Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज : भाग १



          रामदास स्वामींचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर. अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी नदीच्या तीरावर असणार्‍या जांब या गावचे आणि अशाच इतर बारा गावचे कुलकर्णीपण ठोसरांच्या घराण्याकडे होते. नारायणाचा जन्म इ.स. १६०८ सालचा, सूर्याजीपंत ठोसर आणि राणूबाई यांचा हा कनिष्ठ पूत्र. सूर्याजीपंत हे थोर सूर्यभक्त, अशात घरात अध्यात्म आणि ईश्वरभक्तीचे वातावरण पूर्वीपासूनच होते, परंतू नारायणाच्या जन्मानंतर लगेचच सूर्याजीपंतांचा मृत्यू झाला. परंतू वडिल बंधू गंगाधरपंत हेदेखिल आध्यात्मिक विचारांचे असल्याने त्याचा प्रभाव साहजिकच नारायणपंतांच्या स्वभावावरही पडला. ‘शरिर हे नाशवंत आहे, परंतू आत्मा हा अविनाशी आहे. त्याच्या कल्याणासाठी आणि अंती मोक्ष प्राप्त होण्यासाठी मन निःस्वार्थी असावं लागतं’. नारायणाला लहानपणापासूनच या गोष्टींबद्दल कुतुहल वाटत असे.
पुढे धर्मशास्त्रानुसार, वयाच्या बाराव्या वर्षी लग्न करण्याची वेळ आली. परंतू नारायणाला काही लग्न करायचे नव्हते. घरातली सारी मंडळी विनवण्या करून करून थकली, पण नारायणाने मात्र ऐकले नाहीच ! शेवटी अगदी आईने शपथच घातली तेव्हा आईच्या इच्छेखातर नारायण बोहल्यावर उभा राहण्यास तयार झाला. नाशिकजवळ असणार्‍या आसनगावातच लग्न ठरले होते, मुलगीही तिथलीच ! लग्नाच्या वेळी नारायणाचे मित्र केवळ थट्टेने म्हणाले, “ नारायणां ! पहा बरं ! जरा जपूनच हं, कारण आता तुझ्या पायात बेड्या पडणार आहेत ”. आधीच नारायणाचे मन प्रपंचाचा नाद सोडून अध्यात्माकडे वळले होते, अन्‍ अशात मित्रांच्या थट्टेने ते अधिकच गंभीर बनले. आणि ऐन लग्नाच्या मंडपात, ब्राह्मणांकडून ‘सावधान’ हा शब्द कानी पडताच नारायण गळ्यातला हार तिथेच काढून लग्नमंडपातून चक्क पळून गेला, आणि मागाहून येऊन आपल्याला कोणी पकडू नये म्हणून थेट वेगाने गोदावरी नदीच्या उगमाकडे चालू लागला !
          त्या दिवसापासून बाराव्या दिवशी नारायण गोदातीरावर असणार्‍या नाशिक-पंचवटीत येऊन पोहोचला. समोर पंचवटीच्या मंदिरात श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सीतेसह शांत हसत उभे होते. अशा या रम्य वातावरणात, कदाचित नारायणाला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचा दृष्टांत झाला की काय देव जाणे, परंतू त्याने ठरवले, आजपासून राम हाच आपला पालक, तोच बंधू आणि तोच सखा ! श्रीराम हाच आपला मार्गदर्शक, स्वामी आणि त्याचा दास हनुमंत हा आपला गुरू ! अन्‌ खरोखरीच, नारायणाने त्या क्षणापासून स्वतःला रामाचा सेवक, दास म्हणवून घ्यायला सुरूवात केली ! रामाचा दास, रामदास !
          आपल्या आयुष्याच्या दुसर्‍या तपाच्या बारा वर्षात (१६२०-१६३२) रामदासांनी गोदावरीच्या पात्रात पहाटे ब्राह्ममूहूर्तावर सूर्यनारायणाला अर्घ्य देत तेरा कोटी वेळा गायत्री मंत्र म्हणण्याचा संकल्प पूर्ण केला. स्नान संध्या झाल्यानंतर भिक्षा मागून प्रथम रामचंद्राला नैवेद्य दाखवायचा आणि मगच अन्न भक्षण करावयाचे हा रामदास स्वामींचा नेम होता ! यानंतर बारा वर्षे (१६३२-१६४४) तिर्थाटन करून सबंध देशातील हलाखीची परिस्थिती समर्थांनी अनुभवली. यावेळेस, एके दिवशी हिंदुस्थानातील हलाखीची परिस्थिती पाहून समर्थांना हे जगणेच नकोसे वाटू लागले होते, परंतू आत्मार्पणाचा विचार मनात आल्या क्षणीच समर्थांनी तो दूर लोटला. जणूं काही श्रीरामचंद्रांनीच समर्थांना सावध केले,

