Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

भीमा कोरेगाव : विजयाची कहाणी



दि. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळ कोरेगाव येथे झालेल्या तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धातील एका चकमकीत इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला खरा, पण इंग्रजांनी “झाकली मूठ सव्वा लाखाची” या उक्तीनुसार जगासमोर आम्ही जिंकलो अशी हूल उठवली आणि त्यातही, इथल्या जाती-पातींमध्ये भांडणे लावून द्यायलामहार रेजिमेंटविरुद्धपेशवावगैरे किनार या वादाला मुद्दाम जोडून दिली. वास्तविक पाहता, तत्कालीन पुरावे अभ्यासल्यास, या युद्धात इंग्रजी फौजांची अक्षरशः लांडगेतोड मराठी फौजांनी केली असून या फौजांच्या मदतीला येणार्‍या दुसर्‍या इंग्रजी फौजांनाही सतावून सोडले होते हे आपल्याला सहज लक्षात येईल. काय आहे ही कोरेगावची मराठ्यांना अभिमानास्पद असलेली लढाई ?



येरवड्याच्या लढाईनंतर दुसरे बाजीरावसाहेब एकदम दक्षिणेकडे वळले आणि त्यांनी वर्तुळाकार पलायन सुरु केले. इंग्रजांना बाजीरावपळत आहेतअसे वाटणे स्वाभाविक होते, पण हागनिमीकावाकाही इंग्रजांच्या लक्षात आला नाही, आणि आला तेव्हा मात्र बराच उशीर झालेला होता. येरवड्यानंतर मराठी फौजा या पुरंदर-माहुली करत पुसेसावळीला येऊन पोहोचल्या. माहुलीला पेशव्यांना सरलष्कर अप्पा देसाई निपाणकर येऊन मिळाले. पुसेसावाळीहून मिरजमार्गे बाजीराव दक्षिणेकडे न जाता थेट पूर्वेकडे पंढरपूरच्या रोखाने वळले. इंग्रजांच्या फौजा, अजूनही बाजीराव दक्षिणेच्या रोखाने जात आहेत असे वाटून पुसेसावळीत आल्या तेव्हा त्यांना बाजीरावांनी आपल्याला चकवले हे त्यांच्या ध्यानात आले. पुढे या इंग्रजी फौजा पंढरपुरच्या रोखाने येत असताना सेनापती बापू गोखल्यांच्या सैन्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. बाजीरावसाहेब पुढे येथून नगर जिल्ह्यातील पीरगाव आणि तेथून नाशिकच्या दिशेने वळले. बाजीरावसाहेबांच्या या हालचाली इतक्या जलदगतीने केलेल्या आहेत की इंग्रजी फौजांना आता बाजीरावांचा पाठलाग करणे अशक्य होऊ लागले. मराठयांचा “गनिमीकावा” काय असतो याची ब्रिगेडीअर जनरल स्मिथला खात्री पटून तो मोठा तोफखाना सोबत नेण्यामूळे कंटाळला आणि नाशिककडे जाण्याचा नाद सोडून तो शिरूरला पोहोचला. तेथे त्याने आपला तोफखाना मागे ठेवून सड्या फौजेनिशी प्रवरा नदीच्या काठी संगमनेरला येऊन पोहोचला. 



