Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज : भाग २

चाफळकर रामदासींची कैफियत

     श्री रामदास स्वामी, तर्फ चाफळ
     पूर्वी कसबे जांब, परगणे आंबड, ईलाखा मोंगलाई, येथील कुळकर्णी सूर्याजी त्रिंबक आडनाव ठोसर म्हणून असून त्यांनी श्री सूर्यनारायणाची आराधना केली. त्याजवरून त्यांजला श्री सूर्यनारायण यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन, मनुष्यदेशाने मी एक, व दुसरे मारुती याप्रमाणे तुझे पोटी जन्मास येऊ म्हणून वरप्रदान दिल्हे. पुढे सूर्यनारायणाचे अंशे करून गंगाधर उर्फ रामी रामदास एक व दुसरे मारुतीचे अंशेकरून नारायण उर्फ रामदासस्वामी म्हणून दोन पुत्र झाले. त्यापैकी वडिल पुत्र गंगाधरबावा उर्फ रामीरामदास हे कसबे जांब येथील संस्थानी तसेच राहिले व दुसरे नारायणबावा उर्फ रामदासस्वामी हे महान पराक्रमी सत्पुरुष होते.
ते लग्न न करीता ब्रह्मचारी आश्रमाने असोन त्यांनीनरदेह धारण केला. सबब तपश्चर्या केल्यावरून त्यांस श्री रामचंद्रजी देव साक्षात येऊन, मंत्रोपदेश देऊन, रामदासी सांप्रदाय दिल्हा; व आपले शिष्य असे त्यांजला समजूनरामदासम्हणून नाव ठेऊन देव अदृश्य जाहले. पुढे रामदासस्वामी हे संचार करीत करीत कसबे चाफळ तालुके तारगाव येथे येऊन त्यांनी कसबे चाफळ व किल्ले सज्जनगड येथे श्री रामचंद्रजी व मारुतीच्या मूर्ति स्थापन केल्यानंतर त्यांचे शिष्य शिवाजी महाराज यांनी स्वपराक्रम करून गुरुकृपेने राज्य मिळविले. ते राज्य श्री रामदासस्वामी आपले गुरु म्हणोन संपूर्ण राज्य स्वामींस अर्पण केले. तेव्हा स्वामींनी “आम्हांस विशेष उपाधीचे कारण नाही, म्हणून सदरहू राज्य पाळणार्थ राजास दिल्हे. तत्रापी तुमचे मनात श्री रामचंद्रदेवाची व मारुतिची सेवा घडावी अशी इच्छा असेल तर काही गाव व भूमि नेमावी म्हणोन आज्ञा दिल्यावरून शिवाजी महाराज यांनी इनामगाव व गावगन्ना इनामजमिनी, व नक्तनेमणूका वगैरे उत्पन्न राज्याभिषेक शके ५ कालयुक्ताक्षीनाम संवत्सरे आश्विन शु॥ १० ची सनद करून दिल्ही. त्याप्रमाणे कसबे चाफळ व सज्जनगड येथील देवाचे हरदो संस्थानास खर्च होत असून नंतर सदरहू रामदासस्वामी हे शके १६०३ दुर्मतीनाम संवत्सरात किल्ले सज्जनगड उर्फ परळी येथे समाधिस्थ जाहले. पुढे सदरहू संस्थानची व्यवस्था स्वामींचे शिष्यांपैकी अकाबाई वगैरे मंडळी यांनी शके १६३१ पर्यंत करून, सदर अकाबाई यांचा वृद्धापकाळ झाल्यामूळे अकाबाईंनी स्वामींची आज्ञा, आमचे बंधूचे नातू, गंगाधरबावा याजला आणून संस्थानचा बंदोबस्त ठेवावा, असा मजकूर शाहू महाराज यांजला सांगितला. नंतर शाहू महाराज यांनी शके १६३२ साली सदर गंगाधरबावा हे गृहस्थाश्रमी असून मोंगलाईत कसबे जांब परगणे आंबड येथील संस्थानातून आणवून चाफळ व सज्जनगड येथील संस्थानची व्यवस्था पाहण्यास स्थापना केल्यापासून आजपर्यंत गृहस्थाश्रमीच असून वंशविस्तारे वहिवाट करीत आहो.

