Pages

  • छत्रपती शिवाजी महाराज
  • समर्थ रामदासस्वामी
  • पेशवाई
  • मोडी कागदपत्रे
  • संकीर्ण लेख
  • माझी पुस्तके
  • कविता
  • बखरीतील गोष्टी

पेशवे दफ्तर भाग १ : पेशव्यांच्या दफ्तरातील कारभार

पेशवे दफ्तर ! पुण्याला आज 'पेशवे दफ्तराची' जी प्रचंड इमारत उभी आहे त्यातील शाहू दफ्तर, इनाम कमिशन वगैरे काही विभाग बाजूला केल्यास बहुतांशी कागद हे मूळच्या पेशव्यांच्या दफ्तरातील आहेत. मुळात हे पेशव्यांचं, शनिवारवाड्यात असलेलं प्रचंड दफ्तर होतं तरी कसं? त्याचं कामकाज कसं चालायचं? त्या दफ्तरात,, त्या काळी कोणकोणते कागद लिहिले जायचे वगैरे अनेक प्रश्न आपल्याला असतात, पण सहसा ऐतिहासिक कागदांमध्ये हि माहिती एकत्र सापडणे महा कठीण काम. पण सुदैवाने, रावबहाद्दूर दत्तात्रय बळवंत पारसनिसांना पेशवेकाळात या महाप्रचंड दफ्तराचं कामकाज कसं चालायचं याचा एक अखंड कागदच सापडला. हा कागद त्यांनी त्यांच्या 'इतिहाससंग्रह' या मासिकात दोन भागात प्रसिद्ध केला. सदर कागद हा आज अभ्यासकांना नक्कीच उपयोगी पडणारा असल्यामुळे येथे देत आहे -





१ सालवार लिहिणे. मराठी साल धरून लिहीत नसत. मुसलमानी फसली साल धरून लिहीत होते. फसली साल आरंभ, मृग नक्षत्र ज्या दिवसी निघते, तो प्रथम दिवस धरून, दुसरे साली मृग निघे तोपर्यंत अखेर साल. त्यामानाने मुसलमानी बारा महिने अकरा दिवस एक सालांत येतात. असे मानाने साल धरण्याची वहिवाट होती. हे दिवस वारांचे नव्हेत, वाराने ३५४-३५५. 


१ हुजूर पेशवे दफ्तरात प्रथमपासून कागद तयार होत होते त्याचा तपसील :-

१ 'रोजकीर्द' दरएक तारखेचे मोकळे बंद लिहीत असत. यात खाली लिहिलेले प्रकार असतात -

१ रोख पैसे मामलेदार यांजकडून रसद व नजरभेट इतर लोकांकडून व हरएक कामासंबंधी हारकी, गुन्हेगारी, व संस्थानिकांकडून खंडणी सालाबाद येणे ती, व सरंजामदार लोकांकडून दत्तकसंबंधे वगैरे हरएक प्रकारे पैसा आलेला, व दुसरे हरएक कारणाने जो पैसे येतो तो जमा असतो. त्यास 'पोता' असे म्हणत असत. 

१ 'रवासुदगी म्हणजे वर लिहिलेले लोकांकडून रसद व नजर येणे रक्कम पैकी सरकारांस दुसरे लोकांस पैसा देणे असतो, त्या लोकांस वराता देत असतात, ती या सदरात लिहिण्याची चाल आहे. प्रथम अव्वल पेशवाईचे वेळेस सनदापत्रे ही या 'रवासुदगी' सदरातही एखादे वेळेस बार करीत होते. ती वहिवाट पुढे बंद होऊन रवासुदगीत फक्त वराता करून, सनदापत्रे 'दफाते' सदरांत बार होऊ लागली. 

१ 'दफाते' म्हणून एक सादर रवासुदगीचे खाली असते, त्यात सनदापत्रे जी हुजुराहून हरएक प्रकारची होत होती, ती बार करीत होते. सनदापत्रे दोन प्रकारची होत होती. 
१ मुख्य नावाची सनदापत्रे जी होणे ती फडणीसीकडून होत होती. 
१ त्या मुख्य पत्रास साहित्यपत्रे जमीदार व मोकदम व कमावीसदार वर्तमान भावी वगैरे लोकांस जी पत्रे लिहिण्याची ती चिटणीसीकडून होत होती. 