आतापर्यंत स्मिथची अशी समजूत होती की बाजीराव नाशिकला गेले आहेत. पण संगमनेरवरून बाजीरावसाहेब त्रिंबकजी डेंगळ्यांच्या सोबत थेट डाविकडे वळून ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून थेट पुण्याकडे वळले हे ऐकताच स्मिथ अगदी रडकुंडीला आला. बाजीराव स्मिथला झुकांड्या देत दि. ३० डिसेंबर १८१७ रोजी पुण्याजवळ चाकण येथे जाऊन पोहोचले. येथून पुणे आता अगदी जवळ, म्हणजे जेमतेम आठ कोस (साधारणतः २५ किमी) होते. १८ नोव्हेंबरला पुणे सोडल्यापासून सुमारे दीड महिन्याच्या अवधीत पुरंदर, सालप्याचा घाट, माहुली, पुसेसावळी, मिरज, पंढरपूर, पीरगाव, संगमनेर, ओझर, जुन्नर, खेड आणि चाकण करत बाजीराव पुन्हा पुण्याजवळच आले आणि आपल्याला गोल फिरवून दमण्याचा बाजीरावांचा “गनिमीकावा” इंग्रजांच्या चांगलाच लक्षात आला. गेल्या दीड महिन्यात दहा-बारा ठिकाणच्या  मुक्कामात आणि सुमारे दोनशे कोसांच्या प्रवासात स्मिथला बाजीरावांचे नखही दिसले नाही, यावरूनच या सार्‍या रणनीतीचे यश स्पष्ट होते. ही तर इंग्रजांना नामुष्कीची गोष्ट होतीच, पण त्याहूनही नामुष्कीची गोष्ट असही, की ज्या पेशव्यांना इंग्रजांनी पुण्यातून पळवून लावले असा डंका ते पिटत होते ते पेशवे इंग्रजांनाच मूर्खात काढून अगदी सहज दीड महिन्यात पुन्हा फिरून पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले होते. म्हणजे गोर्‍यांचा सारा खटाटोप गेला की फुकटच. दीड महिना इंग्रजी सैन्य बाजीराव हाती लागतील या आशेने उगाच रानोमाळ फिरत राहीले. बाजीरावांनी या सगळ्या खेळात एक अशी चाल खेळली होती की सैन्याच्या मागे लहान तुकड्या इंग्रजांच्या नजरेस पडतील अशा पद्धतीने मुद्दाम रेंगाळत राहत, आणि बाजीराव गेले त्याच्या नेमक्या उलट्या दिशेने हळूहळू सरकत. साहजिक, इंग्रजांना बाजीरावही याच वाटेने पुढे गेले आहेत असे वाटे आणि दुसर्‍या वाटेने पेशवे बरेच पुढे गेले याची खात्री पटताच मागे असणार्‍या या तुकड्या जंगलात हळूच काढता पाय घेत. मग मात्र इंग्रज सेनाधिकारी विचार करण्या शिवाय काहीकरू शकत नसत. 
 
बाजीराव चाकणला पोहोचले तेव्हा कर्नल बर या नावाचा अधिकारी पुण्याच्या इंग्रजी तुकडीचा प्रमुख होता. त्याने स्मिथचा पत्ता नाही आणि बाजीराव तर आता केव्हाही पुण्यावर हल्ला चढवू शकतात हे पाहताच काहीतरी मदत मिळावी असं म्हणून शिरूरला कॅप्टन स्टाँटनकडे मदत मागितली. शिरूरच्या, पाचशे बंदुका, दोन तोफांसह पंचवीस गोरे गोलंदाज, आणि तीनशे मराठी लोक असणार्‍या या पलटणीला “सेकंड ग्रेनेडीअर अथवा सेकंड बटालिअन” असे म्हणत. बरचा निरोप आल्यावर स्टाँटन ३१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता शिरूरहून निघाला आणि दि. १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी १० वाजता कोरेगाव नजिकच्या एका टेकडीवर जाऊन पोहोचला. अर्थात, आपण आत्ता पुणे घेतले तर पुन्हा अडकू हे माहित असल्याने बाजीरावांनी पुण्याला वळसा घालून येणार्‍या स्टाँटनला मराठी हिसका दाखवत, वाट मोकळी करून पुन्हा दक्षिणेकडे जाण्याचे ठरवले. स्टाँटनला याची काहीच खबरबात नव्हती. १ तारखेला सकाळी तो टेकडीवरून खाली पाहतो तर भीमा नदीच्या खोर्‍यात त्याला पेशव्यांची प्रचंड फौज दिसली. एवढ्या मोठ्या सैन्यापासून आता आपला काही बचाव होत नाही हे पाहताच स्टाँटन आपली पलटण घेऊन जवळच असणार्‍या कोरेगावात शिरला. इंग्रज गावात शिरत आहे हे पाहताच त्यांना मारण्यासाठी आणि मुख्यतः त्यांची गळचेपी करण्यासाठी मराठी फौजेच्या एका तुकडीनेही इंग्रजांवर चालून घेतले. कोरेगावला चारही बाजूंना तटबंदी होती. येथेजास्त वेळ काढणे उपयोगी नाही म्हणून केवळ तीन हजारांची एक तुकडी मागे ठेवून पेशवे सोलापूरच्या रोखाने निघून गेले.


