Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

सातारा आणि कोल्हापूर गादीतील वितुष्ट

मराठ्यांच्या इतिहासात खेददायक गोष्ट म्हणजे एका सार्वभौम सिंहासनाची झालेली विभागणी ! पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तिसऱ्या पिढीतच हे सिंहासन 'वाटलं' गेलं आणि त्यासाठी भाऊबंदकी सुरु झाली. पण दोन्ही पक्षाकडील लोकांचं नेमकं म्हणणं तरी काय होतं ?

शाहू महाराजांनी इ.स. १७३५ मध्ये जिवाजी खंडेराव चिटणीस यांना दिलेल्या वतनपत्रात पूर्वीपासूनच इतिहास थोडक्यात आलेला आहे. यात समजणारे प्रमुख मुद्दे असे -

१) बाळाजी आवजींनी थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खूप कष्ट केले, महाराजांना साथ दिली.

२) राज्याभिषेकसमयी बाळाजींना अष्टप्रधान मंडळात घेण्याचा महाराजांचा विचार असता बाळाजींनी प्रधानपद न स्विकारता चिटणिशीच द्यावी अशी विनंती केली.

३) संभाजी महाराजांच्या काळात 'कोण्ही गैरवाका समजाविल्यावरून' म्हणजे कोणीतरी मुद्दाम चुकीचा समाज करून दिल्यामुळे संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद वगैरे सरकारकूनांना ठार मारलं, त्यातच बाळाजींनाही मारण्यात आलं. 

४) हे असं होऊनही बाळाजींचा पुत्र खंडो बल्लाळ यांनी संभाजी महाराजांची मनोभावे सेवा केली, गोव्याच्या आधारीत त्यांचा जीव वाचवला.

५) राजाराम महाराजांच्या काळातही खंडो बल्लाळ चिटणिसांनी स्वतःच्या पदरचं (वतन वगैरे) सोडून राजाची आणि राज्याची सेवा केली.
६) शाहू महाराज पुन्हा स्वराज्यात आल्यानंतर राजाराम महाराजांची स्त्री म्हणजे ताराबाईंनि आपला मुलगा गादीवर बसवून 'राज्य करण्याची इच्छा होऊन दुर्बुद्धी धरली' (शाहू महाराजांना त्यांचे राज्य दिले नाही). 

हे संपूर्ण वतनपत्र असं [1]