तुम्हांसी जगोद्धार करणे आहे । तुमची तनु ते आमची तनु पाहें ।
दोनीं तपे तुमची रक्षिली ही काया । धर्मसंस्थापनेकारणे ॥

          तिर्थाटन पूर्ण झाल्यावर समर्थांनी पुनश्च पंचवटीला जाऊन नंतर सातारा प्रांतातील शहापूर, मासूर, शिरगांव, उंब्रज, शिराळे, पारगाव, माजगाव, मनपाडळे, शिंगणवाडी इत्यादी अकरा गावांत अकरा मारुतींची स्थापना केली. रामदास स्वामींची मारुती मंदिरे म्हणजे केवळ आध्यात्म नसून ती बलोपासना केंद्रे होती. या मंदिरांमध्ये मारुतीचं सतत स्मरण करून, त्याच्यासारखं शरिरबल कमवून शिवाजीराजांना म्लेंच्छांचं उच्चाटन करण्यात मदत करावी हा त्यामागचा हेतू होता. समर्थांनी आपल्या निरनिराळ्या अकराशे महंतांना अखंड हिंदुस्थानात मारुतीची उपासना आणि मठ निर्माण करण्यासाठी धाडले होते. जवळच्या महंतांनी दर तीन वर्षांनी आणि दूरच्या महंतांनी महंतांनी अकरा वर्षांच्या आत एकदातरी भेट घेतली पाहीजे असा दंडक होता. समर्थ रामदास स्वामिंचा रामदासी पंथ हा असा होता. उगाच नको तिथे ‘अहिंसा’ पाळण्याचा उपदेश त्यांनी कधिही केला नाही. दामाजीपंत ठाणेदाराला जसं सुलतानाच्या तावडीतून पंढरपूरच्या विठ्ठलाने सोडवलं तसंच तो सध्याच्या आदिलशाही आणि मोगलादी सुलतानांच्या तावडीतून महाराष्ट्राला सोडवेल, त्यासाठी वारी करा अशा आशयाचा उपदेश समर्थांनी कधिही आपल्या शिष्यांना केला नाही. ते म्हणत ‘शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होतसे ।’ म्हणजे, देव मदतीला येईल हे निश्चित ! पण त्याने स्वतः येऊन तुम्हाला मदत करावी लागणार का दरवेळेस ? देवाने तुम्हाला दोन हात दिलेत ही त्याने केलेली कृपाच आहे, तेव्हा अकलेचा वापर करून शरिरबल वाढवा आणि स्वतंत्र व्हा असा उपदेश समर्थ करत असत ! शक्तीचे महत्व पटवून देताना समर्थ म्हणतात-

शक्तीने पावती सुखे । शक्ती नसतां विटंबना ।
शक्तीने नेटका प्राणी । वैभवे भोगिता दिसे ॥
कोण पुसे अशक्ताला । रोगिसे बराडी दिसे ।
कळा नाही कांती नाही । युक्ती बुधी दुरावली ॥
साजिरी शक्ती तो काया । काया मायाची वाढवी ।
शक्ती तो सर्वही सुखें । शक्ती आनंद भोगवी ॥
सार संसार शक्तीने । शक्तीने शक्ती भोगिजे ।
शक्त तो सर्वही भोगी । शक्तीवीण दरिद्रता ॥
शक्तीने मिळती राज्ये । युक्तीने यत्न होतसे ।
शक्ती युक्ती जये ठायीं । तेथे श्रीमंत धावती ॥


          ब्राह्मणांची कर्तव्ये काय हे समर्थांनी आपल्या शिष्यांना नीट समजावून सांगितलं होतं. आपलं मन हे विकारी असतं, वाहत्या पाण्यासारखं असतं, त्यामूळे त्याला लगाम घालण्यासाठी समर्थांनी ‘मनाचे श्लोक’ अथवा ‘मनोबोध’ या स्फूट रचनांची निर्मिती केली. भिक्षा मागताना या मनोबोधातील काही विशिष्ट श्लोक म्हणून दात्यास आशिर्वाद देणे अशी समर्थांची आज्ञा होती.
समर्थांच्या रामदासी
संप्रदायाची वीस लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत-

प्रथम लिहीणे, दुसरे वाचणें । तीसरे सांगणें अर्थांतर ॥१॥
आशंकानिवृत्ती ऐसी चौथी स्थिती । पांचवी स्थिती अनुभवें ॥२॥
साहावें तें गाणें
, सातवें तें नाचणें । ताळी वाजवणें आठवें ते ॥३॥
नववां अर्थभेद
, दाहावा प्रबंध । अकरावा प्रबोध, प्रचितीसी ॥४॥
बारावे वैराग्य
, तेरावा विवेक । चौदावा तो लोक, राजी राखे ॥५॥
पंध्रावे लक्षण तें राजकारण । सोळावे तें जाण अव्यग्रता ॥६॥
प्रसंग जाणावा हा गुण सत्रावा । काळ समजावा सर्वांठायीं ॥७॥
आठ्रावे लक्षण वृत्ती उदासिन । लोलंगता जाण तेथे नाही ॥८॥
येकोणीसावे चिन्ह सर्वांसी समान । राखे समाधान ज्याचे त्याचे ॥९॥
विसावे लक्षण रामउपासना । वेध लावी जनां भक्तीरंगे ॥१०॥


