Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

सर्व पेशव्यांत थोर कोण व ते का याची कारणे : स्वातंत्र्यवीर सावरकर



रत्न म्हटले की ते टाकाऊ नसावयाचेच. परंतू त्यातल्या त्यात कोहीनूरची दीप्ति जशी काही निराळीच. त्याचप्रमाणे ज्यांनी प्रथम मोडकळीस आलेल्या स्वातंत्र्यप्रासादाचा जिर्णोद्धार केला ते बाळाजी विश्वनाथ, ज्यांनी आपल्या बाहुबलाने नि सद्गुरुप्रसादाने सत्कीर्तिचे मजले त्या प्रासादावर उठविले ते बाजीराव-चिमणाजी नि ज्यांनी आपल्या पितृमहांच्या अचाट धाडसाला नि कीर्तिला साजेल अशा रीतिने कैक शत्रूंस दाती तृण धरावयास लावून त्या विस्तिर्ण नि भव्य प्रासादाची पूर्णतः करून त्यावर हिंदुपदपातशाहीचा दैदिप्यमान जरिपटका रोविला ते बाळाजी मालिकेत कौस्तुभमणीच्या ठायी शोभणार्‍या राव माधवरावांची थोरवी काही विलक्षणच !
जमिन कितीही जरी सुपिक असली तरी काही काळाने जशी ती निःसत्व होत जाते त्याचप्रमाणे भटकुलभूमिकेने माधवरावांचा जन्म दिल्यापासून ती निःसत्व होत गेलीसे दिसते. कारण त्यांच्यामागून जेवढे पेशवे गादीवर आले तेवढ्यात एखादाही माधवरावांपर्यंतच्या पेशव्यांसमान झाला नाही. मग त्यास कारण भोवतालची परिस्थिती असो, वा अंगच्या अमोल गुणांची कसोटी पाहण्यास त्यांची त्यांच्यापूर्वीच्या पेशव्यांशीच तुलना केली पाहिजे नि त्यांतजर ते श्रेष्ठ ठरले तर ते सर्व पेशव्यांत थोर होते हेही कबूल केले पाहिजे.

