Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

पारंपारीक हिंदू कालगणना



दि. ११ एप्रिल २०१३

          आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस. या दिवसापासून हिंदू सौरवर्ष सुरु होते. आज श्रीनृप शालिवाहन शके १९३५ तर २०६९ व्या विक्रम संवताला प्रारंभ होत आहे. ही हिंदू कालगणना म्हणजे नेमका काय प्रकार आहे हे आजच्या काळात बहुतांश जणांना ठाऊकच नसेल, किंबहूना आज नेमकं शालिवाहन शक सुरु होतं का विक्रम संवत्‌ का आणखी काही असा प्रश्ना बहुतेकांना पडल्यावाचून राहणार नाही ! शालिवाहन शक, विक्रम संवत्‌, राज्याभिषेक शक हे नेमके काय प्रकार आहेत हे जाणून घ्यायची मात्र प्रत्येकालाच उत्सुकता असते..
          विक्रम संवत्‌ याच्या उगमाबद्दल दोन तर्क किंवा गोष्टी आहेत. एक म्हणजे, इसवी सन पूर्व १४०-१३० च्या दरम्यान बॅक्ट्रियन ग्रिक राजा मिनॅंडर किंवा बौद्ध लोक ज्यालामिलिंदम्हणत असत त्याचा मध्य आशियाई आक्रमक असणार्‍याशकलोकांनी पराभव केला. शक हासिरियनया शब्दाचा अपभ्रंश आहे. याकाळात मध्य भारतात राज्य करणार्‍या बॅक्ट्रियन ग्रिकांचे साम्राज्य उखडून शकांनी आपले बस्तान मांडले. परंतू, पश्चिमेस असणार्‍या आर्यांच्या मालव या गणराज्याने शकांना हिंदुस्थानातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरु केला. या काळात शकांचा प्रसिद्ध राजा, ज्याला ते क्षत्रप असे म्हणत तोनहापानगादीवर बसला होता. मालवगणांनी (नंतरचा माळवा हा शब्द याच मालव गणावरून प्रचलित झाला आहे) इ.स.पूर्व ५६ च्या आसपास नहापान क्षत्रपाच्या उज्जैनी उर्फउत्तमभद्रला वेढा घातला. नहपान शक हासुद्धा अत्यंत शूर होता. त्याने आपल्या राजधानीला पडलेला मालवांचा वेढा उठवून लावला. परंतू, मालव पळून गेले असे समजून नहापान मागे फिरतो न फिरतो तोच मालवांनी अत्यंत भिषण असा हल्ला चढवला आणि शकांना पळता भुई थोडी केली.या घनघोर रणसंग्रामात खुद्द नहापान ठार झाला. मालवराजांनी या विजयाच्या आनंदाप्रित्यर्थ नवा संवत्‌ अथवा नवी कालगणना सुरु केली. या सुमारास मालवांनी पाडलेल्या नाण्यांवरमालवजयःअशी अक्षरे ब्राह्मी लिपीत कोरलेली आढळतात. या नव्या संवताला मालवांनीकृतअसे म्हटले खरे, परंतू मालवांनी शकांवर मिळवलेल्या विजयाच्या प्रित्यर्थ, त्यांच्याविक्रमाप्रित्यर्थ या कालगणनेलाविक्रम संवत्‌म्हटले जाते.
          मालवगणांच्या शकांवरील या स्वारीव्यतिरीक्त आणखी एक तर्क इतिहासतज्ञांकडून मांडला जातो तो म्हणजे हा संवत्‌ शकांचा हिंदुस्थानातूनसमूळ नायनाट करणार्‍या उज्जयिनीचा गुप्तवंशिय सम्राट महाराजा विक्रमादित्याने (दुसरा चंद्रगुप्त) सुरु केला ! साधारणतः इ.स. ३८० च्या सुमारास हा चंद्रगुप्त दुसराउर्फ विक्रमादित्य गादीवर बसला. परंतू, आज प्रचलित असलेला विक्रम संवत, किंबहूना आज सुरु झालेल्या विक्रम संवत हा २०६९ असल्याने महाराजा विक्रमादित्याने हा संवत्‌ सुरु केला असे म्हणणे पूर्णतः फोल ठरते. कारण जर हा संवत विक्रमादित्याने शकांवर केलेल्या स्वारीप्रित्यर्थ असेल तर विक्रमादित्याचा काळ हा इ.स. पूर्व ५६ असायला हवा, पण तसे नाही ! शिवाय या विक्रमादित्याने सुरु केलेल्या कालगणनेचे उल्लेख एखाद्याही शिलालेखात अथवा नाण्यावर सापडत नसल्याने विक्रम संवत हामहाराजा विक्रमादित्यानेसुरु केला नाही या तर्काला पुष्टी मिळते. आजही उत्तर भारतात विक्रम संवत्‌ हीच कालगणना रुढ आहे.