 
इंग्रज रात्रभरच्या प्रवासाने दमलेले होते, अशातच सकाळी सकाळी युद्धाचा प्रसंग उभा ठाकला. इंग्रजी तोफा आधी भीमेच्या रोखाने वाळवंटात उभ्या होत्या पण मराठे दुसर्‍याच्य बाजूने हल्ला  करू लागले हे पाहताच इंग्रजांनी नाईलाजाने त्या तोफा तटबंदीच्या आत घेतल्या आणि मार्‍याच्या ठिकाणी बसवल्या. इंग्रजांचे पाणी मराठ्यांनी तोडले होते. भीमेवर मराठी चौक्या बसल्या असल्याने इंग्रजी सैन्याला पाण्याची वानवा होती. अशातच, पेशव्यांच्या फौजेतील अरबांनी इंग्रजांवर चालून घेतले आणि त्यांची एक तोफ बंद पाडली. या तोफेवरील इंग्रज अधिकारी लेफ्टनंट चिशोम याला ठार मारण्यात आले आणि विजयाप्रित्यर्थ त्याचे मस्तक पेशव्यांकडे पाठवण्यात आले. इंग्रजांकडील लेफ्टनंट स्वाँस्टन, लेफ्टनंट कोनलन आणि असिस्टंट सार्जंट विंगेट यांना जबरदस्त जखमा झाल्या. विंगेटला गावातील एका धर्मशाळेत हलवण्यात आले असता अचानक मराठी फौजांनी ती धर्मशाळा काबिज केली आणि विंगेटलाही ठार केले. एवढ्यात इतर काही इंग्रज अधिकारी तेथे आल्याने बाकीचे दोघे अधिकारी वाचले आणि मराठ्यांनी तेथून काढता पाय घेतला. याशिवाय गावात एक मोठी मजबूत गढी होती. इंग्रजांची नजर तीच्यावर पडण्याआधीच मराठी फौजांनी ती गढी काबीज केली. आता येथून इंग्रजी फौजांना मारणे चांगलेच शक्य होते. मराठे मोक्याच्या जागी पोहोचले हे पाहताच इंग्रजांची पाचावर धारण बसली. 


इकडे रात्र झाली आणि दिवसभरात पेशवे लांबच्या मजला मारत खूप पुढे निघूलन गेले हे पाहताच मराठी फौजांनी आपले काम झाले असे समजून हळूच काढता पाय घेण्याचे ठरवले, कारण पुन्हा स्मिथच्या फौजा कोरेगावनजिक आल्या तर आपण आतच अडकू त्यामूळे तसंही इंग्रज मोडले आहेत, येथून गेलेले बरे असा विचार करून मराठी फौजा रात्री नऊच्या सुमारास गावातून बाहेर पडल्या आणि त्या भीमा ओलांडून गेल्याची खात्री होताच इंग्रजी पलटण चक्क भीमेकडे पाण्यासाठी धावत सुटली. दिवसभर मराठ्यांनी इंग्रजांचे पाणी तोडले होते. अशा रीतीने कॅप्टन स्टाँटनचा पूर्ण पराभव करून मराठी फौजा लोणीमुक्कामी आल्या. इकडे स्टाँटनची मराठ्यांनी ही गत केली हे स्मिथला आणि बरला माहीतही नव्हते. संगमनेरहून निघाल्यानंतर ओझरच्या घाटात त्रिंबकजी डेंगळ्यांच्या माणसांनी स्मिथची अक्षरशः लांडगेतोड करवली होती आणि तो कसाबसा दि. २ जानेवारी रोजी चाकणला येऊन पोहोचला. स्टाँटनचाही पूर्ण पराभव झाल्याने तो पुण्याला बरच्या मदतीला जाणे शक्यच नव्हते, म्हणून तो २ जानेवारी रोजी रात्री पुन्हा शिरूरला निघाला. या लढाईत इंग्रजांकडील तीनशे तर मराठी फौजेतील सुमारे पाचशे लोक पडले, पण यातही इंग्रजांचे २ नामांकीत सरदार मारले गेले. समकालीन इंग्रज अधिकारी आणि पुढे सातार्‍याचा रेसिडेंट ग्रँट डफ इंग्रजांच्या झालेल्या नुकसानीबद्दल म्हणतो, “त्या लढाईत इंग्लिशांचे मेले व जखमी मिळून एकशे छप्पन शिपाई व वीस गोरे गोलंदाज पडले. इतके होऊन तो उरातून दोन गोळ्या पार झालेला पॅटीसन साहेब आपल्या तळाअवर पोहोचल्यानंतर मेला. त्याशिवाय दुसरे दोघे साहेब त्या लढाईत मृत्यू पावले व दोन जखमी झाले. आणि नवे ठेवलेले मराठे तीनशे त्यापैकी दीडशे उरले वरकड काही मेले व कित्येक जखमी झाले व काही पळाले. मराठ्यांचे सुमारे पाच साहाशे पडले”