येणेप्रमाणे दोन दप्तरांतून सनदापत्रे होत होती. सनदापत्रांवर फडणीसांची तारीख, व आज्ञा प्रमाण हे चिन्ह मुजुमदार यांचे होत होते, व बारनिसीतही दोघांची चिन्हे वेगळाली अशी होत असत. 'कीजे' ही अक्षरे फडणिसांकडील व 'मुकरर' हे अक्षर मुजुमदार यांचे होत होते. एखादे वेळेस चिटणिशी पत्रे बार न होताही तशीच रवाना होत असत. असे पत्र खरे समजण्यास अक्षर व पद्धत वगैरे पाहून ओळखावे लागते. 

१ जामदारखाना म्हणून सदर असते. या सदरात कापड, रोख खरेदी, किंवा नजर वगैरे आलेले जमा असते. 

१ जवाहिरखान या सदरात जवाहीर, दागिने सोने चांदीचे, व हिरे, पांचू, मोती वगैरे हरएक प्रकारचे जिन्नसवार दागिने जवाहिरखान्यात जमा जालेले या सदरात जमा होत असत.

१ हुजुरचे मुतालिकी शिक्के तयार होत असत. तेही या सदरात जमा धरून लोकांस देत असत. 

या प्रकारे जमेची सदरे साधारण मानाने जमा असत. याप्रमाणे पोतापैकी किंवा जामदारखान्यापैकी अथवा जवाहिरखान्यापैकी लोकांस दिलेला पैसे किंवा कापड व दागिने वगैरे खर्च पडलेले, सदरील जमेप्रमाणे सदरास खाली खर्च लिहीत होते.

१ सरंजामदारास किंवा एखादे ब्राह्मणास इनाम वगैरे दिल्याबद्दल प्रथम मखलासी याद दफ्तरात फडणीसीकडे होत होती. त्या मखलासी यादीवर फडणीसांची तारीख व 'करार' करावे अथवा 'देववावे' अशी अक्षरे खुद्द पेशवे यांची हातची असत. सनदापत्रावर खुद्द शिक्क्याशिवाय सरकारचे हातचे दुसरे चिन्ह काही होत नव्हते. 

१ यादी मखलासीची जाल्यावर सनदापत्रे होत होती. ती कीर्दीत दफात्यास बार होत होती. 

१ सरंजामदार यांस सरंजामास महाल व गाव वगैरे देण्याविसी मखलासी यादी व सनदापत्रे जाली, म्हणजे त्या सरंजामदारास एक तैनात जाबता किंवा एकंदर याद करून हुजूरहून देत असत. त्यात एकंदर जातीस व फौजेस किती आकार द्यावयाचा तो प्रथम आकडा नमूद करुन, त्या बेरजेस दिलेले महालाचा आकार तपशीलवार दाखल असतो. त्यात त्या महालगावचा आकार एकंदर किती, व यापैकी दुमाले, नक्त किंवा गावजमीन वगैरे कोणास किती चालवावयाची ती बेरीज वजा करून, बाकी निव्वळ बेरीज सरंजामास लावून दिल्हेली असे, व त्याखाली कलमबंदीही सरंजामदार यांणी चाकरी कोणते प्रकारे कसकसी करीत जावी यांसमंधे ठरावाची कलमे लिहीत असत.



१ 'बेहेडा खतावणी' म्हणोन एक प्रकारचा कागद प्रत्येक सालात महालवार व इसमवार मोकळे बंडाचे आवर्जे लिहिण्याची वहिवाट होती. हा कागद किर्दीवरून तयार होत असे. यात खाली लिहिलेले प्रकार असतात :- 

१ जे महाल मामलेदार लोकांकडे कमाविसीने असतात, त्या महालासंबंधे रोख वसूल पोत्यास आलेला , 'जमा पोता' म्हणोन, या आवर्जात तारीखवार कीर्दीवरून जमा धरलेला असतो. असाच वराता दिल्हेल्या रकामेच्छाही तपशील रवासुदगी सदरात जमा असतो. त्यास 'परभारे' म्हणूनही सदराचे नाव म्हणण्याची वहिवाट असे. प्रत्येक महालासंबंधे सनदा व ताकीदपत्रे कीर्दीत बार असतात, त्याचाच उतारा या बेहेडा खतावणीस 'दफाते' सदराखाली अनुक्रमे तारीखवार बार होत असतो. एखादे तारखेची कीर्द हरवली असता या बारनिशीचाही उपयोग पडतो.

