पानिपत प्रकरणात निजाम कायमचा बुडाला असता, पण पेशव्यांच्या कुटुंबातील घरभेदी, स्वार्थी राघोबादादा मुळे हि संधी हातची गेली. झालं असं, की नोव्हेंबर महिन्यानंतर डिसेंबर संपत आला तरी पानिपतावरून भाऊंचा काहीही निरोप अथवा पत्र येत नाही हे पाहून इकडे नानासाहेब पेशव्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी गडबड आहे असं मनाशी समजून नानासाहेब स्वतः उत्तरेत जायला निघाले. यावेळी दक्षिणेत मराठ्यांचा प्रबळ असा एकमेव शत्रू होता तो म्हणजे हैद्राबादचा निजाम !
पानिपतापूर्वीच्या दोन वर्षात पेशव्यांनी निजामाला सिंदखेडराजा आणि उदगीरच्या मोहिमांमध्ये चांगलीच धूळ चारली होती. आता या दोन महत्वाच्या मोठ्या मोहीमांतील हार अंगाशी आल्यामुळे निजामाकडे लगेच नानासाहेबांची कुरापत काढायची ताकद उरली नव्हती. पण न जाणो, दक्षिणेतील इतर संस्थानिकांना आपल्याविरुद्ध भडकावून आपण उत्तरेत गेल्यावर हा निजाम पुन्हा डोकं वर काढेल म्हणून नानासाहेबांनी निजामाच्या आघाडीवर तळ ठोकून असलेल्या राघोबादादाला 'निजामाला सुद्धा आपल्या उत्तरेच्या मोहिमेत सामील होण्यास सांगा' असं सांगायला सांगितलं. राघोबादादाने हि बातमी निजामाला दिली, आणि निजामालासुद्धा हे मेनी करण्यावाचून काही पर्याय नव्हता. पण वर लिहिल्याप्रमाणे सततच्या दोन मोहीमांतील हार पचवून निजामाकडे तेवढं खडं सैन्य यावेळी नसावं. निजामाला सैन्य उभं करण्यासाठी काही वेळ गेला असावा असं दिसतं. पण या उशिरामुळे इकडे नानासाहेबांना वेळेची मर्यादा तोडावी लागत होती. उशीर करून चालणार नव्हता, उत्तरेत काय झालं असेल याची चिंता त्यांना सतावत होती. अखेर एक दिवस नानासाहेबांनी राघोबादादाला पत्र लिहून स्पष्ट कळवलं की "निजामअलीला जीवे मारून टाका नाहीतर कैद करा". यावर राघोबादादाने नानासाहेबांना पत्र लिहून निजामाला मारणे किंवा कैद करणे हे आत्ता सोयीस्कर नाही असं कळवलं. यावेळी राघोबादादाने निजामाला सुद्धा थोडी टोचणी दिली असावी, जेणेकरून निजाम ताबडतोब त्यांच्यासह नानासाहेबांच्या फौजेत सामील व्हायला निघाला आणि नानासाहेबांचा राग किंचितसा शमला. दि. १८ जानेवारी १७६१ च्या पात्रात नानासाहेब भाऊसाहेबांना कळवतात, "निजामअलीसी विरोध नाही (म्हणजे त्याने विरोध केला नाही). उशिरामुळे गप्पा उठवतात (त्याला उशीर लागतोय त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला आहे). आमच्या मागे पंधरा मजलींचे अंतराने येतात यात संशय नाही !"[१].
पण या आधी नानासाहेबांनी निजामाला मारण्यासाठी अथवा कैद करण्यासाठी राघोबादादाला लिहिलेलं पत्र खूप महत्वाचं आहे[२] . ते पत्रं असं-
"सेवेसी विज्ञापना ! आपली (नानासाहेबांची) आज्ञा व मर्जी की निजामअली यास उसिराचे निमित्य करून शब्द ठेवावा असा समय दुसरे वेलेस येणार नाही. यावेलेस निज्यामअली यास जीवे मारावे आथवा कैद करावे याअन्वये पत्रे लिहिली (ती) आली. यैसीयांस निज्यामअली तो बराबरीचा सरदार ! आम्हांजवल फौज फार व त्याजवल तोफखाना गाडदी फार, याअन्वये पाहता तो थोडासा आम्हापेक्षा उणा नाहीतर समानच आहे. यैसीयांस कोल्ह्याच्या सिकारीस जावे तेव्हा वाघाचे सामान असावे तेव्हा इच्छिले प्रकार होतो. यास्तव या सामानासी केवळ जीवे मारू आथवा कैद करू हा इजारा कोणाच्याने होईल. येक कुत्रे आथवा मांजर, उंदीर यास जीवे मारिता कितीक प्रयास लागतात. अखेर उंदीर एखादे बिलात सिरला तरी मरतही नाही. तसा प्रकार पाहता (निजामाचे) मारणे दुस्तर आहे. दुसरे (असे की) सलाबतजंगही फार शाहाणा ! त्यासही समजते की आज निज्यामअली बुडविला तरी उद्या आपली अवस्था तेच आहे. यास्तव ते येकच आहेत. आम्ही शहाणे आणि ते सारेच वेडे असे नाही. येक सलाबतजंग मात्र जिकडे भरले तिकडे भरतील. वरकड सारे शहाणे, दुरंदेसी आहेत. ते आपल्या तजविजेस चुकत नाहीत. आम्हीही जितके उपाय तितके करितो, सारांश जर्बेट आणणे हे तरी होईलसेच वाटते. जीवे मारणे आथवा कैद करणे हे ही न होईल, आथवा होईल आसा इजारा करवत नाही. परंतु येक ईश्वरी दया व स्वामींचे पुण्य येणेंकरून होईलसे दिसते. आम्ही तरी चुकत नाही. तर्तूदा करितो व सिपाईगिरीही होईल ते करू ! स्वामी आइकतील तेव्हा कलेल. परंतु सारे प्रकार कलावे म्हणून लिहिले आहेत. ईश्वरी तंत्र जे होणे ते होईल. आम्ही जे होईल ते यावत्सामर्थ्य करणार हे विनंती".
या पत्रात राघोबादादा नानासाहेबांना समजावतो की निजाम आपल्यापेक्षा जरासाच कमी, अथवा बरोबरीचाच आहे. त्याला पकडून मारणे सहज सोपे नाही. मी त्याला आपल्यासोबत घेऊन येतो. खरी गोष्ट काय, खरंच निजामाला मारणं कठीण होतं का राघोबादादा त्याच्या स्वार्थासाठी निजामाला मारू इच्छित नव्हता ते समजायला पुराव्याअभावी आत्ता मार्ग नाही, पण नानासाहेबांच्या मनात यावेळी निजामाचा कायमचा काटा काढायचं होत हे मात्र यावरून स्पष्ट दिसून येतं ! हे पत्र जानेवारी १७६१ मधील आहे. यावेळी नानासाहेबांचा मुक्काम हा माळव्याच्या आसपास, हंडीयाच्या अलीकडे पिपलोद परगण्यात होता[३].
संदर्भ :
१) पुरंदरे दफ्तर खंड १, लेखांक ३९५
२) पुरंदरे दफ्तर खंड १, लेखांक ३९३
३) बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी खंड २, पृ. २५८
१) पुरंदरे दफ्तर खंड १, लेखांक ३९५
२) पुरंदरे दफ्तर खंड १, लेखांक ३९३
३) बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी खंड २, पृ. २५८
- © कौस्तुभ कस्तुरे