Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

३ जून.. पेशवाईची अखेर !

महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा कालखंड, आणि विषेशतः पेशवाईचा काळ हा अनेक कारणास्तव उत्सुकतेचा आणि काहीसा अवहेलनेचा विषय गेली कित्येक वर्षे बनला आहे. श्रीमत्छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य राजाराम महाराजांनंतर काही काळातच अस्ताला जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असता महाराणी ताराबाईसाहेब आणि नंतर शाहूराजांनी ते वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले.


ताराबाई आणि संभाजीपूत्र थोरल्या शाहू महाराजांमध्ये वारसाहक्कावरून भांडणे सुरु असतानाच ताराबाईंचे पक्षपाती असणार्‍या कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराजांचे पंतप्रधान बहिरोपंत आणि चिटणीस खंडो बल्लाळ यांना पकडले. या सार्‍या राजकारणात कान्होजी आंग्र्‍यांना शाहू महाराजांकडे वळवण्यात महत्वाची कामगिरी बजावली ती बाळाजी विश्वनाथ भट यांनी. बाळाजीपंतांच्या कर्तबगारी आणि मुत्सद्देगिरीवर खुष होऊन इ.स. १७१३ मध्ये शाहूराजांनी त्यांना पेशवेपदबहाल केले. आणि मृत्यूसमयी ते पेशवेपद भट घराण्याकडेच वंशपरंपरागत कायम सुरु ठेवण्याचं मृत्यूपत्रात नमूद केलं. यानंतर सुमारे १०५ वर्षे महाराष्ट्राच्या या पेशव्यांचा दरारा सार्‍या हिंदुस्थानभर दुमदुमत होता. पण कालचक्राच्या गतीला कोणीही अडवू शकत नाही, त्याप्रमाणे एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असणारी पेशवाई पत्त्याचा मनोरा कोसळावा तशी कोसळली, आणि दि. ३ जून १८१८ या दिवशी महाराष्ट्र हा कागदोपत्री पूर्णपणेसईस्ट इंडिया कंपनीसरकारच्या अंमलात आला.

या सार्‍या गोष्टीत एक गोष्ट मात्र अतिशय क्लेषकारक वाटते, ती म्हणजे, थोरले बाजीरावसाहेब, नानासाहेब, माधवराव अशा एकाहून एक वीरोत्तमांच्या या वंशात स्वराज्य बुडाले कसे ? या गोष्टीचं कारण सांगताना महाराष्ट्रातले इतिहासकार पूर्वीपासून सारा ठपका शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव यांच्यावर ठेवतात. बाजीरावाच्या नादानपणामूळे पेशवाई आणि शिवछत्रपतींनी कष्टानी उभारलेलं स्वराज्य बुडालं असे आरोप दुसर्‍या बाजीरावांवर केले जाऊ लागले. या आरोपांत थोडंफार तथ्य होतंही, परंतू पेशवाई, किंवा मराठी राज्य बुडण्याला केवळ दुसरे बाजीराव पेशवेजबाबदार होते असं मात्र नक्कीच नाही ! मग मराठी राज्य कसं लयाला गेलं ?