१ जे महाल सरंजामास दिल्हेले असतात, त्या प्रत्येक महालाचा सरंजामदार मनुष्य वेगळाला असल्यास, प्रत्येक महालाचा आवर्जा निरनिराळा, सरंजाम महाल अमुक, निशाणी अमुक, असे लिहून, त्यात सरंजामदार यांजकडून एकसाली पट्टी व कर्जपट्टी वगैरे हरएक कारणाने नजर वगैरे सुद्धा घेणे ठरलेला पैसा रोख आलेला 'जमापोता' म्हणून जमा असतो; व वराता दिल्हेल्या 'परभारे' म्हणोन सदराखाली दाखल असतात. सरंजामी महालात इनाम वगैरे हरएक प्रकरणाबद्दल संवादापात्रे हुजुरची हरएक सालात जालेली, तारीखवार, अनुक्रमाने, कीर्दीत बार असल्याप्रमाणे, या आवर्ज्यात बार करीत असत.

१ एखादे सरंजामदाराकडे एकाहून अधिक महाल सरंजामास असल्यास, त्या सर्व महालांबद्दल त्या सरंजामदार मनुष्याचेच नावाचा आवर्जा दरएक सालचा होत होता. त्यात वर लिहिल्याप्रमाणे पैसा जमा आल्याबद्दल सनदापत्रे वगैरे जालेली किर्दीप्रमाणे या आवर्ज्यात अनुक्रमाने तारीखवार बार करीत असत.

याप्रमाणे बेहेडा खतावणी म्हणून हिशेब लिहिण्याचा प्रकार असतो.



१ एखादे प्रसंगी स्वारीस एखादे सरदारांस किंवा दुसरे भरवशाचे माणसास पाठविण्याचे जाल्यास, त्याचबराबर प्रसंगानुरूप सनदापत्रे कौल देण्यास मुतालिकीचा शिक्का त्या मनुष्यास देत असत; व त्याचे स्वारीबराबर हुजुरचे दरकदार, फडणीस व मुजुमदार देत असत. त्यांच्या विद्यमानच्या किर्दीही वर लिहिलेल्या पद्धतीप्रमाणे होत असत. ते स्वारीचे काम आटोपल्यावर शिक्का परत देत असत.



१ 'घडणी' म्हणून एक प्रकारचा कागद हुजूर तयार होत असतो, त्याची हकीकत :

१ जे महाल मामलेदार लोकांकडे कमाविसीने दिल्हे असतात, त्या महालांबद्दल प्रत्येक सालाबद्दल आवर्जा मोकळे वर्षाचा लिहीत असत. त्यात हुजूर मखलासी जालेले ताळेबंदाप्रमाणे जमाखर्चाचा तपशील असोन, त्या महालसंबंधी सनदापत्रे हरएक प्रकारची कीर्दीत तारीखवार बार जाली असतात. त्या अनुक्रमाने एकंदर सालांत जालेली पत्रे बार होत असतात.

१ सरंजामदार यांजकडे एका मनुष्याकडे एक महालाहून अधिक महाल असल्यास, त्या सरंजामदाराचे नावचा, अथवा एकच महाल असल्यास त्या महालाचा आवर्जा, याप्रमाणे आवर्जे दरएक शाळांचे होत होते. या आवर्ज्यास सरंजामजाबत्याप्रमाणे जमा महालाची धरून, दुमाले वगैरे जाबत्याप्रमाणे खर्च लिहून, बाकी राहिलेला आकार त्या सरंजामदाराचे नावे लिहीत असत. याशिवाय त्या महालासंबंधी सनदापत्रे जालेली तारीखवार कीर्दीत जशी बार असतात, त्या शेजेने, एकंदर सालात जालेली पत्रे या आवर्ज्यात बार करण्याची वहिवाट होती. यात सरंजामदार यांजकडून पहिले एकसाली वगैरे पट्टी आलेलीही जमा असते.

१ याशिवाय देवस्थान, वर्षासन व खैरात व रोजीनदार व धर्मादाय व इनाम व किरकोळ दफाते व जफ्त मोकळीक व निवाडपत्रे व वतनपत्रे व उत्साहखर्च व श्रावणमासदक्षिणा व हरदासबिदागी वगैरे प्रत्येक कलमाबद्दल एकंदर आवर्जे सलवार निरनिराळे तयार करीत असत. त्यांतही पैसे खर्च पडल्याप्रमाणे महालवार व हुजूरहून दिलेला पैसा तपशीलवार दाखल असतो. व त्या प्रत्येक कालमाबद्दल सनदापत्रे तारीखवार हुजुरचे कीर्दीत बार जालेली असतात. त्याप्रमाणे या आवर्ज्यातही बार होत असत.