          विक्रम संवताच्या सोबतच येणारे, किंबहूना दक्षिण भारतात त्याहूनही प्रसिद्ध असणारी कालगणना म्हणजेशालिवाहन शक! या शकाची उत्त्पत्तीही अंधारातच आहे. काही इतिहासकारांचे असे मत आहे की पैठणच्या शालिवाहन उर्फ सातवाहन या राजसत्तेतील गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स. ७० ते इ.स. ९५) या राजाने माळव्यातील शकांचा मोठा पराभव करून या विजयाप्रित्यर्थशालिवाहन शकसुरु केला. सातवाहन राजे हे मूळचे आंध्रप्रदेशातील होते. हिंदु-वैदिक धर्माचे कट्टर अभिमानी असणार्‍या या सातवाहनांना आंध्रभृत्य किंवागोपथ ब्राह्मण्याजातिबाह्य ब्राह्मणअशी संज्ञा आहे. इतिहासकारांच्या मते इ.स.च्या ७८ व्या वर्षी गौतमीपुत्र सातकर्णीने शक राजा रुद्रदामनचा पराभव केला आणि त्या विजयाप्रित्यर्थशालिवाहन शकसुरु केला. परंतू, ग्रिक इतिहासकार मात्र शक-क्षत्रप रुद्रदामनने सातवाहनांचा पराभव केला असे सांगत असल्यानेशालिवाहन शकाच्या उत्त्पत्तीविषयीही अजून एकमत नाही ही गोष्ट नाईलाजाने मान्य करावी लागते.
          विक्रम संवत्‌ आणि शालिवाहन शकाच्या उत्त्पत्तीविषयी संभ्रम असला तरी एका कालगणनेबद्दल मात्र आज ठामपणाने, आणि अभिमानाने सांगता येते. ती कालगणना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या शुभमुहूर्तावर सुरु केलेलाराज्याभिषेक शकहोय ! श्रीनृप शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शुक्रवार या दिवशी रायगडावर मंत्रोच्चारांच्या उद्घोषात शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला. जवळपास साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर पुन्हा हिंदूंचेस्वतंत्र सिंहासननिर्माण होत होते. या अतिशय शुभ प्रसंगाची आठवण म्हणून छत्रपती महाराजांनी नवी कालगणना सुरु करण्याचे ठरवले. फक्त, या कालगणनेतील एक लहानशी शंका अशी उद्भवते, की नवे संवत्सर नेमके कधी सुरु होते. इतर हिंदू कालगणनांमध्ये नवे संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु होते. परंतू राज्याभिषेक शक हा महाराजांच्या राज्याभिषेकापासून सुरु झाला असल्याने या शकाचे नवे संवत्सर हे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासूनधरायचे का गुढीपाडव्यापासून याबाबत आजही संभ्रम आहे. परंतू , ही एक लहानशी शंका वगळता, या कालगणनेला हिंदुस्थानच्या, किंबहूना किमान महाराष्ट्राच्या दृष्टीने तरी अनन्य साधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात आपले नाव अजरामर करण्याचा अट्टहास केला नाही. या नव्या कालगणनेलाही त्यांनी स्वतःचे नाव न देताराज्याभिषेक शकअसे संबोधले. हेच या शकाचे मूळ नाव आहे. या शकालाशिवराज्याभिषेक शक’, शिवशकअशा नावांनी ओळखले जात असले तरीही ही नावे संपूर्णतः चूकीची आहेत. अस्सल शिवकालीन पत्रांतून स्वस्तीश्री राज्याभिषेक शके...” असंच लिहीलेलं आढळतं.