सातारकर महाराजांची दिनचर्या, बापू गोखले यांची कैफियत, रियासतकार सरदेसाईंनी संपादीत केलेल्या पेशवे दफ्तरातील बाजीराव पेशव्यांसंबंधीचे कागद, मराठी रियासत, राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासातील साधने मध्ये प्रकाशित झालेले कागद, दुसर्‍या बाजीरावांची रोजनिशी, ग्रँट डफचे हिस्टरी ऑफ मराठाज्‌ अशा असंख्य कागदपत्रांतून दुस्सर्‍या बाजीरावांचा व्यक्तिमत्वावर प्रकाश पडतो. बाजीरावांचं आयुष्य हे थोडं गुंतागुंतीचं होतं. रघुनाथरावांच्या विरोधात उतरलेल्या बारभाईंच्या कारस्थानामूळे बाजीरावांचा जन्म झाला तेव्हा ते धारला पवारांच्या कैदेत होते. पुढे रघुनाथराव वारले तरीही नाना फडणवीस, महादजी शिंदे आदी मुत्सद्द्यांनी रघुनाथरावांच्या वारसांपासून कसलाही धोका अथवा फितुरी होऊ नये यासाठी त्यांना शेवटपर्यंत कैदेतच ठेवले. परंतू सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर गादीला कोणी वारस नसल्याने नाना फडणवीस-दौलतराव शिंद्यांपुढे गादीवर रघुनाथरावांच्या वंशजांना बसवण्याशिवाय कोणताही मार्ग नव्हता. अखेरीस याही वेळेस मोठ्या राजकारणांनंतर रघुनाथरावांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव यांना गादीवर बसवण्यात आले. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर बाजीरावांना अचानक अनपेक्षितपणे पेशवाईची सूत्र मिळाली. इतकी वर्ष कैद अन्‌ एक्दम अशी सत्ता हातात आल्यानंतर काय करायचं हे बाजीरावांना न समजल्याने सुरुवातीला त्यांच्या हातून अनेक गंभीर चूका घडल्या. नाना फडणवीसांना कैदेत टाकणे, दुसर्‍या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी सरदारांना मदत न करणे, इंग्रजांशीवसईचातह करणे या सार्‍या बाजीरावांच्या घोडचूकाच होत्या यात वादच नाही. परंतू पुढे इ.स. १८११ मध्ये पुण्याच्या रेसिडेंटपदी कर्नल बॅरी क्लोज च्या जागी माऊंट्स्टुअर्ट एलफिन्‍स्टनची नेमणूक झाली तेव्हा मात्र बाजीरावांना कंपनी सरकारचा खरा हेतूकळून चूकला आणि त्यांना आपण केलेल्या चूकांची जाणीव होऊ लागली. एलफिन्‍स्टन हा अत्यंत धूर्तगृऊहस्थ होता. त्याचं हेरखातं जबरदस्त होतं. बाजीराव जेवायला बसण्यापूर्वी त्यांच्याताटातकाय पदार्थ असणार आहेत याची त्याला माहिती होत असे असं म्हटलं जातं. बाजीरावांनाही आपण एलफिन्‍स्टनच्या जाळ्यात पुरते फसलो आहोत ही गोष्ट कळून चूकली होती. अन्‌ आता यातूनबाहेर पडण्यासाठी अत्यंत सावधपणे आणि नाजूक हातांनी हे जाळं तोडायला पाहीजे हे त्यांनापक्कं समजून चूकलं होतं. म्हणूनच दर वेळेस बाजीराव एलफिन्‍स्टनसमोर जाताना, ‘आपण खूप मृदू स्वभावाचे, युद्ध-लढाई ऐवजी ख्याली खुशालीत रमणारे आहोत,मोहीमांचा आपल्याला खूप तिटकारा आहे. तोफांचा आणि बंदूकांचा आपल्याला आवाजही सहन होत नाहीअसे बहाणे करत असत. हा एक प्रकारे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला गनिमी काव्याचाच एक प्रकार होता. बाजीरावांनी सदाशिव माणकेश्वरांच्या फितुरीचेनिमित्त करून त्यांच्या जागीत त्रिंबकजी डेंगळेया एका जबरदस्त असामीला नेमले. त्रिंबकजी डेंगळे म्हणजे जणू दुसरे नाना फडणवीसच होते. नानांनी इंग्रजांना पक्के ओळखले होते, अन्‌ १८०० मध्ये नानांच्या मृत्यूपर्यंत इंग्रजांना एक पाऊलही मराठी राज्यात टाकणे शक्य झाले नव्हते. नानांची कडवी शिस्त, कारभारावरची मजबूत पकड, शत्रूविषयी योग्य ते धोरण, परकीय गोर्‍यांविषयीच्या शंका इत्यादी सार्‍या गोष्टी त्रिंबजींमध्ये जशाच्या तशा होत्या.

