Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी
साताऱ्याचे प्रसिद्ध इतिहाससंशोधक कै. दत्तात्रय बळवंत पारसनीस यांना शिव-समर्थ संबंधांविषयी एक यादी सापडली, आणि त्यांनी ती यादी 'इतिहाससंग्रह' या मासिकात प्रसिद्ध केली. या यादीसंबंधी पारसनीस म्हणतात, "शके १५९६, आनंद संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध १३ रोजी महाराज राज्याभिषिक्त झाले, त्यावेळी त्यांनी कानुनजाबीता करून अष्टप्रधानांकडे जशी राज्याची कामे नेमून दिली, त्याप्रमाणे स्वामींच्या श्रीरामचंद्रांच्या वार्षिक उत्सवाची कामें नेमून दिली. ती सातारचे राज्य होते तोपर्यंत चालत होती". ही यादी पुढीलप्रमाणे - 




यादी

१ मोरोपंत पिंगळे पंतप्रधान हे कीर्तनाची समाप्ती झाल्यावर खिरापत वाटावी, आणि  ........ कारभारी घेऊन वाटावी. 

१ रामचंद्रपंत अमात्य यांनी ब्राह्मणभोजनसमयी पूजा करावी, उदक सोडावें, सभेचे समयीं बैठक करावी. श्रीचे सेवेचे कामगार, शागीर्दपेशा यांचा अधिकारही त्यांकडे. राजश्रींनी मोर्चेल श्रीवर धरिले असता, उद्धव गोसावी, कल्याण गोसावी नसल्यास, यांही दुसरे मोर्चेल डावे बाजूस धरावे. 

१. अण्णाजी दत्तो सचिवपंत यांनी भोजनसमयी दक्षणा वाटावी. भोजनानंतर उच्छीष्टे काढून स्थलशुद्धी करावी. आर्तीधूपार्तीसमयी श्रीकडील चोपदार शहापूरकर साटे पाटील यांस बोलावून स्वारीची व छबिन्याची तयारी करवावी. 

१ दत्तोपंत मंत्री यांनी कीर्तनात बुक्का लावावा. पाकशाळेची तयारी करावी. कोंडोपंत निसबत मंत्री यांनी कोठीतून साहित्य आणून पाकशाळेकडे द्यावे. नेहमीं श्रीजवळ राहून दिनचर्येचा वांका होईल तो राजश्रीस ल्याहावें. 

१ जनार्दनपंत हणमंते सुमंतपंत यांनी भोजनोत्तर ब्राह्मणांस विडे द्यावे. कीर्तनाची बैठक सभेची करावी.

१ बाळाजी पंडित न्यायाधीश यांनी प्रयोजनात पाण्याच्या अधिकार व पाकशाळेचा सडासंमार्जनाचा अधिकार त्यांचेकडे. 

१ रघुनाथराव पंडित छंदोगामात्य यांनी, श्रीचे उत्साहात शिष्टमंडळी संभावित येतील त्यांचा परामर्श करावा. दक्षणा, रवानगी, सत्कार करणे तो मठाचे कारभारी यांचे विद्यमाने करावा.

१ हंसाजीराव मोहिते सेनापती यांनी आरतीचे छबिन्यात, सिंहासनाच्या काठ्या व छत्रे-चामरे घेणार अधिकारी यांस आणवून, काठी ज्याची त्याजपासीं देऊन, छबिना जालियावर जतनेस ठेवावी. कीर्तनात उजवे बाजूस उभे राहून पंख घेऊन वारा घालावा. डावे बाजूस प्रतापजी गुजर सरनोबत यांनी पंख घेऊन वारा घालावा.

१ पोतनीस यांनी श्रीस जवाहीर, पोशाख वगैरे जिन्नस, फळफळावळसुद्धा आणून देत जावें. 

१ बाळोबाभाऊ चिटणीस यांनी, मठाचे कारभारी वगैरे यांस घेऊन संस्थान प्रकरणी व उत्साहप्रकरणी जमाखर्चाची व्यवस्था करून, बोभाट पडू देऊ नये. आज्ञेप्रमाणे काम पाहावे.

१ राजश्रींनी आपल्याकडे काम नेमून घेतले (ते) सडासंमार्जन जातीनिशी घालणे. सर्व अधिकारी सेवेचे नेमिले त्यांची चौकशी पाहून, तोफखान्याचा व फरासखान्याच्या बंदोबस्त करून, छबिन्याचे मागे सर्वत्रांस घेऊन चालावे. कीर्तनांत गोसावी यांचे मागे उभे असावे. आगर स्वामी सभेत बैसले असता मोर्चेल घेऊन उभे राहावे. रथ उत्साहाचे समयी, श्री रथावर जातेवेळी राजश्रींनी आपली स्वारी दरोबस्त तयार करून, पालखीच्या मूर्ती बैसवून, पालखीस खांदा शहापूरकर यांनी पुढे द्यावा. राजश्रींनी मागे खांदा द्यावा. रथावर श्री रघुपति बैसल्यावर राजश्रींनी रथापुढे सोन्याची काठी घेऊन उजवे बाजूस चालावे. दावे बाजूस आमात्य यांनी काठी घेऊन चालावे. उभयतांचे मध्ये शहापूरकर साठे यांनी काठी घेऊन चालावे. श्री रघुपतीची स्वारी माघारी येता शिराळकर यांनी पालखीत मूर्ती बैसवाव्या. पुढे पालखीस खांदा राजश्रींनी द्यावा. मागे शिराळकर यांनी द्यावा. देवालयात श्री आल्यावर लळीत करावे. प्रसादसमयी हिंदुस्थानी पद करुणापर शिवबांनी केले आहे, ते म्हणत असावे. 

स्रोत : इतिहाससंग्रह, ऑक्टोबर १९०९, पुस्तक दुसरे, अंक तिसरा 
संपादक : दत्तात्रय बळवंत पारसनीस

Newer Post Older Post Home