Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

मराठ्यांची भूगोलविषयक माहिती

मराठ्यांकडे नकाशे बनवायची पद्धत नव्हती, या बाबतीत आपण खूप मागासलेले होते वगैरे अनेक अपप्रचार आहेत. नकाशे बनवण्याच्या कामी व त्यांच्या उत्तमतेबद्दल इंग्रज वा कोणीही युरोपिअन आपल्या काही पावले पुढे होते हे उघड आहे. आपल्याकडे तेव्हा छपाईतंत्र इतके विकसित झाले नव्हते हेही खरे आहे, पण म्हणून आपल्याकडे नकाशे बनवले जात नव्हते, आपल्याला भूगोलाची माहिती नव्हती वा केवळ स्थानिक भौगोलिक माहिती सोडता आपण अनभिज्ञ होतो हि गोष्ट मात्र खरी नाही.. पुढील कागदावरून याची कल्पना येईल. 



नाना फडणीस यांचे दफ्तरात एक भूगोलविषयक माहितीचे गुंडाळे सापडले. ते संपूर्ण नसावे असे त्याच्या स्वरूपावरून दिसते. या गुंडाळ्यावरून मराठी राज्यामध्ये  जगातील अन्य राष्ट्रांविषयीचे भूगोलविषयक  प्रयत्न कसा केला जात होता त्याची चांगली कल्पना येते. हि माहिती वाचून पहिली म्हणजे मराठे मुत्सद्दी, हिंदुस्थानाखेरीज इतर राष्ट्रांच्या संबंधाने देखील सर्व प्रकारचे ज्ञान संपादित करीत असत असे स्पष्ट दिसून येते. या गुंडाळ्यांमध्ये इंग्रज लोकांच्यासंबंधाने जी माहिती दिली आहे त्यावरून नाना फडणिसांस युरोपखंडाचा भूगोल व इतिहास चांगला माहित असावा असे म्हटले असता अतिशयोक्ती होणार नाही".
- रावबहादूर दत्तात्रय बळवंत पारसनीस 

श्री

इंग्रजलोक यांचे उत्पत्तीचा वगैरे मजकूर. यांची विलायत व यवनांचे रुमस्थान वगैरे नजीक आहे. रूमचे पश्चिमेस कहरदर्या. यात विलायत मुख्य टापू. औरस चौरस पाऊणशे कोस आहे. त्याचे नाव 'इंग्लिश लंधन'. वरकड आणखी समुद्रात खुष्की, बेटे व शहरे बहुत आहेत. कर्नाटकच्या पश्चिम समुद्रात हजार कोश टापू आहे, तेथे फरांसीस राहतात. मुख्य टोपीगारात शिपाई व पातशाहा फरांसीस. व आपले खुश्कीवर मुख्य एकछत्री रूमचा बादशहा. त्यापासून दिल्ली वगैरे शेकडो सुभे सरसुभे म्हणवतात. त्यात इकडे, हिंदुस्थान सोळा सुभे व दक्षिण साडेसहा सुभे, मिळोन साडेबेवीस सुभ्याचा सरसुभा दिल्ली. यास रुमाहून तुघरा शिक्का वगैरे येत असतात. दिल्लीस "हिंदुपतपातशाहा" असे म्हणतात. असे रुमाखाली सरसुभे बहुत. दिल्लीखाली मुलुख रामेश्वरापासून काश्मीर, गंगोत्री, बद्रीनाथपर्यंत. याची उत्तरदक्षिण लांबी पंधराशे कोस. आणि रुंदी पूर्वसमुद्र महोदधीपासून पश्चिम समुद्र रत्नाकर याचे मध्ये, त्यात रामेश्वराकडे अरुंद आहे, आणि उत्तरेकडे जसे जसे जावे तसे रुंद अधिक आहे. दिल्लीपासी पूर्वेस दोनशे कोस, कलकत्ता पाच सहाशे कोस, पश्चिमेकडे द्वारका च्यारशे कोस याप्रमाणे हिंदूंचा गुजर अटक व काश्मीरपर्यंत. पुढे हिमालय शुद्ध उत्तरेस वायव्येच्या कोनास. पृथ्वीचा अंत नाही. अटकेपार झाडून यावं मुसलमान यांची वस्ती, व बादशाही मोठ्या मोठ्या आहेत. तितके रुमवाले यांचे ताबीन आहेत. दिल्लीप्रमाणे अटकेपासून पाच सहाशे कोस रूमकडे जाण्यास पहाडी वगैरे मुलुख लागतो. नंतर रुमवाल्याचा मुलुख आठशे कोस साफ मैदान आहे. पुढे रूम व शाम शहरे लागतात. मुलुख अस्तंबोल, तेथे वजीर व बादशाह असतात. ती शहरे मध्ये आहेत. त्यांच्या गिर्दनवाईकडे उत्तर वायव्येस पूर्व व पश्चिम आठशे आठशे कोस, कोणीकडे गेले तरी पहाड वगैरे खडा नाही. मुलुख साफ, भरवस्ती व संस्थाने व सरसुभे व पातशहाती बहुत आहेत. त्या मुलखात मोठ्या नद्या तीन आहेत. त्या हिमालयातून येऊन पश्चिमेस कहरदर्यास मिळाल्या आहेत. त्यांची रुंदी बेवीस चोवीस अठ्ठावीस कोस याप्रमाणे आहेत. त्यास मीठादर्याय म्हणतात. त्यातून मोठीमोठी जहाजे व नावा माळ भरून देशादेशात जिकडे पाहिजे तिकडे नेतात, आणितात. 