उत्तर पेशवाईत कारभारीच सत्ता सांभाळत, बाजीराव हा कारभार्‍यांच्या हातचं बाहुलं होता असा आरोप बहुतेक करून सगळेच इतिहासकार करतात. परंतू आपण स्वतः फार कर्तबगार नाही आहोत हे स्वतःला समजल्यामूळेच बाजीरावांनी सर्व कारभाराची मुखत्यारी त्रिंबकजींना दिली होती. त्रिंबकजी डेंगळ्यांनी बापू गोखले, गणपतराव पानसे, चिंतामणराव पटवर्धन, विट्ठलराव विंचूरकर,मोरदिक्षित मराठे, निळकंठराव उर्फ आबाजीपंत पुरंदरे अशा अनेक शूर सरदारांना एकत्र करून गुप्तपणे इंग्रजांविरुद्ध कारवाई सुरू केली. नेमकं हेच एलफिन्‍स्टनला जड जाऊ लागलं. कसंही करून त्रिंबकजींना कारभारातून हटवणं गरजेचं होतं. त्रिंबकजींविषयी एलफिन्‍स्टन काय म्हणतो पहा-गेले कित्येक महिने त्रिंबकजीचा जो राज्यकारभार चालला आहे तो अस्वस्थ करणारा आहे. माझी तर पक्की खात्री झाली आहे की बारभाईंच्या कल्पनेचं त्रिंबकजीनं पुनरुज्जिवन चालवलं आहे. आम्ही तिकडे दुर्लक्ष केलं तर मोठ्या कष्टानं मिळवलेलं हिंदुस्थानचं हे राज्य टिकणार नाही ! आणि म्हणूनच मराठ्यांशी युद्ध पुकारण्यापूर्वी त्रिंबकजीला कारभारी पदावरून खाली ओढलं पाहिजे पण त्रिंबकजीचा कुठल्या तरी कटाशी संबंध जोडल्याखेरीज ही संधी कशी मिळणार याची मला चिंता वाटते !दुर्दैवाने एलफिन्‍स्टनला ही संधी लवकरच मिळाली. जुलै १८१५ मध्ये पंढरपुरात बडोद्याच्या गायकवाडांचा वकील गंगाद्गरशास्त्री पटवर्धन याचा खून झाला, वास्तविक तो खून गोविंदराव बंधुजी या माणसामार्फत एलफिन्‍स्टननेच घडवला होता, अन्‌ गायकवाडांशी इंग्रजांचा तह झाल्याने व गायकवाडांची जबाबदारी इंग्रजांनी घेतल्याने एलफिन्‍स्टनने धूर्तपणाने या खूनाला त्रिंबकजी जबाबदार आहे असा ठपका ठेवला. त्रिंबकजींना इंग्रजांनी ठाण्याच्या तुरुंगात ठेवलं. पुढे त्रिंबकजी निसटले, मात्र यासवाई नानाच्या जिवाखातर बाजीरावांना पुन्हा इंग्रजांशी नामुष्कीचापुणे करारकरावा लागला. १८१७-१८ च्या इंग्रज मराठा युद्धात मात्र स्वतः बाजीरावसाहेब जातीने हाती तलवार घेऊन मैदानात उतरले असता बाकीच्या सरदारांनी मात्र ऐन वेळेस पेशव्यांचा घात केला. शिंदे-होळकर-भोसले हे मात्र ऐनवेळी वतन हवे म्हणून अडून बसले. नागपूरकर अप्पासाहेब भोसल्यांनासेनासाहेब सुभाहे पद हवे होते. शिंद्यांनाअलिजाबहाद्दरही पदवी हवी होती. बाजीरावांनी निपाणीच्या ज्या अप्पा देसायाला सरनौबती दिली तोच फितूर झाला. घोरपडे, रास्ते असे अनेक सरदारही फितूर झाले. बापू गोखले आणि त्यांचे चिरंजीव गोविंदराव गोखले, गणपतराव पानसे, मोरदिक्षित मराठे असे लोक रणांगणात पडले आणि बाजीरावांच्या शरणागती पर्यंत केवळ त्रिंबकजी डेंगळे, विठ्ठलराव विंचूरकर आणि आबा पुरंदरे हे तीनच सरदार पेशव्यांच्या पाठी सावलीसारखे उभे होते.

