Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

श्रीमंत थोरले माधवराव : कृष्णाजी वासुदेव पुरंदरेभाऊसाहेबांनी उद्गिरावर निजामाला लोळवून जो अपुर्व विजय मिळवला, तेथेच नानासाहेबांच्या व एकंदर पेशवाईच्या वैभवाची परिसमाप्ती होते. यानंतर ही गाडी पुढे अवघ्या दहा महिन्यांतच पानिपतच्या जबरधक्क्याने तोंड फिरवून अपकर्षाकडे धावत सुटते. शके १६८१ च्या फाल्गुनात उद्गिर संपले व शके १६८३ च्या ज्येष्ठांत नानासाहेबांनी सर्व प्रकारची वाताहात झालेली पाहता पाहता देह ठेविला.
या तेरा चौदा महिन्यांत राज्याची सर्वच अंगे झडत जाऊन पेशवाई केवळ लुळीपांगळी झाल्याचा देखावा दिसत होता. पैसा गेला, प्रदेश गेला, कर्ती माणसे क्षय पावली, पानपतावर पेशव्यांचा खजिना रीता होऊन त्यावर कित्येक लाखांचा कर्जाचा बोजा चढल्यामूळे या अंगाकडे पाहण्याची तर सोयच उरली नव्हती. पानपतानंतर तर जबर व्याज देऊनही कर्ज मिळण्याची आशा उरली नव्हती. ही झाली कोशाची स्थिती. दुसरे अंग मनुष्यबळ. तेथे तर याहुनही हृदयद्रावक देखावा दिसत होता. राव-आप्पांनंतर ज्याने आपल्या कर्तृत्वाचे जोरावर पेशवाईचा गाडा पाच-सहा वर्षे पेशवाईचा गाडा चाकोरी न सोडता व्यवस्थित चालवून वाहवा मिळविली होती त्या महादोबा पुरंदर्‍यांच्या मृत्युपासून (शके १६८२ कार्तिक) मनुष्यहानीला जी एकंदर सुरुवात झाली तिने नानासाहेबांचा बळी घेऊन दुर्दैवाची कमालच करून टाकली. भाऊसाहेब, विश्वासराव, जनकोजी शिंदे वगैरे मोहरे व कमावलेले सैनिक यांचा पानिपतावर झालेला संहार यासारखा न भुतो न भविष्यती मृत्यूच्या अजय तडाख्याला इतिहासात तोडच मिळावयाची नाही. पानपतावर मराठ्यांची जवळजवळ एक पिढीच्या पिढीच कापली गेल्यामूळे महाराष्ट्रभर जो हाहाःकार उडाला त्याचे वर्णन करण्याची सोयच नव्हती. अशा या आपत्काली अंतःस्थ आणि बहिःस्थ शत्रूंनी उचल न खाल्ली तर ते राजकारण कसले ? पानपतात पेशव्यांच्या विरुद्ध पक्षास सामिल झालेल्या व तरत्या-बुडत्याची वाट पाहत बसल्यामूळे सुरक्षित राहिलेल्या शत्रूंनी या नाजूक प्रसंगाचा पुरेपूर फायदा घेऊन उत्तरेत मराठ्यांची सत्ता केवळ नाममात्र ठेवून अराजकाला ऊत आणला. हाच देखावा दक्षिणेतही दिसत होता. निजाम हा मराठ्यांचा पिढ्यानपिढ्यांचा हाडवैरी असून त्याच्या जोडीला आता श्रीरंगपट्टणचे राज्य घशात टाकून शेर बनलेला हैदरनाईक येऊन मिळाला होता. उद्गिरला स्वसामर्थ्याला धक्का न लागू देता झालेली अंतस्थ व्यवस्था दूर करण्यास अवसर  मिळावा म्हणूनच निजामाने पेशवे म्हणतील त्या अटीवर उद्गिरवर तह करून वेळ मारून नेली होती. पेशव्यांचे लक्ष पानिपतावर होतेच परंतू इकडे निजामाच्या छाताडवर राघोबा आणि हैदरच्या छाताडावर विसाजीपंत बिनीवाले नसता तर निजाम-हैदर या जोडिने संगनमत करून दक्षिणेतही पानपतचा देखावा दाखविण्यास कमी केले नसते. अशा वेळेस नानासाहेबांच्या मृत्यूनंतर, आणि त्यांच्या पुढे गादी चालवण्याचा वसा सांगणार्‍या विश्वासरावांच्या मृत्यूनंतर कारभारी आबा पुरंदरे, सखारामबापू बोकील आणि राघोबादादाच्या पाठिंब्याने गादीवर आले ते नानासाहेबांचे द्वितिय चिरंजीव श्रीमंत माधवराव बल्लाळ !

- इतिहास संशोधक कै. कृष्णाजी वासुदेव पुरंदरे
(पुरंदरे दफ्तर भाग ३, प्रस्तावना)


Newer Post Older Post Home