          समर्थांचा मुक्काम महाबळेश्वर जवळची चंद्रगिरीची गुहा, चाफळचा मठ, शिंगणवाडीचा मठ अथवा शिवथरच्या पर्वतराजीतील वरंधा घाटातील घळीतही असे. या घळीला समर्थांनी नाव दिले होते ‘सुंदरमठ’ ! समर्थांचा मुक्काम शिवथरला असताना समर्थांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली असावी असा तर्क आहे, किंबहूना या भेटी अनेक वेळा होत असाव्यात, कारण राजगड आणि शिवथरघळ ही केवळ १० कोस म्हणजेच ३२ कि.मी च्या अंतरावर आहे. इ.स. १६५८ मध्ये शिवाजी महाराजांना प्रथम रामदास स्वामींबद्दल कळले असावे, कारण या वेळेस, खुद्द समर्थांनी त्यांचे शिष्य भास्कर गोसावी यांना राजाच्या दर्शनासाठी राजगडावर पाठवले होते. त्यावेळी, राजांनी त्यांना विचारले होते, “ तुम्ही कोठील ? कोण ? कोणां ठिकाणी असता ?”. भास्कर गोसावी म्हणाले, “आम्ही रामदासी. श्री समर्थांचे शिष्य. चाफळास हों”. राजांनी पुन्हा विचारले, “ ते (समर्थ रामदास स्वामी) कोठे राहताती ? मूळ गाव कोण?”. यावर भास्कर गोसाव्यांनी म्हटलं, “ गंगातिरी जांबचे राहणो. चाफळास मठ करून, श्री देवाची स्थापना करून, उछाव महोछाव चालू करून आम्हां सर्वांस आज्ञा की तुम्ही भिक्षा करून उछाव करीत जावा. सांगितल्यावरून आम्ही हिंडत आहो”. यानंतर महाराजांना स्वराज्यावरील सततच्या आक्रमणांमूळे सतत धावपळ करावी लागल्याने त्यांची आणि समर्थांची भेट लांबलेली दिसते. परंतू दिवाकर गोसाव्यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांनी दत्ताजीपंत मंत्र्यांना समर्थांच्या चाफळच्या राम-उत्सवासाठी प्रतिवर्षी दोनशे होन देण्याची आज्ञा केली होती. अशाचप्रकारे महाराजांनी अनेक वेळा समर्थांना वेळोवेळी मदत देऊ केली, पण समर्थांनी द्रव्यलोभापोटी ती स्विकारली नाही.समर्थप्रतापया ग्रंथात उल्लेख आला आहे, की चाफळचे देवालय बांधण्यासाठी महाराजांनी समर्थांना पैशाची मदत देऊ केली होती, परंतू समर्थांनी राजाला त्रास नको व राज्याच्या खजिन्यावर भार नको म्हणून राजांना स्पष्टपणे नको सांगितले. तो समर्थप्रतापातील श्लोक पहा :

समर्थआज्ञा पुसे शिवराजा । श्रीरघुनाथदेवालया मी बांधीना वोजा ।
समर्थ म्हणती शिष्यसमुदाय माझा । देवालयें करवीन अनंतहस्ते ॥

          चाफळच्या मठात बसूनही समर्थ जनतेची गार्‍हाणी ऐकत असत. लोकांचे दूःख त्यांना पाहवत नव्हते.


श्रीगुरुसमर्थ एकांती बैसती । प्रांतीचे लोक दर्शनासी येती ।
सकळ प्रांतीचा स्वामी परामृश घेती । चिंता करिती विश्वाची ॥
देशकाळ वर्तमाने । आपण चिंताग्रस्त होतील मनें ।
म्हणती कैसी वाचतील जनें । कैसी ब्राह्मण्ये राहतील ॥
कैसी क्षेम राहिल जगती । कैसी देवदेवालये तगती ।
कैसे कुटुंबवत्सल लोक जगती । कोणेकडे जातिल हे ॥

आणि म्हणूनच, समर्थ कायमच आपल्या शिष्यांना आणि जनतेला सांगत असत-

मुख्य हरिकथा निरुपण । दुसरे ते राजकारण ।
तिसरे ते सावधपण । सर्वांविषयी ॥

          मार्च १६७२ मध्ये समर्थ रामदास स्वामिंनी शिवाजी महाराजांना त्यांच्याच महत्कार्याचे अचूक वर्णन करणारे एक अनमोल पत्र पाठवले. ते पत्र असे-

