Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

छत्रपती शिवाजी महाराजां व्यतिरिक्त शिवाजी नाव असलेल्या व्यक्ती

शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ‘शिवाजी’ हे नाव प्रचलित नव्हते, वा कोणाचेही ठेवलेले आढळत नाही, महाराजांच्या जन्मानंतरही केवळ ठराविक समाजाच्या लोकांनी हे नाव ठेवले वा ठराविक समाजाच्या लोकांनी हे नाव कधिच ठेवले नाही, वगैरे अनेक गैरसमज अजाणता वा अनेकदा मुद्दाम पसरवले जातात. गेल्या काही दिवसांतही अशा प्रकारच्या पोस्ट्स-कमेंट्स आढळल्या, म्हणून सदर पोस्ट लिहीत आहे.. पुढे आपल्याला शिवपूर्वकालीन, शिवकालीन तसेच पेशवेकालीन वेगवेगळ्या समाजगटांमध्ये “शिवाजी” नाव ठेवले जाई हे दिसून येते. पुढील उल्लेखांत महाराजांच्या जन्मापूर्वीचेही उल्लेख आपल्याला सापडतील. सदर पोस्टमध्ये पुस्तकाचे नाव, लेखांक आणि वर्ष दिले आहे, त्यामूळे कोणीही व्यक्ती हे तपासू शकते..


१) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ (नवीन खंड १) लेखांक १६१ मध्ये “शिवाजी बिन जैताजी मोकदम” म्हणजे पाटील हे नाव आले आहे. हे पत्र पेशवेकालीन असले तरी त्यातील शिवाजी पाटील हा माणूस निळो सोनदेव आणि आबाजी सोनदेव यांच्या काळातील म्हणजे शिवकाळातील आहे.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ (नवीन खंड १) लेखांक १८३ मध्ये इ.स. १७४८ च्या एका पत्रात “शिवाजीपंत” हे नाव आले आहे.

३) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५ (नवीन खंड २) लेखांक १२ मध्ये “शिवाजी नाईक” हे नाव आले आहे, सदर पत्र इ.स. १६८५ चे म्हणजे शिवकालीन आहे.

४) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २१ (नवीन खंड ५) लेखांक १०४ मध्ये “शिवाजी केशव” हे नाव आले आहे. सदर पत्र इ.स. १७१८ चे म्हणजे पेशवेकालीन आहे.

५) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (नवीन खंड ८) लेखांक १६० मध्ये “शिवजीपंत” हे नाव आले असून पत्र पेशवाईतील इ.स. १७५१ चे आहे.

६) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (नवीन खंड ८) लेखांक ११० मध्ये “शिवाजी हरी” हे नाव आले असून तुळाजी आंग्र्यांचा उल्लेख असल्याने पत्र पेशवाईतील आहे.

७) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (नवीन खंड ८) लेखांक ६ मध्ये “शिवाजी शंकर” हे नाव आले असून ब्रह्मेंद्रस्वामींचे असल्याने सदर पत्र पेशवाईतील आहे.

८) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक २६६ मध्ये “शिवाजीपंत किटो” हे नाव दोन व्यक्तींचे (पूर्वज-वंशज) आहे. हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे आहेत !

९) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक २८७ मध्ये “शिवाजी बापुजी” हे नाव आले असून सदर कजिया इ.स. १७३८ मधील असला तरिही हे नाव “पूर्वी होवून गेलेल्या माणसाचे” आहे, म्हणजे हा माणूस शिवकालीन आहे असं म्हणायला हरकत नाही.
\
१०) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक १७६ मध्ये पेशवेकालीन एका जोशीपणाच्या कजियात “सिवजी चांभार”, “सिवाजी बिन दत्ताजी कासार मेहतर” आणि “सिवजी बिन लखमाजी” ही नावे आलेली आहेत.

११) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक ४४ मध्ये “सिवाजी वलद तुकोजी जगताप” आणि “सिवाजी वलद जाऊजी” ही नावे आली आहेत. सदर महजर इ.स. १७२२ चा आहे.

१२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक २२७ मध्ये “सिवजी पडील मोकदम” हे नाव आले असून हे पत्र इ.स. १६१७ म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही पूर्वीचे आहे.

१३) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक ८७ मध्ये “सिवाजी बिन आकोजी पाटणा” हे नाव आलेले असून हे पत्र इ.स. १६४७ म्हणजे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीतील आहे.