रियासतकार गो. स. सरदेसाईंनी पेशवे दफ्तर खंड ४१ कोरेगावसंबंधी काही बातमीपत्रे प्रसिद्ध केली आहे. त्यातील मजकूर असा- “१ स्वारी श्रीमंत माहाराजाची (पेशव्यांची‌) राजेवाडी जेजुरीनजिक आहे तेथे आली. चाकणचे ठाणे राजश्री त्र्यंबकजी डेंगले यांणी घेतले. ताम्रमुख (इंग्रज) यांजकडील आत लोक होते ते कापून काढिले. स्वारी ब्राह्मणवाड्याचे घाटातून निघोन फुलगाव आपटीचा मु॥ आहे. नंतर गुरुवारी कूच होऊन फुलगावापुढे तीन कोश कोरेगाव आहे तेथे फौजा गेल्या, तो तेथे इंग्रजांकडील दीड पलटण व तोफा आल्या. नंतर त्याणी तोफ डागली. तेव्हा सरकारफौजेनी चालून घेतले. ते गावात सिरले. फौजाही बेलासिक गावात सिरून दीड पलटण व तीनशे तुरुप स्वार कापून काढीले. त्यात जो खासा होता त्याचे डोसके मारीले”. दुसर्‍या बातमीपत्रात “गोखले, रास्ते वगैरे पायउतारा होऊन पारपत्य केले. त्याजपैकी येक तोफ व दोनशे लोक कोरेगावचे वाड्यात सिरले ते मात्र राहीले. येक तोफ व येक पलटण कापून काढिले”. यानंतर इंग्रज जवळपास बुडाल्यात जमा आहेत हे पाहताच मराठी फौजा मागे फिरल्या. 


इंग्रजांनी मात्र या वेळी पेशवा घाबरून पळाला अशी फुशारकी मारली, पण मूळात पेशव्यांनी दक्षिणेचा मार्ग मोकळा होण्यासाठी इंग्रजांना कोरेगावात डांबून ठेवण्याची ही युक्ती केली होती हे काही त्या बिचार्‍यांना समजले नाही. गोखल्यांच्या कैफियतीत बाजीरावसाहेब बापू गोखल्यांना स्पष्ट म्हणतात, “आज लढाई करून मार्ग काढावा”.ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतलेअसं स्पष्ट नमूद आहे. 


एकूणच, इंग्रजांचे सुमारे पावणे तीनशेच्या आसपास लोक पडले आणि मराठ्यांचे पाचशेच्या आसपास पडले. कोरेगावात मराठी फौजांचा निःसंशय विजय झाला, पण नंतरच्या काळात, योगायोगाने पेशव्यांचा पाडाव झाल्याने इंग्रजांनी खुशालआमचाच जय झालाअशी थाप ठोकून दिली. १८२२ मध्ये मराठी राज्य बुडाल्यानंतर इंग्रजांनी भीमेच्या काठावर चक्क विजयस्तंभ उभारला अन्‌ त्यावर लिहीले, One of the proudest triumphs of the british army in the east ! म्हणजेगीरे तो भी टांग उपरयातली गत ही. शिवरामपंत परांजपे यांनी चपखल शब्दातमराठ्यांच्या लढायांचा इतिहासमध्ये याचे वर्षन केले आहे- “ब्रिटीश सैन्य इतक्या धाडधडीत रीतिने येथे नामोहरम झाले असताना देखिल अतिशय गर्व वहाण्यासारखा हा विजय होता, असे म्हणून इंग्लिशांकडून जयस्तंभ उभारीले जातात, यावरून पूर्वीचे खोटे इतिहास कसे बनविण्यात आले आहेत, त्याच्याबद्दलची कल्पना कोणालाही येण्यासारखी आहे !”