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्वासी । तुळणा कैंची ॥
नरपती, हयपती, गजपती । गडपती, भूपती, जळपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ॥
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळांठायी ॥
धीर, उदार, गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
तीर्थक्षेत्रे मोडीली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥
देव धर्म गोब्राह्मण । करवाया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
उदंड पंडित, पुराणीक । कवीश्वर, याज्ञिक, वैदीक ।
धुर्त, तार्कीक सभानायक । तुमचें ठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहीला काही । तुम्हांकारणे ॥
आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक असती ।
धन्य धन्य तुमचीं कीर्ति । विश्वी विस्तारली ॥
कित्येक दुष्ट संहारीले । कित्येकांस धाक सुटले ।
कित्येकांस आश्रयो जाले । शिवकल्याण राजा ॥
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतू वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाहले । काय नेणो ॥
सर्वज्ञ मंड्ळी धर्ममूर्ति । काय सांगणे तुम्हांप्रती ।
परी धर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळली पाहीजे ॥
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागिले ।
प्रसंग नसतां लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥

          महाराजांना हे पत्र पाहून समर्थांसारख्या महान योग्याचे दर्शन घेण्याची अतिव इच्छा झाली. याच सुमारास चाफळच्या देवालयातील यात्रेदरम्यान सैन्यातील लोक हे यात्रेकरूंना त्रास देतात, आणि महोत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात, असे शिवाजी महाराजांना समजले. महाराजांनी ताबडतोब सातारा प्रांतातील सुभेदाराला दि. २२ जुलै १६७२ रोजी आज्ञापत्र पाठवून समर्थांच्या कार्याला उपद्रव न पोहोचण्याची खबरदारी घ्यावी अशी आज्ञा केली. ते अस्सल आज्ञापत्र असे-

या आज्ञापत्राचा देवनागरी तजुर्मा असा-
          “ मशहुरूल हजरत राजश्री गणेश गोजदेऊ सुबेदार व कारकून सुबा ता। कोल प्रति राजश्री शिव्वाजीराजे दंडवत शुहूर सन सलास सर्बैन व अलफ. कसबे चाफल तेथे रामदास गोसावी आहेती. व श्री चे देवालये केले असे (तेथे) यात्रा भरते. सर्वदा मोहोछाय चालतो. तेथे कटकीचे सिपाही व बाजे लोक राहताती. ते देवाची मर्यादा चालवित नाही. यात्रेकरू लोकांसी बलेच कलागती करून तसविस देताती म्हणून कलो आले. तरी लोकांस ताकीद करणे आणि यात्रेमधे हो अगर हमेशा कोण्हाचा उपद्रव अगर चोरचिरटियाचा दगा अगर तुरकाचा काही उपद्रव होऊ न देणे. सालाबाद यात्रा राखताती. तैसे ता।मा। (तालुके मजकूर) चे कारकून संगीनातीने यात्रा राखेत, गोसावियांचा परामर्ष करीत देवाकरीता व गोसावियांकरीता ब्राह्मण येऊनु नवी घरे करून राहताती. त्यांचा परामर्श घेत सुखरूप राहे ते यात्रा भरे मोहोछाय चाले ते करणे. तुम्हीही (**येथील मजकूराची शाई उडाल्याने वाचता येत नाही**) अंतर पडो न देणे. छ ७ रबिलाखर. मोर्तब सुद. मर्यादेयं विराजते ॥ रुजु सुरुनिविस ”

