Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

आर्य- वैदिक संस्कृतीचा इतिहास


      वैदिक आर्यांच्या हिंदुस्थानातील आगमनाबद्दल आपल्याकडच्या संशोधकांमध्ये अजुनही एकमत नाही. संस्कृत भाषा ही आर्यांची प्रमुख संपर्क भाषा होती. त्या खालोखाल नंतर हळूहळू प्राकृत भाषांचा उदय होत गेला. भाषाशास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार उजेडात आलेल्या बर्‍याचशा संस्कृत शब्दांचे युरोपिय आणि मध्य आशियाई-पर्शियन भाषांशी असणारे साम्य लक्षात घेऊन हिंदु-आर्य (Indo Aryans) हे भारता बाहेरून आले असावेत असे बहुतांश इतिहासतज्ञांचे मत आहे.
मॅक्सम्युलर या जर्मन इतिहास संशोधकाने भारतीय प्राचिन संस्कृत आणि युरोपिअन प्राचिन भाषांतील सारख्या वाटणार्‍या शब्दांवरून युरोपिअन आर्य आणि त्याचबरोबर हिंदु-आर्य हे सुद्धा एकाच प्रदेशातून स्थलांतरीत झाले असावेत असा निष्कर्ष काढला. मॅक्सम्युलरच्या मते या आर्यांचे मूळ स्थान मध्य आशिया असावे. परंतू, आपल्याकडचे थोर विद्वान, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ असणारे लोकमान्य टिळक यांनी आपल्या द अरायन आणि आर्क्टिक होम इन द वेदाज्‌ या ग्रंथातून, आर्य हे उत्तर धृवीय प्रदेशातून आले असावेत असा सिद्धांत मांडला. ऋग्वेदात उल्लेखलेल्या खगोलशास्त्रिय घटना, मृग नक्षत्रातील वसंतसंपात शिवाय इतर घटनांच्या आधारावर टिळकांनी सिद्धांत मांडला. वास्तविक पाहता टिळकांचा हा सिद्धांत अत्यंत शास्त्रिय कारणांवर आधारीत होता. शिवाय ते संस्कृत पंडित असल्याने वेदांच्या वाचनातही त्यांच्याकडून चूका होण्याची शक्यता नव्हती. परंतू, तत्कालीन इंग्रजी शासनात टिळकांसारख्या इंग्रजविरोधी पंडिताचे संशोधन पुढे कसे येणार ? अन्‌ या नंतरही आपल्या इतिहास संशोधकांनी टिळकांच्या या सिद्धांताचा आजतागायत विचार केलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते भारताच्या उत्तर दिशेस असणार्‍या सैबेरिया प्रांतात, पामिरच्या पठारावर आर्यांचे मूळ वस्तीस्थान असावे. येथेच पूर्वी मेरू नावाचा प्रचंड पर्वत होता. एकूणच काय, आर्यांच्या हिंदुस्थानातील आगमानाविषयी आज ठामपणे कोणतेही विधान करता येत नाही.
     ऋग्वेदात आर्यांचे आगमन कोठून झाले याबाबत काहीच खल नाही. परंतू, अनु, यदु, द्रह्यू, पुरु आणि तुर्वस हे आर्यांचे पाच गट प्रथम सप्तसिंधूंच्या प्रदेशात उतरले. सप्तसिंधूचा प्रदेश म्हणजे वायव्य प्रांतातील सिंधू, वितस्ता, अश्विनी, परुष्णी, व्यास, शुतुद्रू आणि सरस्वती या नद्यांचा प्रदेश. यांच्यात पुरु हे बलाढ्य होते. परंतू नंतर मागाहून आलेल्या आर्यांच्याच त्रित्सु, भरत इत्यादी गटांतील भरतगण हासुद्धा तितकाच बलाढ्य असल्याने या दोन आर्यगणांतच यादवी माजली. भरतांचा राजा सुदास आणि पुरुंचा राजा पुरुकुत्स यांच्यात युद्ध झाले. भरत गणाने इतरही आर्यगणांविरुद्ध युद्धाची आघाडी उघडल्याने पूर्वीचे पाच मुख्य गण आणि शिवाय हिंदुकुशच्या आसमंतातील अलिन, परव्त(पर्वत), भल्लन, शिव आणि विषाण या एकूण मिळून दहा गणांनी सुदासाविरुद्धयुद्ध पुकारले. या युद्धात या दहागणांचा मुख्य पुरोहित विश्वामित्र तर सुदासाचा पुरोहित वसिष्ठ ऋषी होते. ऐन वेळेस सुदासाचा पराभव होत आहे असे पाहून वसिष्ठांनी देवांचा राजा इंद्र याचे स्तवन करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि सुदासाला विजय मिळवून दिला (ऋग्वेद- मंडल ७, सुक्त ३३). या युद्धाला ऋग्वेदात दाशराज्ञ युद्ध असे संबोधले आहे. ऋग्वेदाचा कालखंडहा सुमारे इ.