Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

बखरीतील गोष्टी, भाग ४ : बचेंगे तो और भी लढेंगे

जनकोजी शिंदे निशाणापाशी घोड्यावर बसून लढत निशाण सांभाळण्याची पराकाष्ठा करत होते. इतक्यात एकाएकी जनकोजींच्या उजव्या दंडाला कुठूनतरी सुसाट आलेली गोळी लागली, त्या गोळीने जनकोजींच्या हातचे हाड बाहेर आले आणि त्या आघाताने मुर्च्छित होऊन जनकोजी घोड्यावरून कोसळले. 


जनकोजींच्या जवळच लढत असलेल्या खिजमतागाराला हे दिसलं आणि तो घाबरा होऊन तडक दत्ताजी शिंद्यांपाशी येऊन म्हणाला, “सरदार, बाबासाहेब गोळी लागून पडले !” दत्ताजी शिंद्यांचे अवसानच गळाले, त्यांना या बातमीने वाटलं की जनकोजी शिंदे मृत्यू पावले. जनकोजी म्हणजे दत्ताजीबाबांचा पुतण्या, तोच पडला ! आता काय करावं ? दत्ताजी भान हरपून एकदम आपल्या सवंगड्यांकडे बघत गर्जले, “बाबा आम्हांस सोडून गेला. आता मी कोणाला काय तोंड दाखवू ? रणात मृत्यू आला तर उत्तमच आहे, पण नाहीच आला तर विष खाऊन प्राण द्यावा लागेल मला !” असं म्हणत दहा हजार दुराणी फौजेवर दत्ताजी चालून गेले. आता ? बाकीच्यांनीही विचार केला अन हल्ल्यातून वाचलेल्या केवळ सतरा जणांनी दत्ताजींसोबत दौडत जाऊन त्या दुराणी फौजेवर स्वत:ला अक्षरशः झोकून दिले.

त्या अठरा जणांची घोडी दुराणी फौजेला भिडतात न भिडतात तोच दुराण्यांच्या बंदुकांनी अचूक वेध घेऊन अकरा मराठी स्वार ठार केले. उरलेले सात जण तसेच बाणासारखे त्या बर्कंदाजांच्या दिशेने घुसले. त्यांच्यातील यशवंतराव जगदाळे थोराळेकर हे गोळी लागून पडले असताना त्यांचा भाऊ पिराजी जगदाळेही तिथेच होता, त्यांनी यशवंतरावांचा खाली पडलेला देह आपल्या घोडयावर ओढण्याचा प्रयत्न केला. दत्ताजी शिंदे आपल्यालालमणीघोड्यावर बसले होते, त्यांनी घोड्याचा लगाम ओढून तोंड फिरवले आणि ते पिराजींना “ओढा, ओढा” असं म्हणत असतानाच एकाएकी एक गोळी दत्ताजींच्या बगलेला लागून थेट बरगडीत शिरली. दत्ताजी घोड्यावरून खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या तानाजी खराडे, राजाराम चोपदार आणि राघोबा शेणवी पागनीस यांनी विचार केला, “आपण इतके दिवस दत्ताजींचं अन्न खाल्लं. जे काही दुखाचे दिवस पाहिले ते यांच्यामूळेच. आता अशा कठिण प्रसंगी यांना टाकून जावं ? छे ! असं करण्यापेक्षा मरण परवडलं !”. हे तिघेही एकीकडे तलवारी चालवत घोड्यावरून उतरले, आणि घायाळ असलेल्या दत्ताजींना उचलण्याचा प्रयत्न केला. पण आजूबाजूने इतके दुराणी सैन्य अंगावर येत होतं की या तिघांनाही क्षणाक्षणाला मरण दिसत होतं.

