Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

"पेशवाई", म्हणजे नेमके काय ?

पेशवाई ! पेशवाई म्हणजे महाराष्‍ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपानच जणू.. पण आज पेशवाई म्हटलं की अनेकांच्या मनात जळजळ उठते की 'मराठा राज्य' असताना 'पेशवाई' का म्हणावे आम्ही वेगळे ? अनेकदा काही पढतमूर्ख म्हणतात की 'मराठ्यांचे राज्य' बळकावून 'पेशवे' सत्ताधिश झाले म्हणून पेशवाई ! हे आणि असे अनेक..

हे सारे गैरसमज आहेत, काही अजाणता, माहितीअभावी पसरले गेले तर काही समाजकंटकांनी मुद्दाम "ब्राह्मणद्वेषाने" पसरवले. "पेशवाई" हे एका कालखंडाला दिलेले विशेषण आहे. इ.स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि मराठी राज्य हे 'अधिकृत' झाले. सभासद म्हणतो, "मर्‍हाटा राजा छत्रपती जाला, गोष्ट सामान्य न जाहली !". पण शंभूराजांच्या दूर्दैवी पाण तरिही मराठेशाहीला अभिमानास्पद हौतात्म्यानंतर मराठी राज्यातील सूसुत्रता नाहिशी झाली आणि १७०७ मध्ये शाहूराजांच्या आगमनापर्यंत मराठी राज्य आपले अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीत होते. अशातच छत्रपती शंभूपुत्र शाहूमहाराजांचे आगमन झाले आणि १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद मिळाले. १७१३ पासून मराठी राज्य हे "प्रतिपच्चंद्रलेखे" सारखे "वर्धिष्णुर्विश्ववंद्य" होत गेले आणि शाहूछत्रपतींचा बाळाजीपंतांनंतर त्यांचे पुत्र बाजीरावसाहेब आणि पौत्र नानासाहेब यांच्या कर्तृत्वावर आणि योग्यतेवर विश्वास बसला. यामूळेच 'राज्‍य चालवाल' असा भरवसा वाटल्याने शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूपत्रानुसार राज्याची अखात्यारी पेशव्यांकडे दिली. इथपासून पुढे मराठ्यांची कागदोपत्री राजधानी 'सातारा' असली तरी 'राज्यकाराभाराची राजधानी' पुणे (शनिवारवाडा') बनली.

पेशव्यांच्या वाढत्या पराक्रमामूळे, चढत्या यशामूळे आणि कीर्तिमूळे बखरकारांच्या लेखणीतून, शाहीरांच्या कवनांतून, पोवाड्यांतून त्यांची कीर्त दवण्यासारखी घमघमू लागली, आणि मराठी बखरकारांनी, शकावलीकारांनी, शाहीरांनी मराठेशाहीच्या या कालखंडाला एक विशेषण बहाल केले ते म्हणजे "पेशवाई" !!

पेशवे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत, तसे अनेक उल्लेख सापडतात. त्यामूळे 'ब्राह्मण' पेशव्यांनी 'मराठा' राज्य बळकावले इत्यादी बिनबूडाचे आरोप करणार्‍यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. असे असते तर नानासाहेबांनी "आम्ही गनिमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो" असे निजामाला ठणकावून सांगितलेच नसते. पेशव्यांनी कधीही 'हा ब्राह्मण, हा मराठा, हा अमुक, हा तमुक' असला भेद केला नाही. एका समकालीन पत्रात म्हटलंय, "खावंदांचे (पेशव्यांचे) घरी सर्व लहान मोठे आहेत. बरे-वाईट आहेत. परंतू आपपरत्वे जातीचा अभिमान काही एक नसावा. सर्वही खावंदांची लेकरे. आम्ही सेवक हे जाणतो की, देशस्थ, कोंकणस्थ, कर्‍हाडे, प्रभू, शेणवी, मराठे इत्यादी सर्व स्वामींचे. स्वामी इतक्यांचे मायबाप. चाकारी मात्र सर्वांनी दौलतीची करावी. जातीभेद अभिमान नसावे"..

असो. इतक्यावरून तरी सर्वांचा गैरसमज दूर होईल अशी आशा आहे. बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे ही विज्ञापना.. लेखनावधी ॥




© कौस्तुभ कस्तुरे । [email protected]