Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

बखरीतील गोष्टी, भाग ५ : सुरतपाक बाजीराव

बाजीराव पेशवे निजामाच्या भेटीस गेले असता निजामाच्या जनानखान्यात, म्हणजे त्याच्या राणीवशात बातमी पसरली की, “बाजीराव आले आहेत ! ते फार देखणे, सुरतपाक आहेत !”. हे समजल्यानंतर निजामाच्या सगळ्याच बेगमांनी बाजीरावांना पाहण्याचा एकदम हट्ट धरला. वास्तविक निजाम मनातून चरफडला, पण सगळ्याच बेगमांची ही मागणी त्याला धुडकावून लावता आली नाही. त्याने आणखी एक विचार केला, की दख्खन सुभा आपला, पण हा पेशवा हळूहळू आपल्याला डोईजड होतो आहे, तेव्हा त्याला बोलावून दग्याने पकडावं ! 


एकंदरीतच असा विचार करून निजामाने बाजीरावांच्या छावणीत वकीलामार्फत निरोप पाठवला, “पेशवासाहेब ! तुम्हांला मेजवानी द्यावी असं आमच्या फार मनात आहे, आपण कृपा करून आमच्या येथे औरंगाबादेत येण्याची मेहेरबानी करावी !”. अर्थात, बाजीराव निजामाला पक्के ओळखून होते. औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला हा मीर कमरुद्दीन उर्फ चिनक्लिचखान म्हणजे दुसरा औरंगजेब होता ! बाजीरावांनी वकीलाचं बोलणं ऐकून त्याला स्पष्ट सांगितलं, “आम्ही शहरात येणार नाही ! बाहेर कुठेही भेटीची जागा केल्यास तिथे येऊ, त्यानंतरच नबाबांची आणि आमची भेट होईल”. वकील पुन्हा निजामाकडे जाऊन त्याने हा सगळा मजकूर नबाबाला समजावला. निजामाला वास्तविक शहरात बोलवून बाजीरावांना घेरायचे होते, पण इलाज नव्हता. अखेर त्याने बाजीरावांकडे निरोप पाठवला, “शहराबाहेर सातारे मुक्कामी आपण भेटीस यावे, तेथेच मेजवानी करू !”. सातारा हे औरंगाबादनजिकचे एक गाव होते. बाजीरावांनी हे कबूल केल्यानंतर निजामाने ठरलेल्या ठिकाणी मेजवानी आणि भेटीसाठी खास शामियाना उभारला.

सगळी तयारी झाल्यावर निजामाने बाजीरावांना कळवलं, की “आपण सडे, म्हणजे एकटे, केवळ पाच खिजमतगारांसह, म्हणजे पाच सेवकांसह यावे”. श्रीमंतांनी या गोष्टीला होकार दिला. निजामाने भेटीची तयारी फारच खास केली होती. खास डेरे-शामियाने उभारून, त्यात बिछायत म्हणजे बसण्याची उत्तम जागा करून, त्या सभोवती चिकाची बाडे चिरुन, अर्थात बांबूची साल वापरून केलेले अर्धपारदर्शक पडदे लावून त्या आड निजामाचा सारा जनानखाना बसण्याची व्यवस्था केलेली होती. त्यानुसार सारा जनानखाना आधीपासूनच येऊन बसला.

बाजीराव खासे भेटीच्या मुक्कामापासून एक कोसांवर सारी फौज ठेवून केवळ पाच घोडेस्वारांनिशी निघाले. ते डेर्‍याजवळ आलेले पाहताचनबाब स्वतः उठून डेर्‍याच्या बाहेर येऊन बाजीरावांना आत घेऊन गेले आणि बिछायतीवर जाऊन बसले. निजामाचा सारा जनानखाना बाजीरावांना भरल्या डोळ्यांनी पाहत होता. एवढा खुबसुरत मोहरा पाहून निजामाच्या बेगमा बाजीरावांच्या सुंदरतेवर भाळल्या आणि त्यांनी दोन पायली मोती बाजीरावांवर चक्क उधळले ! हे होत असताना निजामाचा काय जळफळाट झाला असेल याचा विचार न केल्यास बरा ! हे घडताच निजाम तत्क्षणी बाजीरावांना म्हणाला, “पेशवाबहादूर ! आता कसं ! आता तुम्ही आमच्या हातात सपडलात ! तुमचे ते खास शिंदे-होळकर, अन बाकीचे कुठे आहेत ? आता आम्ही तुम्हाला इथे दगा केला तर कोण वाचवेल तुम्हाला ?”. यावर बाजीराव एकदम शांतपणे उत्तरले, “मी जिथे असतो तिथेच माझ्याजवळ सगळे असतात !”. हे ऐकून निजाम गोंधळला, तो अधिरतेने म्हणाला, “कुठे आहेत ?”. यावर हसत हसत बाजीरावांनी आपल्यासोबत असलेल्या पाच खिजमतगारांची ओळख करून दिली. ते पाच जण म्हणजे शिंदे-होळकरांसहित बाजीरावांची खास माणसं होती. त्यावेळी निजाम वरमला. तो खुल्या दिलाने बाजीरावांना म्हणाला, “आम्ही या वेळी तुम्हाला दगा करणार नाही, या वेळी आम्हाला तुमची गरज आहे. पण यापुढे असा आंधळा विश्वास ठेवून भेटीस जाऊ नये”. असं म्हणून शेवटी निजाम म्हणाला, “एक बाजी, बाकी सब पाजी !”. त्यावर क्षणाचाही वेळ न दवडता बाजीराव निजामाला म्हणाले, “एक निजाम, बाकी सब हजाम !”. 

यानंतर निजामाने बाजीरावसाहेबांना वस्त्रे, अलंकार, जवाहिर वगैरे देऊन, सोबत असलेल्या शिंदे-होळकरादी लोकांनाही पोषाख दिले. नंतर बाजीराव पेशवे आपल्या छावणीत येऊन दाखल झाले.इतिहासदृष्ट्या काही महत्वाचं :- हा प्रसंग पेशव्यांचा बखरकार कृष्णाजी विनायक सोहनी यानी १७२१च्या आसपासचा दाखवला आहे. बखरीतील औरंगाबादच्या उल्लेखानुसार ही भेट १७२८ ची असू शकते. तर या प्रसंगाच्या आधी पेशव्यांनी निजामाकडे केलेल्या पैशाच्या मागणीवरून ग्रँट डफ १७३२ सालची भेट असल्याचं म्हणतो. एकंदर, सालनिश्चिती करणे कठिण असले तरी ही भेट झाली, आणि वरचा प्रसंग घडला असं मात्र एकंदरीत खरं मानता येतं.

स्रोत : पेशव्यांची बखर


©कौस्तुभ कस्तुरे