याप्रमाणे 'घडणी' हा कागद खतावणीअन्वये मोकळे वर्षाचा हुजूर तयार होत होता.

याप्रमाणे हुजूर कागद तयार होत असतात.



१ खालसा महाल मामलेदार लोकांकडे कमाविसीने दिल्हे त्या महिलांबद्दल हिशेब कसकसे होत असतात त्याचा तपशील -

१ प्रथम कलमात सांगितल्यावेळेस हुजूरहून त्या महालाबद्दल 'आजमास' अथवा 'नेमणूक बेहेडा' मामलेदार यांस हुजुरचे मखलासीसुद्धा शिक्क्यानीसी देत असतात. त्या कागदात प्रथम एकंदर त्या महालचा आकार, पूर्वी ज्या साली जाजती आकार झालेला असतो त्या सालचे आकाराप्रमाणे करून, आकार किती व यापैकी दुमाले गाव व जमिनी किती, कोणाकडे चालावयाच्या, याचा आकार वजा जाता, बाकी निवळ ऐनजमेचा आकार व याशिवाय बलुते, मोहतर्फ़ा, राबता व जकात वगैरे शिवाय जमासुद्धा एकंदर आकार जमा धरून यातून महालमजकुरबद्दल मुशाहिरा, मामलेदार व दरकदार व कारकून व शिबंदीचा खर्च, असा एकंदरबद्दल मुकामचा आकार, व बद्दलमुशाहिरा, देवस्थान, धर्मादाय व रोजीनदार व खैरात वगैरे खर्च सरकारमंजुरीने चालावयाचा तो, असा एकंदर वजा करून बाकी राहिलेले बेरजेपैकी निवळ रसद सरकारांशी किती यावी व व्याज, हुंडणावळ व रसदेचा बट्टा वगैरे मामलेदार यांस मजुरा द्यावयाचा  किती, याचा तपशील अखेरीस केलेला असतो. हा कागद हुजूरहून मखलासी करून मामलेदारांस देतात.

१ नंतर मामलेदार यांणी अजमासाचे धोरणाने साधेल तशी जमा करून, खर्च जो होईल तो तपशीलवार एकंदर कच्चे वहिवाटीचा हिशेब अखेर साली तयार करून, हुजूर पेशवे यांचे फडणिसीदफ्तरांत द्यावा.

१ मामलेदार यांजकडून हिशेब हुजूर आल्यावर, हुजुरचे फडणिसीदफ्तरांत त्या हिशेबाची तपासणी करून नंतर हुजूरदफ्तरी एक ताळेबंद तयार होत होता. त्यात जमेची तपशील व यातून दुमाला गाव वगैरे आजमासांत लिहिलेले वजा करून, बाकी निवळ जमा किती आली, यापैकी खर्च किती, याचा तीन प्रकारचा तपशील असे.

१ आजमासांत न मिळे (अशा) खर्चापैकी जो खर्च होतो, त्यास 'सनदी' असे सदर घालून त्यात बद्दल मुशाहिरा वगैरे सादर घडणीअन्वये खर्च वजा करतात.

१ आजमासांत खर्चाची नेमणूक नाही, परंतु मागाहून हुकुमाने झालेला खर्च, किंवा योग्य कारणाने खर्च जाला असे असल्यास तो खर्च, सरकारमजुरा देत होते. त्या खर्चास मुख्य सादर 'मखलासी होणे' असे लिहून, पोटी तपसीलवार लिहीत होते.

१ योग्य कारणाशिवाय बिगर हुकुमाने मामलेदार यांणी खर्च केला असेल, तो 'गैरसनदी' असे सदर घालून, त्या सदरात तो खर्च लिहीत असत.

