Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

रायगडावरील महाराज शिवछत्रपतींचं सिंहासन नेमकं कसं होतं ?

छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन म्हणजे बत्तीस मण सोन्याचं सिंहासन असं आपण कायम ऐकलेलं असतं. पण हे सिंहासन नेमकं कसं होतं याबद्दल फारशी माहिती आपल्या वाचनात आलेली नसते. मग महाराजांचं हे सिंहासन नेमकं होतं तरी कसं ? याच उत्तर, बाळाजी आवजी चिटणिसांचे वंशज, सातारकर दुसरे शाहू महाराज आणि प्रतापसिंहांच्या दरबारातील चिटणीस असलेल्या मल्हार रामराव लिखित शिवाजी महाराजांच्या 'सप्तप्रकरणात्मक चरित्रा'त मिळतं.

सप्तप्रकरणात्मक चरित्रातील सिंहासनासंबंधीचे पान

मल्हार रामराव लिहितात, "सिंहासन-सभा केली. तेथे क्षीरवृक्षांची वेदी, वट-औदुंबर यांची करावी. तशी करून त्या ठोकळ्यास सुवर्णेकरून, तगडे (वर्ख अथवा पातळ पत्रा) मढून रत्नखचित केले. प्रमाण आहे, तसे त्याजवरी चित्रे- प्रथम वोळ वृषभाची, त्याजवर मार्जार, त्याजवरी तरसांची, त्याजवरी सिंहांची, त्याजवरी व्याघ्रांची. ऐशी एक बाजूस आठा प्रमाणे बत्तीस बत्तीस चित्रे चहूकडे मिळोन काढून, त्यास सिंहासन ऐसे म्हणावे, तसे सिद्ध केले होती. त्याजवर मृगचर्म घालून, काही सुवर्णादी द्रव्य घालावे. त्याजवरी व्याघ्रचर्म घालून त्याजवरी कार्पास आसने (मऊ आसन) मखमालीचे मृदू ऐशी घालून, बादली जरी वस्त्रे घालून उपबर्हण म्हणजे लोड, तक्ये, मागे प्रभावळ करून त्यास छत्र, त्याजवर मंडप, चांदवा सुवर्णमय वस्त्रांचा, त्यास मुक्ताफळांचे घोस ऐसे सुशोभित केले होते".

म्हणजेच, सिंहासन हे पूर्णपणे सोन्याचे नव्हते. ते आतून वड, औदुंबर अशा पवित्र वृक्षांच्या लाकडाचे होते. त्यावर सोन्याचा पत्रा मढवून हे सुवर्णसिंहासन तयार केलेले होते हे उघड आहे. त्यापुढे मग त्यावर  वगैरे दिले आहे. आता कोणी असा आक्षेप घेईल की चिटणीस हे महाराजांच्या समकालीन नव्हते, त्यामुळे त्यांनी दिलेली हि माहिती सत्य कशावरून मानायची ? हा प्रश्न योग्यच आहे, पण याचं उत्तरही आपल्याला देता येतं ! चिटणीस हे महाराजांच्या समकालीन नसले तरीही ते बाळाजी आवजींचे थेट वंशज होते. सातारकर छत्रपतींचा वंश (मग तो दत्तक का असेना) हा शिवाजी महाराजांपासून अखंड सुरु असल्याने सिंहासन बनवण्याच्या कार्यात खंड पडलेला नव्हता. अशातही, १६८९ मध्ये झुल्फीकारखानाने रायगड घेतल्यानंतर राजाराम महाराज असताना आणि शाहू महाराज पुन्हा साताऱ्यात आल्यानंतर पूर्वीच्या सिंहासनासारखेच सिंहासन बनवण्यात आले असणार हे उघड आहे. हे सिंहासन तसेच थेट मल्हार रामरावांपर्यंत चालत आलेले होते. याच सिंहासनावरून मल्हार रामरावांनी हे सगळं लिहिलं आहे. शिवाय हे स्वतः चिटणीसांच्या वंशातील असल्याने त्यांना अनेक अस्सल कागद उपलब्ध झाले असणार हे उघड आहे. 

सभासद बखरीतील सिंहासनाचा उल्लेख

शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला कृष्णाजी अनंत सभासद त्याच्या चरित्रात केवळ "पुढे तक्तारूढ व्हावे म्हणून तक्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमौलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली". यात सभासद सिंहासन कसे करावे हे सांगत नाही. पण तो वजन ३२ मण असे देतो. आता ३२ मण म्हणजे नेमके किती ? पूर्वीच्या काळी एक तोळा हा पावणेबारा ग्रॅमचा असायचा (आज आपण एक तोळा म्हणजे १० ग्रॅम असा ग्राह्य धरतो). असे पूर्वीचे २४ तोळे म्हणजे १ शेर होई. असे एकूण १६ शेर म्हणजे १ मण ! अशा ३२ मणांचं हे सिंहासन. म्हणजे याच उत्तर किलोग्रॅम्स मध्ये काढायचं तर ते असं काढावं लागेल -

११.७५ x २४ x १६ x ३२ = १४४३८४ ग्रॅम्स म्हणजेच १४४.३८४ किलोग्रॅम्स !! 

आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, हे वजन सोन्याचं नाही ! हे वजन सिंहासनाचं आहे. ३२ मण सोन्याचं सिंहासन नसून सिंहासनाचं वजन ३२ मण होतं, आणि या सिंहासनाला बाहेरून सोन्याचा पत्रा मढवलेला असून आतून हे सिंहासन पवित्र अशा वृक्षांच्या लाकडाचं होतं. एकूणच अशी आहे या सिंहासनाची गोष्ट .. 

- © कौस्तुभ कस्तुरे   
(लेखाचे हक्क राखीव)