इंग्रजांनी उभारलेल्या विजयस्तंभावरील इंग्रजी आणि मराठी मजकुरातही प्रचंड तफावत आहे. इंग्रजी मजकुरातून त्यांची परिस्थिती वास्तविक किती बिकट होती हे उघड उघड दिसते, पण मराठी मजकुरात इथल्या लोकांना सहज वाचता येईल म्हणून शक्य तितके आपल्या बाजूने लिहीण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रथम इंग्रजी मजकूराचा मराठी सारांश पाहूया- 



“मुंबईकडील शिपायांच्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍या कॅप्टन स्टाँटन यांच्यतर्फे हा स्तंभ कोरेगावच्या रक्षणाचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे, जे १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्वोत्तम आणि रक्तपिपासू अशा संपूर्ण लष्कराकडून घेरले गेले होते. कॅप्टन स्टाँटन – अतिशय धक्कादायक परिस्थिती, असाध्य विरोध आणि अजिंक्य मनोवृत्तीच्या शिपायांचे अनुमोदन, आणि शत्रूकडील अस्वस्थता यांमूळे पूर्वेकडील ब्रिटीश सैन्याने अभिमानास्पद सफलता प्राप्त केली. या शूर सैन्याची आठवण चिरस्थायी करण्यासाठी हा त्यांच्या खंबीरपणाचा गौरव आहे. इंग्रज सरकारने त्यांच्या शिपायांची आणि मारल्या गेलेल्या इतरांची, तसेच जखमी झालेल्यांची नावे सदर स्मारकावर लिहीण्याचे निर्देश दिले आहेत”. याखाली “सीम्प्सन अ‍ॅँड कर्नल लेवलीन स्कॉट, कलकत्ता” असे लिहीले आहे. 

आता याच स्तंभावरील मराठी मजकूर पाहू- 



“कप्तान स्थान्तनसाहेबाच्या स्वाधीन मुंबई सर्कार्च्या पळटणचे लोक ५०० व स्वार २५० व तोफखान्याचीं मनुष्ये २५ व तोफा २ होत्या त्याजवर सन इसवी १८१८ ज्यानेवारी तारीख १ शके १७३९ मार्गशीर्ष वद्य ९ गुरुवार ते दिवसी कोरेगावच्या मुकामी पेशव्यांच्या सारे फौजेने चालन येऊन घेरा दिला आणि आरब व दुसरे निवडक लोक पेशव्यांचे यांनी मोठ्या चढायावर चढाया केल्या अस्तां पेशव्यांच्या फौजेचा मोड करून इंग्रेजी लोकांनी जय मेळविला. ही कीर्ती राहावी म्हणून हा जयस्तंभ उभारीला आहे. यावर या वीरांचा पराक्रम व सर्कार्चाकरी विषई प्राणास उदार जाले हा लोकीक बहुत काळ राहावा यास्तव त्यांच्या पळटणाचीं व लढाईत पडले व जखमी जाहाले यांची नावे इंग्रेजी सर्कार्ची आज्ञा होऊन या जयस्तंभावर दुसर्‍या अंगास लिहीली आहेत. सन इसवी १८२२, शके १७४३”

समकालीन मराठी साधने जे सांगतात त्याच्या नेमके उलटे चित्र इंग्रजांनी चार वर्षानंतर, जेव्हा त्यांना अडवायला येथे कोणीही नव्हते तेव्हा उभारले आहे. अर्थात, साधा प्रश्न एवढाच, की स्टाँटनचा जर इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे विजय झाला असता तर तो हात हलवत शिरूरला का परतला ? तो ना बरच्या मदतीला गेला ना पेशव्यांच्या पाठलागावर गेला. असो, बहुत काय लिहीणे ? आपल्याच जातीजातींमध्ये फूट पाडण्याची ही नीति आम्हांला तेव्हा तरी कळली नाही.