"स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६१, आनंदनाम संवत्सर, चैत्र शुक्ल पंचमी, गुरुवासरे, क्षत्रियकुलावतांस श्री राजा शाहूछत्रपती स्वामी यांणी राजकार्यलेखनधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजेश्री जिवाजी खंडेराव चिटनिवीस यांसी आज्ञा केली यैसी जे - तुम्ही विनंती केली की आपले वडील; आजे (बाळाजी आवजी) व तीर्थरूप (खंडो बल्लाळ) यांनी स्वामीसेवा केली. त्याजवर कृपाळू होऊन चिटणिशीचा दरख वतनी परंपरेने करून दिल्हा व कारखानिशी, जमेनीशी दोन धंदे व सर्व राज्यातील परंपरेने देऊन शपथयुक्त पत्रे करून दिल्ही. त्याअन्वये स्वामींनीही अभयपत्र दिल्हे. चिटणिशी वेतनास गाव मोकासे लावून दिल्हे. ते इनाम चालावेसे अभय वचन दिल्हे. त्याप्रमाणे पत्र करून देऊन चालविले पाहिजे म्हणोन, त्याजवरून पूर्वीपासून कागदपत्र व वृत्त मनात आणिता, तुमचे आहे बाळाजी आवाजी, थोरले कैलासवासी स्वामींनी राज्यसाधन केले ते समई बहुतांचे श्रमसाहस करून उपयोगी पडले. त्यानंतर दिल्लीस जाण्याचे प्रसंगी संकट पडले असता बरोबर फार सेवा केली व राज्याभिषेकाचे समया उपयोग पडून स्वामींचे मनोरथसिद्धी केली. त्याजवरून संतोषी होऊन अष्टप्रधानांतील पद द्यावे यैसी योजना केली असता, चिटणिशीच वतनी परंपरेने द्यावी ऐसी विनंती केली. यावरून प्रसन्न होऊन शपथयुक्त पत्र करून दिल्हे. नंतर थोरले महाराज (थोरले शिवाजी महाराज) कैलासवासी जालियावर कैलासवासी तीर्थरूप स्वामी (थोरले संभाजी महाराज) यांणी कोण्ही गैरवाका समजाविल्यावरून राज्यभारप्रसंगी सरकारकून यांस शिक्षा केल्या. त्यात, यांसही (बाळाजी आवजी) केली असता, तुमचे वडील खंडो बल्लाळ यांनी बहुत निष्ठेने वागून, स्वामींशी गोव्याचे लढाईत शूरत्वे करून व समुद्राचे भरतीस स्वामींचा घोडा पाण्यात पोहणी लागला असता धरून, उडी टाकून घेऊन निघाले. त्याजवरून बहुतांचे संतोषी होऊन, शपथ करून वचन दिल्हे. सर्फराज केले. तोही प्रसंग यवनांचे प्राबल्य होऊन विज्वर आला. स्वामींसही (शाहू महाराज) यवनांचे सन्निध जाणे झाले. तेथे गेलो असता, कैलासवासी काकासाहेब (राजाराम महाराज) चंदीकडे जाऊन राज्यरक्षण करण्याच्या प्रयत्नास लागले. तेव्हा जातेसमयी त्यांसी संकटसमय प्राप्त जाला असता त्यांस काढून देऊन आपण क्लेश भोगिले. त्यानंतर चंदीस जाऊन तेथेही सेवा निष्ठेने केली. तेथे संकटाचा प्रसंग प्राप्त होऊन निघणे दुर्घट पडिले असता झुल्फिकारखान व गणोजी शिर्के यांसी संधी करून दाभोळचे वतन दिल्हे होते. ते शिर्के यांस देऊन त्यांचे मोर्च्यातून पाळण्यात बसवून काढून घेऊन येऊन देशी सेवा केली. त्यानंतर काकासाहेब समाप्त झाले. यवनास दिल्लीचे व्यसन प्राप्त झाले. तेव्हा स्वामींशी त्यांनी निरोप देऊन लावून दिल्हे. देशी येणे घडले असता काकासाहेब यांची स्त्री आईसाहेब (ताराबाई) यांस आपला पुत्र घेऊन राज्यभर करण्याची इच्छा होऊन, दुर्बुद्धी धरिली. फौज देऊन सेनापती व परशुराम त्रिंबक प्रतिनिधी (शाहू महाराजांवर) रवाना केले, त्याबरोबर खंडोबास दिल्हे असता, स्वामींशी गुप्तरूपे भेटून सेनापती व सरदार यांच्या खातरजमा करून सर्वांस स्वामींचे लक्षी आणिले. लढाई झाली. प्रतिनिधी पळून गेले. स्वामी (शाहू महाराज) विजयी होऊन राज्यभारसाधन प्रसंगात सर्व स्थळे व सरदार व प्रतिनिधी सरकारकून यांस स्वामींचे लक्षी लागण्याचे उद्योग बहुत केले. पुढे तुम्हीही त्याअन्वयेच स्वामींचे ठायी एकनिष्ठता धरून आंगरे वगैरे मातुश्रीचे लक्षातील सरदार स्थळे वगैरे स्वामींचे लक्ष्मी वागण्याचा उद्योग करीत आहात. याजवरून तुम्हांवर कृपा करणे आवश्यक जाणोन, चिटणिशी पूर्वी तुम्हांस शपथयुक्त दिल्ही आहे, ती व कारखानिशीं, जमिनीशी दोन धंदे राज्यातील दिल्हे. त्याप्रमाणे करार करून देऊन चिटणिशी वतनास गाव व मोकाशे व जमिनी लागले आहेत. 

(येथे वतने दिलेल्या ४५ गावांचा तपशील आहे)

येणेप्रमाणे महाल व गाव व जमिनी तुम्हांस इनाम करून दिल्हे असेत. तरी तुम्ही व तुमचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने सदराहूचा अनुभव करून, सेवा करून सुखरूप राहणे. जाणिजे. येणेप्रमाणे सेवा केली आहे. वतनी धंदे करून इनाम खाणे. बहुत काय लिहिणे ? [मोर्तब]" 