आता हेही खरे आहे की प्रसंग हा मानवी प्राण्याच्या गुणसिंधूला भरते  आणणारा चंद्र होय. प्रसंगाशिवाय मनुष्याच्या अंगचे गुण वनात सुकलेल्या गुलाबाच्या पुष्पाप्रमाणे होत. माधवरावांच्या अंगी जे जे गुण आपणांस वास करीत असलेले दिसतात ते ते पूर्वीच्या पेशव्यांच्या अंगी नसतील असे नाही नि त्याच कारणांनी त्यांच्या त्या अदृश्य गुणांची आपल्याला कल्पना होणे नाही. माधवराव गादीवर आले त्यावेळची संकटपरंपरा नि अत्यंत दुस्तर परिस्थिती नि त्यातून माधवराव निभावले ही गोष्ट या दोन गोष्टी ऐकताच त्यांच्या अजब कर्तृत्वशक्तीने मनुष्य थक्क होतो. 'व्यावर्तितापरुजः प्रथमाभ्रवृष्ट्या वृक्षस्य वैद्युत इवाग्निरिव स्थितोयम्‌'  याप्रमाणे हिंदुपदपातशाहीची पानपतच्या भयंकर रणकर्दनाने दुर्दशा झाली आहे; दोन लाख बांगडी फुटल्याने महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून अबलांच्या हृदयद्रावक किंकाळ्या व वृद्ध मातापित्यांचे हंबरडे ऐकू येत आहेत. स्वराज्यप्रासादाचे स्तंभ जे सरदार लोक ते खाल्या घरचे वासे मोजू लागले आहेत. नुकताच उद्गिरचे लढाईत बडवलेला निजाम, म्हैसूरचा हैदर, रोहिलखंडचा नजिब, अयोद्धेचा नबाब असे एक ना अनेक कोल्हे क्षणभर क्षीण झालेल्या मराठी सिंहास मृतप्राय मानून त्याच्या मांसाची वाटणी करण्यास उद्युक्त झालेले आहेत. एक दोन महिन्यात स्वकुलगृहाचे तीन आधारस्तंभ पडल्याने वरली इमारत डळमळू लागली आहे. आजवर कोणत्याही पेशव्याला अननुभूत असा फितूरराहू महाराष्ट्रराज्येंदूला ग्रासू पाहत अअहे व होळकर, शिंदे, भोसले, बुंदेले इत्यादी कृतघ्न सरदार ज्यांचे अन्न खाल्ले त्यांची स्थिती अशी असता खुशाल तमाशा पाहत उभे आहेत व आपापली तुंबडी कशी भरते या अपस्वार्थी चिंतेत निमग्न आहेत. अशा अत्यंत आणिबाणीच्या प्रसंगी १७ वर्षाचे पोर, की ज्याच्या वयात स्वतःचे शरिराचीही शुद्ध नसते, अशा अल्पवयात आमचा राजबिंडा माधव प्रपितामहांनी संपादन केलेल्या, पितृमहांनी अटकेस नेऊन भिडवलेल्या जरिपटक्याचा असह्य तोल सांभाळण्यास दंड ठोकून उभा तो काय राहतो व कविकुलमुकूटमणीच्या
भुवमधिपतिर्बालावस्थोप्यलं परिरक्षितुं
न खलु वयसा जात्यैवायं स्वकार्यशोभरः ।
या वचनास यथार्थ करून एका दहा वर्षात झंझावाताप्रमाणे वरील अभ्रपटल पार विध्वंसून टाकून महाराष्ट्र स्वराज्याकाश निर्मल ते काय करतो ! खरोखर असल्या प्रसंगी जर थोरले माधवरावां विरहीत कोणताही पेशवा गादीवर असता तर त्याला इतक्या बेमालूम रितीने ही सर्व संधाने साधणे अशक्य होते. कारण माधवरावांच्या वेळेला जितकी कठीण परिस्थिती आली होती की ती पूर्वी कोणत्याच पेशव्याच्या वाट्याला आली नव्हती.  शिवाय माधवरावांपेक्षा पूर्वीच्या तिघाही पेशव्यांना पुष्कळ अधिक सवलती होत्या. बाळाजी विश्वनाथांना जसा शाहू महाराजांचा पाठपुरावा होता तसा माधवरावांना कोणताच नव्हता. शिवाय बाळाजी विश्वनाथांपेक्षा राज्यशकटपालन माधवरावांचे वेळेस कितीतरी पट दुस्तर झालेले होते, हे वरील वर्णनावरून दिसेलच. बाजीरावांशी तुलना करू लागले असतानाही असे आढळून येईल की त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदारीची कामे माधवरावांस पार पाडावी लागली. त्यास एकतर चिमणाजी अप्पासारखा कोणी जोडीदार सहकारी नव्हता. शिवाय शिंदे-होळकरादी सरदारांची प्रस्थे बाजीरावाच्या वेळेस बिलकूलच डोईजड नव्हती व इतकी कृतघ्नही बनली नव्हती. बाजीरावाला मोठा व कायमचा शत्रू म्हटला म्हणजे तो एकटा निजाम, पण माधवरावांचे वेळेला तो निजाम तर होताच, पण हैदर व इंग्रज, रोहीले, रजपुत ! सारांश हिंदुस्थानी सार्‍या पेशवाईच्या नाशाकरीता 'व्रणार्त पशूच्या शिरावरी वनीं उभे काकसे' राहिले होते ! बाजीरावाला कर्जाचा जाच सोसावा लागला तर तो आमच्या माधवरावांनाही सुटला असे नाही. अशा स्थितीत बाजीरावांपेक्षा खडतर स्थितीत सापडूनही ज्यांनी खच्ची झालेल्या राज्यवृक्षाच्या जोमू 'की तोडीला तरु फुटे आणखी भराने' या न्यायाने वृद्धींगत केला. त्यांची थोरवी काय वर्णन करावी ? आपल्या नातवाचे हे अवर्णनीय चातुर्य पाहून त्या पितामहांनी मात्सर्यरहित होऊन स्वर्गी आश्चर्याने तोंडात बोटच घातले असेल. आता नानासाहेबांसंबंधाने पाहिले तर त्यांना शूर, चतुर व कारस्थानी अशा भाऊ-दादांचे साह्य होते, सर्व सरदार लोक आपापल्या इमानास जागत होते. 'विभवयशाचे सदैव पोशिंदे' असे तुकोजी, जनकोजी व दत्ताजी शिंदे व 'रिपुसि महादर देते' राजेबहाद्दर व समशेरबहाद्दर असलेला एकेक वीर हातावर शीर घेऊन उच्चारलेला शब्द सिद्धीस नेण्यास खडे होते व छत्रपतींच्या वेळेपासून बसलेला मराठ्यांचा अद्भुत दरारा कायम होता. शिवाय घरात फितुराने पोखरण्यास आरंभ केला नव्हता. पण या सवलतींपैकी एकतरी सवलत रावसाहेबांस मिळाली काय ? नाही, अगदी नाही ! सर्व प्रकार याच्या अगदी उलट ! पण या पठ्ठ्याने या संकटास भिक घातली काय ? बिलकूलच नाही ! त्यांनी भ्रातृपितृव्यशोकाचे असह्य उमाळे दाबून टाकून काकांचा शक्य तिथवर बोज ठेवला व तोच त्यांचा क्रम जेव्हा मर्यादातिक्रम करू लागला त्या वेळेस कोणाच्याही आधाराची वा दपटशाहाची पर्वा न करता सामदंडादी योग्य शासन देऊन आधी घरातील कलह मिटवला; 'सख्या विठ्ठलाच्या' जगप्रसिद्ध शहाणपणाला बिल्ली मांजर बनवले; राक्षसभुवनच्या लढाईत स्वतःच्या शौर्याची व कर्तबगारीची कमाल करून निजामाची हड्डी नरम केली. फितुरी रघुजीला येथेच्छ चोप दिला. हैदरला तर वेळोवेळी चित केले; रोहिल्यांचा सूड उगवला; राजपुतांना वठणीवर आणले;  व दिल्लीशिवाय बहुतेक हाताखाली घातली ती निराळीच ! सारांश भयंकर वादळाच्या तडाख्यात गवसलेल्या व समोरील खडकावर आपटून छिन्नविछिन्न होण्याच्या बेतात असलेल्या तारवास जसा एखादा कुशल कर्णधार मिळावा व त्याने त्यास अलगद तीरास न्यावे, त्याचप्रमाणे मोठ्या  शिताफीने माधवरावांनी स्वराज्यास त्या वेळेस जगविले !