कारण, इंग्रजांनी जेव्हा पेशव्यांना बंडखोर ठरवले आणि राज्य घेतले तेव्हा इथल्या लोकांच्या मनातूनपेशव्यांचीप्रतिमा जोवर मलिन होत नाही तोवर आपल्याला सुरळीत राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना पक्के समजून चूकले होते. बंडखोर ठरवूनही आणि पेशवे पदावरून दूर करवूनही बाजीराव चार महिने इंग्रजांशी लढत होते आणि माल्कम त्यांच्या पाठलागावर जंगल तुडवत होता यातच इंग्रजांना पेशव्यांची किती धास्ती होती हे समजून येते. म्हणूनच, ३जून १८१८ ला बाजीरावांकडून शरणागती लिहून घेतल्यावर माल्कमने त्यांना शक्य तितके महाराष्ट्रापासून दूर ठेवले, जेणेकरून इथे राहून पुन्हा उठाव होऊ नयेत. यासोबतच इथाल्या माणसांच्या मनातब्राह्मण-अब्राह्मणहा संघर्ष पेटवून इंग्रजांनी ब्राह्मणेतर समाजाच्या मनात पेशव्यांविषयी विष पेरले आणि त्याकरीता मुद्दाम पेशवाईत ब्राह्मणेतरांवर किती अन्याय झाला अशा अर्थाने कथा पसरवून दिल्या. इंग्रजी अमदानीत ब्राह्मणांकडून काही ठिकाणी अत्याचार झाले हे उघड आणि सर्वज्ञात आहेच, किंबहुना म्हणूनच डॉ. आंबेडकर, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा समाजसुधारकांना वर्णवर्चस्वतेविरुद्ध झगडावे लागले, पण म्हणून हे सारे पेशवाईपासून सुरु आहे हा समज पूर्ण निराधार आहे.

दि. ५ जून १९३६ च्या “केसरी”मध्ये इतिहास संशोधक यशवंत नरसिंह केळकर (साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे पुत्र) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्यापेशवाईत प्रत्येक अस्पृश्याने आपल्या गळ्यात अथवा मनगटावर काळा गंडा आपल्या अस्पृश्यतेची निशाणी दर्शविण्याकरीता लावलाच पाहिजे असही सक्ती होती, शिवाय प्रत्येक अस्पृश्याने गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधून फिरावे असा कायदा होताया आरोपांना पुरावे देण्याबद्दल विचारले असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ६ जुलै १९३६ रोजी केसरीतच पत्रोत्तर देऊन “ही वयोवृद्ध लोकांकडून ऐकलेली दंतकथा असून लिखित पुरावा नसल्याचे” मान्य केले. अर्थात, बाबासाहेबांनी हे उत्तर देण्यापूर्वी जवळपास सव्वाशे वर्षे इंग्रजांनी इथल्या लोकांच्या मनात फूट पाडण्यासाठी जातियवादाची बिजे रोवली होती, त्यामूळे नंतरच्या पिढ्यानपिढ्या इंग्रजांनी पसरवलेल्या या गैरसमजुतींना खर्‍या मानू लागल्या. पेशवे दफ्तरात आजवर हजारोंच्या संख्येने कागदपत्रे प्रसिद्ध झाली असून एकाही कागदात अशा हीन दर्जाच्या आरोपांना पुरावे सापडले नाहीत. “पेशवेकालीन सामाजिक आणि आर्थिक इतिहास” यावार भारत इतिहास संशोधक मंडळाने एक विशेष त्रैमासिकच प्रसिद्ध केले आहे. पण तरिही इंग्रजांनी पसरवलेल्या या विषवल्लीचा परीणाम मात्र ब्राह्मण आणि बहुजन या दोघांवरही इतका झाला की एकेकाळी एकमेकांच्या साथीने, विचाराने काम करणारे, लढणारे हे दोन समुह एकमेकांचा न भूतो न भविष्यती दुस्वास करू लागले. यात दोन्हीही समाजांचे आजवर नुकसानकच झाले. पण इंग्रजी राज्य जाऊन, आज इतकी ऐतिहेसिक साधने उपलब्ध असतानाही या दोन्हीही समाजांना हे समजू नये का ? किमान आतातरी हे सगळे गैरसमज दूर करून ही जातियता संपेल अशी अपेक्षा करावी काय ? दुर्दैवाने आपण अजूनही परकीयांच्याच बोलण्यावर-लिहिण्यावर विश्वास ठेवत आपल्याच लोकांवर सूड उगवत आहोत. अगत्य असु द्यावे. 





© Kaustubh Kasture