इथे शाहू महाराज ताराबाईंनी 'राज्य करण्याची इच्छा होऊन दुर्बुद्धी धरली' असं स्पष्ट म्हणतात. याच कारण म्हणजे यापूर्वीही, शाहू कधीतरी दक्षिणेत नक्की येईल असे राजाराम महाराजांना वाटत होते, आणि आपण शाहूतर्फे राज्य करत आहोत ही राजाराम महाराजांची भावना होती हे दर्शवणारे राजारामांचे शंकराजी नारायण सचिव यांना लिहीलेले दि. २५ ऑगस्ट १६९७ रोजीचे पत्र. परंतू पुढे राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईंनी मात्र शाहू महाराष्ट्रात आल्यावर अखेरपर्यंत त्यांना विरोधच केला. राजारामछत्रपतींच्या मनातलं शाहूंचं स्थान त्या अखेरपर्यंत ओळखू शकल्या नाहीत. आणि म्हणूनच, शाहू महाराज जिवाजी खंडेरावांना दिलेल्या पत्रात ताराबाईंनी 'दुर्बुद्धी धरली' असं स्पष्ट म्हणतात. राजाराम महाराजांचं मन दर्शवणारं हे पत्र असं [2]

"राजमान्य राजेश्री शंकराजी नारायण पंडीत यांसि आज्ञा ऐसी जे राजश्री दादाजी नरसप्रभू देशकुलकर्णी व गावकुलकर्णी देहाये (गाव) तर्फ (तालुका) रोहीडखोरे व वेलवंडखोरे याचे वतन तुम्ही जप्त केले. हे वतन परत देणे. मावळमजकूरी स्वारी येण्याचे पूर्वी वतन दिल्याचा मजकूर लिहीणे. याउपरी वतन न दिल्या हा बोभाटा आल्यास तुमचे अबरूस व पदास धका येईल असे स्वामीस भासत आहे व पुढे नाना प्रकारच्या अडचणी तुम्हांस अशा करणीच्या येतील कारण चिरंजीव (शाहू) कालेकरून (काही काळानंतर) श्री देसी (महाराष्ट्रात) आणील तेव्हा संकटी जी माणसे उपयोगी पडली त्याचा तसनसी (नाश) आम्ही करविल्या हे इकडे यावे त्याचे चित्ती द्वेश यावा (अर्थात शाहू इकडे यावे आणि त्याला माझ्याबद्दल म्हणजेच राजारामांविषयी द्वेष वाटावा) व राज्यकर्त्यास इनसाफ पाहाणे जरूर, त्यात हे तरी अविचाराचे कलम (म्हणजे ही अविचाराची गोष्ट). भलाई जाली ती सारी आमची. एकीकडे जाऊन असी करणी तुम्ही केली यास स्वामीद्रोहाचेच करणे, ते (शाहू) मुख्य, सर्व राज्यास अधिकारी, आम्ही करीतो तरी त्याच्यासाठीच आहे, प्रसंगास सर्व लोकांस तिकडेच पाहणे येईल, व वागतील हे कारण ईश्वरीच नेमले आहे. उगीच भलते भरी न भरणे (उगाच भलत्या  नादाला लागू नका). पुढे उर्जित होय ते करणे. हे न केलिया कामची फळे ज्याचे ते भरतील असी श्रीची इच्छाच असली तरी तुम्ही तरी का समजाल. तरी  नीट चालीने वागणे म्हणजे पुढे सर्वोपरी उर्जिताचेच करण. जाणिजे निदेश (निर्देश=आज्ञा) समक्ष मो। (मोर्तब) असे. 

   तेरीख १७ सफर सु॥ समान                                 रुजू सुरनीस बार
   तिसैन अलफ                                                      बार सूद

असल पत्र सचिवपंतास दिल्हे त्याची नकल ठेविली त्याची नकल"


हे सगळं झालं. पण राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंचं शाहू महाराजांविषयी मत काय होतं ? पुढे दिलेल्या १७ सप्टेंबर १७०७ रोजीच्या एका पत्रात ताराबाईंचा मनोदय स्पष्ट होतो. खरंतर हे पत्र गादीवर असलेल्या शिवाजी महाराज यांच्या नावाने असले तरी यावेळी ते अतिशय लहान असल्याने सर्व कारभार त्यांच्या नावे ताराबाईच करत होत्या हे उघड आहे. या पत्रात समजणारे प्रमुख मुद्दे असे [3] -

१) थोरल्या शिवाजी महाराजांनी खूप कष्ट करून राज्य परिपूर्ण केलं होतं, पण ते संभाजी महाराजांनी विध्वंसून टाकलं, त्यानंतर पुन्हा राजाराम महाराजांनी कष्ट करून नव्याने राज्य संपादिले असं ताराबाईंचं म्हणणं आहे.

२) हे राज्य थोरल्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीतच राजाराम महाराजांना द्यावं असं ठरवलं होतं, त्यामुळे शाहूंचा गादीशी काही संबंध नाही असं ताराबाई म्हणतात. राजाराम महाराजांच्या काळात लिहिलेल्या सभासद बखरीतही असंच काहीसं आहे.

