Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

स्वराज्यातील शेतकरी !

शिवाजी महाराजांचे शेतकरी आणि रयतेविषयी नेमके धोरण काय होते हे खुलासेवार स्पष्ट करणारं एक अस्सल पत्रं आज सापडलं आहे. दि. ५ सप्टेंबर १६७६ रोजी, प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना लिहीलेल्या या पत्रात महाराज रयतेसाठी किती झटत होते हे दिसून येते. पत्राचे देवनागरी लिप्यंतर पुढीलप्रमाणे [१]-


"मशहुरूल हजरत राजश्री रामाजी अनंत सुबेदार मामले प्रेभावली प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत सुहूर सन सबा सबैन वलफे(व अलफ) साहेब (शिवाजी महाराज) मेहेरवान होऊन सुभात फर्मावीला आहे यैसियास चोरी न करावी; ईमाने ईतबारे साहेबकाम करावे यैसी तू क्रियाच केलीच आहेस तेणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन नं दाखविता रास व दुरुस वर्तणे याऊपरी कमाविस कारभारास बरे दर तू रोज लावणी, संचणी, उगवणी जैसी जैसी जे जे वेलेस जे करू येते ते करीत जाणे. हर भातेने साहेबाचा फायेदा **** होये ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालत आहे. परंतू रयेतीवर जाल, रयेतीचा वाटा रयेतीस पावे आणि राजभाग आपणास येई ते करणे. रयेतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत यैसे बरे समजणे. दुसरी गोष्टी की रयेती पासून यैन जिनसाचे नक्ष घ्यावे यैसा येकंदर हुकूम नाही. सर्वथा येन जिनसाचे नख्त घेत घेत नच जाणे. यैन जिनसाचे यैन जिनसच उसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेलचे वेलेस विकीत जाणे, की ज्या ज्या हुनेरेन माहाग विकेल आणि (रयतेचा) फायेदा होईल ते करीत जाणे. उसूल हंगाम सीर घ्यावा आणि साठवण करून आणि विकरा यैसा करावा की कोण्हे वेलेस कोण(ता) जिनसच विकावा, ते हंगामी तो जिनस विकावा, जिनस तरी पडेन जाया नव्हे आणि विकरा तरी माहाग यैसे हुनरेने नारल, खोबरे, सुपारी, मिरे (इत्यादी) विकीत जाणे. माहाग धारणे जरी दाहा बाजार यैन जिनस विकेल तर तो फायेदा जाहलियाचा मजरा (मान) तुझाच आहे यैसे समजणे. त्याउपरी रयेतीस (ताजा)तवाना करावे आणि कीर्द(कामं) करवावी, हे गोस्टीस ईलाज साहेबी तुज यैसा फर्माविला आहे, की कष्ट करून गावाचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुलबी (कुणबी) किती आहेती ते गोला करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफिक त्यापासी बैल, दाणे संच आसिला तर बरेत(च) जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि त्याला जोतास बैल-नांगर, पोटास दाणे नाही; त्याविण तो आडोन निकामी जाला असेल तरी त्याला रोख पैके हाती घेऊन दो-चौ बैलाचे पैके द्यावे; बैल घे(व)वावे व पोटास खंडी-दोन खंडी दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. पेस्तर, त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढीदिडी न करीता मुदलच उसनेच हळू हळू याचे तवानगी माफीक घेत घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवावे. या कलमास जरी दोन लाख लारी पावेतो खर्च करीसील आणि कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी ये(ईल) ती करून कीर्द करीसील, आणि पडजमिन लाऊन दस्त जाजती करून्न देसील तरी साहेबा कबूल असतील तैसेच कुलबी तरी आहे. पुढे कष्ट करावया उमेद धरीतो आणि मागिल बाकीचे जलित त्यावरी केले आहे ते त्यापासून घ्यावया मवसर तरी काही नाही. ते बाकीचे खडवे तो कुलबी मोडोन निकाम जाला, याउपरी जाऊन पाहातो यैसी जे बाकी रयेतीवरी आसेल ते कुलाचे कुल माफ करावयां खडवे तोकूब(तहकूब) करून पेस्तर साहेबास समजावणे की ये रवेसीने कीर्द करऊन साहेबाचा (सरकारचा) फायेदा केला आहे, आणि आमची येक बाकी गैर उसली मफालीस कुलास माफ केली आहे यैसे समजावणे. साहेब ते माफिची सनद देतील. जे बाकी नफर निसबत आसली ते हिसेबीच उसूल घेत जाणे. बाकीदार माहाल न करणे, ये रवेसीने तुजला पदनसी येत तपसिले करून तुजला हा रोखा लिहून दिधला आसे. आकली व तजविजीने समजोन त्याप्रमाणे कारबार करीत जाणे, की तुझा कामगारपणाचा मजरा होये आणि साहेब तुजवरी  मेहेरवान होत ते करणे. जाणिजे. रा। छ ६ माहे रजब". 

हे संपूर्ण पत्र महाराजांच्या शेतीविषयक आणि शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावर प्रकाश टाकणारे आहे. सुरुवातीलाच महाराज त्या नव्याने नेमलेल्या प्रभावळीचा सुभेदाराला अतिशय महत्वाचं म्हणजे "चोरी करणार नाही, इमाने इतबारे साहेबकाम म्हणजे चाकरी करिन अशी तू शपथ घेतली आहेस त्याप्रमाणे वाग" असं  बजावतात. महाराज पुढे म्हणतात, "तू सुभेदार आहेस, कोणाच्याही भाजीच्या देठाकडेही (स्वार्थीपणे) नजर न ठेवता योग्यपणे काम करत जा. कमावीसदारी कारभारात जी लावणी-संचाने वगैरे होत असते ती ती होऊ दे, जेणेकरून साहेबांचा (महाराजांचा) फायदा होईल". या पुढचे महाराजांनी त्याला बटाईच्या तहाबद्दल काही सूचना केल्या आहेत. 'बटाईचा तह' म्हणजे सरकारात जमा होणारा उत्त्पन्नावरील कर हा नख्त स्वरूपात न घेता तो जिनसांच्या स्वरूपात घेतला तरी चालेल. म्हणजे, शेतकऱ्यांचा माल पूर्णपणे विकला गेला नाही, तर त्यांच्यावर कर भरण्यासाठी पैशाची सक्ती न करता जे उत्पन्न असेल, त्यातील कराच्या किमतीचे जिन्नस सरकारी धान्यकोशात सामील करायचे. यामुळे एकतर शेतकऱ्याला हानी विकले न गेल्याची जी चिंता असते ती थोडी दूर होईल आणि त्याच्यापासून मिळणारा महसूल कर सुद्धा बुडणार नाही. याबद्दलसुहा या नव्या सुभेदाराला महाराज बजावतात, "हा बटाईचा तह अंमलात आणताना रयतेचा  वाटा रयतेला घेऊ द्यावा आणि आपला ठरलेला असेल तेवढाच वाटा घ्यावा. दुसरं म्हणजे बटाईच्या तहानुसार रयतेकडून ऐन जीन्सच्या बदल्यात रोख पैसे घ्यावा असा माझा हुकूम नाही. त्यामुळे असं न करिता जिनसांच्या स्वरूपातच शेतसारा घेत जावा". 

इथपर्यंत आपण पाहिलं ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी. पण स्वराज्याच्या खजिन्यात धान्य साठवणार तरी किती ? धान्याऐवजी पैसा हवा ! याकरिता महाराज तो जिनसांच्या स्वरूपात घेतलेला माल वेळच्या वेळी विका असं सांगतात, आणि तो नुसताच विका असं नाही तर "ज्या ज्या हुनरेने महाग विकेल आणि (सरकारचा) फायदा होईल ते ते करीत जाणे" असं सुद्धा बजावतात. कोणत्या वेळेस कोणत्या जिन्नसाचा हंगाम आहे ते पाहून मग तो जिन्नस विकावा, एकदम साठवण करून त्यातून वेळच्या वेळी ज्याची गरज असेल तो तो विकत जावा, पण तो नुसता पडून खराब होणार आहि याची काळजी घ्यावी असाही सल्ला दिलेला आहे.