इतक्यात नजिबखान रोहिल्याचा गुरु, कुतुबशाह अंबारित बसून पुढे आला. कुतुबशाहाला पाहून राघोबा पागनिसांनी राजाराम चोपदारांना म्हटलं, “तुम्ही तडक असेच कुतुबशाहाकडे जा आणि त्याला सांगा की दत्ताजी शिंदे घायाळ झाले आहेत, तुम्ही याचा बचाव करावा, इथे अबदाली आला तर तो हरामखोर आमची डोकी मारेल, त्यापेक्षा जिवंत पाडाव झाले असं समाधान करून घ्यावे”. राजाराम चोपदार येणारे घाव अडवत अडवत कुतुबशाहाच्या अंबारीकडे  निघाले. यापुर्वीही दत्ताजींकडून अनेकदा उत्तरेतील राजकारणासंबंधाने पूर्वी राजारामांचे आणि कुतुबशाहाचे संबंध आले असावेत. राजाराम चोपदारांना पाहून कुतुबशाहा म्हणाला, “राजाराम आप इधर कहाँ ?”. राजारामांनीही खरं खरं सांगितलं, “साहेब ! पटेल घायल पडे हुएँ है ! इन्हे बचाईएँ !!”. दत्ताजी जखमी होऊन कोसळले आहेत असं ऐकताच कुतुबशाहाला असुरी आनंद झाला. तो मनातून बाहेर न दाखवता त्याने राजारामांना सरळ विचारलं, “पटेल कहाँ है ? हमें दिखलाव !”. राजारामांना वाटलं कुतुबशाह जुनी ओळख पाहून दत्ताजींचा जीव वाचवेल. कुतुबशाह अंबारीतून उतरून दत्ताजी शिंदे उताणे जमिनीवर पडले होते तेथे आला. स्वतः कुतुबशाह चालत येतोय म्हटल्यावर दुराणी फौजेने आत्तापर्यंत वाढवलेली मारगिरी आता आटोपती घेतली होती. कुतुबशाहाने जवळ येऊन दत्ताजींकडे बघत विचारलं, “पटेल, हमारे साथ तुम और लडोगे ?”. कुतुबशाहाच्या बोलण्यातली खोच दत्ताजींना त्या परिस्थितीतही लगेच जाणवली. कुतुबशाह आपल्याला काही जिवंत सोडत नाही हे दत्ताजी पुरते उमजून चुकले. त्यांनी जिव एकवटून मोठ्या करारी आवाजात कुतुबशाहाला करडा जवाब दिला, “इन्शाल्लाह !! बचेंगे तो और भी लढेंगे !!!”. कुतुबशाहाची अटकळ होती दत्ताजी आपल्या प्राणांची याचना करतील पण दत्ताजींचे हे बोल ऐकून कुतुबशाह रागाने लालबुंद झाला. त्याने लाथेने दत्ताजींना ढकलून पुन्हा पालथे केले आणि कमरेचा सुरा काढून दत्ताजी शिंद्यांचा शिरच्छेद केला. राघोबा, राजाराम यांनी खुप विनवण्या केल्या, “एक करोड रुपये देतो” असं सांगितलं पण झालेल्या अपमानाने कुतुबशाह खवळला आणि त्याने दत्ताजींना मारून, शीर कापून भाल्यास टोचून शाहजणं वाजवली.


इतिहासदृष्ट्या काही महत्वाचं :- पंजाबातून आलेल्या अब्दालीला अडवण्याकरीता दत्ताजी आणि जनकोजी शिंदे निघाले खरे, पण यमुना मराठी फौजेला उतार देतच नव्हती. यमुनेचा उतार शोधत दत्ताजी आपल्या फौजेसह जात असता अब्दालीला एके ठिकाणी यमुनेला उतार सापडून त्याने अचानक दत्ताजी शिंद्यांवर हल्ला चढवला. अर्थात, दत्ताजींच्या या बलिदानाने पानिपतच्या तिसर्‍या अन शेवटच्या मोहीमेस प्रारंभ झाला. दत्ताजी शिंद्यांना गोळी कुठे लागली हा एक प्रश्न गोंधळात टाकणारा आहे. राजवाडे खंड १ लेखांक १६५ मध्ये गोळी मानेत लागली असं दिलं आहे. पण एकंदरीतच बखरीतील हा मजकूर त्यावेळची भयाण परिस्थिती जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी करतो.

स्रोत : भाऊसाहेबांची बखर


Newer Post Older Post Home