स. पूर्व १५०० मानला जातो. यानंतर सुमारे इ.स. पूर्व ८०० पर्यंतचा काळ हा वैदिकोत्तर कालखंड म्हणून गणला जातो.  मधल्या काळात पूर्वी पुरु व भरत या एकमेकांचे कट्टर शत्रू असणार्‍या गणांनी एकत्र होऊन वेगळा असा कुरुगण स्थापन केला. असेच वैदिकोत्तर कालखंडात पांचाल, मत्स्य, मगध इत्यादी अनेकनवे गण उदयास आले. या वैदिकोत्तर काळात आर्यांच्या वसाहती वायव्येस गांधार-कंबोज म्हणजेच सध्याच्या अफगाणीस्तान, पूर्वेस मगध-वंग म्हणजेच सध्याचा बंगाल, पश्चिमेस अवंती तर दक्षिणेस विंध्याद्री ओलांडून विदर्भातही जाऊन पोहोचल्या होत्या. आज आपण ज्याला अफगाणीस्तान म्हणतो हा मूळ अहिगणस्थान या शब्दाचा अपभ्रंश तर बंगाल हा वंग या शब्दाचा अपभंश आहे.  
     कित्येकदा अनेक तथाकथित संशोधक वेदांमध्ये स्त्रियांना अत्यंत कमी लेखल्याचे सांगतात. परंतू, ऋग्वेदासारखा मुख्य वेद मात्र तसे अजिबात सुचित करत नाही. वैदिक आर्यांची कुटूंबव्यवस्था ही जरी पितृसत्ताक असली तरी केवळ पुरुषप्रधान नव्हती. ऋग्वेदातील काही मंडले रचणार्‍यांमध्ये उर्वशी, लोपामुद्रा, इंद्रायणी अशा स्त्री-ऋषींची नावे आहेत. उर्वशी ही तर पूर्वी इंद्राच्या दरबारातील एक अप्सरा (नृत्यांगना) होती. यामूळेच वेदकाळात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात बंदी नव्हती हे सिद्ध होते. वेदांमध्ये बालविवाहा संबंधी एका शब्दानेही उल्लेख नाहीत आणि सती अथवा केशवपनाचेही उल्लेख नाहीत. अग्नि ही आर्यांची प्रमुख देवता असल्याने त्याचे प्रतिक म्हणून वैदिक व्यवस्थेत यज्ञविधीला सर्वोच्च सन्मान होता. ऋग्वेदातील यास्करचित पुरुषसुक्त हे मूळ वेदाला नंतर जोडलेले मंडल आहे, आणि त्यातही, पुरुषसुक्ताचा मूळ अर्थ लावला असता ब्रह्मशक्ती म्हणजे विद्या, क्षात्रशक्ती म्हणजे बल, वैश्यशक्ती म्हणजे व्यवहार आणि शूद्रशक्ती म्हणजे कष्ट असा सहज सोपा अर्था लावण्याऐवजी संकुचित मनोवृत्तीच्या लोकांनी याला उच्च-निचतेचे विकृत स्वरुप देऊन जातिव्यवस्थेला खत-पाणी घातले. आर्यांच्या काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात होती, जातिव्यवस्था नव्हे ! वर्ण हा मनुष्याच्या कर्मानुसार ठरत असे. वर्ण म्हणजे एक प्रकारची वृत्ती होती. याचे साधे-सरळ उदाहरण म्हणजे लंकेचा राजा रावण हा आर्य नसतानाही मिथिला जनपदाच्या जनक राजाने त्याला आपल्या मुलीच्या, सीतेच्या स्वयंवरासाठी आमंत्रण धाडले ! शूर आणि सुसंस्कृत अनार्य हेसुद्धा आर्यांच्या वर्णव्यवस्थेत सामावून घेतले जाऊ लागले होते. यास्कऋषींनी पुरुषसुक्त लिहीले ते जातिव्यवस्थेत फूट पाडण्यासाठी नक्कीचनव्हते. उलट, पूर्वी