३) शाहूंचा अधिकार नसल्याने त्यांना पकडायला सेनापती आणि प्रतिनिधी पाठवले आहेत, तेव्हा जो कोणी त्यांना सामील होईल त्याचा परिणाम ठीक होणार नाही अशी धमकीही या (आणि अशा इतर सरदारांना लिहिलेल्या) पत्रात आहे.

"स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४, सर्वजीतनाम संवत्सरे आश्विन शुद्ध तृतीया, सौम्यवासरे, क्षत्रियकुलावतांस श्री राजाशिवछत्रपती यांनीं सोमनाईक देसाई व देशकुलकर्णी त|| सैतवडे यांसी आज्ञा केली यैसी जे- राजश्री शाहूराजे ताम्रांचे निर्बंधातून निघाले आहेत, म्हणून हुजूर वर्तमान आले. यैशास हे राज्य थोरल्या कैलासवासी स्वामींनी बहुतां श्रम मेलऊन, सर्वार्थे संपूर्ण केले होते. ते राजश्री संभाजीराजे काका यांणी विध्वंसून कैलासवासी स्वामी राज्याधिकारी झाले. त्यांणी स्वपराक्रमे नूतनच राज्य संपादिले. स्वामींनी त्याचे संरक्षण करून ताम्राचा पराभव केला. राज्याची अभिवृद्धी होत चालली. दुसरी गोष्ट, हे राज्य थोरल्या कैलासवासी स्वामींनी (शिवाजी महाराजांनी) तीर्थरूप कैलासवासी स्वामींस (राजाराम महाराजांना) द्यावेसे ऐसे केले होते. ऐसे असता त्यांस (शाहू महाराजांस) या राज्याशी संबंध नाही. त्या डोहणियांत जे मिळाले आहेत व मिळतील त्यांस नतिजा पावावयाची आज्ञा करून रा|| जयसिंग जाधवराऊ (धनाजी जाधव) सेनापती व हंबीररराव मोहिते सरलष्कर व वरकड सरदारांस फौजेनिशी पाठविले आहेत. रा|| परशुराम पंडित प्रतिनिधी यांसही रवाना केले आहे. ज्यांचे अनुसंधान त्यांकडे (शाहूराजांकडे) त्यांचाही मुलाहिजा होणार नाही, शासन करीत. तुम्ही वतनदार एकनिष्ठ आहां. तुम्हांपासून अन्यसारखी वर्तणूक होणार नाही. परंतु शाहूराजे यांजकडील कागदपत्र तुम्हांस आले असता काही वर्तमान हुजूर लिहिले नाही म्हणजे काय ? त्यांकडून माणूस आले तेच कैद करून पाठवावयाचे होते. ते गोष्टी न केली. यामध्ये बरे काय विचारिले आहे ! याउपरी ऐसे करीत न जाणे. त्यांकडील कागदपत्र घेऊन माणूस येईल तो कैद करून हुजूर पाठवीत जाणे. कदाचित कोण्ही त्यांकडे अनुसंधान लावील, राबता राखेल, तरी त्याचा उबार राहणार नाही. तुम्ही अन्यसारिखा प्रसंग मनात आणाल, कागदपत्र येईल तो पन्हाम कराल, तरी तुमचे बरे होणार नाही. वतनापासून दूर व्हाल हे जाणोन, स्वामींच्या पायाशी निष्ठा धरोन राहोन लिहिलेप्रमाणे वर्तणूक करणे. जाणिजे. मर्यादेयं विराजत. लेखनसीमा. सुरुसुद बार" 

एकूणच, येनकेनप्रकारे शाहू महाराजांना अथवा संभाजी महाराजांच्या वंशाला हि गादी मिळू नये असा ताराबाईंचा मनोदय यातून स्पष्ट होतो. पुण्यश्लोक शिवछत्रपती महाराजांच्या वंशात पडलेली ही दुही अखेरपर्यंत भरून निघाली नाही हे खेदानं सांगावंसं वाटतं. बहुत काय लिहिणे ? 

संदर्भ :
[१] सनदापत्रांतील माहिती, प्रकरण ५, लेखांक ६१
[२] मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १५, लेखांक २८६
[३] मराठी रियासत, खंड ३, पृष्ठ ४१ / करवीर रियासत, पृष्ठ ७९ (आवृत्ती चौथी)


© कौस्तुभ कस्तुरे