उत्तरेस रूमपासून आठशे कोस साफ जाल्यावर मग पहाडी वगैरे लागतो. मग पलीकडे अंत नाही व दिवसही कमती होत होत साथ घटिका रात्रच असा अंधकार आहे.  तिकडे मनुष्याचा संचार नाही. रूमचे मुलुखापासून इकडे यावे तर हिराजेंकडे येऊन द्वारकेकडे यावे. आणि त्याच खुषकीवर फिरणे तर त्या मुल्कापासून आठशे कोस मक्क्यास अरबस्तानात यावे. मसकत, बसराई वगैरे बातशहाती व मुलुख आहे. मोती त्या बंदरास रास उत्पन्न होते व पुतळी व रयाल होतात. ती खाण सोन्याची व चांदीची अरबस्तानात आहे. पिवळी वाळू आहे. तिची भट्टी लावून त्यात उत्पन्न करितात आणि पुतळ्या करून त्याजवर शिक्का पाडतात व पांढऱ्या वाळूची भट्टी लावून रूपे उत्पन्न करितात. त्यात तांब्याचा खार टाकून रयाल शिक्का पडतो. चांदी निखालस ठेवणे तर शिक्का पाडित नाहीत. तसेच गट इकडे आणतात. त्या मुलखात खारीक, खजूर, बेदाणा, लवंग व पोवळी वगैरे किराणा बहुत उत्पन्न होतो. तो आकडी बेपारी जहाजे घेऊन जाऊन रत्नाकर समुद्रातून पलीकडे पश्चिमेस अरबस्तानात जाऊन तेथील बंदरावरून घेऊन येतात. तो मुलुख रूमच्या मुखापासून दक्षिणेस शेवटपर्यंत चवदाशे कोस लांब आहे व सातशे कोस रुंदी आहे. यात अरब व हापशी व मुसलमान वगैरे आहेत. याचे शेवटी दक्षिणेकडे वगैरे तापू किरकोळ आहेत. त्याजवर इतर टोपीकर आहेत. आणि मोठा तापू आहे त्याजवर फरांसिस आहेत.

पूर्वेस महोदधी समुद्रापलीकडे तापू आहे त्यास चीन म्हणतात. तो हिमालयाच्या पहाडापासून साफ मुलुख दक्षिणोत्तर लांबी चौदाशे कोस आहे. रुंदी सातशे कोस. त्याचे पूर्वेकडे कहरदर्याय व पश्चिमेकडे महोदधी समुद्र त्या मुलखात एक मोठे शहर आहे त्याचे नाव चीन. तेथे मुख्य पातशहा राहतात. त्यामुळे त्या टापूचे नाव चीन पडले. ते शहर बहुतांचे उत्तम आहे. हवेल्या व भमी वगैरे भिंती चैनीचे पेल्याप्रमाणे व कांच बिलोरमय सारे. ते पहिले असता स्वर्ग पाहण्याची इच्छा राहत नाही. याचे कारण ते पूर्वी विश्वकर्म्याचे स्थान. तेथे पूर्वी पांडवांनी मयसभा केली होती. त्या समईच्या कारागीर त्या बादशहापासून आणिला होता. त्याचे नाव मयासूर. त्या टापूवर गोरेच लोक झाडून, त्यांस चिणलेले म्हणतात. तेथे दुसरे जातीचे मनुष्य इंग्रज वगैरे कोणासच आपले बंदरात घेत नाहीत. त्याचे राज्यात कारागिरी व कसबी अतिकुशल लोक त्या राज्यात उत्तणन जिन्नस होतो - रेशीम, रेशमी सरंजाम व मातीची जिन्नस. त्यावर कवड्याची रोगण व बिलोरी सरंजाम, झुंबर, झाडे, हंड्या, पितळी पाने व हरजीनसी पितळी सरंजाम, व कांच व आईने मोठे, घड्याळे व दुर्भिणी व छत्र्या व पंखे वगैरे कागदी चंदनी वगैरे कापड, चिटे वगैरे त्यास चंदन रुई इकडून जाती. त्याची चीज करून विकतात. व तसबिरा व पुतळ्या मातीच्या व लोखंडी हत्यारे व शस्त्रे व पेट्या तयार करितात. याप्रमाणे हरतऱ्हेने उत्पन्न करून इतर टापूंचा पैसा ओढतात. चहुकडील बेपारी जहाजे घेऊन जातात परंतु त्यांनी वीस कोसांपलीकडे राहावे, आपले बंदरास जहाजे ठेऊ देत नाहीत. परस्परे दलाल यांनी सवदा करून मचवे भरून नेऊन द्यावे, आणावे. इंग्रजांचा बेपारी कोणी आला तर त्याने पन्नास कोसांपलीकडे असावे. इंग्रज लोक कोणी त्या टापूवर जाऊ पावत नाही. 