ज्या अनार्य-शूद्रांना अगदी रानटी व अस्पृष्य मानले जाई त्यांना आर्यांच्या चातुर्वण्यात हक्काने जागा मिळाली. ते स्पृष्य मानले जाऊ लागले. चातुर्वण्य व्यवस्थेत शूद्रांना स्थान मिळाले आणि ते दासकर्म करू लागल्यामूळे इतर त्रैवर्णियांना मुबलक स्वास्थ्य मिळून आपापल्या नियोजीत कर्मात लक्ष देण्यास वेळ मिळू लागला. परंतू हा वर्ण म्हणजेच पुढे कालांतराने ती जन्मापासून चिकटलेलीव कधिही न जाणारी जात बनली. म्हणूनच, आधी दरोडेखोरी करणारा शूद्र वाल्मिकी नंतर रामायणकर्ता ऋषी (ब्राह्मण) म्हणून नावारुपास आला; मगधच्या गादीवर शूद्र असणारा महापद्मनंद बसून क्षत्रिय झाला; आणि कलिंगाच्या जातिबाह्य ब्राह्मणांनी गादीवर बसून क्षत्रिय वर्ण धारण केला. आर्यांच्या वाढत्या विस्तारामूळे आणि अनार्य-द्रविडांशी येणार्‍या वारंवार संबंधांमूळे वर्णसंकर निर्माण झाले. यातील काही अनार्यांनी आर्यांची व्यवस्था पूर्णपणे आत्मसात केली, तर काहींनी आपल्या पूर्वीच्या प्रथा तशाच सुरु ठेवून आर्यांची व्यवस्था अंशतः अंगिकारली. तर काहींनी आर्यांना पूर्णपणे नाकारले. अशा लोकांनाच पुढे शूद्र’, ‘महाशुद्र अशा संज्ञा देण्यात आल्या. इ.स. पूर्व नवव्या शतकाच्या सुमारासही महर्षी पाणिनी यांनी आपल्या शब्दानुशासन अष्टाध्यायी सूत्र या व्याकरणावरआधारीत ग्रंथात सर्वांचा उल्लेख केला आहे. पाणिनीकाली अनिर्वसित आणि निर्वसित असे शूद्रांचे दोन प्रकार होते. याज्ञवल्क स्मृतिटीकेनुसार तक्षन, अयस्कर, रजक, तंतुवाय इत्यादी तत्कालिन अनार्य ज्ञाती या शूद्र गणल्या जात असल्या तरीही त्याअस्पृष्य नव्हत्या. केवळ केवळ रानटी आचार असणारी आणि जनावरांचे कच्चे मास,उंदीर मारुन खाणार्‍या आणि यज्ञसंस्था न मानणार्‍या चंडाल, निषाद, मृतप अशा महाशूद्रांना अस्पृष्य मानले जाई. अन्‌ तेही केवळ यज्ञासारख्या पवित्र कार्यात गलिच्छ प्रकार नकोत म्हणून.
     शूद्रांना चातुर्वण्य व्यवस्थेत स्थान दिल्यानंतर त्रैवर्णिय आर्यांचा त्यांच्याशी शरिरसंबंध येणे हे साहजिकच होते. यांच्या उत्त्पत्तीला वर्णसंकर असे म्हणत असत. आर्यांची व्यवस्था पितृसत्ताक असल्याने क्षत्रिय अथवा ब्राह्मणादी त्रैवर्णियाला शूद्र स्त्री पासून झालेल्या संततीला पित्याचा वर्ण प्राप्त होत असला तरिही कृष्णवर्णामूळे तो संकर आहे हे सहज लक्षात येई. त्यामूळे मूळ शुक्लवर्णिय आर्य आणि संकरीत कृष्णवर्णिय आर्य असे हळूहळू दोन गट निर्माण होऊन आर्यांच्यातच हळूहळू यादवीला प्रारंभ झाला. या यादवीमूळे, संकरीत कृष्णवर्णिय आर्यांनी शुक्लवर्णिय वैदिक आर्यांविरुद्ध बंड उभारत नव्या वेदबाह्य विचारधारा मांडून वैदिकांना आव्हान दिले. मगध साम्राज्याचा राजा शिशुनाग महानंद याचा त्याचाच शूद्रसंकर पूत्र महापद्मनंद याने शिरच्छेद करून सत्ता ताब्यात घेतली व शुद्धक्षत्रियांचा निःपात करून वृषल (संकरीत) वंशाची सत्ता स्थापन केली. या कृष्णवर्णिय लोकांनी अनार्यशूद्रांच्या मूळ प्राकृत भाषांना उत्तेजन देऊन आर्यांच्या वैदिक-संस्कृत भाषेवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला. 