यापुढे पुन्हा महाराज शेतकऱ्यांसंबंधी काय उपाययोजना कराव्यात ते सांगत आहेत. ते म्हणतात, "तू कष्ट करून गावोगावी फिरत जा, गावागावांमध्ये जेवढे कुणबी अथवा शेतकरी आहेत त्या त्या सगळ्यांना गोळा करून त्यापैकी ज्यांच्याकडे शेतीसाठी योग्य साधने असतील त्यांचं उत्तम आहे, पण ज्याच्यापाशी शेतकाम करायला माणसं आहेत, कुवत आहे पण नांगर चालवायला बैल नाही, दाणे नाहीत अशा शेतकऱ्यांना दोन बैलांचे पैसे रोख द्यावेत, त्याचं शेत उभं राहीपर्यंत त्याला पोटास सरकारातून धान्य द्यावे, त्याच्याकडून जमेल तेवढं शेत उभारावं. त्याचं शेत पिकलं कि मग जास्त काही न मागता आधी मुद्दलाचे दिलेले पैसे वसूल करावेत. असं करत करत जोवर तो तवाना होत नाही तोवर त्याच्यावर जास्त जोर देऊ नये. या कामात तू अगदी दोन लाख लारीपर्यंत खर्च करशील, शेतकऱ्यांना तवाना करून पडजमीन पुन्हा उगवती करशील तर त्याकरता साहेब म्हणजे मी केव्हाही कबूलच आहे". हे असं झाल्यानंतर महाराज पुढे म्हणतात, "तू हे असं केल्याने शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने उभा राहिल्यास मग मागील उरलेली बाकी त्याच्याकडून वसूल करण्यात काहीच अर्थ नाही. पुन्हा तो मागील बाकी फेडण्यात निकामी झाला तर काय उपयोग ? यासंबंधी जर तू नीट तपास करून आधीची सरकारात येण्याची जी बाकी असेल ती माफ करावी असं सांगितलंस तर ती माफ केली जाईल".  याचा स्पष्ट अर्थ असा, कि महाराज म्हणतात, दिलेली मुद्दलाची रक्कम परत घ्या, पण वरचं जे अधिक येणं असेल (थोडक्यात व्याज) ते माफ करा. म्हणजे सरसकट पूर्ण सूट न देता, शेतकऱ्यांची मदत करून एकदा का त्यांचं पीक पुन्हा आलं कि मदतीसाठी दिलेली मुद्दल कोणतंही व्याज न आकारता परत घ्यावी. यापुढचं एकच वाक्य असलं तरी ते महत्वाचं आहे. "जे बाकी नफर निसबत आसली ते हिसेबीच वसूल घेत जाणे". म्हणजे जी बाकी शेती व्यतिरिक्त 'वैयक्तिक' कारणासाठी असेल, जो पैसा शेतीव्यतिरिक्त इतर कामांसाठी घेतलेला आणि तो राहिला असेल तो मात्र वसूल करावा !! 

हे झालं ऐन कठीण काळातलं. पण जर पीक योग्य येत असेल तर मात्र महाराजांचं म्हणणं असे कि बटाईनुसार सरकारात जमा झालेला कररूपी जिन्नस हा बाजारात चढ्या भावाने विकला जावा, जेणेकरून सरकारी खजिन्यात भर पडेल. दि. २४ सप्टेंबर १६७१ च्या सुभे-मामले प्रभावळीचा सुभेदार तुकोराम याला लिहिलेल्या पत्रात महाराजांचा हा मनोदय स्पष्ट होतो. हे संपूर्ण पत्रं असं [२]-

"मशहुरुल हजरत राजश्री तुकोराम सुबेदार व कारकून सुभे मामले प्रभावली प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत सुहूर सन इसने सबैन व अलफ. मामले दाभोल विलायतीस नारळ दर सद्दे लारी ४ व रोठा देखील जकात दर खंडीस लारी १२५ सवाशेप्रमाणे विकत आहे. आणि नेवरे व बाजे तुम्हांकडील महाली ऐन जिन्नस बटाई दिवाणात वसूल देताती व रयत वासा खरीदी करितात. ऐसे असता कामनिर्खे नारळ सुपारी विकते ऐसी खबर कळों आली आहे. तरी हा अंमल कैसा आहे ? ऐन जिनसांची गिर्द्वारी कैसी करिता ? आणि कमनिर्खे कोण विकितात ? हे खबर घेणे आणि ताकीद करणे. पेस्तर ऐसे नव्हे. ऐन जिनसांची गिर्दवारी बरी हो आणि जो तह तुम्हांकडे आहे, त्या निर्खे विक्री करणे. कमनिर्खे विकलीया इकडे धक्का बसतो आणि अलग नुकसान येऊ पाहते. त्याची बदनामी तुम्हांस ऐसे जाणून, खरी खबर घेऊन, चौकशी व गिर्दवारी करून, ऐन जिन्नस तहाप्रमाणेच दिवाणातून विकीत जाणे. छ ३० जमादिलावल". 

महाराज स्पष्ट विचारतात, नारळ सुपारी कामनिर्खे म्हणजे कमी भवानी विकली जाते हा कोणता कारभार ? तुम्ही म्हणजे सुभेदारांनी जातीने लक्ष घालून ऐन जिनसांची गिर्दवारी म्हणजेच जकातवसुली कशी करतात आणि कमी भावाने कोण विकतात याचा शोध घ्या आणि त्या लोकांना ताकीद द्या. (रयत अथवा शेतकऱ्यांकडून बाजारात येणाऱ्या) ऐन जिनसांची जकातवसुली 'बरी' म्हणजे उत्तम हो आणि बटाईनुसार तुमच्याकडे जो वसूल जमा होतो त्याची चांगल्या किमतीने विक्री होईल असं करा, कमी भावाने निकाल तर इकडे सरकारास त्याचा धक्का बसतो आणि नुकसान होतं. 

एकूणच, या दोन पत्रांवरून शेतकऱ्यांविषयी महाराजांचं धोरण कसं होतं हे समजून येईल. 


पत्रांचे संदर्भ : 
[१] शिवचरित्रसाहित्य खंड ९, लेखांक ५५
[२] मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८, लेखांक २६

- © कौस्तुभ कस्तुरे