हनुमानजयंतीचा तो दिवस.. वरकरणी नेहमीसारखाच भासणारा, पण वज्राहूनही कठीण असलेल्या रायगडाचं हृदयही हेलावून सोडणारा.. साऱ्या जबाबदाऱ्या जबाबदार व्यक्तींवर सोपवून महाराज ईश्वराचं नामस्मरण करत पलंगावर पहुडले होते. एक अस्पष्ट, धूसर काळी सावली हळूहळू त्यांच्या रोखाने पुढे सरकत होती.. महाराज निजल्या जागेतून त्या सावलीकडे पाहत होते, आणि पाहता पाहता आपण लहानपणापासून केलेल्या स्वराज्याच्या त्या प्रचंड उठाठेवीचे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागले..
सह्याद्रीच्या कडेकपारी चैतन्याचे मळे बहरले,
शिंपले गेले रक्त, अनं दगडासही अंकुर फुटले !
महाराष्ट्राच्या मनात गुंजे, एक मंत्र अन एकच कर्म,
शिंगे, तुताऱ्या, डंके गर्जती, स्वराज्यधर्म ! स्वराज्यधर्म !
आठविता त्या पराक्रमासी, मनी तो हरवूनी गेला..
किती आल्या कृद्धसेना, महाराष्ट्रासी बुडवायाला !
जण होऊनि एक जाहली मनें, पेटली काया..
खड्ग घेऊनि हात नाचती, जणू महादेवाची छाया !
परी, आज नभीचे तेज उतरले, थबकलेही वारे..
पैलतीरावर नजर फेकता, तुटले बांध सारे !
क्षणभर दिसता सावलीस, तो हसला खिन्नपणे..
बोट धरुनी न्यावया आला, मृत्यू चल म्हणे !!
(२४ एप्रिल २०१०)
- © कौस्तुभ कस्तुरे