     पाणिनीच्या काळात किंवा उत्तर वैदिक काळात आर्यांमध्ये भाषावार दोन गटात विभागणी होती. मूळ त्रैवर्णिय आर्य, जे संस्कृत भाषा वापरत अन्‌ दुसरे म्हणजे शूद्र जे संस्कृत समजू शकत असत परंतू बोलताना मात्र अशुद्ध संस्कृत अथवा प्राकृत भाषांमध्येच बोलत. अशा शुद्रांना पाणिनी म्लेच्छ म्हणतात. थोडक्यात, आर्यांनी भारतात लोहयुगाची सुरुवात केली परंतू हे द्रविडादी अनार्य अजूनही ताम्रयुगाच्या उंबर्ठ्यावरच असल्याने ते प्रगत होऊ शकलेले नव्हते. पाणिनीच्या नंतर सुमारे सहाशे वर्षांनी म्हणजेच इ.स. पूर्व तिसर्‍या शतकाच्या सुमारास झालेले कात्यायन ऋषी च्या काळात या धार्मिक अधःपतनाला सुरुवात झाली. कात्यायनाने त्याच्या वार्तिक या स्मृतीटीकेत अथवा ग्रंथात  पुरुषसुक्ताचा विपरीत अर्थ लावून जातिव्यवस्थेचा पाया घालून दिला.  यानंतर दोनशे वर्षांनंतर झालेल्या पतंजलीच्या काळापासूनखर्‍या अर्थाने जातिव्यवस्थेला सुरुवात झाली. पतंजली आपल्या महाभाष्य या ग्रंथात म्हणतो, “असुयकत्स्वमसीं जाल्म; न त्वं प्रत्यभिवादमर्हसी” म्हणजे वैदीक धर्माचा अपमान करणार्‍या, तु प्रत्यभिवादनास अपात्र आहेस ! याचे कारण असे, की पाणिनीच्या काळात जैन-बौद्धादी पंथ निर्माण झाले नव्हते. तत्काली चातुर्वर्ण्य समाज हा वैदिक आचाराशी एकनिष्ठ होता, परंतू यानंतर कात्यायनाच्या काळापर्यंत वैदिक धर्माशी समांतर असे बौद्धादी इतर पंथ निर्माण झाल्याने त्यांनी वैदिकांचे स्वामित्व नाकारले. चातुर्वण्यातील काही शूद्र; विशेषतः महाशूद्र हे प्रथमपासूनच वैदिक धर्माशी निगडीत नसल्याने बौद्धादी नव्या विचारधारांकडे आकर्षित होऊ लागले. शिवाय वर वर्णन केल्याप्रमाणे, वर्णसंकर प्रजाती या बंडखोर निघाल्यामूळे मनुस्मृती सारख्या स्मृतीटीकेत शूद्रांशी व शूद्र स्त्रीशी संग करू नये असे लिहीले आहे आहे.  त्याचे कारण हे आहे ! पाणिनीनंतरच्या काळात चार मुख्य वर्णाशिवाय त्रैवर्ण-शूद्र संकरीत निषाद, उग्र, रथकार या पितृवर्णिय प्रजाती तर  मूर्धावसिक्त, अंबष्ठ आणि माहिष्य या मातृवर्णिय प्रजाती अस्तित्वात आल्या. या सर्व वर्णांना आणि प्रजातींना नियमानुसार कामे ठरवून देणे हे वैवस्वत मनुसारख्या धर्मज्ञांना गरजेचे वाटले, जेणेकरून या वर्णसंकरीत प्रजाती जैन-बौद्धादी पंथाकडे वळणार नाहीत. परंतू धर्मज्ञांचा याच निर्णयामूळे पुढे जातिव्यवस्था अस्तित्वात आली.