          ऑगस्ट १६७२ मध्ये चाफळच्या जवळच असणार्‍या शिंगणवाडीच्या मठात समर्थांची आणि महाराजांची भेट झाली. आणि श्री समर्थ रामदास स्वामिंनी शिवाजी महाराजांना आशिर्वाद दिला- “ तुमचा मुख्य धर्म राज्यसाधना करुनु, धर्मस्थापना व प्रजेची पीडा दूर करुनु पाळण रक्षण करावे. हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मनीं धराल ते प्रभू रघुनाथ सिद्धीस पावविल ! ” आणि यानंतर समाधानाने महाराज रायगडास परतले.
          समर्थ राज्याभिषेकाला हजर राहिले होते का नव्हते या गोष्टीचा उहापोह अधिक ठोस पुरावे मिळाल्याशिवाय करता येऊ शकत नाही परंतू महाराज समर्थांना किती मानत असत हे खुद्द महाराजांच्या समर्थांना लिहीलेल्या पत्रावरूनच सिद्ध होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून चोविसाव्या वर्षापर्यंत म्हणजेच, सलग बारा वर्षे गोदावरी नदीच्या पात्रात उभे राहून, पहाटे पहाटे गोदावरीच्या थंड पाण्यात उभे राहून सूर्यनारायणाला तेरा कोटी गायत्री मंत्राचा जप करण्याचा संकल्प समर्थांनी केला होता. समर्थही शेवटी माणूसच होते. गोदावरीच्या थंड पाण्यात उभं राहण्याचा परीणाम अखेरीस श्वसनसंस्थेच्या विकारात झाला, आणि पुढे समर्थांना दम्याचे दुखणे जडले ते कायमचेच ! ऐन राज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थांना दम्याचा त्रास जाणवू लागल्याने ते राज्याभिषेकास उपस्थित राहू शकले नाहीत.  परंतू आपल्या शिष्यांसोबत त्यांनी आशिर्वाद पाठवला ! किंबहूना, समर्थांनी शिवाजी महाराजांचे ‘निश्चयाचा महामेरू...’ असे जे सार्थ शब्दांत वर्णन केले आहे, त्यासारखं वर्णन भूषण कवी अथवा अगदीच जयरामासारखे कवी सोडले तर कोणाही कवीला आजतागायत करता आलं नाही ! अर्थात हे झाले तार्कीक स्पष्टीकरण ! शेडगावकरांचा बखरकार मात्र रामदास स्वामी राज्याभिषेकाला हजर होते असं स्पष्ट नमुद करतो, तो म्हणतो, “ ... कुल देशातूंन पादशाई मुलुखातून व थोर थोर क्षेत्रांस पत्रे पाठऊनु वैदीक व शास्त्री व वैदीक पुरुषें व थोर थोर ब्राह्मण भट भिक्षुक षड्दर्शने दशनाम मिळोन पनास हाजार याची गणना जाली. त्यास चातुर्मास ठेऊन घेऊन सीधे उलफे व मिष्टान्न भोजन देऊन सर्वांचा बंदोबस्त ठेविला. नंतर श्री रामदास स्वामी व गागाभट पंडित व प्रभाकरभट पंडित यांचे चिरंजीव बालंभट कुलगुरू व सरकारकून व उमराव व सरदार व मानकरी वगैरे मिळोन सर्व मते तख्तांस जागा पूर्वी रायेरी सोन्याची पायेरी हे नांव मोडून रायगड असे नाव ठेऊन तोच गड तख्तास व राजधानीस नेमिला. असे जाहल्यानंतर श्री रामदास स्वामी व गागाभट व थोर थोर ब्राह्मणानी सिवाजीराजे यांस अभिषेक करावा असा निश्चय केला. आणि सुदीन सुमुहुर्त शके १५९६ आनंदनाम संवतसरे फसली सन १०८४ मिती ज्येष्ठ शु॥ १३ त्रयोदसीस मंगळस्नान श्री माहादेव व भवानी कुलस्वामी व मातोश्री व श्री रामदास स्वामींस व प्रभाकरबावा याचे पुत्र बालंभट कुळगुरू व गागाभट व थोर थोर भट व सत्पुरुष या सर्वांची येथाविधी आलंकार व वस्त्रे देऊन पुजा करोन, सर्वांस नमन करोन सर्वांचे आसिरवाद घेऊन पट्टाभिषेकास बैसले... ”
          शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो, “ ... कुल आपले देशातून पन्नास सहस्र वैदिक ब्राह्मण थोर थोर क्षेत्रीहून मिळाले. तो सर्वही समुदाय (राजांनी) राहून घेतला. प्रत्यही मिष्टान्न भोजनास घालू लागले. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ मासी शुध त्रयोदसीस मुहूर्त पाहीला. ते दिवशी राजियांनी मंगलस्नाने करून श्री माहादेव व श्री भवानी कुलस्वामी, उपाध्ये प्रभाकरभटाचे पुत्र बाळंभट कुलगुरू व भट गोसावी, वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठीत यांची सर्वांची पुजा येथाविधी अलंकार वस्त्रे देऊन सर्वांस नमन करून अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके करून सुवर्ण कलशपात्री अभिषेक केला. (राज्याभिषेकास) पन्नास सहस्र ब्राह्मण वैदिक मिळाले. यावेगळे तपोनिधी व सत्पुरुष , संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी जंगम नाना जाती मिळाले.या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मर्‍हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाहला. गोष्ट सामान्य न जाहली...”  आता, सभासद हा खुद्द राज्याभिषेकासमयी तिथे उपस्थित होता यात शंका नाही, कारण ही बखर शिवकाळाशी सर्वात जवळच्या असणार्‍या कालखंडातली आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांनी कृष्णाजी अनंत हा ‘ पुरातन, राज्यातील माहितगार ’ असल्यानेच राजारामांनी त्याला आपल्या वडिलांचे चरित्र लिहावयास सांगितले. त्यामूळे याहून दुसरा मोठा पुरावा कोठेही सापडणार नाही. 

          महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि समर्थांच्या डोळ्यांसमोर सुमारे तीस-पस्तिस वर्षांचा काळ दिसू लागला. त्यावेळी समर्थ हे काशियात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण करत होते.  अशाच एके दिवशी समर्थ अयोद्धेत प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात असताना अचानक सुलतानांची धाड आली. यावेळेस दिल्लीचा सुलतान होता तैमूरलंग आणि चंगिझखान यांचा वंशज खुर्रम उर्फ शहाजहान. मंदिरे घणांच्या घावांखाली धडाधड मोडू लागली. सुंदर नक्षिकाम केलेले मिनार कोसळू लागले. देवांची आणि देवळांची विटंबना करून आणि आग लावून ते सुलतानी दंगेखोर निघून गेले. पण इकडे समर्थांच्या मनातही असाच भयंकर क्रोधाग्नी पेटलेला होता. उघड्या डोळ्यांनी प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानात असा प्रकार बघावा लागत होता. पण त्याला काही इलाजच नव्हता. त्या रात्री समर्थ निजलेले असतां त्यांना एक दिव्य स्वप्न पडले. किल्ल्यांचे महादरवाजे प्रचंड कराकरा आवाज करत उघडत आहेत, तोफा दणाणत आहेत, ढोल-ताशे, मर्फे, शिंगे-तुतार्‍या आणि अशाच अनेक रणवाद्यांचा आवाज गगनाला भिडलेला आहे. अशातच एक तेजस्वी पुरूष घोड्यावर बसलेला असून त्याच्या भवताली दुधारी तलवारी घेतलेल्या त्याच्या सेवकांचा आणि राजमंडळाचा गराडा आहे. आजूबाजूचे लोकही फार आनंदात आणि सुखात आहेत... आणि... आणि समर्थ जागे झाले. उठून पाहतात तो हे सारे स्वप्नच ! लगेच ते श्री रामाच्या मंदिरात गेले आणि डोळे मिटून ध्यान लावून बसले. त्यांची समाधी लागली आणि खुद्द प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांनी समर्थांना दृष्टांत दिला की, काळजी करू नकोस ! या सुलतानांची मदमत्त सिंहासने उखडून टाकणारा एक महापराक्रमी योद्धा लवकरच जन्म घेईल, आपल्या मायभूमीचे पांग फेडेल... त्यावेळी घडलेला हा सारा प्रकार आताही समर्थांच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला होता. समर्थांना स्वप्नात दिसलेला तो दिव्य तेजस्वी पुरूष आज प्रत्यक्षात किल्ल्यांचे दरवाजे उघडून उतरत होता. यावेळी समर्थांच्या मनीं एक दिव्य प्रतिभा झळाळून गेली. अन्‍ त्यातून शब्द उमटले ते थेट घरंगळले.. कुठे ? आनंदवनभूवनी !

स्वप्नीं जे देखिले रात्री । ते ते तैसेची होतसे
हिंडता फिरता गेलो । आनंदवनभूवनीं
स्वधर्माआड जी विघ्ने । ती ती सर्वत्र उठिली
लाटिली कुटिली देवे । दापिली कापिली बहू
विघ्नांच्या उठिल्या फौजा । भीम त्यावरी लोटला
भर्डिली चिर्डिली रागे । रडविली बडविली बळे
खौळले लोक देवाचे । मुख्य देवची उठिला
कळेना कय रे होते । आनंदवनभूवनीं
स्वर्गीची लोटली जेथे । रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही । आनंदवनभूवनीं
त्रैलोक्य चालिल्या फौजा । सौख्यबंदि विमोचने
मोहीम मांडिली मोठी । आनंदवनभूवनीं
अनेक वाजती वाद्ये । ध्वनीकल्लोळ उठिला
छबीने डोलती ढाला । आनंदवनभूवनीं
कल्पांत मांडला मोठा । म्लेंच्छदैत्य बुडावया
 कैपक्ष घेतला देवे । आनंदवनभूवनीं
बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभूवनीं
येथून वाढिला धर्मुं । रमाधर्म समगामें
संतोष मांडला मोठा । आनंदवनभूवनीं
बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छसंहार जाहला
मोडिली मांडिली क्षेत्रे । आनंदवनभूवनीं
उदंड जाहले पाणी । स्नानसंध्या करावया
जपतप अनुष्ठाने । आनंदवनभूवनीं
लिहीला प्रत्ययो आला । मोठा आनंद जाहला
चढतां वाढतां प्रेमा । आनंदवनभूवनीं
बंड पाषांड उडाले । शुद्ध अध्यात्म वाढले
राम कर्ता, राम भोक्ता । आनंदवनभूवनीं
देवालयें दिपमाळा । रंगमाळा बहुविधा
पुजिला देव देवांचा । आनंदवनभूवनीं
गीत-संगीत सामर्थ्ये । वाद्यकल्लोळ उठिला
मिळाले सर्व अर्थार्थी । आनंदवनभूवनीं
येथूनी वाचती सर्वे । ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे । आनंदवनभूवनीं

          इ.स. १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी समर्थांना महिपतगड आणि सज्जनगड या दोन किल्ल्यापैकी त्यांना आवडेल त्या किल्ल्यावर जाऊन राहण्यास विनवले. कित्येक तथाकथित इतिहासकार असा प्रचार करतात की ‘रामदासाला महाराजांनी सज्जनगडावर कैदेत डांबले होते’. पण त्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच आहे. महाराज समर्थांना कसा मान देत होते याबाबत पुढे काही पत्रे दिली आहेत, त्यांपैकी दोन पत्रे ही महिपतगड आणि सज्जनगडच्या किल्लेदारांना लिहीलेली आहेत. ही पत्रे अस्सल मोडी आहेत.




