Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

रामचंद्रपंतांच्या "आज्ञापत्रातील" गडकोट !

गडकोट म्हणजे काय ? छत्रपती शिवाजी महाराजांपासून "अमात्य"पदी असलेल्या रामचंद्रपंतांनी आपल्या "आज्ञापत्र" या अमूल्य ग्रंथात काय म्हटलंय पहा. रामचंद्रपंतांचे हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचीच नीती आहे. पंत स्वतः महाराजांच्या हाताखाली तयार झालेले. आज्ञापत्रात पुढील उल्लेख पाहिल्यावर 'गड-कोटाचे' महत्व लक्षात येते. 








----------------------------------------------------

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ! दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उध्वंस होतो. देश उध्वंस जाल्यावरी राज्य यैसे कोण्हास म्हणावे ? याकरिता पूर्वी जे जे राजे जाले त्याणी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तरी तीर्थस्वरूप थोरले कैलासवासी स्वामींनी (छत्रपती शिवाजी महाराजांनी) गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश्य न होय त्या त्या देशी स्थलविशेष पाहोन गड बांधिले, तैसीच जलदुर्ग बांधिली. त्यांवरून आक्रम करीत करीत साल्हेरी अहिवंतापासोन कावेरीपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. अवरंगजेबासारिखा महान (मोठा, प्रबळ) शत्रू चालोन येऊन विजापूर भागानगर सारखी महासंस्थाने आक्रमिली. संपूर्ण तीस बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यासी अतिशय केला. त्याचे यत्नास असाध्य काय होते ? परंतु राज्यात किल्ले होते म्हणोन अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला.

याउपरही ज्यास राज्यसंरक्षण करणे, आहे त्यापेक्षा अधिकोत्तर साधणे त्याणें स्वतः गडकोटांची उपेक्षा न करीता, परम सावधपणे, असतील गडकिल्ले त्यांची यथोक्त मजबुती करावी. नूतन देश गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरदेपासून पुढे जबरदस्तीने स्थळे बांधून, बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळाचे आश्रयी सेना ठेऊन त्यापुढील देश स्वशासनवश्य करावा. यैसे करीत करीत राज्य वाढवावे. गडकोटांचा आश्रय नसतां फौजेच्यानें परमुलकी टिकाव धरून राहवत नाही. इतकीयांचे कारण ते गडकोट म्हणजे खजिना ! गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ ! गडकोट राज्यलक्ष्मी ! गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण ! यैसे पूर्ण चित्तांत आणून कोण्हाचे भरवसियांवर न जाता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधणे याचा हव्यास स्वतःच करावा. कोण्हाचा विश्वास मानू नये ! 

------------------------------------------------------

वर दिलेले छायाचित्र हे संबंधित मजकूरचे, मूळ आज्ञापत्राच्या एका मोडी प्रतीतील आहे. 

- कौस्तुभ कस्तुरे