     वैदिक आर्य आणि पाखंडी जैन-बौद्धादी संस्कृतीमध्ये इ.स. पूर्व ६०० ते इ.स. ४०० असा जवळपास एक हजार वर्षे झगडा सुरुच होता. प्रथम बलाढ्य मगध राज्याच्या नागवंशिय वैदिक क्षत्रियांचा पाडाव होऊन नंदवंशिय शूद्रांकडे सत्ता गेली. नंतरचंद्रगुप्त-चाणक्याच्या काळात मौर्य साम्राज्यात प्रथम वैदिक धर्म वृद्धिंगत होत असतानाच अशोक मौर्याने पुन्हा बौद्धांची सत्ता स्थापन केली आणि बौद्धांचा प्रसार सिंधूपासून सिंहलद्विपापर्यंत (श्रीलंकेपर्यंत) केला. यानंतर शुंग या क्षत्रिय तर काण्वायन या वैदिक ब्राह्मणांचे राज्य उभे राहते न राहते तोच कुशाण सम्राट कनिष्काच्या  स्वारीमूळे बौद्धांना पुन्हा नवसंजिवनी मिळाली. यानंतर शकांच्या आक्रमणाच्या वेळी मत्स्यपुराणात वर्णन केलेल्या आंध्रभृत्य तर ऐतरेय ब्राह्मण्यातील जातिबाह्य ब्राह्मण उर्फ सातवाहन राजांनी आणि मगधच्या महापराक्रमी गुप्त सम्राटांनी पुन्हा वैदिक धर्माला वैभवाच्या कळसावर नेऊन ठेवले. या मधल्या काळात सततच्या स्थित्यंतरांमूळे प्राकृत भाषा मोठ्या प्रमाणावर उदयास आल्या. या काळात स्त्रिया आणि ब्राह्मणेतर वैदिकांना पूर्वीसारखे उच्चतम संस्कृतचे ज्ञान नसल्याने त्यांना वैदिक वाङमय आणि यज्ञयाग समजण्यास अवघड जाऊ लागले. याच काळात धर्ममार्तंडांनी ब्राह्मणेतर आर्यांना समजण्याजोगा असलेला, आणि जैन-बौद्धादी पंथाप्रमाणेच सोपा असलेला भगवत धर्म उदयास आणला.
     आर्यांचे धार्मिक तत्वज्ञान तर अतिशय विशाल आणि तत्कालीन जगाच्या दहा पावले पुढेच होते. सूर्य,चंद्र, वरुण, अग्नि, उषा अशा नैसर्गिक गोष्टींमूळे आपल्याला जिवन जगण्यासाठी मदत होते हे जाणून वैदिक आर्यांनी या सर्वांना देव मानले होते. ऋग्वेदात एकंसत्‌ सूत्र मांडले आहे. या शब्दांची फोड केली असता एक्‌ अंस आणि त्याला पुढे त्‌ हा प्रत्यय लागला आहे. म्हणजेच, या विश्वात एकच आत्मा अथवा अदृश्य शक्ती आहे जी सर्व जगाला नियंत्रीत करत आहे, आपल्याला दिसणारी सजिवांची विभिन्न रुपे ही या एकाच शक्तीची आभासी रुपे आहेत. उपनिषदांमध्ये या सार्‍या गोष्टीचा खल केलेला आपल्याला आढळून येतो. परंतू, पुढे पुढे, वर वर्णन केल्याप्रमाणे जसे वर्णसंकराच्या बंडाचे भय उत्पन्न झाले आणि बौद्धादी पंथांची भरभराट होऊ लागली तेव्हा हुशार वैदिकांनी सर्वसामान्य वैदिकांना परधर्मात जाण्यापासून रोखण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधून काढल्या. मूर्ति ही मूळ हिंदूंची संज्ञा नसून बौद्धांची आहे. परंतू महायान बौद्धांच्या विहार, स्तुप आणि लेण्यांच्या कलाकारीला प्रत्युत्तर म्हणून वैदिकांनी आपल्या विष्णू आणि त्याचे राम-कृष्णादी अवतार, शिव, शक्ती, इंद्र, लक्ष्मी आदी ऐतिहासिक व्यक्तिंना देवत्व बहाल करून, त्यांच्या मूर्ति तयार करून सुंदर सुंदर नक्षिकाम असलेली मंदिरे उभारण्यास आरंभ केला. आर्यांचे वैदिक वाङ‌‌मय हे मूळातच विशाल होते. या वाङमयात मुख्य संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद होत. याशिवाय, या वेदांतील ऋचांचे ललित-गद्यरुपात स्पष्टीकरण म्हणजे ब्राह्मण्ये’. या ब्राह्मण्यांच्या उत्तरविभाग म्हणजे आरण्यके आणि आरण्यकांचा उत्तरविभाग म्हणजे उपनिषदे होत. त्यामूळेच संहिता हे मूळ वेद, ब्राह्मण्ये हा मध्यभाग तर आरण्यके आणि उपनिषदे यांना वेदांत म्हणतात. परंतू मधल्या काळात झालेल्या धार्मिक उलाढालिंमूळे बौद्धांच्या विनयपिटक, सुत्तपिटक, जातककथा, मिलिंदपन्ह अशा सुरस ग्रंथांना मागे टाकणारे याज्ञवक्लस्मृतीसारखे ग्रंथ, रामायण-महाभारतादी महाकाव्ये, ब्रह्मसूत्र-न्यायसूत्रादी सूत्रग्रंथ आणि लोमहर्ष सुतऋषींनी रचलेली सुंदर पुराणे याच काळात लिहीली गेली. यावरही ताण म्हणजे, पूर्वी यज्ञयागात बळी देणार्‍या वैदिक ब्राह्मणांनी बौद्धांच्याही वरताण अहिंसेचा हिरीरिने पुरस्कार केला. आजही, अहिंसेचे तत्वज्ञान सांगणारे सर्रास मांसप्राशन करताना दिसतात, पण ब्राह्मण मात्र मांसाहार करत नाहीत.
     सिंधु संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या काहीमुद्रांवर शिंगधारी एक व्यक्ती आणि त्याच्या जवळ वृषभ असल्याचे दाखवलेले आढळते. इतिहासतज्ञांच्या मते ती व्यक्ति म्हणजे शंकर आहे. होय, असूही शकते. पण म्हणून शंकर हे वैदिकांचे-आर्यांचे दैवत नसून अनार्यांचे आहे असं भासवण्याचा उद्योग सध्या काही जणांमार्फत सुरु आहे. पण अशा व्यक्तिंना मुख्य प्रश्न हा, की शंकराची व्याख्या आणि वर्णन ही वैदिक आर्यांच्या वेद-पुराणांव्यतिरिक्त इतर कोठेही आढळत नाहीत. सिंधू संस्कृतीचे पूर्णपणे वाचन आजही शक्य नसल्याने त्यांनी जरी शिवाचे वर्णन केले असले तरीही ते आपल्याला आजतागायत समजलेले नाही. शिवाय, आणखी एक मुद्दा असा की योगक्रियांचा जनक पतंजली हा वैदिक आर्य-ब्राह्मण होता. मग सिंधु मुद्रांवर ध्यानस्थ योगमुद्रावस्थेत असलेला शिव कसा काय ? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे दोनच ! एकतर त्या मुद्रांवरील व्यक्ती ही शिव नाही अथवा सिंधू संकृती ही वैदिक संस्कृतीचाच एक भाग असून तेथे वर्णसंकरीत राजसत्ता असल्याने त्यांनी संस्कृत भाषेला दूर करून स्वतःची प्रादेशिक-प्राकृत निर्माण केली.  
     एकंदरीतच असा आहे आर्यांचा इतिहास ! या निबंधाच्या सुरुवातीला नमुद केल्याप्रमाणे आर्यांचे यदु-पुरु आदी गण प्रथम सिंधूनदीच्या खोर्‍यातच उतरले आणि येथेच ऋग्वेदाची निर्मिती झाली. भाषाशास्त्रानुसार चा अपभ्रंश असा होतो. त्यामूळे, पुढे पुढे परकीय आक्रमकांद्वारा सिंधू या शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द निर्माण झाला. आणि हिंदू लोकांचा वैदिक धर्म म्हणता म्हणता हिंदू धर्म हाच शब्द रुढार्थाने प्रचलित झाला !