महिपतगडचा किल्लेदार दसमाजी नरसाळा याला शिवाजी महाराजांनी दि. ८ ऑगस्ट १६७६ रोजी लिहीलेले आज्ञापत्र :
          “ श्री रामदास... मशहुरूल अनाम दसमाजी नरसाला सर हवालदार माहाल ईमारती किले महिपतगड प्रती राजश्री शिवाजी राजे सुहूर सन सबा सर्बैन व अलफ श्री___गोसावी सिवतरी राहताई. सांप्रत कितेक दिवस गडावरी रहावया किलेयास येतील त्यांस जे त्यांचे लोक येतील तितकीयानसी गडावरी घेणे. घर जागा बरा करून देणे. हर येक विसी खबर घेत असत जाणे. जोवरी असतील तोवरी असतील, उतरो म्हणतील तेव्हा उतरो देणे. छ ८ जमादिलाखर परवानगी हुजूर. मोर्तब सुद. मर्यादेयं विराजते ॥ ”
 

याचप्रमाणे सज्जनगडचा किल्लेदार जिजोजी काटकर यालाही दि. ८ ऑगस्ट १६७६ रोजी शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र गेले. ते आज्ञापत्र असे :




         “ श्री रामदास... मशहुरूल अनाम राजश्री जिजोजी काटकर हवालदार व कारकून किले सजनगड प्रति राजश्री शिवाजीराजे सुहूर सन सबा सर्बैन व अलफ. श्री____गोसावी सिवतरी राहतात. सांप्रत काही दिवस गडावरी राहवया किलेयास येतील त्यांस तुम्ही गडावरी घेणे. जागा बरा करून देणे. जे लोक यांचे सेवेस बा। असतील तेदेखिल गडावरी घेणे. असतील तोवरी हरयेकविसी खबर घेत जाणे. यांचे सेवेस अंतर पडो न देणे. उतरो म्हणतील तेव्हा उतरून देणे. छ ८ जमादिलाखर. परवानग हुजूर. मोर्तब सुद. मर्यादेयं विराजते ॥ ”

या दोन्ही पत्रांवर महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांचा “ श्री शिवराजेंद्र हर्षनिधान ॥ त्र्यंबकसूत मोरेश्वर मुख्य प्रधान ” हा शिक्का आहे.
          सज्जनगडावर रहायला गेल्यावर शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची भेट झाली असणारच नक्की, हनुमंताच्या बखरीत महाराज गडावर येऊन समर्थांचा परामर्ष घेत असत आणि त्यांच्याशी निरनिराळ्या प्रकारच्या चर्चा करत असत असे नमुद केले आहे. यानंतर १५ सप्टेंबर १६७८ रोजी शिवाजी महाराजांनी समर्थांना लिहीलेले पत्र असे आहे-