मराठी राज्य बुडाल्यानंतर जनमानसात दुसर्‍या बाजीरावांविषयी अन्‌ त्रिंबकजी डेंगळ्यांविषयी प्रचंड चीड अन्‌ राग होता. तो असणं स्वाभाविकच होतं. कारण थोरल्या शिवछत्रपतींनी पाया घातलेलं आणि थोरल्या बाजीरावांनी कळसाला नेलेलं मराठी राज्य धरणीकंपात एखादी झोपडी कोसळावी तसं कोसळलं होतं. पण याला बाजीराव एकटेच जबाबदार नव्हते. इंग्रजांनी आणि पुढच्या इतिहासकारांनी मात्र तसं चित्र रंगवलं. त्याला कारणंही तशीच आहेत. मराठ्यांपासून राज्य जिंकून घेताना इथले राज्यकर्ते हे नालायक आहेत असं लोकांच्या मनावर ठसवणं हे इंग्रजांना क्रमप्राप्तच होतं. पेशवाई नष्ट झाल्यावर एलफिन्‍स्टन आणि त्याचा सहकारी जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ या जोडगोळीने पेशवे गेल्यानंतर मागे राहिलेले सारे दफ्तरखाने साफकेली असणार यात शंकाच नाही. इंग्रजांना धोक्याचे असे अनेक कागद नष्ट केले गेले. बाजीरावांच्या शुक्रवार पेठेतल्या वाड्याला तर चक्क आग लावण्यात आली. याच वाड्यात बाजीरावांचं खासगी आणि अत्यंत महत्त्वाचं दफ्तर होतं. हे झालं इंग्रजांचं. आपल्या माणसांनीही हेच केलं. यात आघाडीवर असणार्‍या गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहीतवादी यांनी सरकारी नोकरीत राहून बाजीरावांवर शतपत्रांतून टीका करायला सुरुवात केली. लोकहीतवादींच्या मतेनाना फडणीस हा मूर्खांत शहाणा होता. त्याला नेपाळचं राज्य आणि शिखांचं राज्य कुठं होतं हे माहित नव्हतं.पण आता नाना फडणीसांची अस्सल पत्रपेशवे दफ्तरात सापडली आहेत, रियासतकार सरदेसाईंनी ती प्रकाशितही केली आहेत त्यांवरून लोकहितवादींचेच अज्ञान उघडे पडते. मग लोकहीतवादी असं का वागले ? याचं कारण असं की लोकहीतवादी हे सरकारी नोकरीत उच्चपदस्थ होते.समाजसुधारणाकरण्याच्या कामातून लोक त्यांना मानत असत. त्यामूळेच सरकारी कचेरीत एलफिन्‍स्टनच्या तालावर नाचणार्‍या लोकहितवादींनी ब्रह्मावर्ताला जाऊन आपल्या उपकारकर्त्याला सत्य विचारण्या ऐवजी इंग्रजी कार्यालयात बसून खोटा इतिहास रखडला ! बाळाजीपंत नातू या एलफिन्‍स्टनच्या कारभार्‍याने लिहीलेल्या पत्रातच लोकांना बाजीराव किती प्रिय होते हे समजते, नातू म्हणतो, “ बाजीरावसाहेब पळून गेले. त्यावेळेस पेशवे यांचे वाड्यावर बावटा लावण्यास रॉबिन्‍सनसाहेब यांजबरोबर मलाच पाठवले. मी जात नव्हतो. तेव्हा तुम्ही भिता की काय म्हणू लागले, सबब गेलो. यामूळेच बाजीरावसाहेब व त्यांचे राज्यातील सारे लोकांची मजवर दुष्मनी. सारे लोक एकीकडे व मी एकटा कंपनी सरकारचे लष्करात होतो.

लोकहीतवादी आणि आमच्या काही इतिहासकारांनी तर हद्दच केली. बाजीराव म्हणे स्त्रिलंपट होते. याला पुरावा काय, तर कृष्णदास नावाचा शाहीरबाजीराव महाराज अर्जी ऐकीतो बायकांचीअसं आपल्या पोवाड्यात म्हणतो म्हणून. शिदराम नावाच्या शाहीरानेही बाजीरावांचा चारित्र्यहनन करणारा पोवाडा केला आहे. पण पोवाड्यांवरच विश्वास ठेवायचा तर बाजीराव देवासमान होते असं सांगणारे पोवाडेही होनाजी शिलारखाने-बाळा कारंजकर या जोडगोळीने रचलेले आहेत. सगनभाऊ नावाच्या तर एका मुसलमान शाहीराने बाजीरावांचे गोडवे गायले आहेत,मग हेसुद्धा बाजीरावांच्या सत्चरित्राचे पुरावेच म्हणावे की ! बाजीरावांची अकरा लग्न झाली होती. पण तसं पाहिलंतर बहुभार्या पद्धती ही हिंदुंमध्ये अगदी रामायण-महाभारतादी काळापासून चालत आलेली आहे. खुद्द शहाजीराजांची तीन, शिवाजी महाराजांची आठ लग्ना झालेली होतीच की ! मग एवढ्या गोष्टीवरून बाजीराव स्त्रिलंपट कसे ठरतात ?

