतो". आता वास्तविक हे वर्णन मालोजीराजांचा पुत्र शहाजीराजांसंबंधी आहे. पण शहाजीराजे जर "गोब्राह्मणप्रतिपालक" आहेत तर शिवाजी महाराज नसतील का ?

सभासद बखर


१०) शिवरायांचे पुत्र आपल्या पुर्वजांना, त्यांच्या पणजोबांना "देवब्राम्हणप्रतिपालक" म्हणतात. बाकरेशास्त्रींना दिलेल्या दानपत्रात ते मोठ्या अभिमानाने म्हणतात, "सारासार विचार करणारा, चतुरशूराग्रणी, देवब्राम्हणप्रतिपालक, पृथ्वीतलावर ज्याचे मोठेपण प्रसिद्ध आहे, अशा मालोजिराजाचा पणतू" (म्हणजे स्वतः संभाजीराजे)
(स्रोत : छत्रपति संभाजी महाराजांची पत्रे, डॉ. सदाशिव शिवदे)

शंभूराजांनी दिलेले दानपत्र


या सगळ्यावरून आपल्याला एक गोष्ट ठामपणे सांगता येते कि महाराज "गोब्राह्मणप्रतिपालक" नक्कीच होते. बहुत काय लिहिणे ? आपण वाचक सुज्ञ आहातच. आमचे अगत्य असू द्यावे हि विज्ञापना.. 

© टीम : इतिहासाच्या पाऊलखुणा
(सादर लेखाचे सर्व हक्क राखीव आहेत)