          हे सारं झालं विविध कालगणनांच्या बाबतीतलं. या सर्व कालगणनांमध्ये काही गोष्टी या समान असतात. उदाहरणार्थ, संवत्सरे, वारांची नावे इत्यादी. बृहस्पती हे पुराणकाळापासून देवांचे गुरु मानले गेले आहेत. म्हणूनच, बृहस्पती अथवागुरुग्रहाला एक रास ओलांडण्यासाठी लागणार्‍या काळाला संवत्सर म्हणतात. हा काळ साधारणतः साठ वर्षांचा असतो, आणि या साठ वर्षांना साठ वेगवेगळी नावे आहेत. ती साठ संवत्सरे अशी-
          १) प्रभव, २) विभव, ३) शुक्ल, ४) प्रमोद, ५) प्रजापती, ६) अंगिरा, ७) श्रीमुख, ८) भाव, ९) युवा, १०) धाता, ११) ईश्वर, १२) बहुधान्य, १३) प्रमाथी, १४) विक्रम, १५) वृष, १६) चित्रभानू, १७) सुभानू, १८) तारण, १९) पार्थिव, २०) व्यय, २१) सर्वजित, २२) सर्वधारी, २३) विरोधी, २४) विकृती, २५) खर, २६) नंदन, २७) विजय, २८) जय, २९) मन्मथ, ३०) दुर्मुख, ३१) हेमलंबी, ३२) विलंबी, ३३) विकारी, ३४) शार्वरी, ३५) प्लव, ३६) शुभकृत, ३७) शोभन, ३८) क्रोधी, ३९) विश्वावसू, ४०) पराभव, ४१) प्लवंग, ४२) कीलक, ४३) सौम्य, ४४) साधारण, ४५) विरोधकृत, ४६) परिधावी, ४७) प्रमादी, ४८) आनंद, ४९) राक्षस, ५०) अनल, ५१) पिंगल, ५२) कालयुक्त, ५३) सिद्धार्थी, ५४) रौद्र, ५५) दुर्मती, ५६) दुंदुभी, ५७) रुधिरोद्गारी, ५८) रक्ताक्षी, ५९) क्रोधन, ६०) क्षय.
          साठावे संवत्सर संपले की पुन्हा पहिल्या संवत्सरापासून हे चक्र सुरु होते. आपल्याला सहसा पूर्वीच्या घटनांचे संवत्सर वगैरे लक्षात नसते. अशा वेळेस ते संवत्सर काढावयाचे झाल्यास त्यासाठी एक विशिष्ट गणिती पद्धत आहे. सर्व कालगणनांमध्ये आपल्याकडे शालिवाहन शक हा त्यातल्या त्यात लोकमान्य आहे. त्यामूळे, आपल्याला ज्या इसवी सनाचे संवत्सर हवे त्या सनातून ७८ वर्षे वजा करून शालिवाहन शक काढावा. यानंतर या शकामध्ये १२ मिळवावेत आणि जी बेरीज येईल तीला ६० ने भागावे. या भागाकारात जीबाकीउरते त्या बाकीचा अंक वरील साठ संवत्सरांपैकी ज्या नावाशी जोडला असेल ते आपल्याला हवे असलेल्या सनाचे संवत्सर होय. म्हणजेच, २०१२ या मागिल वर्षाचे संवत्सर काढावयाचे झाल्यास या साली शालिवाहन शक होता १९३४ (२०१२-७८). या शालिवाहन शकात १२ मिळवल्यावर बेरीज होते १९४६. आता या बेरजेला ६० ने भागले असता बाकी उरते २६. त्यामूळे या २०१२ या वर्षीच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूननंदननामसंवत्सर सुरु झाले होते. आज, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन शके १९३५ पासूनविजयनामसंवत्सर सुरु होत आहे.
          एकूणच, अशी आहे आपली पारंपारिक हिंदू कालगणना.. इतिहासातील घटनांचा मागोवा घेत असताना या कालगणना माहित असणे अत्यंत आवश्यक असते. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात या कालगणनांचा फारसा उपयोग नसला तरिही आपला एक सांस्कृतीक ठेवा म्हणून तरी या गोष्टी जपणे हे आपले कर्तव्य आहे...


- कौस्तुभ सतीश कस्तुरे
[email protected]

Newer Post Older Post Home