१४) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक २४७ मध्ये “सिवाजी महादजी गोसावी मोरगावकर” हा उल्लेख असून पत्र इ.स. १६७९ चे आहे. लेखांक २४९ मध्येही “सिवाजीगोसावी मोरेश्वरकर” हा उल्लेख आला आहे. दोन्हीही पत्रे शिवकालीन आहेत.

१५) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक २४८ मध्ये “सिवाजी गोसावी वलद गणेशभट” हा उल्लेख असून पत्र इ.स. १६८२ चे म्हणजे शिवकालीन आहे.

१६) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (नवीन खंड ४) लेखांक २५ मध्ये “सिवाजी सेडगे” हे नाव आले असून पत्र इ.स. १६८७ चे म्हणजे शिवकालीन आहे.

१७) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८ (नवीन खंड   ) लेखांक ३९ मध्ये “सिवाजी मुद्गल पुरंधरे” हे नाव आले असून पत्र इ.स. १६९७ चे म्हणजे शिवकालीन आहे.

१८) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८ (नवीन खंड   ) लेखांक २३ मध्ये “सिवाजी कुलकर्णी” हे नाव आले असून पत्र राघो बल्लाळ अत्रे, मोरोपंत पेशवे यांचे उल्लेख असल्याने शिवकालीन आहे.

१९) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १८ (नवीन खंड   ) लेखांक ७ मध्ये “सिवाजी भोईटे” हे नाव आले असून पत्र इ.स. १६३९ चे म्हणजे शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या काळातील आहे.

२०) शिवचरित्र साहित्य खंड १, लेखांक ४४ मध्ये “सिवाजी वैद” हे नाव आले आहे.

२१) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ९५९ मध्ये इ.स. १७१० च्या कागदात “सिवाजी महाजन” हे नाव आहे.

२२) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ८४१ च्या कागदात “सिवाजी बावाजी अत्रे” आणि “सिवाजी गोविंद अत्रे” ही नावे आहेत.

२३) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ९५८ मध्ये इ.स. १६८८ च्या कागदात “सिवाजी नारायण देसापांडिये”, “सिवाजीबिन परसोजी चौगुला” तसेच “सिवाजी कोनेर देसकुलकर्णी” ही नावे आहेत.

२४) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ७८८ मध्ये इ.स. १६७१ च्या कागदात “सिवाजी गोपाल” आणि “सिवाजी जेधे” ही नावे आहेत.

२५) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ८४३ मध्ये इ.स. १६८५ च्या कागदात “सिवाजी जाधव” हे नाव आहे.

२६) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ७९० मध्ये इ.स. १६१४ च्या कागदात “सिवाजी त्रिमल” हे नाव आले आहे. हे पत्र शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे आहे.

२७) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ९५८ मध्ये इ.स. १६८८ च्या कागदात “सिवाजी बाबदेऊ देसपांडिये” हे नाव आलेले आहे. हा कागद शिवकालीन आहे.

२८) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ९५६ मध्ये इ.स. १७१० च्या कागदात “सिवाजी माहाजन” हे नाव आहे.

२९) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ९३२ मध्ये इ.स. १६७३ च्या कागदात “सिवाजी यमाजी सटवे” हे नाव आले असून कागद शिवकालीन आहे.

३०) शिवचरित्र साहित्य खंड ५, लेखांक ८३४ मध्ये इ.स. १६९५ च्या कागदात “शामजी वलद सिवाजी देसपांडिये” हे नाव आले आहे, तसेच याच कागदात “सिवाजी येकनाथ” हे सुद्धा नाव आलेले आहे.

३१) शिवचरित्र साहित्य खंड ८, लेखांक ५ मध्ये इ.स. १५३२ च्या कागदात “सिवजी गाडवे” हे नाव आले आहे, सदर कागद तर शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ९८ वर्षे जुना आहे.

३२) शिवचरित्र साहित्य खंड ८, लेखांक ३५ मध्ये इ.स. १७३७ च्या कागदात “सिवजी हरि” हे नाव आहे.

३३) शिवचरित्र साहित्य खंड ८, लेखांक ८४ मध्ये इ.स. १६७५ च्या कागदात “सिवाजी त्रिंबक” हे नाव आले असून कागद शिवकालीन आहे.

*टीप : “सिवजी / सिवाजी” असे अनेक ठिकाणी लिहीलेले आढळेल, ते “शिवाजी” नाही असा लहान मुलांसारखा प्रश्न मनात उद्भवल्यास प्रथम शिवकालीन भाषेचा अभ्यास करावा ही नम्र विनंती.. बहुत काय लिहीणे ?

- © कौस्तुभ कस्तुरे  |  इतिहासाच्या पाऊलखुणा