          “ श्रीसद्‍गुरूवर्य श्रीसकलतिर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज स्वामींचे सेवेसी चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावर मस्तक ठेऊनु विज्ञापना जे, मजवर कृपा करुनु सनाथ केले, आज्ञा केली की, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव-ब्राह्मणांची सेवा, प्रजेचीं पीडा दूर करुन पाळणरक्षण करावे, हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मनीं धराल ते श्री रघुनाथ सिद्धीस पावविल. त्याजवरून जो जो उद्योग केला, व दुष्ट क तुरुक लोकांचा नाश करावा, विपूल द्रव्य करूनु राज्यपरंपरा आक्षई चालेल ऐशी स्थळें दुर्घट करावीं, ऐसें जें जें मनीं धरीलें तें तें स्वामिंनी आशिर्वादप्रतापे मनोरथ पूर्ण केले. याऊपरी राज्य सर्व संपादीले, तें चरणीं अर्पण करुनू सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला. तेव्हां आज्ञा झाली की, तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले, तेच करावे, तीच सेवा होय, ऐसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावे, श्री रघुनाथाची स्थापना कोठेतरी होऊनु सांप्रदाय, सिष्य व भक्ति दिगंत विस्तिर्ण घडावी, यैसी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगिव्हरी वास करुनु चाफळी श्री रघुनाथाची स्थापना करुनु सांप्रदाय सिष्य दिगंत विस्तिर्णता घडली. त्यास चाफळी श्री रघुनाथाची पुजा मोहोछाव, ब्राह्म‌णभोजन, अतिथी ईमारत सर्व यथासांग घडावे. जेथें जेथें श्री रघुनाथाच्या मूर्तीस्थापना जाहली तेथे उछाव पुजा घडावी, यांस राज्य संपादिले. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावीं ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा झाली की, विशेष उपाधीचे कारण कायतथापी तुमचे मनीं श्री रघुनाथाची सेवा घडावी हा निश्चय झाला. त्यास येथाअवकाश जेथे जे नेमावेसें वाटेल तें नेमावे व पुढे संप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तसे करीत जावें. याप्रकारे आज्ञा जाहली. यावरुनु देशांतरी सांप्रदाय व श्री रघुनाथाच्या स्थापना जाहल्या, त्यास ग्रामभूमिची पत्रे करुन पाठविली. श्री रघुनाथ संनिध चाफळी येकशे येकविस गावीं आकरा बिघे प्रमाणे भूमी व आकरा स्थळीं श्री हनुमंताची स्थापना जाहली. तेथे नैवेद्य पुजेस भूमी आकरा बिघे प्रमाणे नेमिले आहेती, ऐसा संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेण्याविषयी विनंती केली, तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहली. त्याजवरून सांप्रत गावं व भूमी नेमिले. तपशील....

(येथे ३३ गावे, ४१९ बिघे जमिन, एक कुरण व १२१ खंडी धान्य यांचा तपशील दिला आहे.)

येकूण दरोबस्त सर्वमान्या गाऊ तेहेत्तीस व जमिन बिघे गाऊगना चारशे येकोणीस व कुर्ण येक, व गला खंडी एकशेएकविस श्रीचे पुजाउछाहाबदल संकल्पातील सांप्रत नेमिले व उछाहाचे दिवसास व ईमारतीस नख्ती यैवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. यीणेकरोन आक्षई उछाहादी चालविण्याविषयी आज्ञा असावी. राज्याभिषेक ५, कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे, आश्विन शुद्ध १० दशमी, बहुत काय लिहीणे हे विज्ञापना !    ( मोर्तब : मर्यादेयं विराजते )

          समर्थ रामदास स्वामींविषयी काही समाजद्रोही मंडळी अनेक गैरसमज पसरवत आहेत. असाच एक अपप्रचार सुरू आहे तो म्हणजे समर्थांनी आयुष्यभर केवळ ब्राह्मणांचेच हीत बघितले, बाकीच्या समाजाला त्यांनी दूर ठेवले. समर्थ सनातनी होते आणि त्यांनी केवळ ब्राह्मणांनाच आपले शिष्य करून घेतले.. अशा प्रकारच्या आरोप करणार्‍यांची बुद्धी नेमकी किती ते मोजता येणार नाही, परंतू समर्थांचा पुढील टीकापर उपदेश पाहीला तर समर्त्थ आपल्याला नक्की समजून येतील. ब्राह्मणांच्या मूर्खपणाविषयी आणि त्यांच्या ढोंगी गुरुस्थानाविषयी समर्थ म्हणतात-

ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।
गुरुत्त्व सांडुन झाले । शिष्य शिष्यांचे ॥
कित्येक दावलमलकास जाती । कित्येक पीरास भजती ।
कित्येक तुरुक होती । आपले ईच्छेने ॥
गुरुत्त्व आले नीच याती । किती एक वाढली महती ।
शुद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥
हे ब्राह्मणांस कळेना । त्यांची वृत्तीच कळेना ।
मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥
राज्य नेले म्लेंच्छक्षेत्री । गुरुत्त्व आले कुपात्री ।
आपण अरत्री ना परत्री । काहीच नाही ॥

या टीकापर स्फूट रचनेतून समर्थांनी ब्राह्मणांच्या मूर्खपणावर कडकडीत आसूड ओढला आहे...
          एकूणच, समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचे संबंध कसे होते हे समजावून सांगण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे. या सार्‍या अस्सल दस्तावेजावरून ते नक्कीच समजून येतील अशी आशा आहे. महाराष्ट्राच्या तनामनात स्वाभिमानाचं चैतन्य निर्माण करणारा हा राजाही एकच आणि महाराष्ट्राला ‘महाराष्ट्रधर्माची’ शिकवण देणारा हा महान कर्मयोगीही एकच ! ‘यैसा पुनश्च नच होणे !’.......

* वरील पहिल्या ३ पत्रांची छायाचित्रे सौ. अनुराधाबाई कुलकर्णींच्या 'शिवछत्रपतींची पत्रे' मधून तर चाफळ सनद ही सज्जनगडावरून छायांकित करण्यात आली आहे.



संदर्भ : अपरिचित शिवशाही : © कौस्तुभ कस्तुरे    ।    [email protected]