ही नुसती राजकीय गोष्टीत तुलना झाली. पण प्रजावात्सल्य, मनुष्याची पारख, ईभ्रत, शौर्य, कारस्थानीपणा वगैरे जे जे काही म्हणून राजाला अवश्य पाहिजे ते ते माधवरावांच्या ठायी एकवटले होते ! माधवरावांच्या अंगी बाळाजी विश्वनाथांप्रमाणे व बाळाजी बाज्जीरावांप्रमाणे कारस्थानपटुत्व होते; बाजीरावांप्रमाणे शुरत्व व धाडस होते; शिवाय मनुष्याची पारख करण्याच्या कामात तर त्यांची कमाल होती ! तसल्या अल्पवयात जी जी मनुष्ये त्यांनी निवडली त्यात एकही टाकाऊ निघाला नाही ! नाना फडणीस, रामशास्त्री, महादजी शिंदे, त्रिंबकराव मामा पेठे इत्यादी त्यांची मंडळी यच्चयावत्‌ आपापल्या सद्गुणतेजोराशीने भारतेतिहासात लखाखत आहेत ! तसेच प्रजावात्सल्याच्या कामी ते किती दक्ष असत हे, बिगारी धरण्याची त्यांनी जी बंदी केली ह्या गोष्टीवरूनही दिसून येईल. सारांश, पूर्वीच्या सर्व पेशव्यांचे गुण पुष्कळ पटीने गुणीभूत होऊन माधवरावांच्या अंगात एकवटले होते व म्हणूनच ते म्हणजे श्रीमंत माधवराव बल्लाळ उर्फ थोरले रावसाहेब पेशवे, हे सर्व पेशव्यांत अती थोर होत. इतकेच नव्हे तर, जगात आजवर जे कोणी नामांकीत राजे होऊन गेले त्यांच्या मालेच्या मध्यभागी आमच्या या भारतीय रत्नाला गुंफण्यास बिलकूल हरकत नाही. 

संदर्भ : समग्र सावरकर वाड़्मय, खंड ४

करमणूक या वार्तापत्राने भरवलेल्या निबंध स्पर्धेत सावरकरांनी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी लिहीला, आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही पटकवले ! हा निबंध २८ डिसेंबर १९०० रोजी प्रसिद्ध झाला.




© कौस्तुभ कस्तुरे   ।    [email protected]



Newer Post Older Post Home