येणेप्रमाणे तीन सदरे ज्या ताळेबंदात असतात, तो हुजूरचा ताळेबंद असे समजावे. एकंदर खर्च वजा करून, बाकी येणे राहिली असेल त्यांस दोन सदरे असतात. पैकी एक सदर 'मुलकी बाकी' म्हणजे गावगन्नाकडून येण्याची व दुसरे सदर 'मुलकी बाकी निसबतवार' लोकांकडून येण्याची. अशी एकंदर बाकी येणे त्या बेरजेवर गैरसनदी मंजूर केलेला खर्च मामलेदार यांजकडून भरून घ्यावयाचा, ती बेरीज धरून, एकंदर बाकी येणे काढतात. एखादे महालात मामलेदार यांचे फाजील देणे असे निघत असेल, तेथे त्या फाजिलांत गैरसनदी खर्च वजा करून, बाकी फाजील देणे काढतात. या ताळेबंदावर मखलासी शेरे फडणिसीकडून होऊन, करार खुद्द पेशवे सरकारचे हातचे होत होते. याप्रमाणे प्रत्येक सालचे हिशेब येऊन हुजुरचे ताळेबंद होत असत.

१ मामलेदार यांजकडून हिशेब येतात, त्याजबरोबर एकंदर देवस्थान, वर्षासन वगैरे खर्चाबद्दल 'कबजे' म्हणजे पावत्या व मामलेदार यांस हुजुरची सनदापत्रे  किती गेली, त्यापैकी अंमलात किती आली, व किती अंमलात येणे राहिली, याचा तपशीलवार डफाटे झाडाही हुजूर येण्याची वहिवाट होती.
येणेप्रमाणे महालाचे हिशेब तयार होत असत.




१ याशिवाय पूर्वी लिहिण्याची परिभाषा हल्ली काही समजुतीस येत नाही, अशा समजुतीचा खुलासा :-

१ 'तैनात' म्हणजे सालीना किती नेमणूक द्यावयाची त्याची बेरीज. यांस 'तैनात सालीना' असे म्हणतात. तैनात ही सरंजामी सरदार, शिलेदार, यासच बहुत करून असते.

१ सदरहू तैनातीचे पोटभाग आहेत ते :

१ 'नालबंदी' म्हणजे तैनातपैकी काही भाग आगाऊ खर्चास देणे त्यास म्हणतात. ती नालबंदी जात व फौज सरंजामशाही लागू आहे.

१ 'रोजमुरा' म्हणजे वर्षातून काही वेळाने हप्तेहप्त्याने पैसा द्यावयाचा, त्यास रोजमुरा असे म्हणतात. दीड महिन्यांनी किंवा दोन महिन्यांनी एक वेळ असा रोजमुरा तैनातपैकी देत असत.

१ 'समजावीस' म्हणजे रोजमुरा व नालबंदी वजा जाऊन, बाकी देणे राहिले रकमेचा हिशेब करून, समजूत करीत असत. त्यास सांजवीस असे म्हणत.

१ तैनतीशिवाय कारणपरत्वे श्राध्दपक्षास किंवा लग्नकार्यास वगैरे सरकारांतून बक्षीस देत असत. त्यास 'अर्जबाब' असे म्हणत असत.

१ रोजमुरा व नाकाबंदी जी देत असत, त्यात काही रोख व काही कापड आंख देऊन भरती करीत असत. कापड याचा हिषेब दार रुपयांस २।। आंख किंवा तीन चार अशी मोडणी करून रुपये धरीत असत.

१ 'इजाफत जमा' म्हणजे दुसरे महालांतून वगैरे पैसा खर्चाकरिता आणून जमा करितात, त्यांस म्हणतात.

१ 'मुजाफतखर्च' म्हणजे या महालांतून दुसरे महालाचे मामलेदार वगैरे यांस पैसे देणे, तो 'मुजफतखर्च' असे म्हणण्याची भाषा आहे.

१ 'बालपरवर्षी' म्हणजे लढाईत एखादा मनुष्य पडतो, त्याचे मुलाचे संरक्षणास खर्च, काही रोख अथवा जमीन वगैरे देत असत, त्यास म्हणत होते.

१ 'रांडरोटी' म्हणजे लढाईत पडलेल्या मनुष्याचे बाईकोस निर्वाहाकरिता जमीन अथवा पैसा देत असत, त्यास म्हणत असत.

१ 'स्वारी या सरकारकून' म्हणोन खतावणी व घडणी वगैरेत सदर आहे. त्या सदरांत, अष्टप्रधानाचे नावे ज्या नेमणुका वगैरे खर्ची पडत, त्या या सदराखाली येत होत्या.