इकडून जहाजे महोदधीतून चिनीच्या बंदरास तीस दिवसात जाते. द्वारकेहून कलकत्त्यास जाणे तर इकडून रत्नाकर समुद्रातून श्रीनगर कोचीबंदराकडून दक्षिणेस जाऊन लंका व रामेश्वर डावा घालून मंदरास म्हणजे चेनापट्टण व मछलीबंदर महोदधी समुद्रात उत्तरेकडे शिरून जगन्नाथ व बंगले डावे टाकून कलकत्त्यास जावे. रूमच्या राज्यात जाणे तर मक्क्याकडे खुश्कीवर उतरून जावयास बहुत दिवस लागतात. सबब लंकेचे पलीकडून कहरदर्यात शिरून फरांसिसाचा टापू व अरबस्तान उजवे टाकून कहरदर्यातून शेपन्नास कोसांवरून पाण्यांतून कडेनेच जावे. उत्तर वायव्य कोनास यावे. मग पाहिजे तर मिठेदर्यातून म्हणजे गोड्या नद्या रूमच्या त्यात शिरून बेपारी यांनी रूमचे राज्यात पाहिजे तिकडे जावे. इंग्रजांनी परभारेच कहरदर्यातून विलायत इंग्लिश मुलखात आपले टापूवर जावे. रूमच्या राज्यात व यावनी विलायत, अरबस्तान येथे इंग्रजांची पेरावी अद्याप नाही. पुढे ईश्वरसत्ता, याप्रमाणे आहे. चिणलेले याचे टापूत उत्तरेकडे याचे शेवटास ब्रह्माराज्याचा अंमल जाला आहे, तो कलकत्याच्या पूर्वेस. तेव्हा इतर राज्यातील व इतर खुषकीतील फौज वगैरे चढून आपले टापूत येईल, सबब चिंवाल्यांनी आपले राज्याचा शेवट उत्तरेस हिमालयाचे लगत ब्रह्माराज्याचे राजाकडे लागला, तेथे हद्दीवर चाळीस हात उंच व चारशे हात रुंद आणि महोदधीपासून त्याचे पश्चिमेकडून ती पूर्वेस कहरदर्या पर्यंत सातशे कोस लांबी दिवार भिंत चिरेबंदी घालून त्याचे आतले बाजूने चाळीस कोस रुंदी व सातशे कोस लांबी मुलुख आहे. त्यातील गिरासे व सरदार यांस मुलुख दिल्हा आहे. त्यांनी तो मुलुख खाऊन त्या भिंतीचा राबता व रखवाली करावी याप्रमाणे बंदोबस्त आहे. पृथ्वीवर जितका मनुष्याचा संचार सांप्रत आहे, तितके पृथ्वीवर साडेतीन बादशाह. मुख्य रूम प्रथम, दुसरा फरांसीस, तिसरा चिंचा व अर्धा इंग्लिश विलायतचा इंग्रज सवदागीर. एकूण साडेतीन बादशाह येणेप्रमाणे आहेत. अठरा टिपिकल यांस "हूण" अशी संस्कृत संज्ञा आहे. त्यास प्रमाण "दंडाकारण्यमहात्म्य" आहे. त्यात देव दांडकेश्वर लिंग कर्नाटकात "मृकण्डु" ऋषींचे व मृगादेवीचे क्षेत्र. त्याचे नाव मुर्तजाबाद उर्फ मिरज. दंडाकारण्यमहात्म्यात प्रमाण आहे त्याचे श्लोक -

।। कलौ पंचसहस्त्रातें हूणांक्रांता भविर्ष्यात ।।
।। इति प्रमाणं भविष्यकालोक्ति वर्तते ।।
।। तस्मिन्न यत्र कुत्र चित । हुणास्ताम्रमुखां ।। 
।। स्मृता इति अपरपर्यायोपि दृष्टो वर्तते ।।



स्रोत : 'इतिहाससंग्रह', अंक ८वा, मार्च १९१०
संपादक : द. ब. पारसनीस

- कौस्तुभ कस्तुरे । kaustubhkasture.in
Newer Post Older Post Home