     आर्यांच्या या इतिहासाचे कालमापन व घटनांचा क्रम लावताना तो उपलब्ध पुराव्यांवरून आणि त्यांतील उल्लेखांच्या संदर्भावरून असा लावणे इष्ट आहे-
·        ऋग्वेद हा आर्यांचा सर्वात प्राचिन ग्रंथ असून त्याचे अस्तित्व संशयातीत आहे. दहाव्या मंडलातील पुरुषसुक्त हे नंतरच्या काळात विकृत अर्थाने मांडण्यात आले, परंतू आर्यांच्या मानसिकतेचा आणि इतर ऋग्वेदीय ऋचांचा विचार करता त्याचा अर्थ वर उल्लेख केलेल्या प्रमाणे अतिशय निर्मळ आहे.
·        यजुर्वेद व सामवेद यांचा काळ ऋग्वेदानंतरचा आहे. अथर्ववेदाचा काळ आजतागायत निश्चित करता आला नाही, त्यामूळे या ग्रंथांचे प्रामाण्य संशयित नसले तरी ऋग्वेदाच्या तोडीचे नाही.
·        या वेदांच्या संहितांचे गद्यस्वरुपी ब्राह्मण ग्रंथ अथवा ब्राह्मण्ये हे समजण्यास अतिशय उपयुक्त असल्याने त्यांचे महत्व ऋग्वेदाइतकेच मोठे आहे.
·        वेदांगे ही संहिता आणि ब्राह्मण्ये यांच्या सुमारे सहा ते आठ शताकांनंतर पाणिनीच्या काळात लिहीली गेली आहेत. त्यामुळे उत्तर वैदिक कालखंडाच्या संबंधात वेदांगांचे महत्व निःसंशय आहे.
·        धर्मसूत्रे ही वेळोवेळी लिहीली गेली आहेत. त्यामूळे यांचे वेगळे अस्तित्व तितकेसे ग्राह्य नाही.
·        कात्यायन आणि पतंजलीच्या काळात आलेल्या ग्रिकांच्या आक्रमणावेळी आलेल्या अरायन, मॅगेस्थेनिस इत्यादींचे मूळ ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. आज उपलब्ध असलेला इंडिका हा ग्रंथ म्हणजे प्लिनी, प्ल्युटार्क, टॉलेमी, अरायन यांच्या उतार्‍यांवरून नंतर १८७७ मध्ये जर्मन पंडित मॅक्रिंडल याने  एंशंट इंडिया डिस्क्राइब्डबाय मॅगेस्थेनिस अ‍ॅन्ड अरायन या नावाने प्रसिद्ध केला. तो अस्सल मॅगेस्थेनिस्कृत इंडिका नाही ! त्यामूळे त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. परंतू इतर संदर्भ साधनांच्या जोडीने त्यातील माहिती तपासून पाह्ता येते. परंतू ग्रिकांच्या आक्रमणाच्या सुमारास वा इ.स. पूर्व सुमारे तिसर्‍या शतकात बौद्धांचे त्रिपिटक आदी धर्मग्रंथ लिहीले गेल्याने तेही विश्वासार्ह आहेत.
·        वेदव्यास रचित मूळ महाभारत आज उपलब्ध नाही. आजचे महाभारत हे इ.स.पूर्व दुसर्‍या शतकातील आहे, त्यामूळे वैदिक कालखंड सोडून तत्कालीन घडामोडींसाठी हे महाभारत उपयुक्त ठरते. वाल्मिकीचे रामायण, पतंजलीचे महाभाष्य हे सुधा याच काळातील आहेत.
·        या सर्वांनंतर पुराणांचा क्रम लागतो. पुराणे ही साधारणतः प्राचिन बखरी म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. या पुराणांचा रचनाकाल हा साधारणतः इ.स. च्या पहिल्या शतकापासून ननव्या शतकापर्यंत आहे.
·        या सार्‍यासोबतच भाषा आणि कालानुरुप भाषेत पडणारा फरक हासुद्धा मोठा पुरावा ठरू शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्यांच्यातील कालानुरुप कथन केलेला इतिहास पाहून आर्यांच्या या विशाल संस्कृतीविषयी पूर्णतः नाही पण बर्‍याच अंशी माहिती मिळणे आज शक्य झाले आहे.


*********** कौस्तुभ सतीश कस्तुरे
facebook.com/kaustubh.kasture