१ 'पथके लष्कर' म्हणजे सरंजामी सरदार व शिलेदार शिपाई वगैरे लोकांची जी नेमणूक, त्यास या सदराखाली 'घडणीत' खर्च पडत आला आहे.

१ 'सुभे लष्कर' म्हणजे सेनापती दाभाडे व सरलष्कर गाईकवाड वगैरे मोठे सरदार, 'पथके लष्कर' या सदरापेक्षा जास्ती हुद्द्याचे, या सदरांत दाखल करत होते.

१ 'दरुणी महाल' म्हणजे महाराज सातारकर यांचे राण्यांस वस्त्रे, अलंकार अथवा गांवजमिनी, मोकासे अथवा रोख पैसा पावत होता, तो या सदराखाली खर्च लिहिण्याची चाल होती.

१ 'परदरबार' म्हणोन आवर्जे घडणीत आहेत. परदरबार म्हणजे पेशवे यांचे बरोबरीचे राजांस किंवा त्यांचे वकीलांशी वगैरे , पेशवे यांजकडून ज्या ज्या नेमणुका किंवा जवाहीर, कापड वगैरे पावत होते, ते या सदराखाली लिहीत असत.

१ 'तरजुमा' म्हणजे एकंदर राज्याचा एक हिशेब पेशवे करीत होते, त्यास तरजुमा असे म्हणत होते. या हिशेबांत सर्व राज्यातील हरएक प्रकारच्या उत्पन्नाचा व खर्चाचा दाखल असतो. तो फार करून गोळाबेरजेने असतो. कच्चा तपशील नसतो.



१ पेशवे सरकारांत हुजुरचे कामगार यांजकडे कायकाय कामे होती त्याची हकीकत :-

१ शिवराम कृष्ण खाजगीवाले यांचे घराण्याकडे काम, पेशवे यांच्या सर्व खाजगी खर्चाचा हिशेब ठेवणे व खाजगी खर्चाची सर्व व्यवस्था पाहणे, ही कामे होती.

१ आंबाजी त्रिंबक पुरंदरे व त्यांचे पुत्र माहादाजी आंबाजी व निळकंठराव महादेव व माहादेव निळकंठ यांजकडे दिवाणगिरी व साताऱ्याची मुतालकी होती व पोतनिसी होती.

१ फडणिशीचे काम बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस यांचे आजे जनार्दन बल्लाळ यांजपासून होते. सवाई माधवराव यांचे कारकिर्दीपासून सर्व राज्याचा कारभार नाना फडणीस पाहत होते.

१ मुजुमदार निळकंठ नारायण यांचे घराण्याकडे अखेरपर्यंत मुजुमाचे काम होते.

१ हशम लोकांचे काम शंकराची केशव फडके यांजकडे होते.

१ चिटणिशी सातारकर महाराज यांजकडून जिवाजी खंडेराव वगैरे यांचे घराण्याकडे होती.

१ तोफखान्याचे काम पानसे यांचे घराण्यात माधवराव शिवदेव यांजपासून होते. बाजीराव अखेरपर्यंत.

१ फडणिशीचे काम बाळाजी जनार्दन यांचे आज्यापासून होते. त्यांचे घराण्यात दोन भाग होते -
१ मुकामचे फडणिशीचे काम बाळाजी जनार्दन यांचे बापापासून यांजकडे होते.
१ स्वारी सरकारची मुलुहात जाऊ लागली, म्हणजे स्वारीबराबरचे काम बाबुराव राम व त्यांचे पुत्र मोरो बाबुराव यांजकडे होते. त्यांस तैनात पालखी वगैरे नाना फडणीस यांच्याप्रमाणे होती. नाना फडणीस यांस कैद केल्यावर अजमासें सन १७९९ इसवी साली ते मयत झाले. नंतर काही दिवस, दोन-तीन वर्षे बाळोजी कुंजर यांनी कारभार पहिला. यांस मुतालकी शिक्का बाजीरावसाहेब यांणी दिला होता.

१ पुणे सुभ्याचे काम नारो आपाजी व त्यांचे पुत्र रामचंद्र नारायण यांजकडे बाजीरावसाहेब यांचे अमलापर्यंत होते.



स्रोत : 
इतिहाससंग्रह, अंक ९वा, एप्रिल १९१० आणि अंक १०वा, मे १९१० 
संपादक : दत्तात्रय बळवंत पारसनीस