बाजीरावाला इतिहासकार पळपूटा म्हणतात. १८०२ मध्ये यशवंतराव होळकराने पुण्यावर हल्ला केला. यावेळेस इतिहासकार म्हणताततसे बाजीराव न लढताच पळून गेले नव्हते. दिवाळीच्या दिवशीच दि. २५ ऑक्टोबर रोजी बाजीराव युद्धवेश चढवून लढाईस तयार झाले. परंतू पर्वती उतरतानाच समजले की हडपसरच्या मैदानात होळकारांच्या फौजांनी पेशव्यांचा बिमोड केला. यामूळे शेवटी बाजीरावांना पुणे सोडून सुवर्णदूर्ग गाठणे भाग पडले. दौलतराव शिंदे उत्तरेत आणि नुकतेच नाना फडणवीस कैलासवासी झाल्याने यशवंतरावाच्या मीरखान पठाण या सरदाराने पुण्यात हैदोस घातला. पेठा खणून काढल्या. अखेरीस बाजीरावांना वसई मुक्कामी तैनाती फौजेचा करारकरणे भाग पडले. यानंतरही तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धात स्वतः बाजीराव युद्धात उतरले. गोखल्यांच्या कैफियतीतील ही नोंद पहा, “ बापूंचा निरोप ऐकताच तसेच उठोन स्वारी (पेशवे) म्यानात प्रथम जाली, त्यांची (इंग्रजांची) निकड बहुत जाली. तेव्हा श्रीमंत घोड्यावार बसले. खासा स्वारी पुढे, तुरुप (ट्रूप्स- इंग्रजी फौजा) मागे याप्रमाणेदोन तीन कोश दवड (दौड) जाली. राजश्री आबा पुरंदरे व त्रिंबकजी डेंगले मागे जातीने उलटले. परंतू दहा पाच असामी त्यांजपाशी राहीले. श्रीमंतांनी नागवी तलवार अर्धा कोश (१ कोस=३.२ कि.मी.) पावेतो घेतली. मागे उलटावयास दोन वेळा पाहीले. परंतू जमाव अगदी नाही. खाशापासी पस्तिस असामी राहिले होते.अखेरीस सैन्यही हळूहळू सोडून गेलं आणि इंग्रज मागावर अशा अवस्थेत दि. ३ जून १८१८ रोजी खानदेशात धूळकोट बारी येथे बाजीरावांनी सर जॉन माल्कमला सकाळी१० वाजता शरणागती लिहून दिली आणि पेशवाई संपली.


या सार्‍या गोष्टींवरून बाजीराव पळपुटे नव्हते, स्त्रिलंपट नव्हते हे सिद्ध होते. हा, आता बाजीरावांच्या पूर्वीच्या काही चूकांमूळे इंग्रजांचे फावले हे सत्य कटू असले तरी मान्य करावयास हवे. पण कोणतही राज्य कायम टिकत नाहीच. मौर्य,गुप्त, चालुक्य, सातवाहन, यादव यांसारखी एवढी बलाढ्य राज्यही एक ना एक दिवस नष्ट पावलीच ना ! अशा वेळेस राज्याच्या शेवटच्या राज्यकर्त्याकडे आपसूकच बोटे वळतात. पण त्याशेवटच्या राज्यकर्त्याचाच सर्वस्वी दोष असतो असं नाही. नेमकं हेच पेशवाईलाही लागू होतं. या भावनेनेच आपण बाजीराव पेशव्यांकडे पाहायला हवं असं मला वाटतं. ३ जून १८१८ ला मराठी राज्य बुडालं या गोष्टीला काहीच इलाज नाही. पण लोकमान्य टिळकांनी म्हटल्याप्रमाणे, “ पेशव्यांमूळे मराठी राज्याचं आयुष्य शंभर वर्षांच्या एका दिवसाने वाढलंयातच समाधान आहे. अधिक काय लिहावे ?

© कौस्तुभ कस्तुरे 
Newer Post Older Post Home