सनद :  
श्री
     श्रीसद्‍गुरूवर्य श्रीसकलतिर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज स्वामींचे सेवेसी चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावर मस्तक ठेऊनु विज्ञापना जे, मजवर कृपा करुनु सनाथ केले, आज्ञा केली की, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुनु, धर्मस्थापना, देव-ब्राह्मणांची सेवा, प्रजेचीं पीडा दूर करुन पाळणरक्षण करावे, हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा. तुम्ही जे मनीं धराल ते श्री रघुनाथ सिद्धीस पावविल. त्याजवरून जो जो उद्योग केला, व दुष्ट क तुरुक लोकांचा नाश करावा, विपूल द्रव्य करूनु राज्यपरंपरा आक्षई चालेल ऐशी स्थळें दुर्घट करावीं, ऐसें जें जें मनीं धरीलें तें तें स्वामिंनी आशिर्वादप्रतापे मनोरथ पूर्ण केले. याऊपरी राज्य सर्व संपादीले, तें चरणीं अर्पण करुनू सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला. तेव्हां आज्ञा झाली की, तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले, तेच करावे, तीच सेवा होय, ऐसे आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावे, श्री रघुनाथाची स्थापना कोठेतरी होऊनु सांप्रदाय, सिष्य व भक्ति दिगंत विस्तिर्ण घडावी, यैसी प्रार्थना केली. तेही आसमंतात गिरीगिव्हरी वास करुनु चाफळी श्री रघुनाथाची स्थापना करुनु सांप्रदाय सिष्य दिगंत विस्तिर्णता घडली. त्यास चाफळी श्री रघुनाथाची पुजा मोहोछाव, ब्राह्म‌णभोजन, अतिथी ईमारत सर्व यथासांग घडावे. जेथें जेथें श्री रघुनाथाच्या मूर्तीस्थापना जाहली तेथे उछाव पुजा घडावी, यांस राज्य संपादिले. यातील ग्रामभूमी कोठे काय नेमावीं ते आज्ञा व्हावी. तेव्हा आज्ञा झाली की, विशेष उपाधीचे कारण कायतथापी तुमचे मनीं श्री रघुनाथाची सेवा घडावी हा निश्चय झाला. त्यास येथाअवकाश जेथे जे नेमावेसें वाटेल तें नेमावे व पुढे संप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तसे करीत जावें. याप्रकारे आज्ञा जाहली. यावरुनु देशांतरी सांप्रदाय व श्री रघुनाथाच्या स्थापना जाहल्या, त्यास ग्रामभूमिची पत्रे करुन पाठविली. श्री रघुनाथ संनिध चाफळी येकशे येकविस गावीं आकरा बिघे प्रमाणे भूमी व आकरा स्थळीं श्री हनुमंताची स्थापना जाहली. तेथे नैवेद्य पुजेस भूमी आकरा बिघे प्रमाणे नेमिले आहेती, ऐसा संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेण्याविषयी विनंती केली, तेव्हा संकल्प केला तो परंपरेने सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहली. त्याजवरून सांप्रत गावं व भूमी नेमिले. तपशील....
(येथे ३३ गावे, ४१९ बिघे जमिन, एक कुरण व १२१ खंडी धान्य यांचा तपशील दिला आहे.)
येकूण दरोबस्त सर्वमान्या गाऊ तेहेत्तीस व जमिन बिघे गाऊगना चारशे येकोणीस व कुर्ण येक, व गला खंडी एकशेएकविस श्रीचे पुजाउछाहाबदल संकल्पातील सांप्रत नेमिले व उछाहाचे दिवसास व ईमारतीस नख्ती यैवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. यीणेकरोन आक्षई उछाहादी चालविण्याविषयी आज्ञा असावी. राज्याभिषेक ५, कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे, आश्विन शुद्ध १० दशमी, बहुत काय लिहीणे हे विज्ञापना !   
( मोर्तब : मर्यादेयं विराजते )

अस्सल सनदेचे छायाचित्र :



संदर्भ : कैफियत यादी वगैरे - संपादक : ग.चि. वाड, पु.वि. मावजी, द.ब. पारसनिस..

© kaustubh kasture   |   [email protected]



Newer Post Older Post Home